प्रवास आत्मजागृतीचा...

09 Nov 2025 18:34:48

या देशावर परचक्राच्या असंख्य स्वार्‍या झाल्या. त्यांच्या आक्रमणांमुळे देशाची सामाजिक, सांस्कृतिक हानी मोठ्या प्रमाणात झाली. देशातील हिंदूंमध्येच भदभावाचे बीज रोवण्यात ही परचक्रे यशस्वी झाली. याचा परिणाम देशाच्या प्रगतीवर दीर्घकाल झाला. मात्र, रा. स्व. संघाच्या माध्यमातून हिंदू संघटनाला दिलेले महत्त्व, देशाच्या प्रवासात सामाजिक आणि सांस्कृतिक आघाडीवर त्याचा झालेला सकारात्मक परिणाम यावर भाष्य करणार्‍या पुस्तकाचा घेतलेला मागोवा...

हजारो वर्षे इथे राहणार्‍या हिंदू समाजात शतकानुशतके झालेल्या बाह्य आक्रमणामुळे आणि कालपरत्वे आंतरिक भेदांमुळे, अनेक प्रकारचे दोष निर्माण झाले. इथला हिंदू समाज संघटित नसल्यानेच हे दोष निर्माण झाल्याचे, डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी ओळखले. म्हणूनच हिंदूंना संघटित करण्यासाठी त्यांनी तरुणांना दिलेली हाक म्हणजे ‘हिंदू युवका उठ पेटूनी’. एकेकाळी गौरवशाली असलेला भारत काही दोषांमुळे वारंवार पारतंत्र्यात गेला, देशातील समाजव्यवस्था ही अव्यवस्था झाली. त्यामुळेच स्वातंत्र्य आणि पारतंत्र्याचा लपंडावही सुरू झाला. तात्पुरतं स्वातंत्र्य मिळवायला सगळेच पुढे येतात, पण या दोषांचे समूळ निर्मूलन करणे म्हणजे, समर्पणाची आणि संयमाची परीक्षाच असते. कारण, कोणताही समाज बदल स्वीकारायला लगेच तयार होत नाही. त्या बदलासाठी नित्य कार्य आणि खूप मोठा काळ जावा लागतो. मोहन अत्रे या स्वयंसेवक लेखकाने पुस्तकाच्या एका प्रकरणात, डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या सत्याग्रही जीवनकार्याचा आणि संघाची स्थापना का करावी लागली? याचा सखोल आढावा घेतला आहे.

डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांना जाणवले होते की, असंगठीत हिंदू समाज हेच समाजातील सर्व दोषांचे एकच मूळ कारण आहे. हिंदूचे संघटन केले तर बाकीचे दोष आपसूकच निघून जातील, यासाठीच त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या हिंदू संघटनेची स्थापना केली. संघसंस्थापक डॉ. हेडगेवार अजात देशभक्त होते. डॉक्टरकीच्या शिक्षणासाठीदेखील त्यांनी कोलकाता हेच ठिकाण निवडण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, मोठ्या प्रमाणावर तिथे असलेले क्रांतिकारक. वैद्यकीय शिक्षणाच्या काळात त्यांचा अनेक क्रांतिकारकांशी प्रत्यक्ष संपर्क आला. त्यामुळेच शिक्षणानंतर नागपूरला आल्यावर त्यांनी, राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सक्रिय सहभाग घेऊन तुरुंगवासदेखील भोगला. तुरुंगात असतानाच त्यांनी देशावर आलेल्या सततच्या परचक्रावर सखोल चिंतन केले. या चिंतनाचे फलित म्हणजेच रा.स्व. संघाची स्थापना होय. मोहिते वाड्याच्या मैदानावर शारीरिक कसरतींसाठी येणार्‍या बाल-तरूणांच्या समोर हिंदू संघटन, हिंदुत्व, हिंदू राष्ट्र यावर भाषणे देण्यापेक्षा, त्यांनी व्यायामाबरोबरच कळत नकळत राष्ट्रभक्तीचे संस्कार रूजावेत, भारतमातेविषयी त्यांच्या मनात असीम श्रद्धा निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न केले. शाखेत होणार्‍या निरनिराळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून स्वयंसेवकांची शारीरिक, बौद्धिक, मानसिक, सामाजिक, राष्ट्रीय विचारांची जडणघडण होत असे. थोडक्यात ‘संघ म्हणजे शाखा, शाखा म्हणजे कार्यक्रम’ हे पहिले विचारसूत्र डॉ. हेडगेवार यांनीच रा.स्व.संघात दृढ केले.

