वाढवण : समृद्ध भारताचा राजमार्ग

07 Nov 2025 13:50:42

 Vadhavan port 
 
मुंबईत ऑटोबर महिन्याच्या अखेरीस ’इंडिया मेरीटाईम वीक २०२५’ ही सागरी परिषद क्षेत्रातील स्थानिक प्राधिकरणे, राष्ट्रीय आणि जागतिक प्रतिनिधींच्या सहभागासह मुंबईत संपन्न झाली. या संपूर्ण परिषदेत सर्वाधिक चर्चेतला आणि संपूर्ण जगाचे लक्षवेधणारा प्रकल्प ठरला तो प्रस्तावित ’वाढवण बंदर’ प्रकल्प. संपूर्ण जगाला या प्रकल्पाचे आकर्षण नेमके का आहे? तर एखाद्या बंदराची कार्यक्षमता आणि स्पर्धात्मकता केवळ त्याच्या समुद्री पायाभूत सुविधांवर अवलंबून नसते, तर ती त्याच्या आंतरिक प्रदेशाशी असलेल्या जोडणीच्या गुणवत्तेवरही ठरते. महाराष्ट्राच्या पश्चिम किनार्‍यावर उभारले जाणारे वाढवण बंदर हे अशाच अखंड बहुविध वाहतूक जोडणीचे आदर्श उदाहरण ठरणार आहे. त्याविषयी...
 
दिल्ली-मुंबई मालवाहतूक कॉरिडोरशी थेट जोडणी
 
वाढवण बंदराच्या सर्वांत मोठ्या भौगोलिक फायद्यांपैकी एक म्हणजे दिल्ली-मुंबई मालवाहतूक कॉरिडोर या भारतातील सर्वांत महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या अत्यंत जवळ असलेले या प्रकल्पाचे स्थान. वाढवण बंदर या कॉरिडोरपासून अवघ्या १२ किमी अंतरावर उभे राहणार आहे. त्यामुळे अशाप्रकारे थेट कनेक्टिव्हिटीचा लाभ देशातील फार कमी बंदरांना लाभला आहे. सुमारे १ हजार, ५०० किमी लांबीचा दिल्ली-मुंबई मालवाहतूक मार्ग राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एनसीआर) आणि पश्चिम किनार्‍यावरील बंदरांना जोडतो. यामुळे मालगाड्यांसाठी एक उच्च गती, उच्च क्षमतेचा समर्पित रेल्वे कॉरिडोर उपलब्ध झाला आहे. त्यामुळे वाढवण बंदरातून राजस्थान, गुजरात, हरियाणा, मध्य प्रदेश आणि दिल्ली या औद्योगिक राज्यांमधील मालवाहतूक बंदराशी थेट, वेगवान आणि किफायतशीर पद्धतीने करता येईल. यामुळे वेळेवर, कमी खर्चात आणि अधिक विश्वासार्ह लॉजिस्टिक नेटवर्क तयार होईल. वाढवण बंदर हा महत्त्वपूर्ण सागरी केंद्रबिंदू म्हणून भविष्यात उदयास येणार आहे, ज्यामुळे उद्योगांना अल्प आणि कार्यक्षम मार्गाने निर्यात-आयात सुलभ होईल.
 
प्रमुख आर्थिक महामार्गांशी उत्कृष्ट रस्ते संपर्क
 
समर्पित रेल्वेमार्गाशी जोडणीव्यतिरिक्त वाढवण बंदराला भारताच्या मुख्य राष्ट्रीय महामार्गांशीही थेट जोडणी मिळणार आहे, ज्यामुळे विविध प्रकारच्या मालवाहतुकीसाठी अखंड ‘लास्ट-माईल कनेटिव्हिटी’ सुनिश्चित होते. यामध्ये बंदराचे स्थान दिल्ली-मुंबई राष्ट्रीय महामार्गापासून फक्त ३४ किमी आहे, जो भारतातील सर्वाधिक व्यस्त मालवाहतूक मार्ग आहे; तर मुंबई-बडोदा एसप्रेस-वेपासून फक्त २२ किमी वर आहे, जो महाराष्ट्र आणि गुजरातमधील औद्योगिक पट्ट्यांना जोडणारा आधुनिक सहापदरी महामार्ग आहे. हे दोन्ही मार्ग पश्चिम भारतातील वाहतुकीचे मुख्य कणा आहे, ज्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर, वापी, सुरत आणि वडोदरा या औद्योगिक शहरांशी अखंड रस्ते संपर्क शय होतो. अशी बहुविध दिशा असलेली रस्तेजोडणी मालवाहतुकीसाठी अनेक पर्याय निर्माण करते आणि एका मार्गावरील अवलंबित्व कमी करते. विशेषतः नाशवंत किंवा कमी वेळेत वाहतूक आवश्यक आहे, अशा मालासाठी ही जलद आणि थेट रस्तेजोडणी त्वरित वाहतूक आणि मल्टीमॉडेल लॉजिस्टिक पार्कशी जलद संपर्क सुनिश्चित करते.
 
