वन्दे मातरम् : स्वातंत्र्याचा महामंत्र

07 Nov 2025 13:09:57

Vande Mataram
 
 
भारत सरकारने नुकत्याच मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार आणि गृहमंत्रालयाने जाहीर केलेल्या पत्राद्वारे आज दि. ७ नोव्हेंबर रोजीपासून एक वर्षभर राष्ट्रीय गीत ‘वन्दे मातरम्’ची १५०वी जयंती साजरी करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ऑटोबर महिन्यातील आपल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात या संकल्पाचा पुनरुच्चार केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह समाजातील विविध संस्थादेखील ‘वन्दे मातरम्’च्या १५०व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत आहेत. देशभक्तीचा उत्साह आणि सांस्कृतिक वारसा समाजापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न खरोखर प्रशंसनीयच! त्यानिमित्ताने...
 
दि. २३ जून १७५७ रोजी बंगालमधील प्लासीच्या मैदानावर नवाब सिराजुद्दौला आणि लॉर्ड लाईव्ह यांच्यात झालेल्या युद्धात, ब्रिटिशांच्या हातून भारताच्या झालेल्या पराभवानंतर आपला स्वातंत्र्याचा सूर्य मावळला. या पराभवानंतर देशाचा उर्वरित भागही ब्रिटिशांच्या अधीन गेला आणि आपल्या नशिबी गुलामीचे परचक्र आले. त्या अवस्थेचे वर्णन करताना रशियातील विख्यात तत्त्वज्ञ लिओ टॉलस्टॉय यांनी म्हटले होते, "एका व्यापारी कंपनीने केवळ ३० हजार लोकांना आपल्यात सहभागी करुन, २० कोटी लोकसंख्या असलेल्या राष्ट्राला गुलाम केले.”
 
गुलामगिरीच्या काळात देशाची दुर्दशा पाहून समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात भारतमातेच्या स्वातंत्र्याच्या आकांक्षेचे अंकुरण झाले. समाजातील विविध स्तरांमध्ये स्वातंत्र्याच्या घोषणाही घुमू लागल्या होत्या. माता कालीचे उपासक आणि गुरू गोरखनाथांच्या परंपरेशी निगडित असलेल्या संतांनी गावोगावी ‘अलख निरंजन’चा जयघोष करत स्वातंत्र्यदेवतेला जागृत केले. संथाळ जमातीतील सिद्धू आणि कानू या भावंडांनी १८५५ साली दहा हजार संथाळांसह आपली भूमी आपणच राखू, आपली सत्ता आपणच उभारू, असा नारा दिला. याच काळात १८५७ मध्ये झालेल्या इंग्रजांविरुद्धच्या पहिल्या स्वातंत्र्यसमराचेही रणशिंग फुंकले गेले होते.
 
देशभक्तीने भारलेल्या या वातावरणातच दि. २७ जून १८३८ रोजी बंकीमचंद्र चट्टोपाध्याय या एका महान व्यक्तिमत्त्वाचा जन्म झाला. तीक्ष्ण बुद्धी, देवनागरी, बंगाली आणि इंग्रजी या तिन्ही भाषांचे विद्वान असलेले बंकीमबाबू, जेस्सोर (आताचा बांगलादेश) येथे ‘डेप्युटी कलेटर’ म्हणून नियुक्त झाले. इंग्रजांचे जनतेवरील अत्याचार आणि क्रौर्य पाहून त्यांनी साहित्याच्या माध्यमातून समाजजागृती घडवण्याचा संकल्प केला. याच अंतस्थ प्रेरणेने त्यांनी अनेक लेख, निबंध आणि कादंबर्‍यांचे लेखन केले. ‘श्रीकृष्णचरित्र’, ‘दुर्गेशनंदिनी’, ‘राजसिंह’, ‘चंद्रशेखर’ यांसारख्या त्यांच्या साहित्यकृती विशेष प्रसिद्धही झाल्या. आपल्या सर्व साहित्यकृतींतून बंकीमचंद्र यांनी इंग्रजी सत्तेचा अत्याचारी चेहरा समाजासमोर आणला. त्यांच्या कादंबर्‍यांपैकी एक प्रसिद्ध कादंबरी असलेल्या ‘आनंदमठ’मध्ये, संन्यासी विद्रोहाच्या पार्श्वभूमीवर भाष्य करण्यात आले आहे, यामध्येच प्रथमतः ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीयगीत लिहिले गेले. ‘आनंदमठ’मधले ‘वन्दे मातरम्’ या गीतात भारतमातेची स्तुती आली असून, त्यामधील स्थाने लालगोला, मुर्शिदाबाद आणि नदिया (बंगाल) या जिल्ह्यांमध्ये वसलेली आहेत.
 
