साम्राज्ये कशी बरे कोसळतात?

08 Nov 2025 11:58:46

उत्थान आणि पतन हा सृष्टीचा नियम आहे. एखादी व्यक्ती लहानाची मोठी होत असतानाच आपल्या भावी कर्तबगारीची चुणूक दाखवते. मोठी होत होत कळसाला पोहोचते. मग काही काळाने वयोमानानुसार थकत जाते आणि अखेर संपते. व्यक्तींप्रमाणेच साम्राज्ये किंवा आधुनिक काळात राजकीय पक्ष, सामाजिक संस्था अशा सर्वांनाच हा नियम अटळपणे लागू होताना दिसतो. साम्यवादी सेोव्हिएत रशियन साम्राज्य 70 वर्षे चालू राहून अखेर कोसळले. अमेरिकन साम्राज्य त्याच मार्गावर आहे का?

गुजरातमध्ये खंबातच्या आखातात भावनगरपासून जवळ, वलभीपूर नावाचे एक छोटे शहर आहे. आज त्याला व्यापारीदृष्ट्या काहीही महत्त्व उरलेले नाही, पण इसवी सनाच्या पाचव्या शतकापासून पुढची किमान 500 वर्षे ते एक महत्त्वपूर्ण व्यापारी बंदर होते. त्याचा व्यापार थेट अरबस्तानपर्यंत होता. त्यावेळी त्याला म्हणायचे ‌‘वल्लभी‌’ किंवा ‌‘वल्लभीपूर‌’. वल्लभीचे विद्यापीठ नालंदासारखेच प्रख्यात होते. वल्लभी विद्यापीठात वैदिक धर्माबरोबरच, बौद्ध आणि जैन दर्शनांचेही अध्ययन-अध्यापन फार मोठ्या प्रमाणावर चालत होते. वल्लभीचे मैत्रक घराण्याचे राजे स्वतः जैन संप्रदायी होते.

एकदा असे घडले की, वल्लभीचा नगरशेट अरबस्तानात व्यापारासाठी जाऊन आला. येताना त्याने आपल्या लाडक्या मुलीसाठी, एक अत्यंत सुंदर अशी बसरा मोत्यांची माळ आणली. नगरशेटची मुलगी राजाची मुलगी मैत्रिणी होत्या. राजकन्येने बापाजवळ हट्ट धरला की, मला ती माळ हवी. राजाने नगरशेटजवळ योग्य ती किंमत देऊन, माळ विकत देण्याची मागणी केली. नगरशेट म्हणाला, ही माळ देण्याऐवजी अगदी अशीच दुसरी माळ बसऱ्याहून मागवून घेतो आणि तुम्हाला देतो. खरे म्हणजे हे म्हणणे योग्यच होते, पण राजकन्येने हट्ट धरला. मला हीच माळ पाहिजे. राजाने बालहट्टासमोर मान तुकवली. जबरदस्तीने नगरशेटच्या मुलीच्या गळ्यातून माळ काढून आपल्या मुलीला दिली.

या अन्यायाने संतापलेल्या नगरशेटने काय करावे? तो सरळ दिल्लीच्या सुलतानासमोर जाऊन उभा राहिला. त्याने सुलतानाला वल्लभीवर स्वारी करण्याचे आमंत्रण दिले. मोहिमेचा संपूर्ण खर्च नगरशेटने करायचा या अटीवर, सुलतानाने वल्लभीवर स्वारी केली. राजाप्रमाणे सैनिकसुद्धा जैन सांप्रदायिक होते. अहिंसेच्या अतिरेकामुळे सैनिक म्हणे लढण्याची कलाच विसरून गेले होते. साहजिकच सुलतानी सैन्याने गवत कापावे, तसे वल्लभीचे सैन्य छाटून टाकले. अखेर राजा आणि नगरशेट यांनाही ठार मारले. अफाट लूट असंख्य स्त्रिया आणि हो, ती मूर्ख राजकन्या आणि ती नगरशेटची मुलगी सगळ्यांनाच बगलेत मारून, सुलतान दिल्लीला निघून गेला. जाताना वल्लभी नगरी आणि वल्लभी विद्यापीठ उद्ध्वस्त करायला तो विसरला नाही.

