भारतीय संस्कृतीमध्ये वेदांचे महत्त्व अनन्यसाधारण असेच. वेदांमधील अनेक गुण मानवी विकासासाठी लाभदायक ठरतात. या वेदातील सार एकाच ठिकाणी संग्रहित झाले आहे, असा ग्रंथ म्हणजे ‘नाट्यशास्त्र’. हा ‘नाट्यवेद’ म्हणूनही ओळखला जातो. या नाट्यवेदातील ज्ञानाचाही मानवी आयुष्यावर प्रभाव पडतो. नाट्यवेदाच्या प्रभावाचा मानवी आयुष्यातील नेमक्या कोणत्या अंगावर प्रभाव पडतो, याचा घेतलेला आढावा...
भारतीय संस्कृतीचे वैभव तिच्या प्राचीन वेदांमध्ये सामावलेले आहे. वेदांमध्ये आध्यात्मिक ज्ञानच नसून, नैतिक मूल्ये आणि व्यावहारिक जीवनकौशल्यांचेही शिक्षण मिळते. प्रत्येक वेद मानवी व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकतो. या सर्व ज्ञानाचा कलात्मक अविष्कार म्हणजे नाट्यवेद, अर्थात भरतमुनींचे ‘नाट्यशास्त्र.’ हा असा ग्रंथ आहे जो ज्ञानाला कृतीत, विचारांना अभिव्यक्तीत आणि भावनांना जीवनमूल्यांत रूपांतरित करतो. भरतमुनींनी ‘नाट्यशास्त्रा’ची रचना करताना, चारही वेदांतील सारांश आत्मसात केला. ऋग्वेदातून शब्द आणि संवाद, सामवेदातून संगीत, यजुर्वेदातून अभिनय आणि अभिव्यक्ती आणि अथर्ववेदातून भावना व रस. वेद आपल्याला काय जाणावे हे शिकवतात, तर नाट्यवेद आपल्याला कसे जगावे हे शिकवतो.
नाट्यवेद म्हणजे फक्त रंगभूमीवरील तंत्र नव्हे; तो जीवन समजून घेण्याचा मार्ग आहे. तो भावनिक बुद्धिमत्ता, सर्जनशील विचार, संवाद, सहकार्य, आत्मजागरूकता, सहानुभूती आणि सामाजिक समजही विकसित करतो. त्यामुळे ‘नाट्यशास्त्र’ हे केवळ कलाप्रशिक्षणाचे साधन नसून, जीवनकौशल्यांच्या विकासाचे प्रभावी माध्यम आहे. हे माध्यम प्राचीन ज्ञानाला आजच्या जगात सजीव करते.
हे सगळे सांगण्यामागचे उदिष्ट असे की, बालनाट्यही याला अपवाद नाही. बालनाट्य जर याला लक्षात घेऊन लिहिले, दिग्दर्शित आणि सादर केले, तर त्याचा परिणाम बालकलाकार, विद्यार्थ्यांवर प्रभावशाली होतो. मुलं नाटकातून काय शिकतात विचारण्याऐवजी, ते काय शिकत नाहीत असा मला वैयक्तिक प्रश्न पडतो.
सर्जनशील विचार : नव्या शक्यतांकडे नेणारा दृष्टिकोन
सर्जनशील विचार म्हणजे, समस्यांकडे नव्या नजरेतून पाहणे आणि अभिनव उपाय शोधणे. ही विचारशैली व्यक्तीला ठराविक चौकटीबाहेर नेऊन, नवीन दृष्टी देण्याचे कार्य करते. सर्जनशील विचार व्यक्तीला निर्णयक्षम बनवतो, समस्या सोडविण्याची क्षमता वाढवतो आणि परिस्थितीला लवचिकपणे प्रतिसाद देण्याची कला शिकवतो. काही व्यक्तींमध्ये ही प्रवृत्ती नैसर्गिकरित्या असते, परंतु ती शिकवता आणि विकसितही करता येते. शैक्षणिक प्रक्रियेत प्रयोगशीलता, निरीक्षण आणि कल्पकतेला संधी दिली, तर मुलांमध्ये सर्जनशीलता खुलते. पूर्वी सर्जनशीलता ही फक्त कलाकार, लेखक किंवा संगीतकारांची देणगी मानली जायची. परंतु, आज ती प्रत्येक क्षेत्रात आवश्यक कौशल्य झाली आहे. शिक्षण, व्यवस्थापन, उद्योग, सामाजिक कार्य किंवा दैनंदिन जीवन अशा सर्वच क्षेत्रात तिचे महत्त्व आहे.
