रंगसृष्टीचा आत्मसंवाद

    08-Nov-2025   
Total Views |

आपल्या क्षेत्रातील व्यावसायिक शिस्त आणि सर्जनशील कलात्मकता या दोन्ही गोष्टी एकत्र जोपासणे म्हणजे अनेकांसाठी मोठे आव्हान असते. मात्र, चित्रकाराच्या अंतरंगातून जेव्हा कॅनव्हासवर चित्र साकार होतं, तेव्हा खरी कला बहरते. मुंबईच्या नेहरु सेंटर आर्ट गॅलरी येथे सध्या अशाच विविधतेने नटलेल्या चित्रांचा बहर आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. सुलोचना गावडे आणि दंतचिकित्सक डॉ. हर्ष ठक्कर यांच्या कुंचल्यातून साकारण्यात आलेले कलाविश्व संवादी आहे. ‌‘टेक्सचर ॲण्ड टोन्स‌’ हे त्यांचे चित्रप्रदर्शन दि. 4 नोव्हेंबर ते दि. 10 नोव्हेंबर या कालावधीत सकाळी 11 ते सायंकाळी 7 या कालावधीमध्ये सगळ्यांसाठी खुले असेल. या आगळ्यावेगळ्या कला प्रदर्शनाचा घेतलेला शब्दरुपी आढावा...

भारतीय चित्रविश्वामध्ये आधुनिकतेचा अविष्कार प्रख्यात चित्रकार राजा रविवर्मा यांनी घडवून आणला. आपल्या कुंचल्यातून त्यांनी केवळ चित्रच रेखाटली असे नाही, तर त्या चित्रांच्या माध्यमातून भारतीयत्वाचा आणि ‌‘स्व‌’चा नेमका विचार लोकांसमोर मांडला. इंग्रजांच्या बेड्यांमधून भारतमातेला मुक्त करण्यासाठी जेव्हा राष्ट्रीय स्वातंत्र्याची चळवळ उभी राहिली, त्यावेळेला अबनेंद्रनाथ टागोर यांसारख्या चित्रकारांनी कलात्मक पातळीवर भारत देश पुन्हा एकदा जोडण्याचे काम केले. स्वातंत्र्याची इतकी सारी दशक ओलांडल्यानंतरसुद्धा हा आधुनिक विचार आपल्याला कालसुसंगत वाटतो. काळाच्या ओघात तो शिळा झालेला नाही; उलटपक्षी या विचारांचे नवनवे प्रारूप आपल्याला आजच्या चित्रकारांच्या दृष्टीने कळतात. भारतभूमीचा समृद्ध वारसा आणि निसर्ग यांच्या संगमातून रंगसृष्टीचा आत्मसंवाद घडवून आणणारे चित्रकार म्हणजे डॉ. हर्ष ठक्कर आणि डॉ. सुलोचना गावडे.

दोन संपूर्ण वेगवेगळ्या पेशाची माणसं. मात्र, यांना एकत्र जोडणारी दुवा म्हणजे चित्रकला. रूढार्थाने पूर्ण वेळ चित्रकार नसले, तरीसुद्धा चित्रकाराची भूमिका, दृष्टी आपल्या अंतरंगात ज्यांनी उतरवली, असे हे सक्षम आणि द्रष्टे कलाकार आहेत, असे दिसून येते. त्यांच्या चित्रांमध्ये एकाच वेळेला आपल्या भोवतालाला साद घालण्याची शक्ती तर आहेच, परंतु त्याचबरोबर, आपल्या नजरेस दैनंदिन जीवनामध्ये या गोष्टी येतात, त्यांच्याकडे एका नव्या आणि वेगळ्या नजरेने बघण्याची वृत्तीसुद्धा आहे. व्यक्तीच्या उत्थानासाठी जी आध्यात्मिक बैठक आवश्यक असते, त्या प्रक्रियेतील प्रतीकांच्या जाणिवांचा विचार आपल्याला या चित्रांमध्ये बघायला मिळतो. रूढार्थाने देवी-देवतांचे चित्र वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमांतून साकारल्याचे आपण नेहमीच पाहतो. परंतु, हजारो वर्षांपूव जी मंदिरे बांधण्यात आली, त्या मंदिरांच्या निर्मितीमध्ये जे बारकावे होते, ते टिपण्याचं काम डॉ. सुलोचना गावडे यांच्या चित्रामध्ये आपल्याला बघायला मिळते. त्या आध्यात्मिक अनुभूतीशी एकरूप झाल्याशिवाय त्याचे चित्ररूपाने इतके सामर्थ्यशील दर्शन आपल्याला घडू शकत नाही. डॉ. सुलोचना गावडे यांची चित्रं, अत्यंत सक्षमपणे हेच सौंदर्य आपल्या नजरेस आणून देतात. अक्षरधाम मंदिराची प्रतिकृती ज्या वेळेला रंगांच्या माध्यमातून आपल्या समोर येते किंवा एखाद्या जुन्या मंदिरावरील दगडावरती केलेले कोरीव काम आपण बघतो, तेव्हा सूक्ष्म पातळीवरदेखील कलेच्या वैभवाचे संचित दडलेले असते, हे आपल्या लक्षात येते. ही सारी चित्रे आपल्याला स्थिर दिसत असली, तरीसुद्धा त्यांची एक स्वतंत्र लय आहे, एक प्रकारचा मोकळेपणा आहे, जो या चित्रचौकटीच्या पलीकडे जातो.