कुणी म्हणतात, ही घटना 13व्या शतकात घडली आणि तो सुलतान म्हणजे अल्लाउद्दीन खिलजी किंवा गियासुद्दीन तुघलख असावा. दुसरे कुणी म्हणतात की, ही घटना आठव्या-नवव्या शतकातच घडली. नगरशेटचे संबंध समुद्रमार्गे थेट अरबस्तानपर्यंत असल्यामुळे, त्याने पैसे देऊन अरबांच्या आरमारी सैन्याकरवी वल्लभीवर स्वारी करवली. आक्रमक कुणीही असो, हिंदूंच्या मूर्ख अहंकारापोटी एक हिंदू राज्य, हिंदू विद्यापीठ उद्ध्वस्त करायला परकीय अरबांना संधी मिळाली.

अमेरिका हा जगातल्या अन्य देशांच्या तुलनेत नवा देश आहे. सन 1776 मध्ये अमेरिकेने आपण ब्रिटनची वसाहत नसून स्वतंत्र देश आहोत, असे घोषित केले. मग क्रांतियुद्ध झाले, असंख्य राजकीय घडामोडी झाल्या. अखेर 1789 साली, जॉर्ज वॉशिंग्टनने पहिला राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ ग्रहण केली. म्हणजे एक स्वतंत्र, सार्वभौम राष्ट्र म्हणून अमेरिकेचे राजकीय जीवन हे गेल्या जेमतेम 235 वर्षांचे आहे.

दुसरे महायुद्ध ही एक अशी थारेपालटी घटना घडली की, तिने ब्रिटन, फ्रान्स, इटली, जर्मनी, जपान यांची साम्राज्ये मोडीत काढली, सेोव्हिएत रशियन साम्राज्य विस्तारत होतेच, त्याला आणखी बळ दिले. त्याचप्रमाणे अमेरिकेलाही महासत्ता बनवूनच सोडले. अमेरिकेने मोठ्या चतुराईने साम्राज्यविस्ताराचा नवाच मार्ग शोधून काढला. एखादा देश प्रत्यक्ष ताब्यात ठेवणे फार महाग पडते, त्यापेक्षा त्या देशातील सत्ताधारी पक्ष, तिथला व्यापार, तिथले अर्थकारण आपल्या ताब्यात ठेवायचे. त्या देशाचे व्यापारी शोषण तर करायचेच, पण त्याहीपेक्षा सुखासीन जीवनाची लालूच दाखवून, तिथले मनुष्यबळ आपल्याकडे खेचायचे. देशोदेशींचे बुद्धिमान लोक अशा तऱ्हेनेच अमेरिकेचे दास बनले.

पण जगात शेरास सव्वाशेर भेटतच असतो. अमेरिकेला तर दोन सव्वाशेर भेटले आहेत, एक चीन आणि दुसरे मुसलमान. चीन अमेरिकेचीच आर्थिक वर्चस्व स्थापन करण्याची युक्ती वापरून तिच्यावर मात करू पाहतोय, तर मुसलमान आतून अमेरिकेला पोखरून काढू पाहातायत. या प्रयत्नांत त्यांना वल्लभीपूरच्या नगरशेटसारखा आपल्याच सरकारवर संतापलेला एक भिडू भेटलाय, तो म्हणजे डेमोक्रॅटिक पक्ष.

अमेरिकन राजकारणात रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक असे दोनच प्रमुख प्रतिस्पध पक्ष आहेत. रिपब्लिकन पक्ष हा थोडा उजव्या विचारांचा म्हणजे नैतिक मूल्ये इत्यादी मानणारा पक्ष आहे, तर डेमोक्रेटिक पक्ष हा मुक्त, उदारमतवादी विचारांचा आहे. समाजात ‌‘लिव्ह-इन‌’ नातेसंबंध, मुक्त लैंगिक स्वातंत्र्य असावे, शस्त्रास्त्रबंदी असावी, अंमली पदार्थांवर बंदी नसावी, चीन आणि रशियाशी व्यापारबंदी नसावी, गर्भपात करावा की न करावा याचा निर्णय शासनाने न घेता संबंधित महिलेने घ्यावा, अशा त्यांच्या उदार राजकीय कल्पना आहेत. सोव्हिएत रशिया संपल्यामुळे निराधार झालेले साम्यवादी उदारमतवादी डेमोक्रॅटिक पक्षात घुसून त्यांनी तो पक्ष ताब्यात घेतलाय की काय, अशी शंका येण्याइतपत डेमोक्रॅटिक पक्षाची धोरणे अतिरेकी डावी होत चालली आहेत. ‌‘वोकिझम‌’ या नावाने बोकाळू पाहणारा उदारमतवाद म्हणजे सांस्कृतिक साम्यवाद असून, ही वाळवी अमेरिकन समाजाला आतून पोखरून काढत आहे.