सर्जनशीलता म्हणजे मेंदूच्या दोन्ही बाजूंचा संतुलित वापर. डावा मेंदू तर्क आणि विश्लेषणासाठी, तर उजवा मेंदू कल्पकता आणि अंतर्ज्ञानासाठी वापरला जातो. शिक्षणात सर्जनशील विचार वाढविण्यासाठी, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाबाहेर विचार करायला प्रवृत्त करणे आवश्यक आहे. नाट्यशिक्षण, भूमिका, दृकश्राव्य कलाकृती त्याची अनुभवाधारित मूल्यांकनपद्धती, या सर्व उपक्रमांतून सर्जनशीलता बहरते. कॉर्पोरेट जगातसुद्धा सर्जनशीलतेला मोठेच महत्त्व आहे. नेतृत्व करणारी व्यक्ती मीटिंग्ज अधिक रंजक बनवू शकते. उदाहरणार्थ, संवादाची सुरुवात हलक्या प्रश्नांनी किंवा कल्पनाशील चर्चेने करून, टीममध्ये आत्मीयता निर्माण करता येते. हीच वातावरणनिर्मिती संघकार्य आणि नवकल्पनांना चालना देते.
सर्जनशील व्यक्तींचे काही ठळक गुणधर्म असतात. प्रभावी संवादकौशल्य, खुले मन, जोखीम घेण्याची तयारी, विषयाची सखोल समज आणि लवचिकता. अशा व्यक्ती समस्यांकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात आणि त्यामुळेच समाजात त्यांचे विचार परिवर्तन घडवतात. बालनाट्य हे सर्जनशील विचारांचे उत्तम शैक्षणिक साधन आहे. मंचावर विद्यार्थी भूमिका साकारताना कल्पनाशक्ती, निरीक्षण आणि भावनिक अभिव्यक्तीचा वापर करतात. तालमीच्या प्रक्रियेत त्यांना मनाच्या डोळ्यांनी पाहायला शिकवले जाते. म्हणजेच, अदृश्य गोष्टींची जाणीव आणि त्यांचे रूपांतर कलात्मक कृतीत करण्याची कला शिकवली जाते. ही प्रक्रिया केवळ कल्पनाशक्ती नव्हे, तर अंतर्मुख निरीक्षण, भावनिक जुळवणी आणि ध्यानशीलता यांवर आधारलेली असते.
यामध्ये मी मार्गदर्शकाची भूमिका बजावते. विद्यार्थ्यांना कल्पनेतून अभिव्यक्तीकडे आणि अभिव्यक्तीतून कृतीकडे नेण्यास प्रवृत्त करते. अशा नाट्यअनुभवांतून मुले टीमवर्क, आत्मविश्वास, नेतृत्व आणि सर्जनशील विचारांची जोड अनुभवतात.
प्रभावी संवाद : व्यक्त होण्याची आणि जोडण्याची कला
प्रभावी संवाद म्हणजे स्वतःचे विचार, भावना आणि हेतू स्पष्ट, संवेदनशीलपणे आणि आत्मविश्वासाने व्यक्त करण्याची कला. संवाद हा केवळ शब्दांचा खेळ नाही; तो देहबोली, स्वर, भाव आणि ऐकण्याच्या क्षमतेचा संगम आहे. आवाज, बोलणे आणि श्वासनियंत्रण ही संवादाची त्रिसूत्री आहे. योग्य उच्चार, शब्दांची स्पष्टता आणि आवाजातील भावनिक छटा व्यक्तीला आत्मविश्वास देतात. एक प्रभावी वक्ता फक्त बोलत नाही, तो भावना पोहोचवतो. त्याच्या शब्दांत विचारांच्या बरोबर भावनांचेही वजन असते. औपचारिक शिक्षणात या कौशल्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही, पण ते प्रत्येक क्षेत्रासाठी अत्यावश्यक आहे. मग ते शिक्षण असो, नाट्यकला, प्रशासन किंवा व्यवसाय. संवाद म्हणजे द्विमार्गी प्रक्रिया. यामध्ये बोलणे आणि सक्रिय ऐकणे, दोन्ही तितकेच महत्त्वाचे. केवळ ऐकणे नव्हे तर समजून घेणे, प्रतिसाद देणे आणि दुसर्याच्या दृष्टिकोनाची जाण ठेवणे हे सक्रिय ऐकण्याचे लक्षण आहे. यामुळे संवाद अधिक सखोल, प्रामाणिक आणि प्रभावी बनतो.
अमेरिकन मानसशास्त्रज्ञ अल्बर्ट मेहराबियन यांच्या संशोधनानुसार, संवादातील फक्त सात टक्के भाग शब्दांवर, तर 93 टक्के भाग अशब्द माध्यमांवर आधारित असतो. चेहर्यावरील भाव, डोळ्यांचा संपर्क, देहबोली आणि आवाजाचा स्वर हे घटक संदेशाचा खरा प्रभाव ठरवतात. नाटक या अशब्द संवादाच्या सर्व घटकांचा विकास घडवते. मंचावर कलाकाराला शब्द, हावभाव, थांबे आणि नजर यांच्या संयोगातून, अर्थ निर्माण करावा लागतो. त्यामुळे विद्यार्थी संवादाचे तंत्र आणि भावना दोन्ही आत्मसात करतात.
