न्यूयॉर्कच्या निकालाचा मतितार्थ

09 Nov 2025 16:44:09

भांडवलशाहीवाद्यांचा देश म्हणून प्रसिद्ध असलेल्या अमेरिकेमधील न्यूयॉर्क या प्रसिद्ध शहराच्या महपौरपदावर, साम्यवादी विचारांचे जोहरान ममदानी निवडून आले. अमेरिकेत साम्यवादी विचारांचा नेता निवडून येणे, तसे नवलच! मात्र, या निवडणुकीत ममदानी यांना झालेले मतदान हे आजही न्यूयॉर्कमधील नागरिकांच्या प्राथमिक गरजांची पूर्तता करण्यात राजकारण्यांना अपयश आल्याचे दर्शवते. ममदानी यांनी त्या गरजांना हेरून, त्यांच्या पूर्ततेचे आश्वसन दिल्याने, नागरिकांनी ममदानी यांच्या पारड्यात मतांचे दान टाकले. त्यामुळे ममदानी यांचा विजय हा अमेरिकेतील समृद्धीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे. ममदानी यांच्या विजयातील अन्य काही दुर्लक्षित पैलूंचा घेतलेला आढावा...

मूळ भारतीय वंशाचे, डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जोहरान ममदानी यांनी, न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदाच्या शर्यतीत ऐतिहासिक विजय मिळवला. त्यांनी निवडणुकीत अपक्ष उमेदवार ॲण्ड्य्रू कुओमो यांचा पराभव केला. या विजयासह, ममदानी न्युयॉर्क शहराचे पहिले भारतीय वंशाचे मुसलमान महापौर ठरले आहेत. या विजयाने अमेरिकेतील सर्वांत मोठ्या महानगराचे नेतृत्व, ममदानी यांच्या हाती आले आहे. डेमोक्रॅट ममदानी यांना 50.4 टक्के, ट्रम्पसमर्थित डेमोक्रॅट ॲण्ड्य्रू कुओमो यांना 41 टक्के आणि रिपब्लिकन कर्टस स्लिवा यांना सात टक्के मते मिळाली. डेमोक्रॅट पक्षांतर्गत निवडणुकीत ममदानी यांचा पहिला क्रमांक असल्यामुळे, त्यांना पक्षाने उमेदवारी दिली होती. त्यामुळे नाराज होत ॲण्ड्य्रू कुओमी हे बंडखोरी करीत, स्वतंत्र उमेदवार म्हणून उभे राहिले. रिपब्लिकन पक्षाचे अधिकृत उमेदवार स्लिवा होते. पण ते जिंकण्याची शक्यता नसल्याचे जाणवल्याने, ट्रम्प यांनी डेमोक्रॅट पक्षाचे बंडखोर उमेदवार कुओमी यांना मते देण्यासाठी प्रचार केला. कुओमी यांना त्यामुळे दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली व रिपब्लिकन पक्षाचे अधिकृत उमेदवार स्लिवा तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. हा रिपब्लिकन पक्षाचा दारूण पराभव ठरतो.

भारतीय चित्रपट निर्मात्या मीरा नायर यांचे जोहरान ममदानी हे पुत्र आहेत. दि. 18 ऑक्टोबर 1991 रोजी युगांडातील कंपाला येथे जन्मलेले जोहरान क्वामे ममदानी, हे युगांडाचे महमूद ममदानी आणि मीरा नायर यांचे पुत्र आहेत. त्यांचे बालपण युगांडा, दक्षिण आफ्रिका आणि न्यूयॉर्क शहरात गेले. त्यांनी 2014 मध्ये बोडोईन महाविद्यालयामधून ‌‘आफ्रिकाना स्टडीज‌’मध्ये पदवी मिळवली आहे. त्या अगोदर ‌‘बँक स्ट्रीट स्कूल फॉर चिल्ड्रन‌’ आणि ‌‘ब्रॉन्क्स हायस्कूल ऑफ सायन्स‌’मध्येही त्यांनी शिक्षण घेतले. 2017 मध्ये अमेरिकेच्या ‌’डेमोक्रॅटिक सोशलिस्ट्स गटा‌’मध्ये सामील होऊन, त्यांनी 2020 मध्ये न्यूयॉर्क राज्य असेंब्लीचीही निवडणूक जिंकली होती.

