अस्थिरतेतून स्थिरतेकडे प्रवास म्हणजे ‌‘भगवद्गीता‌’ : धनंजय गोखले

    01-Dec-2025   
Total Views |

महाभारतामध्ये कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेली गीता म्हणजे भारतीय ज्ञानपरंपरेतील सुवर्णपान! कालौघात अनेक ज्ञानवंतांनी भगवद्गीतेवर अभ्यासपूर्ण भाष्य केले. लोकमान्य टिळकांनी तर ‌‘गीतारहस्या‌’च्या माध्यमातून गीतेतील कर्मयोग भारतीयांना उलगडून सांगितला. आजच्या युगातही भगवद्गीता मानवी उत्कर्षासाठी कशा प्रकारे मदत करू शकते? भगवद्गीतेच्या विचारवैभवाचे आजच्या काळातील आकलन कसे असायला हवे? याविषयी आज गीता जयंतीच्या निमित्ताने प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ, नेतृत्व तसेच व्यवस्थापन कौशल्यावर भारतामध्ये तसेच भारताबाहेर मार्गदर्शन करणाऱ्या धनंजय गोखले यांच्याशी केलेली ही खास बातचीत...

भगवद्गीता ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली मौलिक देणगी आहे. एक शिक्षणतज्ज्ञ म्हणून तुम्ही गीतेकडे कसं बघता?

मला असं वाटतं की, भगवद्गीता ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली केवळ मौलिक देणगी नाही, तर ती मानवी जीवनातील ‌‘फ्रस्ट्रेशन‌’ आणि गोंधळ यावर मात करण्यासाठी आवश्यक असणारे एक माहितीपत्रक (Manual) आहे. शिक्षणतज्ज्ञ म्हणून मी गीतेकडे केवळ तत्त्वज्ञान म्हणून पाहात नाही, तर ती एक ‌‘आनंददायी नाट्यकृती‌’ आहे, जी लोकांना जगण्याचं कौशल्य शिकवते. माझ्या मते, गीता आपल्याला आत शांतता आणि बाहेर उत्कृष्टता यांचे संतुलन शिकवते.
आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगामध्ये भगवद्गीता कशा प्रकारे मानवी जीवनात दिशादर्शक ठरु शकते?

कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) युग हे माहिती आणि डेटाचे युग आहे. ‌‘एआय‌’ आपली कार्यक्षमता (Efficiency) वाढवेल, पण मानसिक अस्थिरता आणि मोह निर्माण करेल; जे आपले आपल्यालाच दूर करायचे आहेत. अशा वेळी भगवद्गीता योग्य दिशा देऊ शकेल. ‌‘एआय‌’मुळे माणसाला माहितीचा आणि पर्यायांचा प्रचंड भडिमार होतो, ज्यामुळे मानसिक गोंधळ वाढतो. गीतेतील बुद्धीत ‌‘समत्व‌’ किंवा ‌‘स्थितप्रज्ञता‌’ ही संकल्पना आजच्या युगातील लोकांना त्यांच्या बुद्धीला स्थिर ठेवण्यास मदत करेल. स्थितप्रज्ञ हेच खरे ‌‘सायबर प्रज्ञ‌’ आहेत, जे माहितीच्या महापुरातही योग्य निर्णय घेऊ शकतात. डेटाच्या ओझ्यामुळे निर्माण होणारे भ्रम आणि संशय दूर करण्यासाठी, गीतेतील अंतिम अवस्था गाठणे अत्यावश्यक आहे. ‌‘नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा स्थितोऽस्मि गतसन्देहः‌’ (मोह नष्ट झाला, स्मृती प्राप्त झाली आणि मी स्थिर झालो, सर्व संशय दूर झाले). गीतेतील हा प्रवास माणसाला खरी शांतता देतो. ‌‘एआय‌’ आपल्याला हवी असलेली उत्तरे देईल, पण कोणते प्रश्न विचारायचे आणि स्वतःच्या जडणघडणीसाठी ‌‘एआय‌’ला प्रश्न विचारायला लावणे, हे माणसालाच ठरवावे लागेल. गीतेतील मूलभूत प्रश्न विचारण्याची मांडणी दिशा देईल, ज्यामुळे ‌‘एआय‌’चा वापर अधिक परिणामकारक होईल.

आपण मध्यंतरी ‌‘अथर्वशीर्ष ते भगवद्गीता‌’ असा एक उपक्रम राबविला होता. त्याविषयी थोडे जाणून घ्यायला आवडेल.

