स्वरांच्या चांदण्यातील आशा

09 Nov 2025 18:20:04

भारतीय संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गजांच्या स्वरांच्या मोहिनीची जादू अखिल विश्वावर पसरल्याचे दिसते. रसिकांच्या मनाला आपलेसे करण्याची कला भारतीय संगीतसाधकांच्या ठायी असल्याचे आपल्याला सहजच आढळते. भारतीय संगीत क्षेत्रातील अग्रणी नाव म्हणजे मंगेशकर कुटुंबीय! या कुटुंबातील एक कन्यारत्न म्हणजे आशा भोसले. आपल्या सुरेल गायकीने अणि वेगळ्या शैलीने, घराण्याला साजेसा लौकिक देणार्‍या आशाताईंच्या 93व्या वाढदिवसानिमित्ताने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘चांदणे स्वरांचे’ या गौरवग्रंथाचा घेतलेला आढावा...

आशाताई भोसले म्हणजे सात दशकांहून अधिक काळ चाललेल्या, सुरेल आणि जिवंत कारकिर्दीचे नाव. नुकताच आशाताईंनी नव्वदीचा टप्पा ओलांडला. त्या केवळ एक दिग्गज भारतीय पार्श्वगायिका नाहीत, तर एक जागतिक आयकॉनदेखील आहेत. भावगीत, गझल, भजन, शास्त्रीय गायन, रोमँटिक गाणी असे सगळेच प्रकार त्यांनी गायले. त्यांच्या आवाजाला केवळ भारतातच नव्हे, तर जागतिक स्तरावरही प्रशंसक मिळाले आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय कलाकारांसोबत त्यांनी कार्यक्रम सादर करून, जगभरातील रसिकांना मोहित केले. त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांचा स्वर हे भारताला मिळालेले वरदानच. त्यांचे संगीत क्षेत्रातील योगदान अतुल्य असेच.

‘चांदणे स्वरांचे’ हा आशाताईंवरील गौरवग्रंथ नुकताच वाचून पूर्ण झाला आणि अलीकडेच आशाताईंनी 93व्या वर्षात पदार्पणही केले. आशा भोसले म्हणजे नादब्रह्माचं गौरवगानच जणू. ‘नादब्रह्म’ आणि ‘शब्दब्रह्म’ यांचा हा सुरेल संगम. आशाताई ही मंगेशकर घराण्यातील स्वप्रकाशाने तेजाळलेली, तेजस्वी, देदीप्यमान, स्वतः चमकत इतरांना प्रकाशमान करणारी तेजस्वी तारका. त्यांच्या स्वरांच्या चांदण्यात रसिकमन न्हाहून निघाले. ’गोरी गोरी पान’, ’एका तळ्यात होती’, ’तुझ्या गळा माझ्या गळा’ ही गाणी ऐकतच, आपली वाटचाल सुरेख आणि सुगम झाली. ’चांदण्यात फिरताना’, ’येरे घना येरे घना’,’नभ उतरू आलं’, ’पान जागे फूल जागे’ या गाण्यांनी मन सुरेल झालं. ’जिवलगा’ने श्रवण सोहळा काय असतो याची अद्भुत अनुभूती दिली. ’ए मेरा दिल’, ’पिया तू अब तो आजा’ यांसारख्या गाण्यांनी जीवन सुंदर झालं. ’तोरा मन दरपन कहलाये’ यासारख्या गाण्यांनी तर, जीवनाचं सत्य शिकवलं. अशी आशाताईंची एकूण सर्वच गाणी संपूर्ण आयुष्यावरच प्रभाव टाकणारी आहेत.

कुठलंही गाणं समरसून गाणार्‍या आशाताईंची चैतन्यमय मूर्ती सदैव डोळ्यांपुढे तरळते. स्वप्नवत वाटणारे हे क्षण खूप श्रीमंत करतात. जीवनात जे काही मिळवायचं, ते सर्व गाणं ऐकताना मिळाल्याची अद्भुत अनुभूती येते. ती गाणी कानांत-मनात गुंजत राहात, तसेच मनही निरंतर टवटवीत आणि प्रफुल्लित ठेवण्यात मदत करतात. आशाताईंच्या गाण्यात बुडून जाण्याची अनुभूती घेत बसावं! विशेषतः ’चांदण्यात फिरताना’ या गाण्यातील ’श्वास तुझा मालकंस स्पर्श तुझा पारिजात’ या पंक्तीतील ‘पारिजात’ या शब्दाचा अतिशय तरल उच्चार, साक्षात् आशाताईंच्या कंठातून ऐकताना नाजूक सुगंधी अशा पारिजातकाचा सडा अंगावर पडण्याचं सुख लाभतं. आशाताईंच्या या गौरव ग्रंथाचे वाचन करताना त्यांच्याबद्दल आदर अधिक वाढला आणि वाटले, ही माणसं देवदुर्लभ आहेत आणि त्यांना याची देही याची डोळा आपण अनुभवतोय, हे संचित नक्कीच कृतार्थतेचा भाव देणारे आहेत.

