पालक, पाल्य आणि पैसा

09 Nov 2025 17:47:09

पैसा हा मालक म्हणून फार भयानक आहे, पण नोकर म्हणून फार उत्तम आहे. प्रश्न आहे, आपण पैशाकडे कसे पाहतो? पैसा आपला मालक म्हणून की, नोकर म्हणून? पैशाकडे पाहण्याची ही दृष्टीच सगळ्यात महत्त्वाची, सगळ्याचे मूळ आहे. घरात मुलांना ही दृष्टी देण्याचे एक महत्त्वाचे काम पालकांचे आहे. लहानपणापासूनच पैशांकडे पाहण्याची एक निकोप दृष्टी मुलांना मिळाली, तर मोठेपणी पैशांचा विनियोग योग्य प्रकारे होईल. पैशांचे महत्त्व आणि मर्यादा योग्य वेळी समजणे आवश्यक आहे. कोणत्या मार्गाने पैसा मिळवायचा, खर्च कसा व केव्हा करायचा, भविष्यासाठी कसा वाचवायचा या सार्‍याचे शिक्षण, प्रशिक्षण, जाणीव, सवयी या सगळ्यांची खूप गरज जाणवते. त्यामुळे ‘त्या अर्थाला अर्थ असावा, नकोत नुसती नाणी’ या ओळीचा अर्थ समजून घेतला पाहिजे. एका अर्थाने अर्थसाक्षरताच म्हणा ना!

शाळा-महाविद्यालयाच्या शिक्षणासाठी आज खूप खर्च केला जातो; पण पैशांसाठी, पैशांसंबंधी या ठिकाणी क्वचितच बोलले जाते. म्हणजे असं, पालक शिक्षणासाठी पैसा खर्च करतात. शुल्क, पुस्तके आदींसाठी पैसे दिले जातात. मुलांच्याही हातात पैसा खुळखुळतो. मुलांनी शिकून मोठं होऊन खूप पैसा कमवावा, असं पालकांना वाटतं. पण पैशांच्या विविध पैलूंबद्दल चर्चा, प्रशिक्षण असं घडताना, फारच कमी दिसतं. मुलं मागतील तेव्हा आणि तितका पैसा मुलांना देणं किंवा मुलांसाठी खर्च करणं, म्हणजे मुलांप्रति आपली जबाबदारी निभावणे असा समज जर पालक करून घेत असतील, तर ते फार धोकादायक आहे. त्यामुळे ‘पैसा’ या संवेदनशील विषयाकडे, पालकांनी पाल्यांशी जरा गांभीर्याने बोललं पाहिजे. आजच्या चंगळवादी वातावरणात, पैशासंबंधी मुलांच्या जाणिवा विकसित करण्याची गरज आहे.

मग सुरुवात करायची कशी आणि कुठून? कुटुंबाच्या आर्थिक स्थितीबद्दल मुलांना अगदी खुलेपणाने सांगितलं पाहिजे. परिवाराच्या उत्पन्नाचे स्रोत कोणते; किती उत्पन्न आहे; घरखरेदी अथवा अन्य कारणासाठी घेतलेलं कर्ज, मासिक कर्जाचे हप्ते हे सगळं वगळता हातात शिल्लक किती राहते; घरासाठी दर महिन्याला येणारा खर्च या सगळ्यांची कल्पना मुलांना द्यायला हवी. अर्थात, मुलांचे वय लक्षात घेऊनच चर्चा करावी लागेल. कष्ट, मेहनत, काम, नोकरी केल्यानंतर हातात पैसे येत असतात. कष्टाविना पैसे मिळत नाहीत, ही गोष्ट मनावर बिंबवली पाहिजे. पैशाचं मूल्य जर मुलांना कळलं नाही, तर पुढच्या आयुष्यात विविध प्रकारची गडबड होऊ शकते. आर्थिक शिस्त नसेल, तर संसाराचा गाडा नीट चालणार नाही.
ही आर्थिक शिस्त नसेल, तर मुलांसाठी कितीही खर्च केला आणि त्यांच्या भविष्याची भक्कम आर्थिक तरतूद केली, तरी त्याचा सुयोग्य परिणाम दिसणार नाही. ‘पुत कपूत तो क्यो धनसंचय? पुत सपूत तो क्यों धनसंचय?’ या वाक्याचा अर्थ सहज लक्षात येईल. आजूबाजूच्या सतत जाहिरातींमुळे मुलांना प्रत्येक वस्तू घ्यावीशी वाटते. त्यासाठी हट्ट, आदळ-आपट आक्रस्ताळेपणा आणि प्रसंगी घरातून निघून जाण्याची, आत्महत्या करण्याची धमकी यांचे प्रमाण खूपच वाढले आहे. असे प्रसंग कौशल्याने हाताळण्याची गरज आहे. हातघाईवर न येता समंजसपणे, पण ठामपणे परिस्थिती हाताळणे, हीच खरी कसोटी आहे.

