महाभारत युद्धात कर्णाचे सारथ्य करणारा शल्य राजा त्याला सतत टोचून बोलत असे आणि कर्णाला ते निमूटपणे ऐकून घेणे भाग पडत होते. आजच्या काळात अशी कुचंबणा काही घराणेशाहीवादी पक्षांच्या नेत्यांच्या वाट्याला आली आहे. अन्य पक्षांमध्येही जे घराणेशाहीच्या वारसाविरोधात बोलणारे नेते आहेत, त्यांच्यावर कारवाई करणे, हे अवघड जागचे दुखणे. कारण, या नेत्यांची स्वत:ची लोकप्रियता आहे. (Shashi Tharoor)
काँग्रेसचे केरळमधील खासदार शशी थरूर यांनी नुकताच घराणेशाहीच्या राजकारणावर कठोर हल्ला चढविल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली. ही अस्वस्थता त्यांनी घराणेशाहीवर, म्हणजे अप्रत्यक्षपणे राहुल गांधी यांच्यावर थेट टीका केल्यामुळेच आहे, असे नव्हे, तर थरूर यांच्यावर कोणतीही कारवाई करणे पक्षश्रेष्ठींना सध्या शक्य नाही, या असाहाय्यतेमुळेही आहे. याचे कारण थरूर यांना पक्षातून काढल्यास तोपर्यंत त्यांची खासदारकी कायम राहीलच, पण ते अन्य पक्षात प्रवेश करण्यासही मोकळे राहतील. त्यानंतर थरूर यांना काँग्रेसवर टीका करण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही. थरूर हे केरळमधील तिरुवनंतपुरम येथून सलग तीनदा निवडून आले आहेत. थरूर यांनी आपल्या बुद्धिकौशल्याने आणि मोकळ्या स्वभावाने सामान्य माणसाची मने जिंकली आहेत. थोडक्यात, काँग्रेसने त्यांना पक्षातून काढूनही टाकले, तरी ते आपल्या लोकप्रियतेच्या बळावर निवडून येऊ शकतात. त्यामुळे सध्या तरी काँग्रेस आपली लोकसभेतील एक जागा कमी करू इच्छित नाही. (Shashi Tharoor)
थरूर यांचा ताजा लेख नुकताच प्रसिद्ध झाला असून, त्या लेखात भारतात राजकारण हा कौटुंबिक व्यवसाय झाल्याची टीका थरूर यांनी केली आहे. त्यात त्यांनी भारतातीलच नव्हे, तर भारतीय उपखंडातील राजकीय घराण्यांची उदाहरणे दिली असली, तरी त्यांचा खरा रोख कुठे आहे, ते सर्वांनाच ठावूक आहे. खरी गोष्ट अशी आहे की, आजघडीला थरूर हे केरळमधील काँग्रेसचे सर्वांत लोकप्रिय आणि स्वीकारार्ह चेहरा. नेमकी हीच गोष्ट राहुल गांधी आणि त्यांच्या परिवाराला खटकते. कारण, आपल्यापेक्षा अधिक लोकप्रिय किंवा मान्यताप्राप्त नेता काँग्रेसमध्ये दुसरा कोणीही असू नये, हीच गांधी परिवाराची अट आहे. जे नेते यापूव गांधी वारसापेक्षा अधिक लोकप्रिय किंवा ताकदवान होतील, असे वाटले, त्यांना पक्षाने पद्धतशीरपणे संपुष्टात आणल्याचे जनतेने पाहिले आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी गांधी परिवाराला एक कठपुतळी नेता हवा होता. म्हणून त्यांनी खर्गे यांची निवड केली. पण, थरूर यांनी ही निवडणूक भलतीच गांभीर्याने घेतली आणि गांधी परिवाराच्या निवडीलाच आव्हान दिले. तेव्हापासून थरूर यांना पक्षात अलग पाडण्यात येत आहे.
