कुत्र्यांचा सुळसुळाट

08 Nov 2025 12:10:33

आजचा विषय रंजनाचा वाटत असला तरी मंथनाचा, चिंतनाचाही आहे. बदलत्या काळात आपल्या भारतातील राहणीमान, विशेषतः वाढत्या नागरीकरणामुळे बदलले असल्याचे चित्र आहे. काही गोष्टी लोक ‌‘स्टेटस सिम्बॉल‌’ म्हणूनच वापरत असल्याचे निदर्शनास येते. आज महानगर असो की उपनगरे, यामध्ये श्वानप्रेमींची संख्या अमाप आहे. अगदी गल्लोगल्ली तसेच, महानगरातील कोणत्याही रस्त्यांवरदेखील भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट अधिकच दिसून येतो. या कुत्र्यांच्या विविध प्रतापांच्या बातम्या आजकाल सातत्याने वाचायलादेखील मिळत आहेत. काल शुक्रवारीच सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांशी संबंधित एका प्रकरणात निर्णय दिल्याने, कुत्र्यांचा विषय ऐरणीवर आला आहे. यानुसार आता सर्व राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांवरून भटक्या प्राण्यांना हटवावे लागणार असून, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी रुग्णालये, शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात कुंपण घालावे लागणार आहे. तसेच पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना जिथून उचलण्यात आले होते, त्याच ठिकाणी परत सोडले जाणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही न्या. विक्रम नाथ, संदीप मेहता आणि एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठाने दिल्या आहेत.

यामुळे खरे तर प्राणीप्रेमींना धक्का बसेलही कदाचित, तथापि बेवारस कुत्र्यांचे चावणे, त्यांचे त्रासदायक वावरणे, भुंकणे आणि अस्वच्छता करणे या गोष्टीदेखील लक्षात घेणे गरजेचे आहे. एकीकडे पुण्यासारख्या महानगरात वाहतुककोंडी आणि अतिक्रमण वाढत असताना, नेमके तेथेच या कुत्र्यांचा वावर अनेकांसाठी धोकादायक होत आहे. या कुत्र्यांमुळे अस्वच्छतादेखील निर्माण होत असल्याने, प्रदूषण वाढीतही आणखी भर पडत आहे. घराघरांतून लोक त्यांच्या पाळीव श्वानांनादेखील वस्त्यांमधून फिरायला नेत असल्याने, याचाही नागरिकांना त्रास होतो. त्यात पुण्यात तर ठिकठिकाणी मटणाची दुकाने लागली असल्याने, त्याच्या सभोवती भटक्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातल्याचेही आढळते. त्यामुळे बुद्धिमान प्राणी म्हणून ख्यात असलेल्या या माणसाला कुत्र्यांनी जेरीस आणावे, ही शोकांतिकाच आहे. आधी पाठ्यपुस्तकात ‌‘मोती‌’ नावाच्या इमानदार कुत्र्याचा धडा शिकविला जायचा मात्र, आज त्या इमानदारी आणि बुद्धिमत्तेची भेसळ झाली आहे.

बिबट्यांची दहशत

पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, राजगुरूनगर आणि शिरूर परिसरातील बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांना रोखण्यासाठी, सरकारने महत्त्वाची पावले उचलली असल्याचे वृत्त अलीकडेच वाचनात आले. गेल्या काही दिवसांत या परिसरात बिबट्यांच्या हल्ल्यात चारजणांचा मृत्यू झाला. याशिवाय, राज्यात अन्य ठिकाणीदेखील या प्राण्याच्या हल्ल्यांच्या आणि दहशतीच्या बातम्या येतच असतात. सोशल मीडियावर तर हे थेट चित्रण बघायला मिळत असल्याने, या प्राण्याचा बंदोबस्त करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. मागच्या आठवड्यात पिंपरखेड परिसरात अवघ्या दहा दिवसांत दोन लहानग्या जीवांचा बळी या प्राण्याने घेतला. तसे बघितले तर, बिबट्यांच्या हल्ल्यांच्या घटना या मानवी वसाहतीकडे भरकटण्याचे प्रमाण वाढल्याने, अलीकडील काळात घडल्या आहेत. हे प्राणी जंगलाजवळच्या मानवी वस्त्यांकडे येतात, कारण मानवानेच जंगले नष्ट करण्याचा सपाटा लावला आहे. हा एक वेगळा चिंतनाचा विषय आहे.

पर्यावरणरक्षणाच्या दृष्टीने प्राणीसंवर्धनदेखील कळीचा मुद्दा होत चालला आहे. मानव-प्राणी संघर्षातील योग्य समन्वय हाच यावर उपाय आहे; मात्र एकीकडे प्राण्यांवर उतू जाणारे प्रेम आणि बिबट आणि कोल्हे आणि तत्सम प्राण्यांचा नागरी वस्त्यांमधील शिरकाव या गोष्टींमुळे, मानव-प्राणी संबंधातील ताळमेळ आजकाल बिघडल्याचे चित्र दिसत आहे. शहरातील कुत्र्यांची संख्या किती असावी आणि नागरी वस्त्यांपासून जंगले किती दूर असावीत, किंबहुना जंगलातील प्राण्यांना नागरी वस्त्यांकडे येता येणार नाही यावर प्रतिबंधात्मक उपाय आखण्याची वेळ खरे तर आली आहे. पुण्यातील अलीकडील काळातील दुर्दैवी घटनांमुळे, बिबट्यांना पकडण्यासाठी 200 पिंजरे लावण्याचा निर्णय झाला आणि या परिसरातील अशा प्राण्यांना ‌‘वनतारा‌’ किंवा अन्य ठिकाणी पाठवण्याचे स्पष्ट करण्यात आले. या उपाययोजना स्वागतार्ह असल्या, तरी त्या पुरेशा आहेत का? बिबट मानवी संघर्षावर आणखी काय उपाययोजना करता येतील, प्राणीसंवर्धन आणि जंगले नष्ट होण्यापासून वाचविण्यासाठी कोणती पावले उचलणे आवश्यक आहे? यावर आता तत्परता दाखवून, सर्वांनी काम करण्याची गरज अधोरेखित करावी लागेल.

- अतुल तांदळीकर


Powered By Sangraha 9.0