REVIEW 'अभंग तुकाराम' : अध्यात्म आणि सेवाभावाची कथा

    09-Nov-2025
Total Views |

जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी जीवनभर विठ्ठलभक्तीची महती जनतेला सांगत, रंजल्या-गांजल्यांना शाश्वत सुखाचा मार्ग दाखवला. मात्र, समाजातील काही विघ्नसंतोषी लोकांनी त्यांनाही त्रास दिलाच. मात्र, ‘भक्तभवहर’ अशी बिरुदावली गर्वाने मिरवणारा भगवंत कायमच तुकाराम महाराजांच्या मागे होताच. हीच कथा घेऊन अभंग तुकाराम हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाचा घेतलेला मागोवा...

सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी,
कर कटावरी ठेवोनिया।
तुलसी हार गळा कासे पितांबर,
आवडे निरंतर, तेचि रूप॥
मकर कुंडले, तळपती श्रवणी,
कंठी कौस्तुभमणि विराजीत॥
तुका म्हणे माझे, हेचि सर्व सुख,
पाहिन श्रीमुख आवडीने॥


‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ अशी ज्यांची महती, अशा संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी भागवत धर्माची पताका उंचावण्याचे कार्य केले. जातिधर्माची उतरंड त्यांनी मोडून काढत, समाजाला ज्ञानवंत करण्यासाठी अविरत प्रयत्न केले. अध्यात्म, भगवंतभक्ती, उपदेशाची कास न सोडता अविरत भगवंताची आणि मानवाची सेवा अविरतपणे सुरूच ठेवली. संत तुकाराम महाराज यांच्या जीवनचरित्राचा असंख्य पुस्तके, मालिका आणि चित्रपट यांच्याद्वारे विविध पैलूंनी आजवर अनेकांनी आढावा घेतला आहे. पुन्हा एकदा तुकोबारायांच्या जीवनगाथेवर भाष्य करणारा ‘अभंग तुकाराम : कथा संत तुकारामांच्या गाथेची’ हा चित्रपट दि. 7 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पण, यावेळी चित्रपटात तुकोबारायांचा जीवनप्रवास न उलगडता, संत तुकारामांची गाथा बुडवल्यानंतर 13 दिवसांत काय घडलं आणि गाथा कशी तरली, यावर भाष्य करण्यात आले आहे. त्यामुळे तुकोबारायांच्या जीवनगाथेतील काही नव्या दृष्टिकोनाचे दालन, प्रेक्षकांसाठी उघडंणार आहे. संत तुकाराम महाराजांच्या विषयी भाष्य करणारा हा चित्रपट नेमका कसा आहे,ते पाहूया.

चित्रपटाची कथा थेट रामेश्वर भट्टांच्या न्यायनिवाड्यापासूनच सुरू होते. जिथे मंबाजी, रामेश्वर भट्ट आणि इतर विद्वान धर्मपंडितांची सभा भरलेली असते. याच ठिकाणी तुकाराम महाराजांवर खटला सुरु असतो. लोकांना चुकीचे ज्ञान आणि भरकटवण्याचे काम तुकाराम महाराज करत असल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आलेला असतो. तुकाराम महाराजांच्या जीवनातील हा इतिहास आणि कथा, बर्‍यापैकी प्रेक्षकांना माहीत आहे. त्यामुळे चित्रपटातही ही कथा फार न रेंगाळवता, झटपट पुढे सरकत राहते. आपल्यावरील आरोपांना उत्तरे देताना तुकाराम महाराज अभंगांच्या आधारे आपली मते, आरोपकर्त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करताना दाखवण्यात आले आहे.

यादरम्यान आवली (संत तुकाराम यांची पत्नी) त्यांची मुलं, गावकरी यांच्यावर आधारित अनेक द़ृष्येदेखील प्रेक्षकांना पाहायला मिळतात. अनेक उदाहरणे आणि दाखले देऊन, संत तुकाराम आपली बाजू आरोपकर्त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करताना चित्रपटात दिसतात. पण दुष्ट मंबाजीने तुकाराम महाराजांना शिक्षा देण्याचा विडा उचलल्याने, धर्मपंडित रामेश्वर भट्टांसमोर तो बरेच आरोप तुकाराम महाराजांवर करतान दिसतो. सरतेशेवटी तुकाराम महाराजांना शिक्षा निश्चित केली जाते. त्यानुसार तुकाराम महाराजांची गाथा बुडवण्यास सांगितली जाते. यानंतर पुढे 13 दिवसांत नेमके काय घडते ते समजून घेण्यासाठी, प्रेक्षकांना चित्रपट पाहावाच लागेल.

