तनीयांसं पांसुं तव चरणपंकेरुहभवं
विरीन्चिः संचीन्वन विरचयति लोकान्विकलम
वहत्येनं शौरिः कथमपि
सहस्त्रेण शिरसां
हरः संक्षुद्यैनम भजति भसितोदधुलन्विधीम॥2॥
पहिल्या लोकात आपण जगन्मातेच्या उपासनेची बुद्धी होणे, हेच तिच्या साधकाप्रति असलेल्या ममत्वाचे आणि साधकाच्या विशिष्ट आत्मउन्नतीचे निदर्शक असल्याचे जाणून घेतले. त्याचप्रमाणे जगन्माता श्री ललिता देवी ही समस्त जगताची स्वामिनी असून ब्रह्म, विष्णु आणि शंकर अर्थात विरिंच्य, हरी आणि हर हेसुद्धा तिचेच पुत्र असून, तिच्याच कृपेने ते ईश्वर या सर्वोच्च स्वरूपाला प्राप्त झाले आहेत, याचेही विलेषण आपण समजून घेतले. उत्पत्ति, स्थिती आणि लय या तिन्ही आवर्तनस्वरूप क्रिया, वैश्विक पातळीवर सुचालित ठेवण्याची जबाबदारी या तिघांना श्री ललिता देवीनेच प्रदान केली आहे, हे पण आपल्याला उमगले आहे. या लोकात पुढील त्याचा विस्तार दिला आहे.
आचार्य म्हणतात, हे ललिता त्रिपुरसुन्दरी तुझ्या चरणकमलांच्या धुळीतील एक छोटा कण घेऊन, ब्रह्मदेव हे विश्व निर्माण करतो. विश्वाचा पालनकर्ता विष्णू अदिशेष रुपात, आपल्या सहस्त्र फण्यांवर या विश्वाला कसेबसे तोलून धरतो आणि प्रलयकाली याच विश्वाचा संहार करून, शिव त्याच्या रक्षेपासून स्वतःच्या शरीराला भस्मविलेपन करतो. म्हणजे तुझे स्वरूप इतके विराट आहे की, आमच्या ज्ञात बुद्धीनुसार सर्वशक्तिमान भासणारे असे तिन्ही देव, तुझ्या ‘चरण रजा’चा इतका विस्तार करतात आणि जगी धन्य मानले जातात. मग तुझ्या या संपूर्ण स्वरूपाचा अभ्यास करण्याची, त्याला जाणून घेण्याची संधी मिळालेला मी किती भाग्यवान आहे!
हे देवीच्या विराट स्वरूपाचे वर्णन आहे. शक्ती ही सर्वव्यापी आहे. तिला चेतना आणि जड अशा दोन्ही रुपांत पाहताना आचार्य हे विवेचन करतात. ती जडत्वाची चैतन्य स्वरूप स्वामिनी आहे, असा सिद्धांत ते मांडतात. याला थोड्या भिन्न पद्धतीनेही पाहता येते. शिव, विष्णू आणि ब्रह्मदेव हे तिन्ही जणू आदिमायेचेच पुत्र आहेत; अर्थात अंश आहेत. त्यांच्या अंतरंगात असणारी चेतना म्हणजे, साक्षात आदिमाया आहे. म्हणजे तिच्या अंशात्मक भौतिक रूपाच्या अंशात, तिने चेतना रूप धारण केले आहे. अर्थात, हे तिचे सूक्ष्मातिसूक्ष्म स्वरूप आहे. पण ते इतके प्रभावी आहे की, त्यातून विश्वाचा विस्तार अव्याहत चालत राहतो. म्हणून ‘चरण रज’ ही संकल्पना वापरली आहे.
हा लोक जणू पहिला लोकाचाच विस्तार आहे. सर्वश्रेष्ठ असणारे देवांनासुद्धा कार्यप्रवण व्हायला, चेतनास्वरूप आदिमायेची अंतरंगातील अस्तित्वाची आवश्यकता आहे. ते अस्तित्व लहरींच्या स्वरूपातील आहे, चेतना रूपातील आहे, ऊर्जा रूपातील आहे. या चेतना स्वरूप ऊर्जेशिवाय, सगळ्यांचेच अस्तित्व अर्थहीन आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्हींची पडद्यामागची स्वामिनी श्री ललिता त्रिपुरसुंदरीच आहे. आता या चेतनाशक्तीच्या ‘चरण रजा’चे महत्त्व आचार्य विशद करतात आणि या स्वल्प शक्तीचा-चेतनेचा वापर करून, ईश्वरही स्वतःला धन्य समजतात याचा अर्थ काय?