आशा भोसले यांचे प्रत्येक गाणं खूप काही देऊन जातं. हे संचित मनात जपून ठेवण्याचा आनंद काही वेगळाच आहे. आशाताईंची गाणी समाधी अवस्थेचा प्रत्यय देतात आणि ते रसिक म्हणून फार विलक्षण असतं. आशाताईंची केवळ गाणीच नाही, तर संपूर्ण जीवनच प्रेरणादायी आहे. जीवनात संकटं आणि दुःखं तर येतातच, पण त्यावर मात करत हसत हसत कसं जगायचं, ही शिकवण आशाताईंकडून सहज मिळते. निरंतर सर्वत्र हसतमुखाने वावरणार्‍या चैतन्यदायी आशाताईंचा आदर्श सर्वांनी ठेवावा असाच आहे. आशाताईंसारख्या प्रतिभावंतांचं व्यक्तिमत्त्व रसिकांना कायम कुतूहल वाटण्याजोगं राहिलं आहे. त्यांचं जीवन एक अलौकिक यशोगाथा आहे. त्यांचं गाणं, गाण्यासाठी त्यांनी केलेली तपस्या, गाण्याचा ध्यास हा संशोधनाचा विषय. मंगेशकर घराणं हे संगीत क्षेत्रातील इतिहास प्रस्थापित करणारं बहुमोल घराणं. या घराण्यातील आशाताई हे एक आगळं ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व असून, अशा व्यक्तिमत्त्वाबद्दल केलं गेलेलं लेखनही आगळं आणि ऐतिहासिकच.

संगीत आणि साहित्याच्या दृष्टीने या लेखनाचं महत्त्व म्हणायला गेलं तर अनन्यसाधारण आहे. आशाताईंसारख्या महान व्यक्तिमत्त्वावर संगीत, साहित्य, राजकारण, समाजकारण, उद्योग, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील उच्च स्थानावर असलेल्या असामान्यांच्या लेखणी, आशाताईंच्या वाढदिनानिमित्त आणि विशेष कारण प्रसंगी त्यांच्याबद्दलच्या आदर भावना आणि अभिमान व्यक्त करण्यासाठी सुवर्णाक्षरांनी बहरल्या आणि हा गौरवग्रंथ देखण्या रुपात साकारला गेला. गौरवग्रंथाचे संपादन करणार्‍या रेखा चवरे जैन यांच्या संग्रही असलेले पूर्वप्रकाशित लेख आणि गौरवग्रंथासाठी नव्याने लिहून घेतलेले काही लेख, असा मौलिक ऐवज ’चांदणे स्वरांचे’ या गौरवग्रंथात एकत्रितपणे रसिकांसमोर आणण्याची सुवर्णसंधी त्यांना लाभली. त्यांनी या संधीचे सोने करत, हा सुरेल दर्जेदार ग्रंथ प्रकाशित केला आणि हा ग्रंथ आज आशाताईंच्या चाहत्यांसाठी एक सुरेख पर्वणीच ठरतो आहे. गौरवग्रंथातील लेख आशाताईंच्या विविध रूपांनी आणि गुणवैशिष्ट्यांनी बहरले आहेत. एक परिपूर्ण गायिका आणि गायिकेपलीकडे एक माणूस म्हणून, बहुआयामी अशा आशाताईंच्या विविध लोभस रुपाचं दर्शन यातील लेखांतून घडते. चिरतरुण सदाबहार व्यक्तिमत्त्व म्हणून आशाताई सुपरिचित आहेतच, पण त्यांच्या कारकिर्दीत त्यांच्या जवळ असलेली माणसं त्यांच्याबद्दल जे लिहितात, ते वाचूनच वाचक भारावून जातो. प्रत्येकाच्या अनुभवातून आशाताई अधिक समृद्ध होत जातात आणि त्यांच्याप्रति असलेला आदर अधिकच दुणावतो.

