भारतीय चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते धर्मेंद्र यांचे नुकतेच निधन झाले. भारतीय चित्रपटसृष्टीतील ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र स्वतःच्या शरीरसंपदेबद्दल देखील तितकेच आग्रही होते. त्यानिमित्ताने धर्मेंद्र यांच्या जीवनातील शारीरिक तंदुरुस्तीचा आढावा घेत, त्यांना आदरांजली अर्पण करणारा हा लेख...
अनेक पिढ्यांवर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेता धर्मेंद्र यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीच्या वाटचालीतील एक महत्त्वाचा साक्षीदार हरपला आहे. दि. 8 डिसेंबर 1935 ते दि. 24 नोव्हेंबर 2025 या काळातल्या लाडक्या धर्मेंद्र सिंह देओल अर्थात
धर्मेंद्र यांच्या निधनाने सगळ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. त्यांच्याविषयी आपण जितके लिहू तितके कमीच!
‘धर्मेंदू’ ते ‘ही-मॅन’
ख्यातनाम चित्रपट दिग्दर्शक बिमल रॉय यांनी धर्मेंद्र यांना ‘बंदिनी’त पहिली संधी दिली होती. तेव्हा बिमल रॉय त्याला ‘धर्मेंदू’ म्हणायचे. पण, तो चित्रपट पूर्ण व्हायला वेळ लागला आणि 1966 साली आलेल्या ओ. पी. रल्हन यांच्या ‘फूल और पत्थर’मध्ये धर्मेंद्र हे खऱ्या अर्थाने ‘सोलो हिरो’ म्हणून प्रेक्षकांसमोर आले. याच चित्रपटात त्यांच्यातील ‘ही-मॅन’ची पहिली झलक पाहायला मिळाली.
‘बंदिनी’तील डॉक्टरच्या पात्रापासून ते बॅरिस्टर, चार्टर्ड अकाऊंटंट, बँक कर्मचारी, मनोचिकित्सक, प्राध्यापक, प्रकाशक, संपादक, कवी, कादंबरीकार, उद्योजक, कामगार नेता अशी अनेक पात्रे धर्मेंद्र यांनी अगदी समर्थपणे साकारली. अशा अनेक चित्रपटांत काम करणाऱ्या ‘ही-मॅन’ धर्मेंद्र यांची दणकट शरीरयष्टी प्रेक्षकांच्या नजरेतून कधी सुटत नसे. 1980-90च्या काळात लहान-मोठी मुलं जेव्हा एकमेकांशी दंगामस्ती करत आणि त्यातला कोणी जास्त उस्तादगिरी करत असेल, तर त्याला मोठी माणसं म्हणत की, “काय रे, तू काय स्वतःला धर्मेंद्र समजतोस की काय!”
हृषिदा-‘गुड्डी’वाला धर्मेंद्र
हृषिकेश मुखजच्या 1971च्या ’गुड्डी’ या चित्रपटात धर्मेंद्र यांनी एका चित्रपट कलाकाराची, धर्मेंद्रचीच भूमिका साकारली होती. गुड्डीला चित्रपट स्टार धर्मेंद्र यांच्यावर खूप प्रेम असते, ज्याला ती एक ‘सुपरमॅन’ मानते, जो काहीही चूक करू शकत नाही. त्याची चित्रपटातील प्रतिमा आणि रुपेरी पडद्यामागची प्रत्यक्ष जीवनातील खरी व्यक्ती यात गुड्डी फरक करू शकत नाही आणि ती धर्मेंद्रच्या प्रेमात पडते. तिला आलेले लग्नाचे स्थळ नाकारून ती धर्मेंद्र यांच्याशीच लग्न करायचा हट्ट धरून बसते. गुड्डीला भ्रम आणि वास्तवातील फरक समजावून देणे, हाच तिला धर्मेंद्र यांच्याशी लग्न करण्याच्या वेडापासून दूर करण्याचा एकमेव उपाय आहे, असे तिच्या घरचे ठरवतात. घरची मंडळी धर्मेंद्रशी संपर्क साधतात. त्याच्या मदतीने ते गुड्डीला वास्तविक जग आणि काल्पनिक चित्रपट जगामधील फरक दाखवतात.
