आज देशात स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून अचाट पराक्रम गाजवत आहेत. सर्वच क्षेत्रांत स्रियांच्या कार्याचे गौरवगान आपणास ऐकायला मिळते. मात्र, आज स्त्रियांना मिळणारे हे स्वातंत्र्य आणि संधी एकेकाळी दुर्लभच होती. समाजातील स्त्रियांची विषण्ण स्थिती आणि भेदाभेदाची परिस्थिती बदलण्यासाठी आजन्म अखंड तैलधाराव्रतासारखे कार्य करणार्या महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या कार्याचा आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने घेतलेला मागोवा...
स्त्रि शिक्षणाबद्दल आस्था असणार्या कुठल्याही व्यक्तीस महर्षी धोंडो केशव कर्वे तथा अण्णासाहेब यांचे नाव माहीत नाही, असे होऊच शकत नाही. कारण अण्णांनी केवळ स्त्रीशिक्षणाची तात्त्विक चर्चाच केली असे नव्हे, तर आपल्या अथक परिश्रमांतून हिंगण्याच्या माळरानावर स्त्रीशिक्षणाचे एक प्रारूप प्रत्यक्ष उभे करून दाखवले. ‘मुलींना कशाला हवे आहे शिक्षण’ असा विचार समाजात सार्वत्रिक रुजलेला असताना, अण्णांनी ‘पैसे कमी असतील, तर एकवेळ मुलांचे शिक्षण थांबवा, पण मुलींना शिकविल्याविना राहू नका,’ असे स्पष्टपणे समाजाला सांगण्याचे धाडस दाखवले.
19व्या शतकाच्या उत्तरार्धात संपूर्ण भारतातच सुधारणावादी चळवळींनी जोर धरला. या काळात भारतात स्थिरावलेली ब्रिटिश सत्ता आणि ती राखण्यासाठी इथे रुजवले गेलेले इंग्रजी पद्धतीचे शिक्षण, या गोष्टी सुधारकी चळवळींना बर्याच अंशी कारणीभूत ठरल्या. घातक सामाजिक रूढींची चिकित्सा नव्या शिक्षणपद्धतीमुळे होऊ लागली. या रूढींपायी भारतीय समाजामध्ये उत्पन्न झालेल्या अनेक समस्यांना सुधारकांनी लक्ष्य केले आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी दीर्घ लढेही दिले. या सर्व सुधारकांमध्ये अण्णासाहेब कर्व्यांचे नाव अग्रस्थानीच घ्यावे लागेल. काळाची गरज असलेले स्त्रीशिक्षणाचे कार्य त्यांनी स्थायी स्वरूपात उभे करून दाखवले, हे त्यामागचे कारण आहेच. पण कर्व्यांच्या दृष्टीचा आवाका लक्षात येण्यास केवळ एवढेच पुरेसे नाही. स्त्रीशिक्षण ही काही महर्षींच्या कार्याची मर्यादा नव्हे. कळत्या वयापासून अण्णांनी विचार केला, तो समग्र समाजहिताचा. आपल्या समाजाबद्दलची आत्मीयता त्यांच्या जीवनात कायमच केंद्रस्थानी होती.
