मुंबई : (Rupali Thombre Patil) राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नेत्या रुपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombre Patil) यांना पक्षाचे संघटन सरचिटणीस संजय खोडके यांनी नोटीस बजावत ७ दिवसांच्या आत खुलासा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पक्षाच्या विरोधात केलेल्या कथित कारवाई आणि बदनामीच्या आरोपाखाली ही नोटीस देण्यात आली आहे. ही नोटीस मिळताच रुपाली ठोंबरे पाटील तात्काळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यासाठी पुण्याला पोहोचल्या आहेत.
दरम्यान, रुपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombre Patil) यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट टाकत त्या म्हणाल्या, आज रात्री पक्षाकडून जगातील महिलांना न्याय देणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षाविषयी केलेल्या वक्तव्याविषयी खुलासा मागण्यात आलेला आहे. खरं तर खुलासा देण्याची वेळ ७ दिवस अत्यंत कमी वेळ देण्यात आली आहे. मी वैयक्तिक हितसंबध ते हगवणे प्रकरण ते आमच्या भगिनी कैलासवाशी डॉक्टर संपदा मुंडेंच्या चारित्र्यहनन प्रकरणापर्यंतचा सविस्तर खुलासा देण्यात येईल. ज्यांनी मयत भगिनीचे चारित्र्यहनन केले त्याच्या विषयी खरतर काय खुलासा द्यावा?
नेमकं प्रकरण काय ?
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षातील रूपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombre Patil) आणि रूपाली चाकणकर या दोघींमध्ये वाद सुरू असल्याचे माध्यमांकडून समजते. रूपाली चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष असून त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष सुद्धा आहेत. तर रूपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombre Patil) यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसची प्रदेश प्रवक्ता पदाची जबाबदारी आहे.
फलटण येथील डॉक्टर तरूणीच्या आत्महत्या प्रकरणांमध्ये चाकणकर यांनी तरुणीचं चारित्र्यहनन केलं असल्याचा आरोप करत रुपाली ठोंबरे यांनी चाकणकर यांच्यावर टीका केली होती. त्याबरोबरच माधवी खंडाळकर यांनी देखील रूपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombre Patil) यांच्याविरोधात व्हिडिओ बनवून त्यांच्यावर आरोप केले होते. हे सर्व प्रकरण पक्षाची बदनामी करणारे असल्याने, आता त्याना शिस्तभंगाची नोटीस देण्यात आली आहे. शिवाय सात दिवसांच्या आत या प्रकरणाचा खुलासा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.