राष्ट्रीय रेल्वे जाळ्याशी थेट जोडणी
 
भारतीय मालवाहतुकीत रेल्वे वाहतूक हा अजूनही सर्वांत विश्वसनीय आणि किफायतशीर पर्याय मानला जातो. वाढवण बंदराचे स्थान राष्ट्रीय रेल्वेच्या जाळ्यापासून केवळ दहा किमी अंतरावर आहे. त्यामुळे बंदराचे देशातील रेल्वे नेटवर्कशी एकत्रीकरण कोणत्याही मोठ्या भौगोलिक अडचणीशिवाय शय होणार आहे. बंदरातून समर्पित रेल्वे मार्गांद्वारे डबल-स्टॅक कंटेनर ट्रेन आणि मोठ्या मालगाड्या सहजपणे चालवता येतील. यामुळे बंदर देशातील ‘इन्लंड कंटेनर डेपो’ (खउऊी), ड्राय पोर्ट्स आणि लॉजिस्टिक पार्सशी कार्यक्षमतेने जोडले जाईल. या बहुविध जोडणीमुळे रस्ते वाहतुकीवरील अवलंबित्व कमी होण्याबरोबरच, लॉजिस्टिक खर्च कमी होईल आणि कार्बन उत्सर्जनात देखील लक्षणीय घट होईल, जे भारताच्या हरित वाहतूक दृष्टिकोनाशी सुसंगत आहे.|
  
बंदरासाठी स्वतंत्र रस्ता व रेल्वेजोडणी
 
वाढवण प्रकल्पाची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे, बंदरापासून राष्ट्रीय वाहतूक नेटवर्कपर्यंत स्वतंत्र रस्ता आणि रेल्वेमार्गांची बांधणी करण्यात येईल. अनेक पारंपरिक बंदरांप्रमाणे येथे गावांमधून किंवा लोकवस्तीतील भागातून मालवाहतुकीमुळे कोणतीही वाहतुककोंडी किंवा गर्दी होणार नाही. हे समर्पित वाहतूक कॉरिडोर्स नियंत्रित प्रवेश प्रणालीसह उभारण्यात येतील, ज्यामुळे मालवाहतुकीत कोणताही अडथळा येणार नाही. यामुळे वाहतुकीची सुरक्षा वाढेल; तसेच ध्वनी व वायुप्रदूषणाचे प्रमाणदेखील कमी होईल. अशी नियोजन पद्धत जगातील प्रमुख बंदरांमध्ये, जसे की रॉटरडॅम आणि सिंगापूर येथे अवलंबली जाते, जिथे बंदरे आणि अंतर्गत प्रदेश एकात्मिक वाहतूक मार्गांद्वारे जोडलेले आहेत. ज्यातून शहरी किंवा ग्रामीण जीवनावर परिणाम होत नाही.
 
स्थानिक आणि प्रादेशिक रस्ते नेटवर्कशी थेट संपर्क
 
वाढवण बंदर पालघर जिल्ह्यातील डहाणू परिसरात असले, तरी त्याचे प्रभावक्षेत्र संपूर्ण कोकण आणि उत्तर महाराष्ट्र व्यापणारे आहे. या रस्त्यांमुळे वाढवण बंदर उत्तर कोकण, ठाणे, पालघर, नाशिक आणि मुंबई या भागातील औद्योगिक क्षेत्रांसाठी सर्वांत जवळचे सागरी द्वार ठरेल. काही स्थानिक मार्ग हे पुढीलप्रमाणे सांगता येतील,
 
वाढवण-बोर्डी-चारोटी मार्ग : हा मार्ग मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग (छक-८)शी जोडला जाणार आहे. या मार्गाद्वारे बंदरापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे ३४ किमीचे अंतर पार करावे लागेल.
 
वाढवण-घोलवड-तलासरी-धाणगाव मार्ग: या मार्गाचा वापर स्थानिक वाहतूक आणि लघुउद्योगांना बंदराशी जोडण्यासाठी होईल.
 
वाढवण-धाणगाव-वाडा-भिवंडी मार्ग : हा मार्ग थेट ठाणे आणि मुंबई महानगर क्षेत्राशी जोडला जाईल.
 