या चित्रपटात धर्मेंद्र यांनी स्वतःचीच हळव्या नायकाची भूमिका भूमिका साकारली होती की, जी त्यांच्या सामान्य ‘ही-मॅन’ प्रतिमेपेक्षा वेगळी होती. हृषिदा-‘गुड्डी’वाल्या धर्मेंद्रने चित्रपटातला अभिनेता आणि प्रत्यक्ष जीवनातील अभिनेत्याचे जीवन युवकांसमोर मांडत समाज प्रबोधनपर पात्र साकारले होते.
इट्स द मायलेज...
वास्तविक आयुष्यात धर्मेंद्र हे कवीदेखील होते. जगातील सर्वांत देखण्या पुरुषांमध्ये समावेश असलेला दारूच्या व्यसनावर मात करणारा माणूस होता. तसाच तो स्वतःच्या शरीरसंपदेवर प्रेम करणारा असा होता. चित्रपट क्षेत्रात असताना काही काळ धर्मेंद्र यांनी भारतीय जनता पक्षाकडून वाजपेयींच्या मागणीवरून राजस्थानात खासदारकीचीही कर्तव्ये पार पाडली होती. राजकारणातून धर्मेंद्र परत पडद्यावर दिसले ते 2007च्या ‘जॉनी गद्दार’सारख्या एका हटके सिनेमात. त्यात त्यांच्या टोळीचे सदस्य वयस्क धर्मेंद्र यांच्या क्षमतेवर शंका घेतात, असे दाखवले आहे. तेव्हा धर्मेंद्रचं पात्र त्यांना सांगते, “It's not the age, It's the milage!” अर्थात, “वयावर जाऊ नका; क्षमता लक्षात घ्या.” धर्मेंद्रचा हा डायलॉग ‘रायडर्स ऑफ द लॉस्ट आर्क’ या अमेरिकन प्रसिद्ध चित्रपटातील ‘इंडियाना जोन्स’ या जागतिक प्रवासी पुरातत्त्वशास्त्रज्ञाच्या पात्राच्या तोंडचा आहे. एखाद्या व्यक्तीचे वय कितीही असो, पण त्याने मिळवलेले अनुभव (mileage) हे अधिक मोलाचे असतात.
धर्मेंद्र यांनी 2013 मध्ये भारतातील एका प्रसिद्ध इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या कारकिदबद्दल चर्चा करताना या ओळीचाही उल्लेख केला होता. धर्मेंद्र 89 वर्षांचे झाल्यानंतरही त्याचे ‘मायलेज’ त्यांच्या कारणी लागलेले दिसून आले.
‘ही-मॅन’ची संकल्पना
‘ही-मॅन’ या संकल्पनेचा विचार केला की, लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांच्या डोळ्यांसमोर खेळण्यातील काल्पनिक पात्रं येतात. दूरचित्रवाणीवरील मालिकांमधील ताकदवान पात्र, पुस्तक, चित्रकथा यांतील नायक अशी अलौकिक शक्तिशाली पात्रे सगळ्यांच्या डोळ्यांसमोर येतात. त्यामुळे ‘ही-मॅन’ प्रत्यक्ष मानवी स्वरुपात कसा असेल, हे जाणून घ्यायला सगळेजण उत्सुक असतात. धर्मेंद्र यांनी असे पात्र अनेक चित्रपटांत साकारून चित्रपट प्रेक्षकांचे समाधान केलं आहे.
माझी आठवण...
