छत्रपती प्रभात शाखेतर्फे वंदे मातरम् गीताच्या १५० व्या वर्षपूर्तीचा उत्सव

07 Nov 2025 19:28:02
मुंबई : ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताच्या १५०व्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने ठाण्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या छत्रपती प्रभात शाखेने विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले. तालाबपाली येथील श्रीराम व्यायामशाळा सेवा संस्थानच्या मैदानावर झालेल्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे नियोजन छत्रपती प्रभात शाखेच्या स्वयंसेवकांनी केले होते. कार्यक्रमात निवृत्त शिक्षक आणि संस्कृत अभ्यासक शरद धर्माधिकारी यांनी ‘वंदे मातरम्’ गीताची सुमधुर प्रस्तुती दिली. कार्यक्रमादरम्यान संघाचे अधिकाऱ्यांनी या गीताचा भारतीय स्वातंत्र्य चळवळीत असलेला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा उलगडून सांगितला.

‘वंदे मातरम्’ हे गीत बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी अक्षय नवमीच्या शुभदिनी रचले होते. ७ नोव्हेंबर १८७५ रोजी त्यांच्या आनंदमठ या कादंबरीतून आणि बंगदर्शन या मासिकात प्रथमच प्रकाशित झाले. स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात हे गीत भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याचे प्रतीक बनले.

या निमित्ताने ठाणे परिसर देशभक्तीमय होऊन ‘वंदे मातरम्’च्या जयघोषाने वातावरण भारावून गेले.




Powered By Sangraha 9.0