जूनमध्ये झालेल्या डेमोक्रॅटिक प्रायमरीमध्ये माजी गव्हर्नर ॲण्ड्य्रू कुओमो यांना पराभूत केल्यानंतर, ममदानी यांनी आता दुसऱ्यांदा त्यांचा पराभव केला आहे. भाडेदरनियंत्रणासाठी उपाय योजना, परवडणारी बससेवा, मोफत बालसंगोपन आणि अतिश्रीमंतांवरील करवाढ अशी आश्वासने ममदानी यांनी निवडणूक प्रचार करताना दिली होती. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जोहरान ममदानी यांचे प्रतिस्पध असलेल्या उमेदवाराला पाठिंबा दिला. जर कम्युनिस्ट उमेदवार झोहरान ममदानी न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदाच्या निवडणुकीत विजयी झाले, तर शहरासाठी निधी देणार नाही असा इशाराही ट्रम्प यांनी दिला होता.

गरीब, श्रमजीवी, नोकरदार, उपेक्षित, वंचित आदी समाजघटकांतील सामान्यांना भेडसावणारे प्रश्न घेऊन, झोहरान ममदानी यांनी प्रचारात आक्रमक भूमिका घेतली आणि विविध शक्तिशाली सत्ताधाऱ्यांवरच मात केली. भांडवलदारांचे वर्चस्व, निर्वासितांना हीन वागणूक, द्वेषावर आधारलेले राजकारण हेच आजचे वास्तव असल्याचा प्रचार ममदानी करत होते. हतबलता व्यक्त करणाऱ्यांसाठी ममदानी यांनी, एक वेगळाच मार्ग या विजयाच्या माध्यमातून प्रशस्त केला आहे. न्यूयॉर्क शहर महापौरपदाच्या निवडणुकीतील विजयानंतर जोहरान ममदानी यांनी ‌‘एक्स‌’ या समाजमाध्यमांवर पोस्ट केली आहे. ममदानी यांनी सिटी हॉलमध्ये, न्यूयॉर्क सब-वे ट्रेन सुरू होत असल्याचा व्हिडिओ पोस्ट केला. भिंतींवर जोहरान फॉर न्यूयॉर्क सिटी असे लिहिले असून, सिटी हॉल हे महापौरांचे कार्यालय असलेले ठिकाण आहे. जोहरान ममदानी दि. 1 जानेवारी 2026 रोजी, न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.

डेमोक्रॅट पक्षाचे एरिक लेरॉय डम्स हे न्यूयॉर्कचे 110वे कृष्णवण महापौर आहेत. नुकतेच निवडून आलेले 34 वषय झेोहरान ममदानी हेही डेमोक्रॅट पक्षाचेच असून, ते मुसलमान व आशियायी आहेत. त्यामुळे डेमोक्रॅट पक्षाने न्यूयॉर्कच्या अध्यक्षपदाची जागा राखली आहे, ममदानी हे न्यूयॉर्कचे 111वे महापौर असतील. जोहरान ममदानी महापौर होताच ट्रम्प यांनी भविष्यवाणी केली की, आता न्यूयॉर्कमध्ये काहीतरी भयंकर होईल. त्यांनी ममदानी यांच्या नावाचीही खिल्ली उडविली.

जोहरान ममदानी यांच्या पत्नी रामा दुवाजी या आहेत. 28 वर्षांच्या रामा दुवाजी या आता न्यूयॉर्कच्या ‌‘फर्स्ट लेडी‌’ झाल्या आहेत. न्यूयॉर्क शहराच्या त्या सर्वांत लहान ‌‘फर्स्ट लेडी‌’ आहेत. त्यांना कायमच प्रसिद्धीपासून दूर राहणे आवडते. दि. 30 जून 1997 रोजी, ‌‘टेक्सास‌’मधील ‌‘ह्यूस्टन‌’ येथे एका प्रतिष्ठित मुस्लीम परिवारात त्यांचा जन्म झाला. त्यांचे आईवडील सीरियातील दमास्कस येथील आहेत. त्यांचे वडील संगणक अभियंता असून, आई डॉक्टर आहे. अमेरिकेत जन्मामुळे धर्म ठरत नाही, तर वयाच्या 18व्या वष व्यक्ती आपला धर्म ठरविते. त्यामुळे रामा यांचा धर्म कोणता याबद्दल अजून फारशी माहिती नाही. पाकिस्तानमध्ये त्यांचा धर्म कोणता आहे, याबद्दल शोधाशोध सुरू आहे. त्या इस्लाम धर्माचे पालन करतात, असे इन्स्टाग्राममधील माहितीनुसार कळते. त्यांचा निकाहही झाला आहे. आता त्या ‌‘शिया‌’ आहेत की, ‌‘सुन्नी‌’ याची चौकशी केली जात आहे. रामा यांनी ‌’इलस्ट्रेशन‌’ विषयात मास्टर्सची पदवी संपादन केली आहे. रामा दुवाजी पॅलेस्टाईनच्या कट्टर समर्थक आहेत. इस्रायल गाझापट्टीत कसा अमानवीय वर्तन करीत आहे, हे दाखवणारे एक ॲनिमेशनही त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम खात्यावरुन सार्वजनिक केले होते. त्यामध्ये हाती एक कटोरा घेऊन उभी असलेली महिला दाखविली होती. ममदानी यांचा विजय जाहीर होताच, न्यूयॉर्कमध्ये मीरा नायर यांच्या ‌‘कामसूत्र‌’ चित्रपटातीलही दृश्ये दाखविली गेली. या चित्रपटावर भारतात बंदी घातली गेली होती.

