न्यूयॉर्क शहरातील महापौरपदाच्या निवडणुकीत झोहरान ममदानी यांचा विजय हा अमेरिकेतील बदलत्या समाजप्रवाहाचे द्योतक म्हणावे लागेल. माध्यमांनी याला ‘विविधतेचा विजय’ म्हणून गौरवले असले, तरीही हा तथाकथित विविधतेचा उत्सव अमेरिकेच्या मूळ आत्म्यावरचा आघात ठरतोय. आज लंडनमध्ये जसे दृश्य दिसते, तशाच पद्धतीचे वारे अमेरिकेत वाहू लागले आहेत, त्याचा हा प्रथम अध्याय.
ब्रिटनची राजधानी लंडन एकेकाळी जगाच्या नागरी संस्कृतीचे केंद्र होते. आज तेथील मूळ ब्रिटिश नागरिकांना आपलेच शहर परके वाटू लागले आहे. सामाजिक बदलामुळे संवेदनशीलतेच्या नावाखाली त्यांच्या अभिव्यक्तीवरच बंधने येऊ लागली. सार्वजनिक ठिकाणी महिलांनी कोणते कपडे घालावे, कोणते विचार मांडावेत, हे ठरविण्याचा अधिकारही लंडनमधील धर्मांध जनतेने घेतल्याने, लंडनच्या मूळ नागरिकांना जीव मुठीत धरून जीवन कंठावे लागत आहे. ब्रिटिश समाजातील हा बदल केवळ राजकारणाचा परिणाम नाही, तर सामाजिक असंतुलनाचेही द्योतक. लंडनच्या महापौरपदी पाकिस्तानी वंशाचे सादिक खान निवडून आल्यापासून जे समीकरण तयार झाले, त्याचाच हा परिपाक! अशीच छाया आता न्यूयॉर्कवरही गडद होताना दिसते. (Zohran Mamdani)
झोहरान ममदानी यांनी त्यांच्या विजयी भाषणामध्ये सर्वसमावेशकता, समानता, आणि सामाजिक न्यायाचा उल्लेख केल्याने, ते ऐकायला नक्कीच मोहक वाटते. परंतु, त्या शब्दांच्या मागे कोणता विचार लपलेला आहे, हेसुद्धा लक्षात घ्यावे लागेल. त्यांच्या भाषणात अमेरिकेच्या पारंपरिक मूल्यांचा उल्लेख क्वचितच आढळतो. त्याऐवजी आर्थिक समानतेच्या नावाखाली भांडवलद्वेष आणि अल्पसंख्याकांच्या हक्कांच्या नावाखाली विशेषाधिकारांची मागणी हेच मुद्दे ठळक होताना दिसले. लोकशाही म्हणजे समान संधींचे व्यासपीठ असते; पण ममदानीसारखे नेते त्याला विशेषाधिकारांच्या राजकारणात बदलण्याचा धोका असतो. (Zohran Mamdani)
अमेरिकेमध्ये झालेल्या महापौरपदांच्या निवडणुकीमध्ये व्हर्जिनिया शहरामधून गझाला हाश्मी यांचाही विजय झाला. मुस्लीम उमेदवार विजयी होण्यामागे अमेरिकेतील वाढती मुस्लीम संख्या हेदेखील एक महत्त्वाचे कारण. आज अमेरिकेमध्ये मुस्लीम लोकसंख्या सातत्याने वाढती असून, त्यांनी न्यूयॉर्कसारखी शहरे काबीज केली आहेत. 2017 मध्ये अमेरिकेमध्ये मुस्लीम लोकसंख्या 3.45 दशलक्ष होती, ती 2020 मध्ये 4.5 दशलक्ष झाल्याचे आपल्याला आढळते. आजमितीला ख्रिश्चन आणि ज्यूंनंतर तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष हा इस्लाम जरी असला, तरीही 2050 पर्यंत इस्लाम अमेरिकेतील दुसऱ्या क्रमांकाचा धर्म असेल, अशी भाकिते वर्तवण्यात येत आहेत. आज एखाद्या देशामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात कृत्रिम बदल घडवणे, हा एका व्यापक कटाचा भाग ठरत आहे.
ममदानी यांचा विजय हा फक्त मुस्लीम मतांचा विजय नाही, तर त्यांनी प्रचारात घरभाडे नियंत्रण, मोफत सार्वजनिक सेवा, करमाफी आणि अनुदान यांसारख्या घोषणांचाही पाऊस पाडला होता. या सगळ्याचा प्रभावही मूळ अमेरिकेच्या नागरिकांवर पडलेला दिसतो. ममदानीच्या घोषणा आज ऐकायला जरी आकर्षक असल्या, तरी अमेरिकेच्या भविष्यासाठी त्या धोकादायकच ठरणार आहेत.
ममदानी यांनी त्यांच्या भाषणात ट्रम्प यांना खुले आव्हान देताना, नव्या अमेरिकेचा काळ सुरू झाल्याची घोषणा केली. पण, ही नवी अमेरिका नेमकी कोणाची आहे, हेच अजून स्पष्ट झालेले नाही. अमेरिकेच्या नागरिकांमध्ये वाढवली जाणारी वोक संस्कृती, त्यातून निर्माण होणारे विविध भ्रम यामुळे भविष्यात वाढून ठेवलेले धोके ओळखण्याचे भानही आज अमेरिकेच्या नागरिकांना राहिलेले नाही, हे दुर्दैव!
आज अमेरिका लंडनच्या पाऊलावर पाऊल ठेवून पुढे जात आहे. लंडनने ज्या वाटेने प्रवास केला आणि स्वतःची सांस्कृतिक ओळख गमावण्याच्या मार्गावर येऊन थांबले आहेत, त्याच दिशेने अमेरिकेची वाटचाल सुरू आहे. झोहरान ममदानी यांचा विजय म्हणजे, केवळ एका महानगरातील बदल नाही, तर संपूर्ण पाश्चात्य जगाला मिळालेला दुसरा इशारा आहे. जर अमेरिकेच्या नागरिकांनी वेळीच भविष्यातील धोका ओळखत स्वतःमध्ये बदल केल्यास, अमेरिकेचे दिवस बरे येण्याची शक्यता आहे, नाही तर, लंडननंतर न्यूयॉर्कचा क्रमांक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Zohran Mamdani)
- कौस्तुभ वीरकर