रा. स्व. संघ शंभरी साजरी करत असताना, संघाचे विरोधक मात्र सातत्याने त्याच्यावर टीका करताना दिसून येतात. त्यात विरोधकांची नित्याचीच टीका म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात संघाचे योगदान काय? संघाच्या अनेक संघ स्वयंसेवकांनी पडेल ते काम करत स्वातंत्र्य लढ्यात हिरिरीने सहभाग घेतला. याचे उत्तम उदाहरण म्हणजे सातार्यातील ‘चले जाव चळवळ’ ठरावी. सातार्यातील विविध भागांतील संघ स्वयंसेवकांचा आंदोलनातील सक्रिय सहभाग होता. त्यापैकीच एक क्रांतिकारक आणि स्वयंसेवक म्हणजे डॉ. शंकर अंबिके. त्यांच्या क्रांतिकार्याचा आढावा घेणारा हा लेख...
संघ स्वयंसेवक डॉ. शंकर अंबिके यांचं योगदान
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ‘भारत छोडो चळवळी’मध्ये योगदान नव्हते, अशी मल्लिनाथी प्रसिद्धीमाध्यमामधून केली जाते किंवा अनेक वेळा कुजबूजही केली जाते. काँग्रेसच्या दबावाखाली काम करणार्या प्रसिद्धीमाध्यमांनी आणि बटिक इतिहासकारांनी स्वातंत्र्य चळवळीचा सर्व फोकस काँग्रेसकडे वळवून, काँग्रेस वगळता इतर क्रांतिकारक आणि इतर संघटनांची सतत उपेक्षाच केली आहे. परंतु, महाराष्ट्रातील स्वातंत्र्य चळवळीच्या काही घटनांचा मागोवा घेतल्यास, राष्ट्रावरील अपार निष्ठा व राष्ट्रहिताशी जुळलेली नाळ असलेल्या संघाचे स्वयंसेवक ‘भारत छोडो चळवळी’मध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभागी झाले होते. सातारा जिल्ह्यातील वडुज येथील महत्त्वपूर्ण घटना त्याची साक्ष आहे. सातारा जिल्ह्यातील वडुज हे गाव स्वातंत्र्य चळवळीचे एक प्रमुख केंद्र होते. वडुजच्या स्वातंत्र्य चळवळीत वडुजचे संघचालक आणि सुप्रसिद्ध वैद्यकीय व्यक्तिमत्त्व डॉ. शंकर अंबिके यांनी अत्यंत मोलाचे योगदान दिले असून, स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण तथा संघ विरोधकांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारी घटना आहे.
वर्ष 1942 मध्ये संपूर्ण भारतभर ब्रिटिश सरकारविरुद्ध ‘चले जाव चळवळी’ची ज्योत प्रज्वलित झाली होती. महात्मा गांधींनी दि. 9 ऑगस्ट 1942 रोजी ‘भारत छोडो’ आणि ‘करा किंवा मरा’चा नारा दिला आणि संपूर्ण देशभरच, इंग्रजांविरुद्ध संतापाची लाट उसळली. संपूर्ण देशाचे वातावरण तापले होते. मुंबईमध्ये सुरू झालेल्या ‘भारत छोडो’ चळवळीने, सातारा जिल्ह्यात उग्र रूप धारण केले. नंतरच्या काळात तेथे प्रतिसरकार उदयास आले होते. क्रांतिसिंह नाना पाटील प्रतिसरकारचे नेते होते. दि. 12 ते 15 ऑगस्ट 1942 या कालावधीत संपूर्ण सातारा जिल्ह्यातील वडुज आणि खटाव, वाई परिसरातील ‘भारत छोडो’ आंदोलन उग्र झाले. ब्रिटिश प्रशासनाने वडुज येथील आंदोलन दडपण्यासाठी बळाचा वापर केला. स्वातंत्र्य सेनानींची धरपकडसुद्धा केली; परंतु आंदोलनाचा प्रभाव काही केल्या कमी होत नव्हता. वडुजचा संग्राम म्हणजे दुसरे जालियनवाला बाग! सातारा जिल्ह्यात वडुज येथे ‘चले जाव चळवळी’साठी विद्यार्थी, शेतकरी व स्वातंत्र्य सैनिक एकत्र आले होते. त्यांनी इंग्रजांविरुद्ध निदर्शने, घोषणाबाजी, बहिष्काराच्या घोषणा दिल्या, सभासुद्धा घेतल्या. तेव्हा ब्रिटिश पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी हालचाली सुरू केल्या; पण जमावाने तो आदेश न पाळता ‘भारतमाता की जय’ आणि ‘चले जाव’च्या घोषणा देत आंदोलन सुरूच ठेवले. ब्रिटिश अधिकार्यांनी जमावावर लाठीमार केला, पण जमाव काही पांगला नाही. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने दि. 13 ऑगस्ट 1942 रोजी दुपारी, पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला.ब्रिटिश पोलिसांनी केलेल्या गोळीबारात काही स्वातंत्र्यसैनिक जागीच ठार झाले, तर असंख्य स्वातंत्र्य सैनिक गंभीर जखमी झाले होते. तेव्हा गोळीबारात जखमी झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांवर उपचार करण्याचे धाडसी काम, वडुचचे संघचालक असलेल्या डॉ. अंबिके यांनी केले. त्यासाठी ब्रिटिश सरकारने त्यांना दंडितसुद्धा केले होते.स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात दुसरे जालियनवाला बाग हत्याकांड म्हणून वडुजची ओळख आहे.