अध्यात्म विचार आणि बुद्ध या दोन गोष्टींना आपण वेगळं काढू शकत नाही. अशा वेळेला चित्रकाराला बुद्ध प्रतिमा साकाराविषयी वाटत नसेल, तरच नवल. बुद्ध हे जसे शांतीचे प्रतीक आहे, तसेच ते अंतरंगातील एका खोल निर्मळ अनुभूतीचे प्रतीक आहे. कागदावर साकारलेली ही अनुभूती पाहताना समाधान तर लाभतंच, परंतु त्याचबरोबर चित्रांच्या विश्वामध्ये बुद्ध कशा पद्धतीने उलगडला जाऊ शकतो, याचासुद्धा एक वेगळा विचार चित्रकला शिकणाऱ्या लोकांना मिळू शकतो.

आपण आपल्या डोळ्यांनी पहिल्यांदा जेव्हा निसर्गाचे सौंदर्य अनुभवतो, त्यावेळेला जे चित्र आपल्या मनामध्ये घर करून जातं, अगदी तशा चित्राचा अवकाश डॉ. हर्ष ठक्कर यांनी आपल्या कुंचल्यातून साकारलेला आहे. निसर्गाच्या सान्निध्यामध्ये माणूस हा दर्शकाच्या भूमिकेमध्ये असतो. दर्शकाची हीच भूमिका डॉ. हर्ष ठक्कर आपल्या चित्रांमध्ये मांडत असल्याचे दिसून येते, म्हणूनच त्यांचं चित्र, निसर्गाच्या मनोविश्वाला कवेत घेणारं आहे. त्यांच्या चित्रांच्या माध्यमातून आपल्याला निसर्गाच्या विहंगम सौंदर्याची प्रचिती येते. डॉ. हर्ष ठक्कर आपल्या निर्मितीच्या प्रक्रियेवर भाष्य करताना म्हणतात की, “चित्रकला म्हणजे त्यांच्यासाठी ध्यानसाधना आहे. ही साधना म्हणजे जीवन समृद्ध करणारी एक अनुभूती आहे.” ही साधना अत्यंत नेमकेपणाने त्यांच्या चित्रवैभवामध्ये आपल्याला दिसून येते. मुंबईच्या ‌‘फ्लोरा फाऊंटन‌’चे चित्र असो किंवा केदारनाथ, या चित्रांच्या निर्मितीमध्ये सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लागला. कागदावर कुंचल्यातून चित्र रेखाटताना, चित्रकार ज्या ध्यानाच्या अवस्थेमध्ये जातो, ती तल्लीनता आपल्या चित्र बघतानासुद्धा जाणवते. निसर्ग आणि भारताची आध्यात्मिक संस्कृती या दोन गोष्टींना वेगळं काढता येत नाही. त्यांचे परस्परांमधले अनुबंध जर आपल्याला जवळून अनुभवायचे असतील, तर या चित्रप्रदर्शनाला नक्कीच भेट दिली पाहिजे.

मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.