'वंदे मातरम्' गीताच्या १५० व्या वर्षानिमित्त ठाणे जिल्हा परिषदेत सामूहिक गायनाचा उत्साहपूर्ण कार्यक्रम संपन्न

07 Nov 2025 16:20:00

Vande Mataram
 
कल्याण : (Vande Mataram) राष्ट्रभावनेचे प्रतीक ठरलेले 'वंदे मातरम्' या गीतास शुक्रवारी १५० वर्ष पूर्ण झाली. या ऐतिहासिक गीताच्या गौरवशाली परंपरेला सलाम म्हणून जिल्हा परिषद, ठाणे येथे शुक्रवारी ७ नोव्हेंबरला 'वंदे मातरम् गीताचे सामूहिक गायन' कार्यक्रम उत्साहात पार पडला.
 
हा कार्यक्रम मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनानुसार आणि सांस्कृतिक कार्य मंत्री व कौशल्य विकास मंत्री यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यात राबविण्यात आलेल्या उपक्रमाचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आला होता. जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या आवारात सकाळी हा कार्यक्रम पार पडला. सर्व अधिकारी, कर्मचारी आणि उपस्थित नागरिकांनी वंदे मातरम् गीत एकत्रित गाऊन राष्ट्रभक्तीचा आणि एकतेचा संदेश दिला.
 
या कार्यक्रमात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी अंजली अंबेकर, लेखाधिकारी (२) रविंद्र सपकाळे तसेच जिल्हा परिषदेचे विविध विभाग प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
प्रसिद्ध साहित्यिक बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या 'आनंदमठ' या कादंबरीतून उदयास आलेले 'वंदे मातरम्' हे गीत अनेक क्रांतीकारकांच्या मनात स्वातंत्र्याच्या जाज्वल्य भावनेची ज्योत पेटविणारे ठरले. स्वातंत्र्यलढ्यातील हाक असो वा स्वातंत्र्योत्तर भारतातील एकता, राष्ट्रप्रेम आणि अभिमान या गीताने प्रत्येक भारतीयाच्या हृदयाला स्पर्श केला आहे.
 
कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी 'भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम्' या घोषणांनी परिसर दुमदुमवला. सामूहिक गायनाद्वारे ठाणे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी राष्ट्रगीताला अभिवादन करून देशभक्तीचा संदेश दिला.
 
 
 
Powered By Sangraha 9.0