थरूर हे काँग्रेसच्या मालकांच्या गळ्यात अडकलेले हाडूक बनले असले, तरी अन्य पक्षांमध्येही असे नेते आहेत, त्यांच्यावर कारवाई करणे हे त्या पक्षांच्या नेत्यांसाठी अवघड जागचे दुखणे बनले आहे. समाजवादी पक्षात आझम खान यांची अवस्था अशी झाली आहे. गेली दोन वर्षे तुरुंगात असलेले आझम खान नुकतेच जामिनावर बाहेर आले आहेत. बाहेर आल्यापासून ते यापुढे समाजवादी पक्षात राहतील की स्वतःचा स्वतंत्र पक्ष स्थापन करतील, याविषयी अटकळी सुरू आहेत. ते तुरुंगात असताना समाजवादी पक्षाचे मालक-नेते अखिलेश सिंह किंवा त्यांच्या परिवारातील कोणीही आझम खान यांची अजिबात विचारपूस केली नव्हती. इतकेच नव्हे, तर तुरुंगातून बाहेर आल्यावरही त्यांचे स्वागत करण्यास अखिलेश किंवा त्यांचे निकटवतय गेले नव्हते. आझम खान यांनी बाहेर आल्यावर काही सूचक वक्तव्यांतून आपली नाराजी व्यक्त केल्यावर अनेक दिवसांनी अखिलेश सिंह यांनी त्यांची भेट घेतली. पण, या भेटीतूनही दोघांचे सूर जुळल्याचे दिसून आले नाही. आझम खान यांना पक्षाबाहेर काढण्याची हिंमत अखिलेश यांच्यात नाही; कारण ते मुस्लीम समाजाचे मोठे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करणे शक्य नाही. पण अखिलेश यांना आझम खान यांचे महत्त्व यापुढे वाढूही द्यायचे नाही. सध्या उत्तर प्रदेशात कोणत्याच महत्त्वाच्या निवडणुका नसल्याने दोन्ही नेत्यांनी ‘जैसे थे’ स्थिती कायम ठेवली आहे. जसजशा निवडणुका जवळ येतील, तेव्हा त्यांच्यातील मतभेद अधिक मुखर होऊ लागतील.
आम आदमी पक्षाच्या राज्यसभेतील खासदार स्वाती मालीवाल यांनीही पक्षनेते अरविंद केजरीवाल यांची अनेक दुष्कृत्ये चव्हाट्यावर आणली आहेत. केजरीवाल नेहमी खासगी चार्टर्ड विमानातूनच कसा प्रवास करतात, चंदीगढमध्येही त्यांनी आपल्यासाठी कसे आलिशान घर बांधले आहे, त्यांच्याविरोधात बातम्या देणाऱ्या वृत्तपत्रांचे पंजाबमधील वितरण थोपविण्याचा प्रयत्न त्यांनी कसा केला, यांसारख्या घडामोडी मालीवाल यांनी अलीकडेच उजेडात आणल्या होत्या. आता स्वाती मालीवाल यांची राज्यसभेतील मुदत संपेपर्यंत केजरीवाल यांना त्यांना सहन करावे लागणार आहे. मालीवाल या केजरीवाल यांच्या दिल्लीतील शीशमहालात आपल्याला झालेल्या मारहाणीचा वचपा काढत आहेत.
पक्षाच्या नेत्यांमध्ये मतभेद असू शकतात; नव्हे, असतातच. पण, आजकाल असे मतभेद म्हणजे पक्षविरोधी कृत्य असे समीकरण बनले आहे. ते घराणेशाही कारभाराचे द्योतक आहे. नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यात अनेक मुद्द्यांवर मतभेद होते आणि ते वेळोवेळी जाहीरही झाले होते. ‘हिंदू कोड बिल’ असो की काश्मीरसाठी ‘कलम 370’ तयार करणे असो, त्यावर पटेल यांचे मत नेहरूंच्या विरोधी होते. पण, म्हणून पटेल हे काँग्रेसविरोधी कारवाई करतात, असे कोणी म्हटले नाही. गुजरात दंगलींनंतर नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्रिपदावर ठेवायचे की नाही, यावर अडवाणी आणि वाजपेयी यांच्यातही मतभेद होते. पण, म्हणून अडवाणी किंवा वाजपेयी हे पक्षविरोधी कारवाया करतात, असे कोणी म्हटले नाही. पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये मतभेद असले, तर त्यात गैर काय? या मतभेदांतूनच पक्षाची भूमिका निश्चित होत असते. पण, घराणेशाहीत पक्षप्रमुख हा सर्वेसर्वा असतो. त्याचे मत हेच पक्षाचे मत असते. त्यामुळे त्याच्याविरोधात बोलणे हे पक्षाच्या विरोधात बोलण्यासमान मानले जाते. ही नेतेशाही, हुकुमशाही झाली. अशी हुकुमशाही कम्युनिस्ट पक्षात असते; कारण तेथे मतभेदाला वावच नसतो. काँग्रेस असो की अन्य कोणताही घराणेशाहीवादी पक्ष असो, तेथेही अशीच हुकुमशाही असते.
महाभारत युद्धात कर्णाच्या रथाचे सारथ्य करण्यास शल्य राजाने एकाच अटीवर मान्यता दिली होती. ती अट म्हणजे, तो कर्णाला जे अपमानास्पद बोलेल, ते सर्व कर्णाला निमूटपणे ऐकून घ्यावे लागेल. भारतातील घराणेशाहीवादी पक्षांतील बंडखोर नेत्यांबाबत पक्षनेत्यांची स्थिती सध्या अशीच झाली आहे. (Shashi Tharoor)
- राहुल बोरगांवकर