डिजिटल क्रांतीचे पथदर्शक

08 Nov 2025 12:15:52

आजच्या डिजिटल युगात इंटरनेट शिक्षण, रोजगार, आरोग्य, उद्योग आणि शासन यांच्या कार्यप्रणालीचा पाया बनले आहे. मात्र, अजूनही जगातील मोठा भाग, प्रगत इंटरनेटपासून वंचित आहे. याच पार्श्वभूमीवर एलॉन मस्क यांची ‌‘स्टारलिंक‌’ ही उपग्रह-आधारित इंटरनेट सेवा, जागतिक डिजिटल परिवर्तन आणि कौशल्यविकासासाठी क्रांतिकारक ठरत आहे. ‌‘स्टारलिंक‌’ ही ‌‘लो अर्थ ऑर्बिट‌’मध्ये असलेल्या उपग्रहांची एक प्रचंड प्रणाली आहे, जी पृथ्वीभोवती सुमारे 550 किमी अंतरावर फिरते. इंटरनेट सेवा देणारे पारंपरिक उपग्रह सुमारे 35 हजार किमी उंचीवरून कार्य करतात, त्यामुळे त्याचा वेगावर परिणाम होतो. परंतु, ‌‘स्टारलिंक‌’चे उपग्रह पृथ्वीच्या अधिक जवळ असल्याने वेगवान आणि उच्च गुणवत्तेच्या इंटरनेटचा अनुभव देतात. यामुळे जगातील दुर्गम भागातही हायस्पीड इंटरनेट उपलब्ध होऊ शकते.

डिजिटल कौशल्यविकासात ‌‘स्टारलिंक‌’ची भूमिका, ग्रामीण आणि दुर्गम भागांपर्यंत कनेक्टिव्हिटीचा विस्तार करण्यात महत्त्वपूर्ण ठरते. ‌‘स्टारलिंक‌’सारख्या इंटरनेटमुळे, अशा भागातील युवकांना ऑनलाईन शिक्षण, नोकऱ्या, ई-कॉमर्स आणि फ्री-लान्स कामांच्या संधी मिळू शकतात. हायस्पीड इंटरनेटमुळे व्हिडिओ-आधारित शिक्षण, ऑनलाईन कोर्सेस आणि थेट वर्ग घेणेही शक्य होते. त्यामुळे शिक्षक-विद्याथ संवाद अधिक प्रभावी होतो आणि डिजिटल साक्षरता झपाट्याने वाढते. स्थिर इंटरनेट मिळाल्याने ग्रामीण भागातील लघुउद्योजक, कारागीर जागतिक बाजारपेठेशी जोडले जाऊ शकतात. यामुळे आर्थिक स्वावलंबन आणि डिजिटल अर्थव्यवस्था बळकट होते. इंटरनेटच्या माध्यमातून कौशल्यविकास कार्यक्रम, कोडिंग प्रशिक्षण, डिजिटल मार्केटिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षण यांसारखे कार्यक्रमही ग्रामीण युवकांपर्यंत पोहोचते. त्यामुळे भौगोलिक अडथळे दूर होऊन, समान संधींचा डिजिटल भारत घडू शकतो. याचीच मुहूर्तमेढ आता ‌‘स्टारलिंक‌’ने, महाराष्ट्राबरोबर देशातील पहिला सामंजस्य करार करुन रोवली आहे.

युरोपमध्ये ‌‘स्टारलिंक‌’ने नेटवर्क साधने कमी असलेल्या भागात, हायस्पीड इंटरनेट सेवा वाढवली आहे. युरोपियन देशांमध्ये फायबर किंवा नेटवर्क कनेक्टिव्हिटी कमी असलेल्या प्रदेशात हे उपग्रह इंटरनेट, एक पर्याय म्हणून समोर येत आहे. त्यामुळे त्या भागातील लोकांना आणि संस्थांना सर्व प्रकारच्या संधी मिळू लागल्या आहेत. इंडोनेशियातील नेटवर्क सुविधा नसलेल्या जवळपास 17 हजार छोटी द्वीपामध्येही, ‌‘स्टारलिंक‌’ने सेवा देण्यास सुरुवात केली आहे. याठिकाणी उदाहरणदाखल एका आरोग्यकेंद्रामध्ये ‌‘स्टारलिंक‌’चा वेग मोजून, हायस्पीड सेवेची खात्री देखील करण्यात आली. संयुक्त राष्ट्र अमेरिकेच्या नौदलाने ‌‘स्टारलिंक‌’चा वापर, जहाजांमध्येही केला आहे. यामुळे त्यांना पारंपरिक उपग्रहांपेक्षा कमी विलंबाने सहज इंटरनेट नेटवर्क मिळते, ज्यामुळे नौदल ऑपरेशन्समध्ये व कर्मचाऱ्यांच्या संवादात सुधारणा झाली आहे. यातून असे दिसून येते की ‌‘स्टारलिंक‌’चे फायदे फक्त सामान्य नागरिकांपुरते मर्यादित नाहीत, ते संरक्षण, प्रशासन, उद्योग अशा विविध क्षेत्रांतही आहेत.

मात्र, हे परिणाम प्रत्येकच देशात आणि भूभागात सामान असतील असे नाही. वरील उदाहरणे व सेवा सर्व देशांमध्ये एकसमान स्वरूपात नसू शकतात. तसेच आणखी एक आव्हान म्हणजे इंटरनेट मिळाल्यानंतर त्याचा वापर करण्याची तयारी जसे की, आवश्यक उपकरणं, प्रशिक्षण, भाषा हेदेखील आवश्यक आहे. जेव्हा एखाद्या प्रकल्पाची प्रगती आणि यशस्विता पाहिली जाते, तेव्हा काही आव्हानांचाही विचार होणे आवश्यक आहे. कारण ही आव्हाने टाळून, प्रकल्प आणि उपक्रम अधिक प्रभावी होणे यामुळे शक्य होते.

‌‘स्टारलिंक‌’ हे केवळ इंटरनेट नेटवर्क नाही, तर ते जगाच्या सामाजिक-आर्थिक बदलाचे प्रतीक आहे. त्याच्या मदतीने डिजिटल अंतर कमी करून ग्रामीण युवक, महिला आणि विद्यार्थ्यांना जागतिक डिजिटल अर्थव्यवस्थेत स्थान मिळू शकते. तथापि, कनेक्टिव्हिटी ही केवळ पहिली पायरी आहे. खरी प्रगती तेव्हाच होईल, जेव्हा त्या इंटरनेटचा उपयोग करून ज्ञान, कौशल्य आणि संधी यांचा प्रसार केला जाईल. अशा रितीने ‌‘स्टारलिंक‌’सारखी तंत्रज्ञानक्रांती, जागतिक कौशल्यविकास आणि डिजिटायझेशनच्या युगात मानवी प्रगतीचा नवा अध्याय लिहू शकते.

Powered By Sangraha 9.0