पण रिपब्लिकन पक्षाच्या आणि विशेषतः ट्रम्प यांच्या द्वेषाने आंधळे होऊन डेमोक्रॅटिक नेते देशविषयक कृत्यांना उत्तेजन देत आहेत की काय, अशी शंका वाटण्यासारखीच स्थिती आहे. मुसलमान हे अशिक्षित आणि गरीब असल्यामुळे ते गुन्हेगार किंवा अतिरेकी बनतात, अशा जगभरच्या सगळ्या उदारमतवाद्यांचा लाडका सिद्धांत असतो, तसाच तो अमेरिकन डेमोक्रॅटिक नेत्यांचाही असावा. खरे तर, दि. 11 सप्टेंबर 2001 या दिवशी हा सिद्धांत नुसता कोसळलाच नव्हे, तर भस्मसातही झाला. कारण न्यूयॉर्क वर्ल्ड ट्रेड सेंटरचे जुळे मनोरे उद्ध्वस्त करणारे मुसलमान अतिरेकी उच्च शिक्षित आणि श्रीमंतही होते. अमेरिकन अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठीच त्यांनी हा कट अतिशय योजनाबद्धपणे आखला होता, हे सगळ्या जगाला कळले.

यानंतर प्रचंड आणि वेगवान घटना घडत राहिल्या. अमेरिकेने प्रथम अफगाणिस्तानवर हल्ला केला, मग इराकवरही हल्ला केला. सतत दहा वर्षे प्रयत्न करून, अखेर ओसामासारखा जबरदस्त वैरी खतम केला. पण देशाच्या बाहेर हे सगळे घडत असताना, देशाच्या आत सांस्कृतिक साम्यवादी आणि मुसलमान शांतपणे एकत्र होत होते.

याचा परिणाम म्हणजे, डेमोक्रॅटिक पक्षाने न्यूयॉर्क या देशाच्या आर्थिक राजधानीच्या महापौरपदासाठी झोहरान ममदानी या मुसलमान उमेदवाराला तिकीट दिले. त्यापुढचा भाग म्हणजे, परवाच या निवडणुकीचा निकाल लागून हा उमेदवार चक्क निवडूनही आला आहे. झोहरान ममदानीची आई म्हणजे ‌‘सलाम बॉम्बे‌’ या चित्रपटाची दिग्दर्शिका मीरा नय्यर. या बाई पंजाबी, हिंदू, उदारमतवादी. त्यांनी महमूद ममदानी यांच्याशी लग्न केले. हे ममदानी मूळचे गुजराती खोजा मुसलमान ते प्रथम युगांडात स्थायिक झाले. झोहरानचा जन्म युगांडाची राजधानी कंपाला शहरात झाला. आता हे सगळे कुटुंब अमेरिकेत स्थायिक झाले आहे.

न्यूयॉर्क शहर हे नेहमीच डेमोक्रॅटिक पक्षाच्या बाजूने राहिलेले आहे. म्हणजे न्यूयॉर्कच्या मतदारांनी झोहरान ममदानीला व्यक्ती म्हणून मत दिलेले नसून, डेमोक्रेटिक उमेदवार म्हणून दिलेले आहे. यात अमेरिकन रिपब्लिकन पक्षाच्या सरकारवर राग हेही एक महत्त्वाचे कारण आहे. सरकारी आर्थिक प्रक्रिया या किचकटच असतात. पण प्रशासनाला या किचकटपणातून मार्ग न काढता आल्यामुळे, दि. 1 ऑक्टोबर 2025 रोजीपासून सर्व सरकारी कामे ठप्प आहेत. मुख्य म्हणजे, सरकारी कर्मचाऱ्यांना पगारच मिळालेला नाही. याचा राग व्यक्त करताना, मतदारांनी ट्रम्प यांच्या विरोधातील डेमोक्रॅटिक पक्षाला मतदान केले. परिणामी ममदानी महापौर झाला.

