मुंबई : (Parth Pawar) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे सध्या पुण्यातील एका जमीन व्यवहारातील गैरप्रकारामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या 'अमीडिया होल्डिंग्स एलएलपी' या कंपनीच्या जमीन खरेदीच्या व्यवहारामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. दरम्यान या गैरव्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले यांना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले. मात्र या सगळ्या प्रकारानंतर आता तहसीलदार येवले यांनी माध्यमांसमोर येत आपली बाजू स्पष्ट केली आहे.
हेही वाचा : Parth Pawar : पार्थ पवार यांच्यावर नेमके आरोप काय? काय म्हणाले मुख्यमंत्री?
माध्यमांशी बोलताना तहसीलदार येवले म्हणाले, "मी असा कोणताही व्यवहार केला नाही, पार्थ पवार (Parth Pawar) जमीन व्यवहाराशी माझा कोणताही संबंध नाही. मुळात, पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या संबंधाने माझ्याकडे कोणतीच फाईल आली नाही. जमीन व्यवहार प्रस्तावितही झालेला नाही. शिवाय अद्याप माझ्यापर्यंत निलंबनाची देखील कोणती माहिती आलेली नाही."
"तसेच, या जमीन व्यवहाराला आमच्याकडून कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही, परवानगी कुणी दिली, कोणत्या विभागाने दिली याची मला कल्पना नाही. माझ्यावर कोणत्या कारणाने कारवाई केली जात आहे, हे देखील मला माहिती नाही. त्यामुळे माझ्यापर्यंत निलंबनाचा आदेश आल्यानंतर अधिक बाबी स्पष्ट होतील," असे येवले म्हणाले.