मध्यममाग कल्याणकारी राजकारण भारताला आणि जगालाही नवीन नाही; परंतु अमेरिकेत त्याला आत्तापर्यंत जनाधार मिळाला नव्हता. प्रभावहीन झालेला डेमोक्रॅटिक पक्ष ममदानी विचारस्वातंत्र्य आणि सर्वांना समान न्याय हा उदारमतवादी विचार हे धोरण स्वीकारेल, तरच त्याला अमेरिकेच्या राजकारणात दमदारपणे प्रवेश करता येईल, हे स्पष्ट झाले आहे. ट्रम्प यांचा पराभव करण्याचे सूत्र ममदानी यांच्या विजयाने डेमोक्रॅट पक्षाला प्राप्त झाले आहे, असे म्हणता येणार नाही. याची काही कारणे आहेत. पहिले असे की, न्यूयॉर्क हा डेमोक्रॅट पक्षाचा प्रभाव असलेला मतदारसंघ आहे. या मतदारसंघात डेमोक्रॅट उमेदवारच वर्षानुवर्षे जिंकत आला आहे. यात कृष्णवणय सुद्धा आहेत. त्याच मतदारांनी यावेळी एका मुसलमानाला, पक्षनिष्ठेला अनुसरून विजयी केले आहे. दुसरे असे की, न्यूयॉर्कमध्ये स्थलांतरीत फार मोठ्या प्रमाणात आहेत. ते अतिउजव्या रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवाराला कधीही जिंकू देणार नाहीत. अमेरिकेच्या प्रगत भागातच म्हणजे कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क आदी भागातच डेमोक्रॅट पक्षाला भरभरून मतदान होत असते. या भागात स्थलांतरितांचे प्रमाणही तुलनेने अधिकच आहे. ग्रामीण अमेरिकेतील लोक आजही सनातनी वृत्तीचे असून, हा भाग ट्रम्प यांचा बालेकिल्ला आहे. या निकालाने या बालेकिल्ल्यावर फारसा परिणाम झालेला नाही. काही ठिकाणी तर उलट परिणाम होऊन, पारंपरिक विचारधारा अधिक दृढ होण्याचीही शक्यता आहे.

एक गोष्ट मान्य केली पाहिजे ती ही की, ममदानी यांना शहरी अमेरिकेच्या आणि न्यूयॉर्कच्या बहुसांस्कृतिक वैशिष्ट्यांचा लाभ झाला. त्यांची आई प्रख्यात चित्रपट दिग्दर्शिका मीरा नायर या भारतीय, वडील महमूद ममदानी हेही मूळ भारतीय वंशाचेच होते, पण जोहरान यांचा जन्म आफ्रिकेतील युगांडामधला. अशा प्रकारे आशियाई आणि आफ्रिकी समुदायाचा वारसा जोहरान यांना लाभला आहे. 9/11च्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेत इस्लामविरोधी वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे इस्लाम धमयांसाठी राजकीय वाटचाल सोपी राहिलेली नव्हती. ममदानी यांनी याच श्रमिक, निर्वासित, विविध उपेक्षित वांशिक घटक यांची भाषा आत्मसात केली. या भाषेचा वापर करीत ममदानी यांनी, उपेक्षित घटकात आपल्याबद्दल विश्वास निर्माण केला. गेली कित्येक वर्षे डेमोक्रॅट्स पक्षाचा महापौर असलेल्या न्यूयॉर्कचा अर्थसंकल्प सुमारे 120 अब्ज डॉलर्स असूनही, तेथील 25 टक्क्यांहून अधिक लोक सुखसुविधांपासून दुर्लक्षितच होते. त्यांना घराचे भाडेही परवडत नव्हते, आरोग्य सुविधा मिळत नव्हत्या. मूळ शहरापासून दोन ते तीन तासांच्या अंतरावर ते राहतात आणि रोज ये-जा करतात. त्यांची ही वाहतूकसेवा मोफत करण्याचे आणि परवडेल अशा पैशांत आरोग्यसेवा देण्याचे आश्वासन ममदानी यांनी दिले. तसेच घरभाडे वाढू न देण्याचे आश्वासन देऊन ममदानी यांनी, या घटकांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. यामुळे त्यांच्यावर सर्व बाजूंनी टीकाही झाली. ट्रम्प यांनी त्यांना ‌‘कम्युनिस्ट‌’ संबोधले, तर त्यांच्या धर्मांकडे बोट दाखवून करून काहींनी 9/11 सारख्या घटनांच्या आठवणी जाग्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जिंकू नये, यासाठी ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक, परंतु बंडखोरी करून लढणाऱ्या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला. विजयानंतर न्यूयॉर्कमधील सत्ता तेथील बलाढ्य धनाधीशांच्या हातात होती, ती सत्ता ममदानी यांनी आता सामान्यांकडे आल्याचे विचार मांडले. यावेळी ममदानी यांनी भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलेल्या ‌‘नियतीशी करार‌’ या भाषणाचा उल्लेखही केला.

अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्ष हा कर्मठ आणि भांडवलदारवादी नाही, तरी अमेरिकेत साम्यवाद आणि समाजवाद हे शब्द चालत नाहीत. अमेरिकेला महान बनविण्याचे ट्रम्प यांचे धोरण लोकानुनयाचे आहे, तेही मूलभूत समस्यांचे निराकरण करीत नाही. राज्य लोककल्याणकारी असावे, ही संकल्पना आज जनतेला भावत आहे. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य यावर भर देणारी शासनव्यवस्था, आज लोकांना सुरुवात म्हणून हवी आहे. ममदानी यांनी अशा शासनव्यवस्थेचा आग्रह धरताच, लोकांनी त्यांच्या पारड्यात भरभरून मते टाकली.

ममदानी न्यूयॉर्कमध्ये तर व्हर्जिनियाच्या लेफ्टनंट गव्हर्नरपदी गझाला हाशमी या निवडून आल्या. त्या दक्षिण आशियई अमेरिकी मुस्लीम आहेत. ट्रम्प यांनी मुस्लीम देशांवर लावलेल्या प्रवासबंदीमुळे, गझाला हाशमी यांनी राजकारणात प्रवेश केला व डेमोक्रॅट पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. ममदानी हे मुस्लीम आहेत, स्थलांतरित आहेत, त्यांची आई भारतीय आहे, वडील आफ्रिकी भारतीय मुसलमान आहेत, ते साम्यवादी विचारसरणीचे समर्थक आहेत, ते इस्रायलवर कठोर शब्दांत टीका करतात या बाबी नोंद घ्याव्या अशा आहेतच, यात शंका नाही. पण त्यांचे असे असणे, हे त्यांच्या विजयाचे कारण नाही. ते विजयी झाले, कारण त्यांनी न्यूयॉर्कमधील जनतेच्या प्रश्नांना उचलून धरले. विषमता, बेरोजगारी आणि महागाई हे अमेरिकेत आज सामान्यजनांना सतावणारे प्रश्न आहेत. गठ्ठा मतांचा फायदा त्यांना काही प्रमाणात त्यांना झाला असेलही, पण ते त्यांच्या विजयाचे कारण नाही. ट्रम्प यांच्या अनुदार व लहरी धोरणाला सामान्य आणि विचारी अमेरिकन नागरिकांनी झिडकारले, ही बाब महत्त्वाची आहे. असे नसते तर, केवळ अल्पसंख्याकांच्या मतांच्या भरवशावर ममदानी यांचा विजय झाला नसता. विषमता, बेरोजगारी आणि महागाई आदी मुद्दे आज जगातल्या सामान्य मतदारांना महत्त्वाचे मुद्दे वाटत आहेत, हे अमेरिकेतील राजकारण्यांनी ध्यानी घ्यावयास हवे. मतदारांना उमेदवारांमधली इतर वैशिष्ट्ये व वैगुण्ये महत्त्वाची वाटेनाशी झाली आहेत, हेही लक्षात घ्यावयास हवे. ममदानी यांचे साम्यवादी व मुसलमान असणे या मुद्द्यांची मतदारांना नोंद घ्यावीशी वाटली नाही, या बाबीचीही नोंदही अमेरिकेतील राजकारण्यांनी घ्यावयास हवी. आंतरराष्ट्रीय पातळीवर विचार केल्यास एखाद्या मोठ्या शहराचे महापौरपद हे काही खूप मोठे पद नाही. पण ते शहर न्यूयॉर्क असेल आणि अमेरिकेतले असेल तर? त्या शहरात घडणाऱ्या प्रत्येक घटनेची चर्चा जगभर होईल. तशी ती झाली, तर त्यात काहीही वावगे नाही. न्यूयॉर्कमधील मतदारांच्या लेखीही अजूनही अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या प्राथमिक गरजांच्या पूर्ततेची समस्या असून, त्या प्रथम क्रमांकाने पूर्ण व्हावयास हव्यात हाच या निवडणुकीच्या निकालाचा अन्वार्थ.

- वसंत काणे
9422804430
Powered By Sangraha 9.0