मुरूड फंड
मॅट्रिकच्या वर्गात शिकत असताना आपले मित्र परशुरामपंत दामले यांच्यासह विचारविनिमय करून, अण्णांनी ‘मुरूड फंड’ या अभिनव उपक्रमाची पायाभरणी केली होती. मुरूड या आपल्या मूळ गावातील अथवा मूळ मुरूडमधून इतरत्र स्थायिक झालेल्या ग्रामस्थांनी, गावाच्या विकासकामांसाठी निधी उभा करण्याची ही योजना होती. त्याकरिता या दोघांनी मिळून अनेकजणांना पत्रेही पाठवली, मात्र त्यावेळी या प्रयत्नांना फारसे यश आले नाही. पुढे ‘बीए’ झाल्यानंतर अण्णांनी हे काम पुन्हा हाती घेतले. यावेळी मात्र ही योजना चांगल्या पद्धतीने कार्यान्वित झाली. पुढे 25 वर्षांपेक्षा अधिक काळ ‘मुरूड फंड’ चालू राहिला. सुमारे 125 हून अधिक सदस्य या फंडात सहभागी होते. आपल्या प्राप्तीमधील ‘रुपयाला पै’ इतकी वर्गणी सदस्याने देणे अपेक्षित असे. मुरूडमध्ये राहणार्या आणि नोकरी न करणार्या ग्रामस्थाने वर्षाला किमान आठ आणे इतकी वर्गणी या फंडासाठी द्यावी, अशी अपेक्षा असे. मे आणि नोव्हेंबर महिन्यात ‘मुरूड फंडा’च्या सर्वसाधारण सभा होत आणि त्यामध्ये हिशोब मंजूर करून घेतले जात असत. ‘मुरूड फंडा’मध्ये ब्राह्मणेतर मंडळींचा सहभाग असावा, यासाठी अण्णा खूप आग्रही होते. प्रसंगी, अन्य सभासदांची कटुता पत्करूनही हा विषय त्यांनी लावून धरला होता. या निधीच्या आधारे पुढे अनेक लोकोपयोगी कामे केली गेली. ‘मुरूड फंडा’तूनच पुढे तालुक्यातील सुशिक्षित लोकांची ‘स्नेहवर्धक सभा’ सुरू झाली. पुढील काळात विधवेशी पुनर्विवाह केल्याने, या सभेतून अण्णांना बहिष्कृत व्हावे लागले. पण आपल्या गावाबद्दलची त्यांची आत्मीयता मात्र कधीच संपली नाही.
स्त्रीशिक्षणाचा व्यापक विचार
प्रदीर्घ परकीय सत्तांमुळे भारतात सर्वाधिक मर्यादा आल्या, त्या स्त्रीवर. तिला थोडे-बहुत शिक्षण मिळे, ते घरातूनच. बाकी स्वतंत्र व्यवस्था अशी नव्हतीच. या पार्श्वभूमीवर महर्षी कर्वे यांचे यासंबंधीचे कार्य पाहावे लागेल.
कर्व्यांच्या स्त्रीशिक्षणाच्या कार्याचे तीन टप्पे प्रामुख्याने पाहायला मिळतात. पहिल्या टप्प्यात विचार झाला तो, अनाथ बालिका आणि विधवांना शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचा. म्हणूनच यासाठी स्थापन झालेल्या संस्थेचे नाव ‘अनाथ बालिकाश्रमाची मंडळी’ असेच ठेवले गेले. हे काम सुरू केल्यानंतर काही दिवसांतच, सर्वसामान्य मुलींसाठी शिक्षणाची गरजही अण्णांच्या लक्षात आली आणि दुसर्या टप्प्यात महिला विद्यालयाची सुरुवात झाली. या विद्यालयातही सर्व स्तरांतील अनेक मुली शिक्षण घेण्यासाठी येऊ लागल्या, पण इतके करूनही पुरेसे नाही, असा विचार करून स्त्रीशिक्षणाच्या संदर्भातील तिसरा टप्पा ओलांडला गेला, तो स्वतंत्र महिला विद्यापीठाच्या रूपाने. खरे तर, 1857 सालीच भारतात विद्यापीठांची स्थापना झाली होती, मुंबई विद्यापीठ होतेच. या विद्यापीठांतून स्त्रियांना शिक्षण घ्यायला बंदी होती असे नाही पण, तरीही अण्णा महिला विद्यापीठासाठी आग्रही होते. स्त्रीशिक्षणाबाबतचे आपले विचार त्यांनी आपल्या आत्मवृत्तामध्ये पुढील प्रकारे स्पष्ट केले आहेत,
अ) स्त्रिया म्हणजे मानवजातीचे घटक व स्वत्वविशिष्ट व्यक्ती आहेत, हे ओळखून त्यांना शिक्षण द्यावे
आ)सुपत्नी व सुमाता होण्याची पात्रता त्यांच्या अंगी येईल, असे शिक्षण त्यांना देणे
इ) आपल्या प्रापंचिक जीवनाचा राष्ट्राच्या उन्नती-अवनतीशी अस्फुट असला तरी निकट संबंध आहे हे त्यांच्या नेहमी ध्यानात राहील, अशा प्रकारचे शिक्षण त्यांस देणे
स्वतः पाश्चात्य शिक्षणपद्धतीत शिकलेल्या अण्णांचा हा विचार, पूर्णतः भारतीय असल्याचे यावरून स्पष्ट होते. भारतीय कुटुंबव्यवस्था हा राष्ट्राचा एक महत्त्वपूर्ण आणि आधारभूत घटक असून, या कुटुंबाचा कणा म्हणजे स्त्री आहे आणि म्हणून तिचे स्त्रीत्व विकसित होईल, अशा पद्धतीचे शिक्षण तिला मिळायला हवे, असे त्यांचे चिंतन होते. स्त्रियांच्या समस्यांचा विचार पाश्चात्य धाटणीनुसार तुकड्यामध्ये न करता समग्र राष्ट्रहित डोळ्यांसमोर ठेवून करणे, हे अण्णांच्या चिंतनाचे वैशिष्ट्य होते.