मॉल, सुपरमार्केट आता फक्त मोठ्या शहरांचीच मक्तेदारी राहिली नाही. 50 हजार वस्तीच्या गावातही मॉल, सुपरमार्केट दिमाखाने उभे राहात आहेत. त्यांचे आकर्षणही युवा पिढीमध्ये वाढते आहे. ही सारी मायावी दुनिया आहे. शालेय वयातील मुलंदेखील मॉल आणि सुपरमार्केटमध्ये जाण्याचा हट्ट धरतात. हे संकट म्हणून बघायचं की संधी म्हणून? संधी म्हणून याचा वापर करता येईल. तिथल्या विविध आकर्षक वस्तू बघणं, त्यांच्या उपयुक्ततेविषयी चर्चा करणं, किमती कशा ठरविल्या जातात हे समजून घेणं आणि समजावून सांगणं, हीच वस्तू अन्यत्र किती पैशात मिळू शकते, वेगळ्या किमतीची असली तर किमतीत कसा व का फरक पडतो, असे अनेक छोटे छोटे मुद्दे विचारात घ्यायची सवय लावण्याची व शिक्षण देण्याची ही एक नामी संधी होऊ शकते.

‘नीड’ आणि ‘वॉन्ट’ यांच्यातील फरक जर नीट प्रभावीपणे सांगता आला, तर आपोआप बरेच प्रश्न निकालात निघू शकतात. खरेच गरजेची वस्तू कोणती व चैनीची कोणती, यातला फरक ओळखायला शिकणं आणि शिकवणं जमलं, तर खूपच छान. एक जोडपं भेटवस्तू खरेदी करण्यासाठी सुपरमार्केटमध्ये गेलं. सोबत अर्थातच त्यांचा मुलगा होताच. स्वाभाविकच त्याला स्वतःसाठीही काही खरेदी करायची इच्छा. पण आईवडिलांनी स्पष्टपणे आणि ठामपणे त्याला सांगितलं ‘हे बघ, आज आपण अमूकसाठी भेटवस्तू खरेदी करायला आलो आहोत. तुझ्यासाठी काही खरेदी करणे हा हेतू नाही.’ हे सांगताना वापरायचे शब्द, आवाज, स्वर, देहबोली यांवरही बर्‍याच अंशी परिणाम अवलंबून असतो. एवढं वाक्य ऐकून मुलं गप्प बसतील, अशा भ्रमात न राहिलेलं बरं! एका कुटुंबात खूप चांगला प्रयोग केला गेला. मुलाला त्यांनी तीन डबे दिले. तीनही डब्यांवर लेबल्स लावली. पहिल्या डब्यावर ’सेविंग’ दुसर्‍यावर ’शेअरिंग’ आणि तिसर्‍यावर ’स्पेण्डिंग.’ मुलाला अशी सवय लावली की, आईवडिलांनी किंवा काका, मामा, मावशीने दिलेले पैसे समान विभागून तिन्ही डब्यात टाकायचे. पहिल्या डब्यातील पैसे ही बचत. दुसर्‍या डब्यातील पैसे कोणत्याही चांगल्या कामासाठी किंवा गरजूंसाठी दान म्हणून वापरायचे आणि तिसर्‍या डब्यातील पैसे आवश्यक असेल तेव्हा खर्च करायचे. इतर मुले जी खरेदी करतात, चैन करतात, पैसे उधळतात, मौजमजा करतात ते पाहून आपण तरी मागे का राहावे? तशीच जीवनशैली असावी, असा विचार अनेकांच्या मनात येतो आणि मग ती मुले पैशांसाठी आईवडिलांकडे हट्ट धरतात. अशावेळी पालकांची परिस्थिती कठीण होते, कसोटी लागते, द्विधा मनस्थिती होते. अशा स्थितीत पालकांनी स्पष्ट व ठामपणे आपली आर्थिक स्थिती कशी आहे आणि आपल्या आर्थिक मर्यादा काय, हे सांगितलं पाहिजे. आई व वडील दोघांचेही याबाबतीत एकमत असणे मात्र महत्त्वाचं. दुसरे पालक आपल्या मुलांसाठी कसे आणि किती खर्च करतात, याचं ओझं आणि तणाव आपल्या डोक्यावर घेण्याचं कारण नाही.