आचार्य सांगतात, उत्पती स्थिती आणि लयाची स्वामिनी चेतना शक्ती आहे, तीच सगुण ब्रह्म आहे आणि ती सर्वश्रेष्ठ आणि उपास्यही आहे. निर्गुण ब्रह्मामध्ये पहिल्यांदा चेतना स्वरूप होऊन ‘एकोहं बहुस्यामि’ हा विचार प्रसवणारी आदिमायाही तीच आहे. निर्गुण सगुणाच्या मिलनातून विश्व उत्पत्ती घडवणारी कारक शक्तीही तीच आहे. निर्गुण ब्रह्माला सुप्त अवस्थेत ठेवून, माया पटल रचून ब्रह्मांडाचा खेळ रचणारी स्वामिनीही तीच आहे. मग या खेळात उत्पत्ती स्थिती आणि लय यावर नियंत्रण ठेवून, संपूर्ण विश्व अव्याहत कार्यप्रवण ठेवणे आणि विश्व प्रसरण होत राहील, जीव मायाबद्ध राहतील, हा खेळ रचणारीसुद्धा तीच आहे. मी त्या चेतनेलाच शरण आलो आहे. ज्या चेतनेच्या चरण रजातून विश्वोत्पत्ती झाली, त्या ‘चरण रजा’चा कोट्यांश माझ्यातसुद्धा आहे. त्या माझ्यातील चेतनेच्या अंशाला जाणून घ्यायला मी उत्सुक आहे. हे आदिमाये मला मार्गदर्शन कर.
ब्रह्मतत्त्वाची तीन मुख्य कार्ये मानली गेली आहेत. ती म्हणजे उत्पत्ति, स्थिती आणि लय. अर्थात, सृजन पालनपोषण आणि संहार. ही तिन्ही कार्ये आवर्तनस्वरूप आहेत. अर्थात जन्माला येणे, तरुण होणे, वार्धक्य आणि मृत्यू हे अव्याहत चालूच असणारे चक्र आहे. एक जीवात्मा म्हणून, आपण या सर्व अवस्थातून जातो आणि मृत्योर्परांत आपण पुन्हा देह धारण करून, या चक्रात बद्ध होतो. हेच चक्र वैश्विक पातळीवरसुद्धा विराट स्वरुपात सातत्याने सुरू असते. सूर्यमाला निर्माण होत असतात. त्यांचा विस्तार होतो, नंतर त्या उद्ध्वस्त होतात. नंतर पुन्हा नवीन सूर्यमाला निर्माण होतात. अगदी सूक्ष्म स्वरूपापासून विश्वव्यापी स्वरुपात, ही आवर्तने स्वरूप क्रिया सातत्याने सुरूच असते. देवीच्या या स्वरूपाला जाणून घेऊन, आचार्य तिच्याकडून विश्वाचा कार्यकारणभाव जाणून घेण्याचा प्रयास करत आहेत. ते दिव्य ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयास करत आहेत.
आचार्य करत असलेली श्री ललिता त्रिपुरसुंदरीची स्तुती, या ज्ञानप्राप्तीसाठी आहे. माझ्यातील चेतनेच्या अंशाला मी जाणून घेतले, मी त्या चेतनेची अनुभूती घेतली की, हे महामाये, अंशात्मक पातळीवर का होईना, पण मीसुद्धा तितकाच सक्षम होईन. तुझ्या चेतनारूपी अस्तित्वाला जाणून घेऊन, मी स्वतः चेतना स्वरूप होईन आणि माझ्या भोवताली असणाऱ्या विश्वावर मी नियंत्रण प्रस्थापित करून श्रेष्ठत्व धारण करेन.
इथे मानवाच्या दृष्टिकोनाला, पूर्णपणे वेगळी दिशा देण्याचा प्रयास आचार्य करत आहेत. तू गौण नाहीस, तू क्षुद्र नक्कीच नाहीस, तू त्याच चेतनेचा अत्यंत लघु असा अंश आहेस, जी ब्रह्मांडाची स्वामिनी आहे. तू तिचा पुत्र आहेस. तिने तिचा अंश तुझ्या आत विद्यमान ठेवला आहेस, ज्याला तू प्राणशक्ती किंवा आत्मा म्हणून ओळखतोस. या सुप्त चेतनेला जागे कर आणि कार्यप्रवण हो. तुला असाध्य असे या जगात काहीही नाही.
या प्राणशक्तीची अनुभूती तू स्वदेहात अंतर्मुख होऊन घेऊ शकतोस. हीच चेतना तू बाह्य स्वरूपात तुझ्या आई, पत्नी, भगिनी या स्त्रियांमध्ये पाहा आणि त्यांना वंदन कर. त्यांच्यातील चेतना स्वरूपाचा आदर्श घेऊन, स्वतःचे जीवन उन्नत कर. श्रीविद्या अर्थात शुद्ध विद्या उपासना ही स्त्रीतत्त्वाला जगताचा कारक मानते, उपास्य मानते. हा वैदिक विचार आहे. सौंदर्यलहरीचे हे सौंदर्य आहे की, ते साधकाला थेट आत्मउन्नतीचा मार्ग दाखवते. परंतु, हे समजण्याची तरलता असेल, तरच हे रहस्य उलगडते आणि मग या स्तोत्राचा खरा रसास्वाद घेता येतो. (क्रमशः)
- सुजीत भोगले
9370043901