Parth Pawar : पार्थ पवार यांच्यावर नेमके आरोप काय? काय म्हणाले मुख्यमंत्री?

06 Nov 2025 16:24:12
Parth Pawar

मुंबई : (Parth Pawar) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे थोरले सुपुत्र पार्थ पवार हे सध्या एका जमीन व्यवहारातील गैरप्रकारामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या 'अमीडिया होल्डिंग्स एलएलपी' या कंपनीच्या जमीन खरेदीच्या व्यवहारामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. पार्थ पवार यांनी १८०४ कोटी बाजारभाव असलेली जमीन केवळ ३०० कोटींना विकत घेतल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. दरम्यान, याप्रकरणी आता प्रशासन अॅक्शन मोडवर आले असून, तहसीलदार सूर्यकांत येवले यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.
 
हेही वाचा :  Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरेंचा दौरा 'बेमोसमी' !


काय म्हणाले मुख्यमंत्री?

माध्यमांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना या प्रकरणाबाबत प्रश्न केला असता ते म्हणाले कि, "या प्रकरणाच्या संदर्भात सगळी माहिती मी मागवली आहे. महसूल विभाग, आयजीआर, लँड रेकॉर्ड यांच्याकडून सर्व माहिती मिळवून, याप्रकरणी योग्य ते चौकशीचे आदेश दिलेले आहेत. या सर्व माहिती आणि प्राथमिक चौकशीच्या आधारावर मी जे सांगायचे ते सांगेन. अद्याप माझ्याकडे पूर्ण माहिती आलेली नाही. प्राथमिकदृष्ट्या जे मुद्दे समोर येत आहेत ते गंभीर आहेत. त्यामुळे मी योग्य माहिती घेऊनच बोलेन."


पार्थ पवार (Parth Pawar) यांच्यावर नेमके आरोप काय?
 
२२ एप्रिल २०२५ रोजी 'अमीडिया होल्डिंग्स एलएलपी' कंपनीनं पुण्यातील सर्वात उच्चभ्रू अशी मानली जाणारी वस्ती म्हणजेच कोरेगाव येथे आयटी पार्क उभारणार असल्याचा ठराव केला. या ठरावावर पार्थ अजित पवार (Parth Pawar) आणि दिग्विजय अमरसिंह पाटील यांनी सह्या देखील केल्या. त्यानंतर पुढच्या काही दिवसात जमिनीचा खरेदी व्यवहार उरकण्यात आला. हे प्रकरण एकूण ४० एकर जमिनीच्या व्यवहाराचे आहे. मात्र आता विरोधी पक्षांकडून आरोप करण्यात येत आहेत कि, ३०० कोटींच्या या मालमत्ता खरेदीच्या व्यवहारासाठी मुद्रांक शुल्क फक्त आणि फक्त ५०० रुपये भरण्यात आले आहे. त्याबरोबरच १८०४ कोटी बाजारभाव असलेली जमीन केवळ ३०० कोटींना विकत घेतली असल्याचाही आरोप करण्यात येत आहे.
 
हे वाचलात का ? : Amit Gorkhe : आमदार अमित गोरखे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव; साहित्य जागर, जपले सामाजिक भान आणि मैत्रभाव!


दरम्यान एका वृत्तवाहिनेकडून प्रसारित करण्यात आलेल्या माहितीनुसार, असे ही लक्षात आले आहे कि, ही जमीन मूळ 'महार वतना'ची म्हणजेच सरकारच्या ताब्यात असलेली जमीन आहे. त्यामुळे 'अमीडिया होल्डिंग्स एलएलपी' कंपनीने सरकारच्या ताब्यात असलेली जमीन विकतही घेतली आणि स्टँप ड्युटीही भरलेली नाही,असे वेगवेगळे आरोप करण्यात येत आहेत.
 

 
Powered By Sangraha 9.0