संकल्पपूर्तीचा सोहळा

09 Nov 2025 17:31:38

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला यावर्षी 100 वर्षे पूर्ण होत असल्याने, हे वर्ष शताब्दी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. याच शताब्दी वर्षात अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीवर उभ्या राहिलेल्या भव्य श्रीराम मंदिराच्या पुनर्निर्माणाचा राष्ट्रीय संकल्पपूर्तीचा सोहळा, दि. 25 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीवर श्रीरामललांच्या विग्रहाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा, गेल्या वर्षी दि. 22 जानेवारी 2024 (पौष शुक्ल द्वादशी) रोजी पार पडला. पाहता पाहता आता वर्षाहून अधिक काळ त्यास लोटला असून, मंदिराच्या भव्य पुनर्निर्माणाच्या संकल्पपूर्ती साठीच्या समारंभात आता ध्वजारोहण होणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान आणि सरसंघचालक यांच्यासह देशातील प्रमुख धर्माचार्य, महंत, संत, विविध संप्रदायांचे प्रतिनिधी तसेच समाजातील तळागाळातील कार्यकर्त्यांना आमंत्रित केले गेले आहे. अंदाजे दहा ते 15 हजार श्रद्धाळू याप्रसंगी अयोध्येत उपस्थित असतील. त्यावेळी वरिष्ठ संतांच्या उपस्थितीत श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या शिखरावर रघुवंशाचा ध्वज फडकावून, जगभर मंदिराच्या पूर्णतेचा संदेश दिला जाईल.

‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास’चे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरी महाराज यांनी सांगितले की, राममंदिरावर लागणार्‍या ध्वजाची लांबी 22 फूट व रुंदी 11 फूट असेल. दि. 25 नोव्हेंबर रोजी मंदिराच्या 161 फूट उंच शिखरावर 42 फूट उंच ध्वजदंडावर हा ध्वज आरोहित केला जाईल. या ध्वजावर वाल्मिकी रामायणात वर्णिलेल्या रघुवंशाचे प्रतीक सूर्य, ॐ आणि कोविदार वृक्ष कोरलेले असतील. या गौरवाच्या मागे हिंदू समाजातील करोडो श्रद्धाळूंचा दीर्घ संघर्ष आहे, जो केवळ रस्त्यांवरच नव्हे, तर न्यायालयातही झाला. या संघर्षाच्या आणि अखंड हिंदू जागरणाच्या विविध टप्प्यांमुळेच, आज आपण अयोध्येत उभे असलेले भव्य राम मंदिर पाहात आहोत. यावेळी ‘विश्व हिंदू परिषदे’चे अशोक सिंघल आणि असंख्य ज्ञात-अज्ञात कार्यकर्त्यांचे स्मरण करणे स्वाभाविकच आहे.

अयोध्येतील मंदिराच्या पुनर्निर्माणासाठी 1989 मध्ये देशभर शिलापूजन कार्यक्रम झाले होते, ज्याला तत्कालीन काँग्रेस सरकारने विरोध केला. त्यांनी न्यायालयात याचिका देखील दाखल केली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने ती फेटाळून लावली आणि सर्व शिला अयोध्येला नेण्यास परवानगी दिली. सप्टेंबर 1990 मध्ये लालकृष्ण अडवाणींच्या नेतृत्वाखाली, गुजरातमधील सोमनाथपासून अयोध्येपर्यंत रामरथ यात्रा काढण्यात आली. यापूर्वी 1982-83 दरम्यान, देशभर तीन एकात्मता यात्राही काढण्यात आल्या. हरिद्वार ते कन्याकुमारी, पशुपतिनाथ (काठमांडू) ते रामेश्वरम आणि गंगासागर ते सोमनाथ या तीनही यात्रांचा समारोप, नागपूरमध्ये एकाच दिवशी झाला होता. या संपूर्ण योजनेचे नियोजन, संघाचे वरिष्ठ प्रचारक मोरोपंत पिंगळे यांनी केले होते.

या सर्व घटना देशातील सर्वसामान्य हिंदू जनमानसातील प्रभू श्रीरामांविषयीची आस्था, श्रद्धा आणि अस्मितेचे प्रतीक आहेत. या कार्यक्रमांत समाजातील सर्व घटकांनी सक्रिय सहभाग नोंदवला. न्यायालयात काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी राममंदिराच्या विरोधात जोरदार युक्तिवाद केला होता, पण सर्वोच्च न्यायालयाने दि. 9 नोव्हेंबर 2019 रोजी श्रीराम जन्मभूमी म्हणजेच रामललांच्या बाजूने निकाल दिला.

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे महामंत्री चंपतराय यांच्या मते, मंदिराचे बांधकाम परंपरागत नागर शैलीत झाले आहे. मंदिराची लांबी 380 फूट, रुंदी 250 फूट असून, ते तीन मजली आहे. प्रत्येक मजल्याची उंची 20 फूट आहे, एकूण 392 खांब आणि 44 दरवाजे आहेत. भूतलावर गर्भगृहात बालरूप श्रीरामलला, तर पहिल्या मजल्यावर श्रीराम सभागृह आहे. मंदिर संकुलात पंचायतनातील सर्व देवतांचे उपमंदिर पूर्ण झाले आहेत.

तीर्थयात्रेकरूंकरिता अपोलो हॉस्पिटलतर्फे 24 तास मोफत आपत्कालीन वैद्यकीय सेवा केंद्र, भक्त निवास, लिफ्ट सुविधा, मोफत कार्ट सेवा आणि परिसरातील हरितीकरणासह पंचवटी उभारण्यात आली आहे. हिंदू समाजातील विविध पंथ, संप्रदाय, भाषाभेद आणि प्रांतीय विविधता असूनही, सर्व घटकांनी रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनात एकजूट दाखवली. त्यामुळे हे मंदिर बांधकाम केवळ धार्मिक घटना नसून, राष्ट्रीय संकल्पपूर्तीचे प्रतीक ठरले आहे. सुमारे 500 वर्षांच्या संघर्षानंतर हा संकल्प पूर्ण होत असल्याने, संपूर्ण हिंदू समाजाला अभिमान आणि समाधानाची अनुभूती होत आहे.

- प्रमोद मुजुमदार
(लेखक वरिष्ठ पत्रकार आहेत.)
(साभार - विश्व संवाद केंद्र भारत)


Powered By Sangraha 9.0