‘पद्मश्री’ आणि ‘पद्मभूषण’ पुरस्कार सन्मानित डॉक्टर सायरस सोली पूनावाला यांच्या ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’च्या संचालकपदावरील ‘पद्मभूषण’ डॉ. जाल मिनोचर मेहता आणि त्यांच्या पत्नी डॉ. मेहरु जाल मेहता यांच्या पुण्याच्या लाल देवळाजवळील ‘राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था’ अर्थात ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी’च्या (एनआयव्हीच्या) समोरील ‘सरोष भवन’ला मी असताना, आमच्या इमारतीच्या एका मजल्यावर आमच्या शेजारी सुप्रसिद्ध डॉ. राजीव शारंगपाणी यांचे क्लिनिक होते. डॉ. राजीव शारंगपाणी हे डॉ. मेहरु जाल मेहता यांचे शिष्य. धर्मेंद्र हे डॉ. राजीव शारंगपाणी यांच्याकडे ‘सरोष भवन’ला आलेले जवळून बघितल्याचे मला आठवते. आज जेव्हा धर्मेंद्र यांच्या निधनाची वार्ता कळली, तशी मला तेव्हाची आठवण आली. कोणताही व्यायामप्रकार परिपूर्ण नसून, लवचिकतेसाठी जॉगिंग, सायकलिंग अशा सर्व प्रकारांतील व्यायाम स्त्री आणि पुरुष दोघांनीही करायलाच हवा. व्यायामाची सवय लावल्यास आयुष्य आनंदी ठेवता येते, असे आग्रहाने सांगणाऱ्या डॉ. राजीव शारंगपाणी यांचे विचार अंगी बाळगणारे धर्मेंद्र हे शारंगपाणी डॉक्टरांच्या सल्ल्यासाठी जात असे.
जगायला कसे शिकावे?
मृत्यूकडे पाठ करून आणि जीवनाकडे चेहरा ठेवून जगायला शिका. वेळ येईल तेव्हा मृत्यू अटळ आहे; पण तोपर्यंत चांगले जगणे तुमच्या हातात आहे. तुम्ही किती दिवस जगता, यापेक्षा निरोगी किती राहता, हे महत्त्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी कायम शरीर जे सांगेल ते ऐका. आपले शरीर वेळोवेळी आपल्याला अनेक सूचना करत असते. त्या सूचना बारकाईने पाळल्यास तुम्हाला कधीही डॉक्टरकडे जाण्याची किंवा औषधोपचाराची गरज भासणार नाही. तसेच शरीराची हालचाल कमीत कमी करण्याच्या मानवी इतिहासातील नीचांकाकडे आपण झपाट्याने चाललो आहोत. पान का सडले, भाकरी का करपली आणि घोडा का अडला, या प्रश्नांचे एकच उत्तर ‘न फिरवल्याने’ असे ज्याप्रमाणे आहे, त्याचप्रमाणे वजन का वाढले, गुडघे का दुखतात, मान, पाठ का दुखते, हृदयविकार का झाला, रक्तदाब का वाढला, पचन का होत नाही इत्यादी हजारो प्रश्नांचे उत्तर ’योग्य हालचाल न झाल्याने’ असे एकच आहे. या शरीराला सदैव निरोगी, लवचिक ठेवण्यासाठी काय करावे, काय करू नये, याचे विवेचन तज्ज्ञ डॉ. शारंगपाणी करतात. फक्त शरीराचीच नव्हे, तर मनाचीही मशागत करणारे, आरोग्यवर्धनासाठी योग्य-अयोग्यतेचे धडे देणारे डॉ.राजीव शारंगपाणी यांनी हे विचार एका ठिकाणी व्यक्त केले आहेत.
डॉ. राजीव शारंगपाणी हे एम.एस. (जनरल सर्जरी) डिप्लोमा स्पोर्ट्स मेडिसीन (कलोन, जर्मनी) आहेत. 39 वर्षांहून अधिक काळ योगासनांचा आणि वजन उचलण्याच्या व्यायामांचा त्यांचा अभ्यास आहे. शारंगपाणी डॉक्टरांनी अभिनेते, नर्तक अशांसाठी अनेक कार्यशाळा घेतलेल्या आहेत. ‘भारतीय क्रीडा प्राधिकरणा’साठी त्यांनी काम केले आहे. अशा डॉ. राजीव शारंगपाणी यांचा सल्ला घेणारे धर्मेंद्र आपल्या शरीरसंपदेबद्दल नेहमी आग्रही असे.