भारतीय दृष्टिकोनातून धर्मनिरपेक्षता आणि धर्मस्वातंत्र्य याची लेखकाने त्याच्या पुस्तकात सुस्पष्ट उकल केली आहे. धर्मनिरपेक्षता म्हणजे स्वतःच्या धर्माला कमी लेखणे नाही, तर स्वतःचा धर्म जपून अन्य धर्मांना समान वागणूक देणे होय. मुळात भारतामध्ये धर्म हा ‘रिलिजन’ नसून कर्तव्य आहे. परंतु, भारताच्या एका माजी पंतप्रधानांनी धर्मालाच ‘रिलिजन’ मानत घटनेत ‘सेक्युलॅरिझम’ हा शब्द आणल्याने, भारतीय राष्ट्रजीवनात आणि समाजजीवनात अनेक समस्या निर्माण झाल्या. धर्मस्वातंत्र्य ही हिंदूंसाठी क्रांती करून मिळवावी लागलेली गोष्ट नाही. त्यामुळेच हिंदूंचे संघटन करणारा रा.स्व. संघ, ‘हिंदू’ या शब्दाची व्याख्या करत बसला नाही. कारण सर्वोच्च न्यायालयानेही एका निकालात सांगितले आहे की, हिंदू ही एक जीवन जगण्याची पद्धत आहे आणि संघाचे देखील हेच मत आहे. अन्य धर्मांत धर्मस्वातंत्र्य हे उपासनेपुरतेच मर्यादित आहे, पण हिंदू धर्मात तसे नाही, ते व्यापक आणि सर्वंकष आहे. एकच पंथ, एकच प्रेषित आणि एकच सत्य याला हिंदू धर्मात स्थान नाही.

‘हिंदुत्व आणि सांस्कृतिक राष्ट्रवाद’ या विषयावर लिहिताना लेखकाने, भारतीय दृष्टिकोनातून हिंदुत्वाच्या अनेक पैलूंना स्पर्श केला आहे. ‘सहिष्णुता’ या शब्दाचा अर्थ ‘सहन करणे’ असाच अभिप्रेत आहे. पण, भारताने या शब्दाचा अर्थ आपलेसे करणे असाच घेतलेला इतिहासात दिसतो. भारताच्या इतिहासात पाहिले असता अगदी आक्रमकांनाही भारताने आपलेसे केल्याचे दिसते. शक, हुण, कुशाण ही त्याची काही प्रमुख उदाहरणे. त्यामुळेच हिंदुत्व हे सर्वसमावेशक आहेच, तसेच ‘वसुधैव कुटुम्बकम्’ सांगणारे हिंदुत्व हेच विश्वबंधुत्वही आहे. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व सांगत, अनेक बाजूंनी लेखकाने हिंदुत्वाची मांडणी करून, त्याच्यासमोरची सांप्रतकालीन आव्हानेदेखील सांगितली आहेत. धर्म आणि देश यावर ज्यावेळी लिखाण होते त्यावेळी, छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख नसणे, असे क्वचित होत असावे. या पुस्तकातदेखील लेखकाने शिवाजी महाराजांच्या कार्याची सर्वव्यापी मांडणी केली आहे.

पुस्तक, भाषण, व्याख्यान याचा समारोप करताना नेहमी अपेक्षा किंवा दृष्टी दाखवावी, असे म्हणतात. या पुस्तकामध्येदेखील गौरवशाली भारतापासून ते परकीय आक्रमण, विद्ध्वंस झालेल्या भारतापासून ते आज डौलाने उभा असलेला भारत या पुस्तकात लेखकाच्या लेखणीतून साकारला आहे. येणार्‍या काही वर्षांतच हा भारत पुन्हा एकदा जगाच्या विश्वगुरूपदी विराजित झालेला पाहायला मिळेल. भारताचा हा प्रवास समजून घेण्यासाठी आवर्जून वाचावे, असेच हे पुस्तक आहे.

पुस्तकाचे नाव : हिंदू युवका उठ पेटूनी
लेखकाचे नाव : मोहन दिगंबर अत्रे
प्रकाशक : अखंड भारत व्यासपीठ, ठाणे
मूल्य : 150/-



Powered By Sangraha 9.0