‘ऑपरेशन सिंदूर’ चालूच आहे : माहिती आणि प्रचारयुद्धाचा सामरिक वापर

09 Nov 2025 17:59:39

‘भविष्यातील युद्धात मानवी संपर्ककमी असेल’ असे विधान मध्यंतरी लष्करप्रमुख द्विवेदी यांनी केले होते. त्याचा अनुभव भारताला ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून आला. भारताच्या या मोहिमेनंतर पाकिस्तान आणि पाश्चात्य माध्यमांनी मोठ्या प्रमाणात खोट्या माहितीचा महापूर समाजमाध्यमांत आणला. आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक लेखही खरडले गेले. मात्र, भारतात काही लोक त्यांनाच सहकार्य करत होते. त्यामुळे या माहितीयुद्धात भारत काहीसा मागे पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे हे युद्ध नेमके कसे लढले गेले आणि त्यावर आवश्यक उपाययोजनांचा घेतलेला आढावा...

दि. 30 ऑक्टोबर रोजी प्रकाशित झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका अहवालात, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा संबंध म्यानमारमधील विस्थापित शिबिरांशी जोडण्यात आला. या चुकीच्या दाव्याने जागतिक संस्थांच्या पूर्वग्रहदूषित नजरेचे वास्तव पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. भारताने या अहवालाला संकुचित व असत्याधारित म्हणून फेटाळून लावले. भारताच्या तपासयंत्रणांनी आणि संरक्षण मंत्रालयाने वेळोवेळी दिलेले पुरावे स्पष्टपणे सांगतात की, या हल्ल्यामागे पाकिस्तानातील ‘लष्कर-ए-तोयबा’,‘जैश-ए-मोहम्मद’ यांचाच हात होता.

अशा प्रकारच्या भारतविरोधी अहवालाचे मुख्य कारण आहे की, संयुक्त राष्ट्रसंघाच्या संस्थांना चीनचे असलेले आर्थिक पाठबळ. या संस्थांचा 50 टक्के खर्च चीन करतो. त्यामुळे त्या चीन सांगेल त्याप्रमाणे काम करताना दिसतात. सध्या अशा संस्थांचा आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांचा वापर करून, चीन पाकिस्तानला माहितीयुद्ध जिंकण्यामध्ये मदत करत आहे. मग याला उत्तर देण्यासाठी आपण नेमके करायचे काय?

‘ऑपरेशन सिंदूर’ विरोधात भारतविरोधी प्रचार

युद्ध किंवा सीमावर्ती कारवाई केवळ लष्कराच्या सामर्थ्यावर अवलंबून नसते, तर तिची खरी ताकद जनतेचा पाठिंबा आणि राष्ट्रभावनेने प्रभावित कृतिशील जनताच असते. अशा परिस्थितीत देशाची एकजूट टिकवणे, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. 140 कोटी भारतीय एकमुखाने भारतीय लष्कराच्या पाठीशी उभे असतानाही, काही विरोधकांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्याच नाहीत, अशीही भूमिका काहींनी घेतली! देशाचा शत्रू सीमेपारच नाही, तर भारताच्या आतमध्येही दबा धरून बसला आहे. सीमेबाहेर आणि अंतर्गतही गृहयुद्ध पुकारणार्‍या या असल्या लोकांवर, आता कडक कारवाई होणे गरजेचेच आहे.

भारतात चाललेल्या भारतविरोधी प्रचाराचा उपयोग, पाकिस्तान आणि चीनने माहितीयुद्धात विजय मिळवण्यासाठी पुरेपूर करून घेतला. पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्याने एका पत्रकार परिषदेत आंतरराष्ट्रीय माध्यमांसमोर एक चित्रफित दाखवली. यामध्ये, भारताचे पत्रकार करण थापर हे काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची मुलाखत घेत होते. या मुलाखतीत सत्यपाल मलिक यांनी सांगितले की, “पुलवामामध्ये ‘सीआरपीएफ’च्या जवानांना पाकिस्तानी दहशतवाद्यांनी नाही, तर भारतानेच मारले आणि पाकिस्तानवर खोटे आरोप केले.” पुलवामा हल्ल्याच्यावेळी सत्यपाल मलिक हे काश्मीरचे राज्यपाल असल्याने त्यांच्या विधानाला महत्त्व होते.

पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय माध्यमांसमोर 100 हून अधिक भारतीयांच्या चित्रफिती दाखवल्या आहेत. त्यात काही भारतीय भारतविरोधी भाषा वापरत होते आणि पाकिस्तानची बाजू मांडत होते. हे भारतीय आंतरराष्ट्रीय माध्यमांसमोर पाकिस्तानचे प्रवक्ते म्हणून काम करत हे सिद्ध करत होते की, भारताने दिलेली माहिती चुकीची असून, पाकिस्तानची बाजू सत्य असल्याचे ते प्रमाणित करत होते.

माहितीयुद्धात पाकिस्तानने विजय मिळवला का?

या युद्धात पाकिस्तानने मोठा मानसिक विजय मिळवला का? पाकिस्तानने जगाचे लक्ष दहशतवाद-दहशतवादी हल्ल्यांपासून काढून घेतले आणि भारत आपल्या नागरिकांचे काश्मीरमध्ये रक्षण करू शकला नाही, पाकिस्तानने भारताचे खूप जास्त लष्करी नुकसान केले आहे; युद्धात भारताचा पराभव झाला आहे असा नरेटिव्ह पसरवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. याचा परिणाम असा झाला की, पाश्चात्य माध्यमांनी लिहिलेले लेख किंवा संपादकीये बहुतेक वेळा भारताच्या विरोधात आणि पाकिस्तानच्या बाजूनेच होती. खरे तर, लोकशाही राष्ट्र या नात्याने पाश्चात्य माध्यमांनी भारताचे समर्थन करायला पाहिजे. परंतु त्यांनी पाकिस्तानी लष्कराच्या ताब्यात असलेल्या पाकिस्तानचे म्हणणेच बरोबर आहे, असे सांगितले. पाश्चात्य माध्यमांनी अशा प्रकारची मते बनवण्यासाठी, भारतीयांनी केलेल्या देशविरोधी विधानांचाच पुरेपूर वापर केला.

थोडक्यात, माहिती युद्धात किंवा मानसिक युद्धात भारत खूपच मागे पडल्यचे चित्र आहे. पाकिस्तानला हे मानसिक युद्ध जिंकण्यात मदत करणार्‍यांवर, देशांतर्गत काय कारवाई करायची हे भारतीय जनतेने ठरवायला पाहिजे.

देशविरोधी प्रचाराला आळा घालण्यासाठी उपाययोजना

परदेशातील वर्तमानपत्रांचे अनेक पत्रकार जे भारताच्या विरोधात लिहितात, त्यांची ओळख पटवून त्यांच्याविरुद्धदेखील कारवाई करणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, त्यांच्यावर भारतात बहिष्कार टाकला जाऊ शकतो, त्यांना भारतात येण्यासाठी व्हिसा नाकारला जाऊ शकतो. एवढेच नव्हे तर जे ज्या वर्तमानपत्रात लिहितात, त्या वर्तमानपत्रावरसुद्धा बहिष्कार टाकला जाऊ शकतो किंवा त्यांना भारताच्या आत ‘ब्लॉक’ही केले जाऊ शकते.

भारतविरोधी पाश्चात्य माध्यमांची भूमिका आणि कारणांचा वेध

पाश्चात्य माध्यमांची भारताबद्दलची भूमिका गेल्या काही वर्षांत अधिकाधिक नकारात्मक होताना दिसते. या प्रवृत्तीमागे काही कारणे आहेत, जी भारताच्या वाढत्या सामर्थ्य आणि स्वाभिमानाशी निगडित आहेत.

1. ‘ब्राऊन’ भारताची प्रगती असह्य वाटणे

भारताची झपाट्याने होत असलेली प्रगती, वाढती अर्थव्यवस्था आणि जागतिक पटलावर उंचावणारी प्रतिष्ठा हे अनेक पाश्चात्य माध्यमांना खटकते. शतकानुशतके जगावर आपले वर्चस्व टिकवून ठेवलेल्या श्वेतवर्णीय राष्ट्रांना, ‘अ-श्वेत’ देशाने स्वतंत्र मार्गाने प्रगती करणे आणि प्रभाव निर्माण करणे पचनी पडणारे नाही. त्यामुळे भारताची प्रतिमा कमी करण्यासाठी आणि त्याच्या धोरणांवर शंका निर्माण करण्यासाठी, नकारात्मक कथानक तयार केले जाते.