दि. ७ नोव्हेंबर १८७५ रोजी ‘वन्दे मातरम्’ या गीताची निर्मिती झाली. हा दिवस भारतीय कालगणनेनुसार कार्तिक शुल नवमीचा म्हणजेच अक्षय नवमीचा होता. हा दिवस देवी जगद्धात्रीच्या पूजेचा पवित्र दिवस मानला जातो. सन १८९६ मध्ये कोलकात्यातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी प्रथमच ‘वन्दे मातरम्’ हे गीत सादर केले. त्यांनी हे गीत राग ‘मल्हार’मध्ये गायले होते. त्या दिवसानंतर काँग्रेसच्या प्रत्येक अधिवेशनात ‘वन्दे मातरम्’चे गायन करणे, ही एक परंपराच झाली.
बंगालमधून सुरू झालेल्या स्वातंत्र्य आंदोलनाला कमकुवत करण्यासाठी ब्रिटिशांनी ‘वंग-भंग’ योजना राबवली. या योजनेची घोषणा त्यांनी दि. १६ ऑटोबर १९०५ रोजी केली. बंगालचा प्रभाव कमी करणे, बंगाली क्रांतिकारकांचे बळ क्षीण करणे आणि हिंदू-मुस्लीम समाजात फूट पाडणे, हेच या ‘वंग-भंग’ योजनेचे खरे उद्दिष्ट होते. परंतु, विभाजनापूर्वीच देशातील दूरदर्शी नेतृत्वाने दि. ७ ऑगस्ट १९०५ रोजी कलकत्त्यातील टाऊन हॉलमध्ये मोठी सभा बोलावली. या सभेला येणार्‍या प्रत्येकाच्या मुखी एकच नारा होता, तो म्हणजे ‘वन्दे मातरम्!’
 
दि. १६ ऑटोबर रोजी आयोजित ‘दुःखद दिवस’ निमित्ताने आनंदमोहन बसू आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली कलकत्त्याच्या सेंट्रल मैदानावर ५० हजार लोक एकत्र आले. या जमलेल्या लोकांनी ‘वन्दे मातरम्’च्या घोषणा देत, साडेतीन किमीचा अनवाणी मोर्चा काढला. याच काळात मन्मथनाथ मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली ‘वन्दे मातरम् संप्रदाय’ची स्थापना करण्यात आली. इंग्रजांच्या अन्याय्य शिक्षांच्या विरोधात एका तरुणाने तर चक्क ‘वन्दे मातरम्’ हे शब्द ५०० वेळा लिहून आपला निषेध नोंदवला होता. देशाचे स्वातंत्र्ययुद्ध लढणारे क्रांतिकारी, फटके खात असतानाही ‘वन्दे मातरम्’च्या घोषणा देतच राहिले. ‘वन्दे मातरम्’च्या या वाढत्या प्रभावामुळे इंग्रजांनी ‘वन्दे मातरम्’च्या घोषणेवरच बंदी घातली. त्यामुळे ‘वन्दे मातरम्’ हा केवळ भारताचाच नव्हे, तर परदेशात कार्यरत स्वातंत्र्यसैनिकांचाही प्रेरणामंत्र झाला. दि. १४ एप्रिल १९०६ रोजी असाममधील बिहू उत्सवातही हजारो लोक छातीवर ‘वन्दे मातरम्’चे बिल्ले लावून आले होते. दि. २२ डिसेंबर १९०८ रोजी गुरू गोविंदसिंह जयंतीनिमित्त लंडनमधील ‘इंडिया हाऊस’मध्ये एका आयोजित कार्यक्रमातही ‘वन्दे मातरम्’चे गायन करण्यात आले.
 