‌‘अथर्वशीर्ष ते फलश्रुती व्हाया भगवद्गीता‌’ हे या उपक्रमाचे सूत्र आहे. हा उपक्रम म्हणजे क्षमता आणि कृती यांचा समन्वय साधणारे एक तंत्र आहे, जे मी गेली काही वर्षे राबवत आहे. मी अथर्वशीर्षाकडे क्षमतांची (Competencies) यादी म्हणून पाहतो. अथर्वशीर्षात सांगितलेल्या 52 क्षमतांचा उपयोग जीवनात कसा करायचा, त्याची कृतीची पद्धत (Recipe or Technique) भगवद्गीता शिकवते. या उपक्रमात मी गीतेच्या सुरुवातीला अर्जुनाची जी स्थिती आहे, तिचा थेट संबंध क्षीण झालेल्या मूलाधार चक्राशी जोडतो. गीतेमधील संवादामध्ये कृष्ण ते मूलाधार चक्र स्थिर करतो. गीतेतील हा प्रवास म्हणजे अस्थिरतेकडून स्थिरतेकडे केलेला प्रवास आहे. ‌‘अथर्व‌’ या शब्दाचा अर्थसुद्धा ‌‘स्थिरता‌’ असाच आहे. ‌‘भ्रमतीव मे मनः‌’ - माझं मन पुरतं गोंधळून गेलं आहे, बुद्धीसुद्धा काम करत नाहीये आणि शरीर तर संपूर्ण हतबल झालं आहे. अशा अवस्थेतून ‌‘नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा स्थितोऽस्मि गतसन्देहः‌’ - कृष्णा, आठवलं रे...आलं सगळं! आता गोंधळ नाही, संशय नाही! एकदम फिट आहे मी. पक्का स्थिर आहे. आता तू सांगशील ते मी करेन, या अवस्थेपर्यंतचा प्रवास आहे.

भारतीय जनमानसात भगवद्गीतेचे वाचन, चिंतन, मनन हे कित्येक शतकांपासून अव्याहतपणे सुरु आहे. मात्र, तुम्ही ज्या वेळेला परदेशात गीताविचार मांडता, तेव्हा त्याला नेमका प्रतिसाद कसा असतो?

गीतेचा विचार मांडताना, मी नेहमीच एक ‌‘युनिव्हर्सल मॅनेजमेंट टूल‌’ म्हणून सादर करतो, ज्यामुळे त्याला जागतिक स्तरावर उत्तम प्रतिसाद मिळतो. परदेशात मी गीतेचा वापर ‌‘व्यवस्थापन‌’ आणि ‌‘नेतृत्व‌’ संकल्पना समजावून देण्यासाठी करतो. अगदी सौदी अरेबिया, कतार, दुबई इत्यादी आखाती देशांमध्येसुद्धा ‌‘प्रोजक्ट मॅनेजमेंट‌’ मधील ‌‘स्टेकहोल्डर मॅनेजमेंट‌’ स्पष्ट करताना, मी लोक 6.9चा वापर करतो.

सुहृन्मित्रार्युदासीनमध्यस्थद्वेष्यबन्धुषु|
साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते॥6.9॥

अर्थात, हितचिंतक, मित्र, शत्रू, मध्यस्थ, द्वेष करणारे, संबंध नसणारे, सर्वांचं कायम वाईटच करणारे, सर्वांचं कायम चांगलंच करणारे आणि नातेवाईक अशा नऊ प्रकारच्या मानसिकतांना तोंड द्यावे लागते. या नऊ प्रकारच्या ‌‘स्टेकहोल्डर्स‌’कडे समबुद्धीने (Equanimity) कसे पाहायचे, म्हणजे यांच्यात अडकण्यापेक्षा काम (project) प्रामाणिकपणे करणे आणि कामाबरोबर प्रामाणिक राहणे, हे या लोकात सांगितले आहे. भारतीय असो वा परदेशी, अर्जुनाचे प्रश्न आपलेच आहेत, हे सत्य आहे. परदेशी लोक गीतेला केवळ अभिमान म्हणून नव्हे, तर एक वापरण्यायोग्य ‌‘लाईफ स्किल‌’ म्हणून स्वीकारतात, ज्यामुळे त्याचा खरा उपयोग होतो.