शरीरसंपदेबद्दल आग्रही
लोणावळ्याच्या बाजारपेठेपासून तीन किमी अंतरावर, तर पुणे-मुंबई जलदगती महामार्गावरून जाता-येताना सिंहगड कॉलेज जिथे दिसते, तिथे औंढे नावाचे एक गाव लागते. त्या गावातील तब्बल 100 एकर शेतजमीन जून 1985 मध्ये धर्मेंद्र यांनी विकत घेतली होती. त्या जागेत सेंद्रिय शेती शिकून घेत धर्मेंद्र यांनी शेतीविषयक विविध उपक्रम राबवले असून, काही जागेत त्यांनी फार्म हाऊस बांधले आहे. त्या फार्म हाऊसमधे पोहण्याचा तलाव, व्यायामशाळेतील उपकरणं वगैरे आणून ठेवलेली आहेत. धर्मेंद्र त्या ठिकाणी अनेकदा मुंबईतून येऊन मुक्काम करत असे. आपल्या आयुष्यातील 20च्या आसपासचा शेवटचा बराचसा काळ त्याने मावळात सुखासमाधानात व्यतीत केला होता. काळ्या आईच्या कुशीत राहून काळ्या आईची मशागत करणारा ‘ही-मॅन’ आपल्या शरीरसंपदेचीही मशागत नित्यनेमाने करत निसर्गात रमत असे.
धर्मेंद्रचा लाडका लेक
धर्मेंद्र यांच्या जाण्याने क्रीडा क्षेत्रानेही दुःख व्यक्त करत सोशल मीडियावरून अनेकांनी श्रद्धांजली वाहिली आहे. सचिन तेंडुलकरने भावनिक पोस्ट शेअर केली आहे. “प्रथम भेटीतच धर्मेंद्र आपल्याला भावले होते,” असे सांगत सचिनने धर्मेंद्रच्या व्यक्तिमत्त्वातील ऊब, दिलदारपणा आणि अप्रतिम ऊर्जा यांची आठवण काढली आहे. “तुला पाहिले की, माझे एक किलो रक्त वाढते, असे धर्मेंद्र नेहमी मजेशीरपणे सचिनला सांगायचे. धर्मेंद्र यांच्या सहवासात क्षणात उत्साह दहापटीने वाढायचा. त्यांच्या जाण्याने मन विषण्ण झाले आहे. आज वाटते की, माझे दहा किलो रक्त कमी झाले,” असे सचिन तेंडुलकर भावूकपणे म्हणाला. धर्मेंद्र यांनीही एकदा विमानप्रवासातील त्यांच्या भेटीनंतर सचिनला ‘माझा लाडका लेक’ असे संबोधत पोस्ट शेअर केली होती.
आर्म रेस्टलर
एक वर्षापूव धर्मेंद्र 89व्या वर्षात प्रवेश करत असताना सार्वजनिक मुलाखतीत त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता की, “आपका पंजा तो अक्षयकुमार और सलमान से बडा है|” (आर्म रेस्टलिंग अर्थात) “पंजा लावण्यात तुम्ही जिंकाल का ते जिंकतील?” या प्रश्नावर हसत धर्मेंद्र उत्तरले होते की, “इस में तो खैर मैं ही जितूंगा|” कदाचित तेव्हा आणि अगदी काल-परवापर्यंत धर्मेंद्र यांनी ‘आर्म रेस्टलिंग’मध्ये जिंकूनही दाखवलं असतं, यात शंका नाही; कारण धर्मेंद्र यांनी स्वतःची शरीसंपदा शेवटपर्यंत उत्तम राखली होती.
अखेरीस पंजा लावण्यास अन्य कोणी नव्हे, तर यमराजाचा खास दूत पाठवण्यात आला होता आणि धर्मेंद्र यांनी थोडे-फार प्रयत्न करत त्याला पराभूत करायचा प्रयत्नही केला होता. पण, शेवटी धर्मेंद्र यांचा हात टेकवून त्यांना पराभूत करत पॅव्हेलियनमधे पाठवण्यात नियती यशस्वी झाली आणि ‘ही-मॅन’ला आपण गमावून बसलो. वेळ येईल तेव्हा मृत्यू अटळ आहे, हे आपणही जाणून आहोत. आपल्याकडे धर्मेंद्र यांच्या मृतात्म्यास सद्गती लाभो, अशी इच्छा व्यक्त करणे, एवढेच आता शिल्लक आहे, तसेच त्याच्या खूप खूप आठवणी...
- श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)
9422031704