दि. २२ ऑगस्ट १९०७ रोजी स्टटगार्ट येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी अधिवेशनात मादाम कामा यांनी ‘वन्दे मातरम्’ गीत गायले. कॅनडा व अमेरिकेतले भारतीय क्रांतिकारकही एकमेकांना भेटल्यावर ‘वन्दे मातरम्’ म्हणूनच अभिवादन करू लागले. भगिनी निवेदिता यांनी तयार केलेल्या ध्वजावरही ‘वन्दे मातरम्’ कोरले गेले. महर्षी अरविंद यांनी ‘वन्दे मातरम्’ नावाचे वृत्तपत्र प्रकाशित केल्याबद्दल, त्यांना इंग्रजांनी शिक्षा ठोठावली. महाकवी सुब्रमण्यम भारती यांनी ‘वन्दे मातरम्’ या गीताचे तामिळ भाषांतर केले; तर महात्मा गांधी यांनी गुजराती अनुवाद केला. तसेच तेलुगू, कन्नड, मल्याळी आणि उर्दू भाषांमध्येही याचे रूपांतर करण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक तथा प्रथम सरसंघचालक प. पू. डॉ. हेडगेवार यांनी तर नागपूरच्या नील सिटी शाळेच्या पाहणीसाठी आलेल्या इंग्रज निरीक्षकाचे स्वागतही ‘वन्दे मातरम्’ या घोषणेनेच केले. या सर्व घटनांमुळे ‘वन्दे मातरम्’ हे गीत स्वातंत्र्यप्रेमींच्या आयुष्यात मंत्र, प्रेरणा आणि श्रद्धास्थान झाले.
 
स्वातंत्र्याच्या लढ्यासोबतच ‘वन्दे मातरम्’ हे गीत स्वदेशीचेही मंत्र बनले. ‘वंग-भंग’ घोषणेच्या दिवशी आयोजित ‘दुःखद दिवस’ कार्यक्रमात रवींद्रनाथ टागोर यांनी उपस्थित लोकांच्या हातात राखी बांधून, त्यांना स्वदेशीचा संकल्प घ्यायला लावला. त्या दिवशी संपूर्ण बंगालमध्ये विदेशी वस्तूंचा त्याग आणि स्वदेशीचा स्वीकार करण्याचा निर्धार करण्यात आला. विदेशी वस्तूंची होळी पेटविताना ‘ॐ वन्दे मातरम् राष्ट्राय स्वाहा’ हा जयघोष सर्वत्र दुमदुमला. एका दिवसातच स्वदेशी प्रचारासाठी तब्बल ७० हजार रुपयांचे दान जमा झाले. स्वदेशीचा संकल्प घेताना महिलांनी प्रण केला की, लग्नाच्यावेळी त्या हातमागावर विणलेल्या बंगाली साड्या आणि हातात काचेच्या नव्हे, तर शंखाच्या स्वदेशी बनावटीच्या बांगड्याच घालतील. इंग्रजांनी तयार केलेल्य वस्तूंचा बहिष्कार करण्यासाठी, देशभर स्वदेशी कंपन्या उभारल्या जाऊ लागल्या. तामिळनाडूमधील तूतीकोरिन येथे स्थापन झालेली स्वदेशी नेव्हिगेशन कंपनी ही त्याच चळवळीचे प्रतीक ठरली. लोकमान्य टिळक यांनी ‘वन्दे मातरम्’ आणि ‘स्वदेशी’ या दोन्ही संकल्पनांना आंदोलनाचा पाया बनवले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनीही ‘वन्दे मातरम्’चा घोषणा देत विदेशी वस्तूंची होळी केली, तर लाला लजपत राय यांनी ‘वन्दे मातरम्’ म्हणतच इंग्रजांच्या लाठ्यांचा मारही सहन केला. अशा रितीने ‘आनंदमठ’मधील एक काव्य असलेले ‘वन्दे मातरम्’ गीत, आता संपूर्ण देशासाठी स्वातंत्र्याइतकेच स्वदेशीचाही प्रेरणामंत्र बनले.
 