आजच्या स्पर्धात्मक युगात व्यवस्थापन कौशल्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले दिसते. त्याअनुषंगाने भगवद्गीता आपल्याला काय सांगते?

भगवद्गीता हे आजच्या व्यवस्थापन कौशल्याचे संपूर्ण मार्गदर्शन आहे. गीतेत व्यवस्थापनाचे केवळ उद्दिष्टच नव्हे, तर ते साध्य करण्याची पद्धत (Process) आणि त्यासाठी लागणारी मानसिकता (Mindset) असे दोन्ही स्पष्ट केले आहेत. कितीतरी उदाहरणं देता येतील.

प्रोसेसचे महत्त्व : काम करताना शास्त्राचे (नियम, प्रोसेस) पालन करणे किती महत्त्वाचे आहे, हे गीता सांगते.

तस्माच्छास्त्रं प्रमाणं ते कार्याकार्यव्यवस्थितौ|
ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं
कर्म कर्तुमिहार्हसि॥16.24॥

अर्थात, काय करावे आणि काय करू नये, हे ठरवण्यासाठी शास्त्र म्हणजेच नियम, प्रोसेस हेच तुझे प्रमाण असू द्यावेत. जर प्रोसेस पाळली नाही, तर काय परिणाम होतो, हे स्पष्ट सांगितले आहे-

यः शास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः|
न स सिद्धिमवाप्नोति न सुखं न परां गतिम्‌‍॥16.23॥

अर्थात, जो प्रोसेस सोडून मनमानी पद्धतीने काम करतो, त्याला यश, सुख किंवा पुढच्या संधीसुद्धा मिळत नाहीत.

यशावर परिणाम करणारे घटक : एखादे कार्य यशस्वी होण्यासाठी केवळ ‌‘कर्ता‌’ (Doer) महत्त्वाचा नसतो. यशावर परिणाम करणाऱ्या पाच गोष्टी गीता सांगते.

अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधम्‌|
विविधाश्च पृथक्चेष्टा दैवं चैवात्र पञ्चमम्‌‍॥18.14॥

अर्थात, vision-mission, कर्ता, विविध साधने (इन्स्ट्रुमेंट्स), वेगवेगळ्या क्रिया आणि पाचवे म्हणजे दैव. मागे करून ठेवलेल्या कामांचे परिणाम. तसेच मोठे यश मिळवण्यासाठी सातत्य आणि चिकाटी आवश्यक आहे.

भगवद्गीता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवी, यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न केले गेले पाहिजे?

भगवद्गीता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी सिस्टिमॅटिक नेटवर्क आणि आधुनिक स्वरूपाचा अवलंब करत आहे. केवळ माझ्या व्यक्तिगत प्रयत्नांनी नव्हे, तर ‘Fa. Fe. Fra. Fu. (Family, Fellow, Franchise, Furtive)’ या सिस्टिमॅटिक नेटवर्कच्या माध्यमातून, Associates आणि Ambassadorsच्या मदतीने गेली काही वर्षे शाळा, महाविद्यालये, कॉर्पोरेट्स आणि सेवाभावी संस्थांपर्यंत मी पुस्तके, प्रयोगशाळा आणि कोर्सेस पोहोचवत आहे. मी गीतेला आजच्या पिढीला आवडेल, अशा स्वरूपात सादर करत आहे. ही शिकवण मी वयाच्या 20व्या वषच सुरू व्हावी, यासाठी प्रयत्नशील आहे. ही प्रवचनं नाहीत, तर प्रयोगशाळा आहेत. गीता ही जीवनकौशल्य (Life Skills) म्हणून आणि मुलांच्या दैनंदिन समस्यांशी जोडून (उदा. गणिताची आवड-नावड), गुणांसाठी नव्हे, तर वापरण्यासाठी शिकवावी लागेल. ‌‘अप्लाईड अथर्वशीर्ष‌’ तसेच ‌‘गोष्ट भगवद्गीतेची‌’ या कोर्सेसच्या आतापर्यंत 34 आणि 22 बॅचेस झाल्या आहेत आणि अनेक ठिकाणी सलग काही दिवसांचे कार्यक्रम, नाट्यवाचन, प्रयोगशाळा झाल्या आहेत. Digital Audio-Video Books आणि व्हिडिओ सीरिजच्या माध्यमातून ‌‘कॉफीशॉप भगवद्गीता‌’ या नाटकाच्या रूपातदेखील हा संवाद मी लोकांपर्यंत पोहोचवला आहे.

9967826983

मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.