घरातील आवश्यक गोष्टींची खरेदी करताना मुलांनाही मुद्दामहून सोबत न्यावे. वस्तूंच्या किमती, गुणवत्ता, उपयुक्तता आदी अनेक मुद्दे खरेदी करताना लक्षात घ्यावे लागतात. सोबत मुलं असतील, तर नकळतपणे त्यांचंही शिक्षण, प्रशिक्षण होईल. पण ही सोबत म्हणजे नुसती ‘कंपनी’ नसावी, सोबत नेण्याचा हेतू मुलांना सांगायला हवा. निरीक्षण करण्यासाठी सूचना द्यायला हवी. अन्यथा, नुसता बाजारात, मॉलमध्ये, सुपरमार्केटमध्ये, दुकानांमध्ये गेला आणि आला, तर त्याचा काहीही उपयोग नाही. विविध माध्यमांतून मालाच्या आकर्षक जाहिरातींना लहान-थोर सर्वच मंडळी बळी पडतात. जाहिरातीत जे प्रदर्शित केलं जातं, हे नेहमीच व 100 टक्के खरं आणि बरोबर असतं असं नाही, हेही लक्षात आणून दिलं पाहिजे. वरवरच्या आकर्षक आणि कित्येक वेळा फसव्या जाहिरातींच्या आहारी न जाता, खरेदीचा निर्णय घेण्याची क्षमता विकसित व्हायलाच हवी. अन्यथा पावलोपावली फसगत होण्याची शक्यता दिवसेंदिवस वाढतच आहे. ग्राहक हित, ग्राहक हक्क, ग्राहक चळवळ, ग्राहक मंच आदींची ओळख करून देता आली, तर खूपच चांगलं.

अनेक कंपन्या क्रेडिटकार्डचा व्यवहार करतात. दिसायला सोपं आकर्षक असं स्वरूप असलं, तरी त्यातून ऋण काढून सण साजरा करण्याची प्रवृत्ती वाढत जाते. खरोखरच ज्याची गरज आहे ती वस्तू घेणे ठीक आहे. पण ज्याच्याशिवाय फार मोठं अडत नाही, अशी खरेदी करण्याकडेही कल वाढू लागला आहे. वॉरेन बुफेचं एक मार्मिक वाक्य आठवतं, ‘तुम्हाला गरज नाही अशा वस्तू जर तुम्ही खरेदी करायला लागलात, तर तुम्हाला खरोखर गरजेच्या वस्तू विकण्याची पाळी तुमच्यावर येऊ शकते!’ हातात पैसा आला रे आला की लगेच खर्च करून टाकायचा; दिसेल ते विकत घेत जायचे, अशी काहीजणांना सवय असते. लहानपणीच या सवयीला खीळ घातली नाही, तर पुढे कठीण होत जातं. भरमसाठ, बेधुंद खरेदी करण्याच्या बाबतीत विल रॉजर म्हणतात, Too many people spend money they haven't earned, to buy things they don't want, to impress people.

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या पाहणीत, “दिलेल्या ‘पॉकेटमनी’तून आपण बचत करता का?” असा एक प्रश्न विचारला होता. 50 पैकी 16 जण नेहमी बचत करणारे, 29 कधीकधी बचत करणारे, तर पाचजण कधीच बचत न करणारे विद्यार्थी आढळले. मुलांसाठी बचतीच्या अनेक योजना आहेत. शिकत असताना, मासिक बचतीची सवय लावायला हवी. पालकांनी आवर्जून बँकेत, पोस्टात मुलांच्या नावाने बचत सुरू केल्यास, उच्च शिक्षणासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. कुटुंबाच्या आरोग्यासाठीही अनेक योजना असतात, त्यांचाही विचार जरूर व्हायला हवा. वॉरेन बुफे म्हणतात, “खर्च करून झाल्यावर बचत करण्याऐवजी बचत करून जी रक्कम उरते, ती खर्च करा.” अर्थात, सर्व बाजूंनी विचार करून, आर्थिक आणि अन्य स्थिती लक्षात घेऊनच निर्णय घ्यायला हवा. शेवटी पैसा हे एक साधन आहे, साध्य नाही, याचे भान राखले म्हणजे झाले. कोणत्याही मार्गाने पैसा मिळवणे हे एकच उद्दिष्ट असेल, तर त्याची जबर किंमतही मोजावी लागेल. ‘शहाण्या माणसाच्या डोक्यात पैसा असला पाहिजे, पण हृदयात नको,’ अशी सावधगिरीची सूचना जोनाथन स्विफ्ट देतात, तर एडी स्टॅनले “लालसा हा आर्थिक आजार नसून, हृदयाचा आजार आहे,” असे सूचवतात.

माणसाच्या गरजा भागवण्यासाठी पैशांची गरज आहे, हे नाकारता येत नाही. पण पैसा म्हणजेच सर्वस्व आणि प्रत्येक गोष्ट पैशानी विकत घेता येते, असे म्हणणेही अतिशय धोकादायक आहे. पैसा मिळवण्याच्या व्यसनात, शर्यतीत, धुंदीत पैशाने विकत न घेता येण्यासारख्या गोष्टी तर आपण गमावत नाही ना, याकडे प्रत्येक पालकाने पाहायला हवं. पाल्यासही तसं पाहायला शिकवायला हवं. अन्यथा ‘मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए, पर वक्त बीत रहा है कागज के तुकडे कमाने के लिए’ असे म्हणण्याची पाळी येईल.

- दिलीप बेतकेकर
7972351208
Powered By Sangraha 9.0