मुंबईशी जोडणी
 
मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्ग, एस. व्ही. रोड आणि लिंक रोड या प्रमुख मार्गांवर क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक असल्याने परिणामी वाहतुककोंडी टाळण्यासाठी नरिमन पाईंट ते विरारपर्यंत सागरीसेतूच्या माध्यमातून, विविध पायाभूत सुविधांचा विस्तार आणि सुधारणा करण्यात येत आहे. याचबरोबर उत्तर-दक्षिण जोडणी करत २४.३५ किमी लांबीचा उत्तन-विरार सागरी सेतू बांधण्यात येणार असून, तो पुढे वाढवण बंदरापर्यंत नेण्यासाठी जोडरस्ता तयार करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच केली. उत्तन-विरार सागरी सेतू प्रकल्पाची लांबी ५५.१२ किमी असून, मुख्य सागरी सेतू २४.३५ किमी लांबीचा असणार आहे. या प्रकल्पात ९.३२ किमी लांबीचा उत्तन जोडरस्ता, २.५ किमीचा वसई जोडरस्ता आणि १८.९५ किमीचा विरार जोडरस्ता तयार करण्यात येणार असून, आता तो वाढवण बंदरापर्यंत वाढविण्यासाठी यावेळी निर्णय घेण्यात आला आहे.
 
समृद्धी महामार्गाची वाढवणशी जोडणी
 
वाढवण बंदराला शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गाच्या माध्यमातून ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’शी जोडण्यात येणार आहे. वाढवण बंदराच्या भविष्यातील मोठ्या प्रमाणावरील वाहतूक वर्दळीचा विचार करता विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील वाहतूक वर्दळीस उपयुक्त अशा महामार्गाची निर्मिती अत्यंत आवश्यक आहे. हा शीघ्रसंचार द्रूतगती महामार्ग पालघर जिल्ह्यातील डहाणू, विक्रमगड, जव्हार आणि मोखाडा या आणि नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुयातून जाणार आहे. समृद्धी महामार्गावरून वाढवण बंदराकडे जाण्यासाठी भरवीर-आमणे (समृद्धी महामार्ग) ते बडोदा-मुंबई द्रुतगती मार्गावरून जावे लागते. यामुळे प्रवासाचे अंतर वाढते. हे अंतर कमी करण्यासाठी नवा मार्ग तयार केला जाणार आहे. या नव्या महामार्गामुळे प्रवासातील ७८ किमी लांबीचा फेरा टळेल. यामुळे वाढवण बंदर ते भरवीर हा प्रवास सध्याच्या चार-पाच तासांवरून केवळ एक ते दीड तासांवर येईल.
 
वाढवण ऑफशोअर विमानतळ
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आकारास येणारे हे विधान बंदर खर्‍या अर्थाने मल्टीमॉडेल वाहतुकीचे जगात नावाजले जाईल, असे उदाहरण ठरणार आहे. याच वाढवण बंदरात समुद्रावर आधारित हा विमानतळ ‘चौथ्या मुंबई’च्या विकासाचे केंद्र ठरेल. अशा रितीने वाढवण बंदराच्या विकासातून निर्माण होणार्‍या या चौथ्या मुंबईत उभारण्यात येणारे हे विमानतळ मुंबईसाठी तिसरे विमानतळ असणार आहे, तर तीन विमानतळ असणारे मुंबई हे देशातील एकमेव शहरही ठरणार आहे.
 
भविष्याभिमुख बंदरजोडणीचे नवे मॉडेल
 
समुद्र, रेल्वे, रस्ता आणि विमानतळ या चारही वाहतूक माध्यमांशी केलेले वाढवण बंदराचे एकात्मिक नियोजन हे भारतातील पुढील पिढीच्या बंदर नियोजनाचे प्रतीक आहे. ‘सागरमाला’ कार्यक्रमाअंतर्गत वाढवण बंदर हे बंदर-आधारित विकास (Port-Led Development) या राष्ट्रीय दृष्टिकोनाचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
 
आर्थिक आणि पर्यावरणीय लाभ
 
वाढवण बंदराची अखंड वाहतूकजोडणी थेट आर्थिक परिणाम घडवणार आहे. जलद मालवाहतूक म्हणजे कमी थांबा वेळ (dwell time), अधिक अंदाजित पुरवठा साखळी (predictable supply chain) आणि कमी वाहतूकखर्च (Less Transporatation Cost) या घटकांमुळे भारतीय निर्यातदारांसाठी मोठा स्पर्धात्मक फायदा होईल. यातूनच शाश्वत बंदर वाहतूक व्यवस्थेचे वाढवण एक आदर्श उदाहरण ठरेल. या पायाभूत सुविधांच्या जोडणीमुळे पश्चिम व उत्तर भारतातील वाहन, वस्त्रोद्योग, रसायन, औषधनिर्मिती आणि कृषी क्षेत्रांतील उद्योगांना थेट बंदराशी जोडेल आणि वाढवणला बहुविध मालवाहतूक एकत्रीकरणाचे केंद्र बनवेल.
Powered By Sangraha 9.0