अहमदाबाद : (Gujarat ATS) गुजरातमधील दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) रविवार दि. ९ नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथील अडालज येथून दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या तीन जणांना अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून एटीएस (Gujarat ATS) पथक या तिघांवर लक्ष ठेवून होते. आज अखेर त्या तिघांना अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर गुजरात एटीएस (Gujarat ATS) पथकाने केलेल्या तपासात हे तिघेही 'ISIS'साठी काम करत असल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात दहशतवाद निरोधक पथकाला अहमदाबादमधील अडालज परिसरात दहशतवादी कट रचला जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार छापेमारी करत गुजरात एटीएसकडून तिघांना अटक करण्यात आली. अटकेतील दोन आरोपी उत्तर प्रदेशातील रहिवासी असून तिसरा आरोपी हैदराबादचा आहे. हे तिघे मिळून देशातील विविध ठिकाणी दहशतवादी हल्ले घडवण्याच्या तयारीत होते. तसेच, ते शस्त्रे मिळवण्यासाठी गुजरातमध्ये आले असल्याचेही म्हटले जात आहे.
गुजरात एटीएसने (Gujarat ATS) माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, आरोपी २० ते २५ वयोगटातील असून, ते भारतात दहशतवादी हल्ल्यांचा कट रचत होते. या दहशतवाद्यांना विशिष्ट आणि संवेदनशील ठिकाणांना लक्ष्य करण्याचे निर्देश देण्यात आले होते. तपासात असेही समोर आले आहे की ते सीमेपलीकडे असलेल्या दहशतवाद्यांच्या देखील संपर्कात होते. त्यासोबतच, त्यांच्या ताब्यातून २ ग्लॉक पिस्तुल, १ बेरेट्टा पिस्तुल, ३० जिवंत कारतूस आणि ४ लिटर कॅस्टर ऑइल असा साठा जप्त करण्यात आला आहे.