चित्रपटाचं दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केलं आहे, तर लेखन योगेश सोमण यांंचे आहे. तुकाराम महाराजांवर आधारित हा चित्रपट ‘बायोपिक’ नसून, त्या 13 दिवसांची ही कथा आहे. त्यामुळे त्या 13 दिवसांच्या काळात जे काही घडलं, त्यावरच जास्त भर देण्यात आलेला आहे. दिग्पाल लांजेकर हे अनुभवी दिग्दर्शक असल्याने, त्यांची एक शैली निश्चित आहे. त्यांच्या आजवरच्या बर्‍याच चित्रपटांमधून त्यांच्या या विशेष शैलीचा अनुभव प्रेक्षकांनी घेतला आहे. तसेच तुकाराम महाराजांच्या आयुष्यातील ठराविक भागावर लक्ष केंद्रित करून, तो भाग पडद्यावर प्रभावीपणे मांडण्यासाठी आवश्यक लिखाणाची जबाबदारी योगेश सोमण यांनी समर्थपणे पेलली आहे. तसेच संत तुकारामांच्या मुख्य भूमिकेतसुद्धा योगेश सोमण हेच असल्याने, त्यांनी दोन्ही भूमिकांना पूर्ण न्याय दिल्याचे चित्रपट पाहिल्यानंतर जाणवते. गेले अनेक वर्षे योगेश सोमण संत तुकाराम महाराजांवरील ’आनंद डोह’, हे एकलनाट्यसुद्धा सादर करत आहेत. त्यामुळे तुकाराम महाराजांची भूमिका जणू त्यांच्या अंगी भिनलेलीच आहे, असे इतका सहज अभिनय पाहून योगेश सोमण यांच्याविषयी म्हणता येते. अध्यात्म आणि मानवसेवेत लीन झालेले संत तुकाराम, योगेश सोमण यांनी उत्तम साकारले आहेत.

चित्रपटात अभिनेते योगेश सोमण, स्मिता शेवाळे, अजय पूरकर, समीर धर्माधिकारी, अजिंक्य राऊत, अभिजीत श्वेतचंद्र, तर पाहुणे कलाकार मृणाल कुलकर्णी, विराजस कुलकर्णी, तेजस बर्वे अशी ताकदवान कलाकारांची उत्तम फळी आहे. अभिनेते अजय पुरकर यांनी मंबाजीची नकारात्मक भूमिकाही, तितक्याच ताकदीने साकारली आहे. समीर धर्माधिकारी यांनी रामेश्वर भट्टांच्या भूमिकेला पुरेपूर न्याय दिलेला दिसतो. या चित्रपटाची कथा आणि संगीत या जमेच्या बाजू आहेत, असं म्हणता येईल. अभंगांना वेगळी चाल आणि सुमधुर आवाज यांमुळे या चित्रपटाचे संगीत हे प्रेक्षकांच्या चिरकाल लक्षात राहणारे आाहे. त्यातील काही निवडक म्हणजे ‘आनंदाचे डोही’, ‘राजस सुकुमार’, ‘आम्ही जातो आमुच्या गावा...’ असे काही अभंग प्रेक्षक पुन्हा पुन्हा गुणगुणातान दिसतो. चित्रपटाचे नेपथ्य, वेशभूषेवर आणखी उत्तम काम करता आले असते. ज्यामुळे चित्रपट पाहताना प्रेक्षकांना आणखी सुखद वाटले असते. 

13 दिवसांनंतर जेव्हा संत तुकारामांची गाथा तरली, तेव्हाचा प्रसंग अगदी सुंदररित्या चित्रित झाला आहे. तर पुढे काही वर्षांनंतर तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमनाचे द़ृश्य पाहून, प्रेक्षकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्याशिवाय राहात नाहीत.

आम्ही जातो आपुल्या गावा।
आमचा राम राम घ्यावा॥
तुमची आमची हेचि भेटी।
येथुनियां जन्मतुटी॥
आतां असों द्यावी दया।
तुमच्या लागतसें पायां॥
येतां निजधामीं कोणी।
विठ्ठल विठ्ठल बोला वाणी॥
रामकृष्ण मुखी बोला।
तुका जातो वैकुंठाला॥


हा अभंग गात गातच महाराज विठुरायासह वैकुंठाला निघून जाताना, चित्रपटात दाखवण्यात आले आहे. बाकी चित्रपट हा उत्तम असून, तुकाराम महाराजांच्या आयुष्यातील एक नवा द़ृष्टिकोन अनुभवण्यासाठी, सहकुटुंब-सहपरिवार हा चित्रपट पाहण्यासारखा आहे.

दिग्दर्शक : दिग्पाल लांजेकर
लेखन, संवाद : योगेश सोमण
कलाकार : योगेश सोमण, स्मिता शेवाळे, अजय पूरकर, समीर धर्माधिकारी, अजिंक्य राऊत, अभिजीत श्वेतचंद्र, मृणाल कुलकर्णी, विराजस कुलकर्णी, तेजस बर्वे
निर्मिती : पॅनोरमा स्टुडिओज, चित्रकथी क्रिएशन्स
रेटिंग : 2.5/5

- अपर्णा कड