ट्रम्प आणि पीटर हेगसेथ

पीटर हेगसेथ हे फक्त 45 वर्षांचे आहेत. ते अमेरिकन लष्कराच्या ‌‘नॅशनल गार्ड्‌‍स‌’ या पथकात मेजरपदावर होते. दि. 30 सप्टेंबर 2025 या दिवशी व्हर्जिनिया राज्यातल्या क्वांटिको इथल्या अमेरिकन नौदलाच्या तळावर त्यांनी, सुमारे 300 जनरलपदावरच्या अधिकाऱ्यांचा एक अभ्यासवर्ग घेतला. अवघा 45 वर्षांचा मेजरपदावरून राजकारणात जाऊन अमेरिकेचा संरक्षणमंत्री बनलेला माणूस, जनरल्स आणि ॲडमिरल्स लोकांचा वर्ग घेत होता.

अरे हो, एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर अमेरिकेने ‌‘वॉर डिपार्टमेंट‌’ आणि ‌‘सेक्रेटरी (मंत्री) ऑफ वॉर‌’ ही नावे बदलून, ‌‘डिफेन्स डिपार्टमेंट‌’ आणि ‌‘डिफेन्स सेक्रेटरी‌’ केले होते. दि. 5 सप्टेंबर 2025 रोजी ते पुन्हा ‌‘वॉर सेक्रेटरी‌’ असे केले आहे. म्हणजे आता पीटर हेगसेथ अमेरिकेचे ‌‘वॉर सेक्रेटरी‌’ आहेत.

जगभर जिथे जिथे अमेरिकन सैन्य तैनात आहे आणि जे जे जनरल किंवा ॲडमिरल दर्जाचे अधिकारी, ज्यांना ‌‘फोर स्टार जनरल‌’ म्हटले जाते, ते सर्व या वर्गाला हजर होते. ऑगस्ट 2025 मध्ये ट्रम्प प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. पोलीस आणि अन्य नागरी सुरक्षा दलांना मदत म्हणून, ‌‘नॅशनल गार्ड्‌‍स‌’ या लष्करी दलाचे सैनिक वॉशिंग्टन राजधानी, लॉस एंजेलिस इत्यादी महत्त्वाच्या शहरांमध्ये गस्त घालतील. याची कार्यवाही सप्टेंबरमध्ये सुरू झाली देखील.

हा सगळा संदर्भ देत पीटर हेगसेथ म्हणाले की, “सैन्याने देशाच्या सरहद्दीचे संरक्षण करायचे असते, पण आज आपल्या देशाला आतून धोका निर्माण झाला आहे. आमचे ‌‘वॉर डिपार्टमेंट‌’ हे ‌‘वोक डिपार्टमेंट‌’ बनले आहे. यावर उपाय म्हणजे, आमचे सैनिकी प्रशिक्षण कणखर, शिस्तबद्ध आणि धाक असणारे बनले पाहिजे. महिला सैनिकांना प्रत्यक्ष युद्धात अवश्य सहभाग घेता येईल, पण त्यासाठी त्यांनी पुरुष सैनिकांप्रमाणेच सख्त प्रशिक्षण घेऊन स्वतःला तत्पर ठेवावे लागेल.”

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या भाषणात माजी डेमोक्रॅटिक राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि जो बायडन यांच्यावर नाव घेऊन हल्ला चढवला. “या डाव्या उदारमतवादी लोकांनी अमेरिकन समाजाला बिघडवून टाकले आहे.” ते म्हणाले, “पण आम्ही हे सहन करणार नाही. निदर्शनांच्या निमित्ताने ते जर सैनिकांवर दगडफेक करत असतील आणि थुंकत असतील, तर मग सैनिकपण त्यांचा फैसला करतील.”

रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक यांच्यातली स्पर्धा आता वैराच्या पातळीवर गेलीशी वाटत आहे. ट्रम्प आणि हेगसेथ या पतनाला आळा घालू शकतील का?

- मल्हार कृष्ण गोखले
Powered By Sangraha 9.0