डॉ. अंबिके यांच्यावर ब्रिटिशांची कारवाई
सातारा जिल्ह्यातील वडुज येथे ब्रिटिश सरकार विरोधात 1942 साली ‘चले जाव’ आंदोलन उभे झाले. वडुज व परिसरातील स्थानिक सामान्य नागरिकांनी चळवळीत भाग घेतला. त्यामुळे वडुज ‘चले जाव’-‘भारत छोडो’ चळवळीची ज्योत, सामान्य माणसात प्रज्वलित झाली. जिल्ह्यातील वडुज हे गाव तर चळवळीचे एक प्रमुख केंद्र बनले होते. चळवळीत वडुजचे सुप्रसिद्ध वैद्यकीय व्यक्तिमत्त्व डॉ. शंकर अंबिके यांनी अत्यंत मोलाचे योगदान दिले. डॉ. अंबिके हे पेशाने डॉक्टर असले, तरी मनाने देशभक्त होते. स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात त्यांनी आपल्या दवाखान्याचा वापर देशभक्तीसाठी केला. या आंदोलनामध्ये ब्रिटिशांच्या गोळीबारात जखमी झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांवर, ब्रिटिश सरकारच्या दडपणास न घाबरता त्यांनी उपचार केले होते. त्यांच्यासोबत त्यांच्या घरातील रामचंद्र अंबिके यांचासुद्धा चळवळीत सहभाग होता. यासाठी दोघांनाही ब्रिटिश सरकारने दंडित केले. डॉ. शंकर अंबिके यांना दोन महिने सातारा जिल्ह्यामधून हद्दपार करण्यात आले तसेच, तत्कालीन माहितीनुसार ब्रिटिश सरकारने वैद्यकीय सेवा बंद करण्याचे फर्मान काढले होते. रामचंद्र अंबिके यांनासुद्धा चार महिने स्थानबद्ध करण्यात आले होते.
सातारा जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या गॅझेटमध्येही या दोघांची नोंद आहे. डॉ. हेडगेवार यांनी सातारा जिल्ह्यात संघ सुरू केला. ‘चले जाव चळवळी’च्या काळात काँग्रेसप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघसुद्धा एक चळवळ होती आणि काँग्रेसच्या तुलनेत संघाची शक्ती कमी जरी असली, तरीसुद्धा संघाचे स्वयंसेवक व्यक्तिशः ‘चले जाव चळवळी’त सहभागी झाले होते. काही ठिकाणी प्रत्यक्ष सहभागी होते, तर अन्य ठिकाणी भूमिगत स्वातंत्र्य सैनिकांना मदत करण्याचे कार्य त्यांनी केले आहे. संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांचा वर्ष 1932 मध्ये सातारा जिल्ह्यात प्रवास झाला होता आणि त्यांनी स्वतः कराडचे गणेश आळतेकर यांना, संघचालक आणि उद्धव कुलकर्णी यांची कार्यवाह म्हणून नियुक्ती केली होती. तसेच वर्ष 1935 मध्ये काशीनाथपंत उपाख्य काका लिमये यांची, प. महाराष्ट्र प्रांत संघचालकपदीही नियुक्ती केली होती. सातारा जिल्हात प्रत्यक्ष संघाचे कार्य सुरू झाले, तथा संघकामाचा प्रभावही होता आणि ‘चले जाव चळवळी’त संघाचे स्वयंसेवक सहभागी झाले होते. वाईतील उद्धव कुलकर्णी हे सुद्धा या चळवळीत सहभागी झाले होते. यासाठी ब्रिटिश सरकारने त्यांना शिक्षासुद्धा ठोठावली होती, सातारा जिल्ह्याच्या स्वातंत्र्य सैनिक गॅझेटमध्ये त्यांच्या नावांची नोंद आढळते. तसेच औंधचे संघचालक वेदमूर्ति श्रीपाद सातवळेकर यांनीसुद्धा, स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला होता. त्यांना वयाच्या 100व्या वर्षी, पू. श्री गोळवलकर गुरूजी यांच्या हस्ते सन्मानपत्र देण्यात आले होते. तसेच वर्ष 1966 मध्ये भारत सरकारने, ‘पद्मविभूषण’ प्रदान करून त्यांचा गौरवही केला होता. वाईचे संघचालक दत्तोपंत गोखले यांनीसुद्धा ‘चले जाव चळवळी’त सहभाग घेतल्याचे आढळते.
डॉ. अंबिके म्हणजे राष्ट्रभक्त तथा जनतेचा डॉक्टर
डॉ. शंकर अंबिके हे लोकसेवा, धैर्य आणि देशप्रेम याचे मूर्तिमंत उदाहरण होते. आजही त्यांचे नाव सातारा जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या इतिहासात गौरवाने घेतले जात असून, त्यांच्या नावांचा उल्लेख सातारा जिल्हा स्वातंत्र्यसैनिक नोंदवहीमध्येसुद्धा आहे. तसेच त्यांचे कार्य केवळ वैद्यकीय सेवेत मर्यादित नव्हते, तर समाजाला संघटित करण्याचे आणि राष्ट्रीय एकतेचे प्रयत्नही ते करत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक असल्याने, त्यांच्यातील शिस्तप्रियता, राष्ट्रप्रेम आणि संघटनक्षम नेतृत्व हे संघस्वयंसेवकाच्या ठायी असलेले सर्व गुण त्यांच्याही कृतीमध्ये आढळतात. म्हणूनच त्यांना ‘वडुजचे राष्ट्रभक्त डॉक्टर’ किंवा ‘जनतेचा डॉक्टर’ म्हणून त्यांची ओळख सर्वज्ञात झाली होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही ते समाजकार्याशी अविरत जोडलेले राहिले. त्यांनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण राष्ट्रसेवेला अर्पण करीत, दि. 10 नोव्हेंबर 1993 रोजी आपला देह ठेवला.
- अशोक राणे
9423658385