ब्रिटिशांच्या कपटनीतीचे परिणामही हळूहळू दिसू लागले. ज्या ‘वन्दे मातरम्’ मंत्राने देशभक्तांच्या मनात प्रेरणेची ज्योत पेटवली होती, त्यात काहींना मूर्तिपूजेचा आणि धर्मभेदाचा आभास होऊ लागला. १९२३ साली काकीनाडा येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनात तत्कालीन अध्यक्ष मोहम्मद अली यांनी इस्लाममध्ये मूर्तिपूजा आणि संगीत मान्य नाही, असे सांगत ‘वन्दे मातरम्’चे गायन करण्यास विरोध केला. परंतु, बदरुद्दीन तय्यब, मोहम्मद रहीमतुल्ला सयानी, नवाब सय्यद मोहम्मद बहादुर आणि डॉ. एम. ए. अन्सारी यांसारख्या अनेक मुस्लीम अध्यक्षांनी, कधीही ‘वन्दे मातरम्’चा विरोध केला नव्हता. सन १९१५ पासून सतत ‘वन्दे मातरम्’चे गायन करणार्‍या महान देशभक्त विष्णु दिगंबर पलुस्कर यांनी "हे काँग्रेसचे व्यासपीठ आहे, कोणत्याही व्यक्तीचे खासगी ठिकाण नाही,” असे सांगत संपूर्ण ‘वन्दे मातरम्’चे गायन केले. पण, या विरोधामुळे काँग्रेस नेतृत्व दबावात गेले आणि अखेर संपूर्ण गीताऐवजी, फक्त दोनच कडव्यांचे गायन सुरू झाले. पंडित जवाहरलाल नेहरू यांनीही पत्राद्वारे सूचित केले की, ‘वन्दे मातरम्’ गीताचे फक्त दोनच चरण गायले जावेत आणि इच्छुक असल्यास, त्याऐवजी दुसरे गीतही गाता येईल. तरीसुद्धा दि. १५ ऑगस्ट १९४७ रोजी सुचेता कृपलानी यांनी ‘वन्दे मातरम्’चे गायन केले आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आग्रहावरून आकाशवाणीवर प्रख्यात संगीतज्ञ ओंकारनाथ ठाकुर यांनीही संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ सादर केले.
 
तथापि, तत्कालीन नेतृत्वाने हास्यास्पद तर्क मांडत ‘वन्दे मातरम्’च्या जागी ‘जन-गण-मन’ला राष्ट्रगीताचा दर्जा दिला. यावर राजर्षी पुरुषोत्तमदास टंडन यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत म्हटले होते की, "वन्दे मातरम्’ला नाकारणारी काँग्रेस मी कल्पनेतही पाहू शकत नाही.” सुदैवाने, आपल्या देशाचे प्रथम राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी दि. २४ जून १९५० रोजी दोन्ही गीतांना समान सन्मान देत, ‘वन्दे मातरम्’ आणि ‘जन-गण-मन’ दोन्हीला राष्ट्रगौरवाचे स्थान दिले. त्या ऐतिहासिक सभेच्या समाप्तीला सर्वांनी ‘वन्दे मातरम्’ उच्चारून एकमेकांना अभिवादनही केले. अगदी अलीकडेच, दि. ३१ ऑटोबर २०२५ रोजी झालेल्या ‘एकता परेड’मध्ये विविध वाद्यांच्या सुरावटींमधून सादर करण्यात आलेल्या ‘वन्दे मातरम्’च्या संगीतबद्ध सादरीकरणाने, या सर्व प्रश्नांना एक प्रभावी, भावनापूर्ण उत्तर दिल्याचे सर्वांनीच अनुभवले आहे.
 
आपल्या देशात ब्रिटिश साम्राज्यवाद्यांनी पेरलेली फूट आणि त्यावेळी आपल्या नेतृत्वाने दाखवलेली अदूरदृष्टीचे परिणाम, आज मतभेदाच्या वृक्षाच्या रूपात आपल्या समोर उभे आहे. १९४७ मधील देशविभाजनाची भीषणता आपण आधीच अनुभवलेली आहे. त्यामुळे अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी आपल्याला सांस्कृतिक एकतेच्या आधारावर पुन्हा एकत्र यावेच लागेल. ‘वन्दे मातरम्’ हे गीत सांस्कृतिक एकतेची सजीव अभिव्यक्ती आहे. त्याच्या सुरांमध्ये मातृभूमी विषयीचे प्रेम, भक्ती, त्याग आणि एकात्मतेची भावना गुंफलेली आहे. ‘वन्दे मातरम्’च्या १५०व्या जयंतीचे वर्ष हा केवळ उत्सव नाही तर, त्या राष्ट्रीय संकल्पाच्या पूर्तीकडे पडलेले एक दमदार पाऊल आहे. या पवित्र प्रसंगी संपूर्ण देशाने आनंद, उत्साह आणि श्रद्धेने भरून एकाच स्वरात ‘वन्दे मातरम्’चा गजर करावा, हाच या उत्सवाचा खरा अन्वायार्थ!
 
शिवप्रकाश

 
 
(लेखक भाजपचे राष्ट्रीय सह संघटन महामंत्री आहेत.)
Powered By Sangraha 9.0