शरद पवार यांची वाचनीय सुरेख प्रस्तावना या ग्रंथाला लाभली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लेखही पुस्तकात आहेत. आशाताईंचे व्यक्तिमत्त्वच असे आहे की, त्यांच्यावर सर्वांना भरभरून लिहावेसे वाटते. याव्यतिरिक्त पुस्तकात पंडित हृदयनाथ मंगेशकर, हरिप्रसाद चौरसिया, यशवंत देव, आनंद मोडक, श्रृति सडोलीकर-काटकर, श्रीधर फडके अशा संगीत क्षेत्रातील दिग्गजांचेही लेख त्यात आहेत. त्याचबरोबर अनेक क्षेत्रांतील उच्चपदस्थ व्यक्तींच्याही लेखाचा अंतर्भाव या गौरवग्रंथात करण्यात आला आहे. साहित्य क्षेत्रातील राम शेवाळकर, शांता शेळके ही नावे फारच मोठी. त्यांच्याही सुंदर अशा लेखांचा समावेश पुस्तकात आहेत. याशिवाय दुबईतील उद्योजक ’मसाला किंग’ धनंजय दातार, शेफ विष्णू मनोहर, डॉ. मंदार बिच्चू, गोविंद निहलानी, सुधीर गाडगीळ या मंडळींनीही, सुंदर लेखन करून आपले अनुभव कथन केले आहे. आशाताईंच्या काही मुलाखतींचाही समावेश या पुस्तकात आहे. सर्वच लेख आणि मुलाखती छानच आहेत. यातील अनेक लेखकांची नावे सर्वश्रुत असून, त्याव्यतिरिक्त रचना शहा, आशाताईंच्या कार्यक्रमात सक्रिय सहभाग असलेले सुप्रसिद्ध गायक सुदेश भोसले अशा सर्वांनीच, आशाताई यांच्या बद्दलच्या आपल्या भावना भरभरून व्यक्त केल्या. या सर्वांशी संवाद साधत त्यांच्या लेखांचे शब्दांकन करण्याची मोठी संधीही, या गौरवग्रंथानिमित्ताने रेखा चवरे जैन यांना मिळाली.

संगीत आणि साहित्याच्याच संदर्भातच नव्हे, तर आशाताईंच्याही संदर्भात हा ग्रंथ निश्चितच अनमोल वाङ्मयीन ठेवा असेल, अशी खात्री आहे. आशाताईंसारख्या महनीय व्यक्तीवर असे काम करणे सोपे नाही. हे शिवधनुष्य रेखा चवरे जैन यांनी समर्थपणे पेलले आहे. सर्व मंगेशकर भावंडांप्रमाणेच आशाताई यांना मधुर सुरेल गळ्याची देणगी, आपल्या कलावंत पित्यांकडून वारशाने मिळाली. पण त्या गळ्याची जपणूक, त्यावर केलेले संस्कार, त्यासाठी अविरत करावी लागणारी साधना हे सारेच आशाताईंचे स्वकष्टार्जित संचित आहे. कष्टाळूपणाच्या बाबतीत तर तुलना करता येईल, असे फारच थोडे कलाकार आढळतील. सुरुवातीच्या उमेदवारीच्या काळात आशाताईंनी अपरंपार कष्ट केले आहेत. आपली स्वतःची एक वेगळी गायनपद्धती आशाताईंनी विचारपूर्वक आणि जाणीवपूर्वक सिद्ध केली. एका मुलाखतीत याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या होत्या की, ’दीदी इतकी उत्कृष्ट गाते की, तिच्या पद्धतीने गाण्यात, तिचं अनुकरण करण्यात काहीच अर्थ नव्हता. मी तिच्यासारखी गायले असते, तर दुय्यम दर्जाची दीदीची फक्त नक्कल बनले असते. आणि प्रत्यक्ष दीदी गाण्यासाठी मिळत असताना, नकलेला कोण विचारणार! म्हणून मी माझी वेगळी ’स्टाईल’ घडवली. पहिल्यापासून त्या पद्धतीनं गाण्याचा प्रयत्न केला आणि दीदींच्याच छत्रछायेत हा सुरेल स्वर समृद्ध झाला आणि रसिकांना तृप्ततेचा आनंद देणारा आहे.’

‘चांदणे स्वरांचे’ या गौरवग्रंथातील प्रत्येक लेख खूप काही देणारा, श्रीमंत आणि समृद्ध करणारा आहे. हे लेख वाचत असताना काहीतरी मिळालं आहे याची जाणीव होते आणि लेख संपूच नये, अशी भावनाही मनात निर्माण होते. प्रत्येक लेखाबद्दल अशी अतृप्ती जाणवत असताना, त्यातून मिळालेलं आंतरिक समाधान आणि आनंदही प्रत्ययास येतो. वाचनीय आणि संग्रही असावा असाच ‘चांदणे स्वरांचे’ गौरवग्रंथ झाला आहे.

चांदणे स्वरांचे
संपादन : रेखा चवरे जैन
पृष्ठसंख्या : 320
मूल्य : 500
उत्कर्ष प्रकाशन, पुणे 411-004
ग्रंथासाठी संपर्क : 9822410037

- सर्वेश फडणवीस
8668541181
Powered By Sangraha 9.0