मूर्खांचा बाजार...

07 Nov 2025 11:55:40
Miss Universe 2025
 
मोठा विनोदच झाला की नाही, अशा आविर्भावात आजही बायकांची अक्कल ना गुढघ्यात असते किंवा बायका मूर्ख असतात; त्यांना कुठे अक्कल असते, अशा आशयाची वक्तव्ये जगभरातील सोशल मीडियावर लोकप्रियही होताना दिसतात. नव्हे, दैनंदिन जगण्यातही या वाक्यांनी महिलांना निरुत्साही करण्याचे कामही काही महाभाग करतात. पण, ‘तू मूर्ख आहेस’ या एका वाक्याने यावर्षीची ‘मिस युनिव्हर्स स्पर्धा’ वादाच्या भोवर्‍यात सापडली.
 
थायलंडचे राष्ट्रीय निदेशक आणि ‘मिस युनिव्हर्स संघटने’चे कार्यकारी निदेशक नवात इत्सराग्रिसिल याने मिस युनिव्हर्स मेक्सिको फातिमा बॉशला म्हटले की, "तू मूर्ख आहेस.”आत्मसन्मानाचा मुद्दा उपस्थित करत बॉश तिथून निघून गेली. तिचे समर्थन करत ‘मिस युनिव्हर्स’ विक्टोरिया केजर थेलविग आणि मिस इक्वाडोर, ‘मिस बांगलादेश’सुद्धा तिथून निघून गेली. ‘मिस युनिव्हर्स मेक्सिको’ असलेल्या बॉशला सार्वजनिक आणि जागतिक प्रतिष्ठेच्या व्यासपीठावर ‘मूर्ख’ म्हटले म्हणून जगभरात चर्चा झाली. महिला आत्मसन्मानाचा प्रश्न नव्याने उपस्थित करण्यात आला.
 
फातिमा बॉश कोण आहे, तर ती ‘मिस युनिव्हर्स मेक्सिको’ आहेच; पण त्याशिवाय ती मॉडेल, सामाजिक कार्यकर्ता आणि वक्ता आहे. तिने ‘कम्युनिकेशन’ विषयामध्ये पदवी मिळवली आहे. लैंगिक असमानतेविरोधात ती काम करते. लैंगिक समानतेसाठी ती समाजात जागरण करते आणि याच बॉशला नवातने ‘मूर्ख’ म्हटले. पण, त्याने असे का म्हटले, तर ‘मिस युनिव्हर्स स्पर्धे’त सहभागी असणार्‍या स्पर्धक महिलांनी ‘मिस युनिव्हर्स स्पर्धे’संदर्भातील व्यावसायिक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासंदर्भात निर्देश दिले होते. पण, काही स्पर्धक सहभागी झाल्या नाहीत. यावर नवातने स्पर्धक महिलांना विचारले की, "कोण कोण या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले नाही?” त्याने थेट ‘मिस युनिव्हर्स मेक्सिको’ फातिमा बॉशला यासंदर्भात विचारले की, ती अशा व्यावसायिक कार्यक्रमामध्ये सहभागी का झाली नाही? यावर ती म्हणाली की, "अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यापूर्वी मला माझ्या देशातील या स्पर्धेसंदर्भातील राष्ट्रीय विश्वस्ताची परवानगी घ्यावी लागेल. कृपया तुम्ही परवानगी घ्यावी.”
 
यावर नवातने तिला ओरडून म्हटले, "पहिले तर मी तुला बोलण्याची परवानगी दिली नव्हती. तसेच तुला या सहभागासाठी तुझ्या राष्ट्रीय विश्वस्ताची परवानगी घ्यावी लागत असेल, तर तू मूर्ख आहेस.” यावर बॉशने विनम्रतेने काही बोलण्याचा प्रयत्न केला, तर तिला बाहेर काढण्यासाठी नवातने सुरक्षारक्षकांना बोलावले. पण, त्याआधीच अपमानित झालेली बॉश तिथून निघून गेली. त्यानंतर ‘मिस युनिव्हर्स स्पर्धे’च्या आयोजकांबद्दल जगभरात रोष प्रकट करण्यात आला. समाजमाध्यमांवर वाढता विरोध पाहून मग नवातने बॉशची क्षमा मागत म्हटले की, "मला कुणाचा अपमान करायचा नव्हता. मी भावनेच्या भरात बोलून गेलो.”
काय म्हणावे!
 
नवात भावनेच्या भरात समोरच्या महिलेला ‘मूर्ख’ म्हणू शकतो, तेव्हा तो भावनेला आवर घालू शकत नाही. मात्र, त्याच्यापेक्षा वरच्या पदाच्या व्यक्तीशी बोलताना तो त्या व्यक्तीला ‘मूर्ख’ म्हणू शकला असता का? नाही. तेव्हा त्याने त्याच्या भावनांना आवर घातलाच असता. त्यामुळे भावनेच्या भरात महिलेचा अपमान करणे, हा काही बचावाचा किंवा केलेल्या अपमानातून सुटण्याचा मार्ग नव्हेच. हे सगळे मुद्दे लक्षात घेऊन, जगभरात बॉशच्या समर्थनार्थ अनेक मान्यवर पुढे आले. तसे पाहायला गेले तर, गेली अनेक वर्षे ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धा वादाच्या भोवर्‍यातच आहे. गेल्यावर्षीही भारताची विजेती रेशल गुप्ता हिने या स्पर्धेच्या वाईट व्यवस्थापनाबद्दल वाईट व्यवहाराबद्दल आरोप केले होते आणि तिने मुकुट परत केले होते.
 
१९९५ मध्ये मचाडो या १८ वर्षांच्या युवतीने ‘मिस व्हेनेझुएला’ ही स्पर्धा जिंकली. ‘मिस युनिव्हर्स स्पर्धे’त सहभागी होताना तिचे वजन पाच किलोने वाढले. तेव्हा त्या स्पर्धेच्या आयोजकांपैकी एकाने तिच्या वजनावरून तिच्यावर अतिशय वादग्रस्त टिप्पणी केली. त्यावेळा तिला हिणवणारा आयोजक कोण, तर अमेरिकेचे सध्याचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प! असो. ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेतील नियम-अटींबद्दलही नेहमीच चर्चा आणि संशय व्यक्त केला जातो. या वर्षी ७४वी ‘मिस युनिव्हर्स स्पर्धे’चे यजमानपद थायलंडकडे आहे. पण, पुढच्या वर्षी ते भारताकडे आहे. भारत यजमान असताना या सगळ्या चुका आरोप टाळले जातील, अशी आशा.
Powered By Sangraha 9.0