2. चीनची गुंतवणूक आणि माहिती युद्ध

अनेक पाश्चात्य माध्यमांमध्ये वृत्तपत्रे, टीव्ही नेटवर्क्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्समध्ये चीनची अंदाजे 30 ते 35 टक्क्यांपर्यंत गुंतवणूक आहे. त्यामुळे ही माध्यमे चीनविरोधी काहीही प्रसिद्ध करत नाहीत. चीनने माहितीयुद्धाचा भाग म्हणून, या माध्यमांचा वापर भारताविरुद्ध केला आहे. भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा मलीन करणे, पाकिस्तानच्या बाजूने कथानक तयार करणे आणि भारतीय सरकारवर आंतरराष्ट्रीय दबाव आणणे, हेच उद्दिष्ट यामागे स्पष्टपणे दिसते.

3. मतपेटीचे राजकारण आणि भारतविरोधी कथानक

पाश्चात्य देशांमध्ये विशेषतः अमेरिकेत आणि ब्रिटनमध्ये, काही राजकीय गटांना उग्रवादी किंवा विभाजनवादी मतदारांचा पाठिंबा हवा असतो. या गटांना आकर्षित करण्यासाठी भारतविरोधी लेख, कार्यक्रम आणि चर्चांचा वापर केला जातो. यामागे भारताशी वैचारिक मतभेद नसून, स्वार्थी मतपेटीचे राजकारण दडलेले असते.

4. भारतीय मूळ असलेले पत्रकार : एक विरोधाभास

हे अत्यंत महत्त्वाचे आणि दुर्दैवी आहे की, पाश्चात्य माध्यमांमध्ये भारताविरुद्ध लिखाण करणार्‍या 70 ते 80 टक्के पत्रकारांचे मूळ भारतीयच आहे. हे पत्रकार भारत सरकारविषयी तीव्र असंतोष बाळगतात. काहीजण वैचारिक पूर्वग्रहामुळे, तर काहीजण स्वतःला उदारमतवादी आणि जागतिक म्हणून सिद्ध करण्याच्या अतिरेकी प्रयत्नात, भारताची बदनामी करण्यासही मागेपुढे पाहात नाहीत.

5. एकंदरीत परिणाम : भारताविरुद्ध संगनमत

या सर्व घटकांच्या संगमातून, भारताविरुद्ध एक वातावरण तयार झाले आहे. आर्थिक स्वार्थ, राजकीय हेतू आणि सांस्कृतिक श्रेष्ठत्वाची भावनांमुळे, पाश्चात्य माध्यमांनी भारताची प्रतिमा विकृत करण्याचा उद्योगच उभारला आहे.

आजचा भारत आत्मविश्वासाने जागतिक पटलावर उभा आहे. पाश्चात्य माध्यमांच्या नकारात्मक प्रचारामुळे भारताचा प्रवास थांबणार नाही; उलट या आव्हानातून अधिक मजबूत आणि सजग माहिती-संरचना उभारण्याची प्रेरणा मिळेल. भारताच्या प्रगतीला रोखण्याचे प्रयत्न कितीही झाले, तरी नवभारत आपला मार्ग स्वतःच ठरवेल.

नागरिक म्हणून आपली जबाबदारी : माहितीयोद्धा बना!

अशा युद्धामध्ये देशभक्त नागरिक अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. परदेशातील सोशल मीडिया, प्रिंट मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये जेव्हा जेव्हा भारताच्या विरोधात काही बोलले जाते किंवा लिहिले जाते, त्याला लगेचच प्रत्युत्तर त्या त्या मीडियामध्ये देणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, ‘न्यूयॉर्क टाईम्स’ने जर एखादा भारतविरोधी लेख लिहिला, तर ‘न्यूयॉर्क टाईम्स’ला ई-मेल पाठवून या लेखात केलेल्या माहितीचे खंडन करायला पाहिजे. ‘न्यूयॉर्क टाईम्स’ला दाखवून दिले पाहिजे की, त्यांनी लिहिलेले लेख पूर्णपणे चुकीचे आहेत. आंतरराष्ट्रीय माध्यमांची व्याप्ती प्रचंड आहे. म्हणूनच, प्रत्येक सुशिक्षित भारतीयाने ‘माहितीयोद्धा’ बनून अशा भारतविरोधी लिखाणांवर लक्ष ठेवून त्याला प्रत्युत्तर देणे, अत्यंत महत्त्वाचे आहे.ही जबाबदारी पार पाडण्यासाठी आपण तयार आहोत का? आपण येणारा प्रत्येक दिवस आपली तंत्रक्षमता, युद्धक्षमता अधिक भक्कम करण्यासाठी वापरला पाहिजे.

- हेमंत महाजन
Powered By Sangraha 9.0