ग्राम शिक्षण
हिंगण्यातील आश्रम आणि विद्यापीठ यांच्या व्यवस्था बर्यापैकी मार्गी लागल्यानंतर, म्हणजे साधारण 1935 सालाच्या आसपास अण्णांची दृष्टी ग्रामशिक्षणाकडे वळली. स्त्रीशिक्षणाची उत्क्रांती अण्णांनी प्रत्यक्ष पाहिली होती. अशीच उत्क्रांती खेड्यांत झाली पाहिजे, असे त्यांना वाटे. त्याच वर्षात ‘केसरी’च्या एका अंकातही हे विचार त्यांनी मांडले होते. या कामासाठी स्वतःच्या निवृत्तिवेतनातून दरमहा रु. 15 इतकी रक्कम त्यांनी बाजूला काढण्यासही प्रारंभ केला. खेड शिवापूर येथे ग्रामोद्धाराचे काम करणारे निवृत्त अभियंता रा. श. बापट यांच्यासोबत, अण्णांनी प्रथम या कामासाठी निधी संकलन करण्याचा प्रयत्न केला. पुढे 1936 साली काही मंडळींसोबत ‘महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ’ ही संस्थाही अण्णांनी सुरू केली. न. चिं. केळकर या संस्थेचे अध्यक्ष, तर स्वतः अण्णा सचिव होते. यावेळी अण्णांचे वय होते केवळ 78 वर्षे!
ज्या गावी सरकारी शाळा अथवा सरकारची मदत मिळू शकणार्या शाळा नसतील, त्या गावांमध्ये प्राथमिक शाळा चालविण्यासाठी सहयोग देणे, हे या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट होते. प्रारंभी दोन शाळांना प्रत्येकी 100 रुपयांची मदत दिली गेली. वाढत्या कामाच्या गरजेनुसार कार्यालयीन कामाच्या व्यवस्थाही लागल्या. 1937 साली या मंडळाच्या मदतीने 20 शाळा चालत होत्या.
अर्थात, पुढे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खेड्यांतील सर्वच शाळांना सरकारी अनुदान मिळू लागले. त्यामुळे हे मंडळ विसर्जित करण्याचा निर्णय घेतला गेला. हे मंडळ सुमारे 11 वर्षे चालले. या मंडळामार्फत संपूर्ण महाराष्ट्रात सुमारे 50 शाळा चालविल्या जात होत्या. विसर्जित होतेवेळी मंडळाकडे असलेली 14 हजार रुपयांची शिल्लक संपेपर्यंत ही मदत संबंधित शाळांना देत राहावी, असे ठरल्याचा उल्लेख अण्णांच्या दैनंदिनीमध्ये आढळतो. अल्पकाळ चालले असले तरी हे काम महत्त्वपूर्ण होते, यात शंका नाही. त्यावेळचे सरकारचे सल्लागार जनार्दन मदन यांनी, अण्णांना मुद्दाम बोलावून घेऊन त्यांच्याशी ग्राम शिक्षणाच्या पुढील योजनांबाबत विचारविनिमय केला होता, यातच या कामाचे महत्त्व लक्षात यावे.