आंतरवैयक्तिक कौशल्ये
नात्यांचे संतुलन आणि सहजीवन : मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. समाजात राहण्यासाठी आणि कार्यक्षम नातेसंबंध टिकवण्यासाठी, आंतरवैयक्तिक कौशल्यांची गरज असते. या कौशल्यांमध्ये संवाद, सहानुभूती, सहकार्य, समन्वय, नेतृत्व आणि संघर्षनिवारण यांचा समावेश होतो.
सहानुभूती: दुसर्याच्या भावना, परिस्थिती आणि दृष्टिकोन समजून घेणे, हे सहानुभूतीचे मूळ आहे. सहानुभूतीमुळे नाते प्रामाणिक आणि दीर्घकाळ टिकणारे बनते. या क्षमतेचा विकास होणे शिक्षक, पालक, कलाकार आणि नेते सर्वांसाठीच महत्त्चाचे असते.
संघकार्य: नाटक या कलेचा आत्मा टीमवर्कमध्ये दडलेला आहे. प्रत्येक कलाकार, तंत्रज्ञ, वेशभूषाकार, प्रकाश आणि ध्वनी संयोजक सर्वांचा सहभाग मिळाल्याशिवाय, सादरीकरण घडत नाही. या प्रक्रियेत मुले जबाबदारी, वेळेचे व्यवस्थापन आणि इतरांच्या मतांचा आदर करणे शिकतात.
सकारात्मक दृष्टिकोन: संघात सकारात्मक विचार ठेवल्यास, प्रेरणादायी वातावरण निर्माण होते. अशी वृत्ती सहकार्य वाढवते आणि तणाव कमी करते. सकारात्मक नेता इतरांना प्रेरित करतो, दोष न दाखवता उपाय सूचवतो.
समन्वय आणि समायोजन : मतभेद हे अपरिहार्य असतात परंतु, त्यांचे निराकरण संवादातून, परस्पर समजुतीतून केल्यास संबंध अधिक मजबूत होतात. नाटकातील संघकार्य हे याचे उत्तम उदाहरण आहे. प्रत्येकाने एक पाऊल मागे घेतले की, एकत्रितपणे मोठे कार्य साध्य करता येते.
संघर्षनिवारण: प्रत्येक संघात विचारभेद असतात परंतु, त्यांना परिपक्वतेने हाताळून संबंध न बिघडवता समस्या सोडविणे, हीच खरी कला आहे. या कौशल्यामुळे संघात विश्वास आणि स्थैर्य निर्माण होते.
प्रेरणा आणि नेतृत्व: नेतृत्व म्हणजे आदेश देणे नव्हे, तर प्रेरणा देणे. एक प्रभावी नेता स्वतःच्या कृतीने इतरांना दिशा दाखवतो. नाटकातील दिग्दर्शक हे त्याचेच प्रतीक आहे, जो संघातील प्रत्येक सदस्याला महत्त्व देतो आणि एकाच ध्येयाकडे नेतो.
लवचिकता आणि अनुकूलता : परिस्थिती सतत बदलते. त्यामुळे बदलांना स्वीकारणे आणि नव्या वातावरणाशी जुळवून घेणे, ही अनुकूलतेची खूण आहे. नाटकात भूमिका, परिस्थिती आणि संवाद बदलतात; त्यामुळे मुलांमध्ये ही गुणवत्ता सहज विकसित होते.
जबाबदारी आणि पुढाकार: स्वतःच्या कृतींची जबाबदारी घेणे आणि गरज पडल्यास पुढाकार घेणे, हे संघाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे. अशी वृत्ती विश्वास आणि आदर निर्माण करते. आंतरवैयक्तिक कौशल्यांचा विकास म्हणजे, या सर्व घटकांचा संतुलित समन्वय. आजच्या गतिमान आणि परस्पर जोडलेल्या जगात, ही कौशल्ये केवळ उपयुक्त नाहीत, तर अपरिहार्यही आहेत.
नाट्यवेद हा केवळ कलाग्रंथ नाही, तर जीवनाचे शास्त्र आहे. तो सांगतो की ज्ञान हे फक्त वाचनाने मिळत नाही; ते अनुभवाने साकारते, अभिव्यक्तीने वाढते आणि सहजीवनाने पूर्णत्वास जाते. नाटक या सजीव कलेच्या माध्यमातून प्राचीन वेदांचे ज्ञान आधुनिक जीवनकौशल्यांत रूपांतरित होते, तेथे विचार ज्ञानात, ज्ञान कृतीत आणि कृती संस्कारात परिवर्तित होते. म्हणूनच, नाट्यवेद हा मानवाला जोडणारा, शिकवणारा आणि घडवणारा ज्ञान आणि जीवनकौशल्यांमधील सेतू असून, बालनाट्य ज्ञानवर्धक, चैतन्याचा झरा आहे.