समता संघ
माणसामाणसांमध्ये उत्पन्न झालेले सर्व प्रकारचे भेद संपुष्टात येऊन, अवघ्या मनुष्यजातीत समत्वभाव प्रस्थापित झाला पाहिजे, ही अनेक सुधारकांप्रमाणे कर्व्यांचीही आंतरिक तळमळ होती. इंग्लंडमध्ये असताना फ्रेड्रिक जेम्स गुल्ड यांच्याशी अण्णांचा परिचय झाला होता. गुल्ड यांनी अशाच तळमळीपोटी ‘Society to promote equality’ नावाची संस्था काढली होती. यापासून प्रेरित होऊन अण्णांनी पुढे 1944 सालात ‘समता संघ’ ही संस्था सुरू केली. तत्पूर्वी चेन्नईच्या ‘इंडियन रिव्ह्यू’मध्ये याबाबत एक लेख त्यांनी लिहिला होता आणि या संदर्भात शेकडो विचारवंतांशी चर्चाही केली होती. संघाची स्थूल कल्पना मांडणारे एक पत्रक अण्णा आणि आश्रमाच्या आजन्म सेविका वारुबाई शेवडे यांनी प्रसिद्ध केले. त्यावर सुमारे 100 बुद्धिवंतांनी सह्या केल्या होत्या.
जातिभेद नष्ट करण्यासोबतच धार्मिक क्षेत्रात समता प्रस्थापित करण्यासाठी, अनेक उपक्रम ‘समता संघा’ने राबवले. संघामार्फत ‘मानवी समता’ नावाचे मासिक संघाने आपले मुखपत्र म्हणून सुरू केले. नाममात्र एक रुपया वर्गणी असलेले हे मासिक, संघाच्या घटकांना विनामूल्य पाठवले जाई. यात बरीचशी पदरमोड स्वतः अण्णाच करत होते. रोज सकाळ-संध्याकाळ फिरण्याच्या वेळात, अण्णा या मासिकाची वर्गणी गोळा करीत. ‘समता संघा’चे पुढे हजारो सभासद झाले. दहा वर्षे स्वतंत्रपणे काम करून, ‘समता संघ’ फलटणचे राजे नाईक निंबाळकर यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या ‘जातिनिर्मूलन’ या संस्थेत विलीन झाला. अखेरच्या दिवसांत संधी मिळेल त्या ठिकाणी अण्णांनी मुख्यत्वे सामाजिक समतेचाच विचार मांडलेला पाहायला मिळतो. ‘सामाजिक समतेशिवाय स्वराज्य अपूर्ण आहे,’ असे ते आग्रहपूर्वक मांडत असत.
समारोप महर्षी कर्वे हे मुळातच अत्यंत संवेदनशील आणि कोमलहृदयी व्यक्ती होते. शिवाय, निसर्गतःच अत्यंत तल्लख बुद्धिमत्ता त्यांना लाभली होती. आपल्या समाजाबद्दल, राष्ट्राबद्दल वाटणार्या आत्मीयतेमुळे, या गुणांना एक उदात्त ध्येय मिळाले. 105 वर्षांच्या आपल्या दीर्घ आयुष्यामध्ये अण्णांनी, ही आत्मीयता कधीही क्षीण होऊ दिली नाही. उलटपक्षी, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर नवनवीन आव्हाने स्वीकारून, ती तडीस नेण्याच्या प्रेरणा मिळतील तेथून अण्णांनी स्वीकारल्या आणि व्रतस्थपणे अंगीकारल्या. स्त्रीशिक्षणाच्या त्यांच्या सर्वपरिचित कार्यातही विचार आहे, तो संपूर्ण समाजाचा आणि राष्ट्राचा. कदाचित म्हणूनच त्यांनी उभारलेल्या स्त्रीशिक्षणाच्या कार्यात, कुठल्याही प्रकारचा प्रतिक्रियावाद किंवा तत्कालीन समाजाबद्दलच्या कटुतेचा लवलेशही पाहायला मिळत नाही.
1958 सालात म्हणजेच अण्णांच्या वयाच्या 100व्या वर्षी भारत सरकारने त्यांन, ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला. या सोहळ्यात शाहीर अमर शेख यांनी अण्णांवर लिहिलेल्या काव्यामध्ये पुढील शब्दांत अण्णांचा गौरव केला आहे,
तुजसम कणखर निर्णय घेऊनी
निष्ठुर सेवाव्रत मी घ्यावे
कोपर्यातल्या उदबत्तीगत
परिमल देतच जळत राहावे
या भावना यथार्थ आहेत!
- महेंद्र वाघ