मुंबई : (Mumbai Local CSMT Protest) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. मुंब्रा दुर्घटनेत जीआरपीने दाखल केलेल्या गुन्ह्याविरोधात सीएसएमटी स्थानकात आंदोलन करण्यात आले. मात्र, मुंबईत संध्याकाळी कार्यालय सुटण्याच्या वेळेत झालेल्या या आंदोलनामुळे रेल्वे प्रवाशांचा खोळंबा झाला. तब्बल दीड तासाच्या रेल रोकोनंतर ट्रेन सुरु झाल्यावर गर्दीने खचाखच भरलेल्या ट्रेनमधून अनेक ठिकाणी प्रवाशी ट्रॅकवर पडल्याच्या दुर्घटना घडल्या. तर दुसरीकडे ट्रॅकवरून चालणाऱ्या काही प्रवाशांना ट्रेनने उडविल्याच्या दुर्घटना ही घडल्या. या दुर्घटनांमध्ये मिळालेल्या माहितीनुसार, पाच जणांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यापैकी २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, एका प्रवाशावर जे.जे.रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावर गुरुवार,दि. ६ नोव्हेंबर रोजी मोटरमनने केलेल्या आंदोलनाचा प्रवाशांना मोठा फटका बसला. या आंदोलनामुळे लोकल ५० मिनिटे बंद होत्या. अशावेळी कामावरून सुटणाऱ्या अनेक चाकरमान्यांनी मध्य रेल्वेच्या आणि हार्बर मार्गाच्या सर्वच स्थानकांवर आणि फलाटावर गर्दी केली होती. तर काही प्रवासी रेल्वे रुळावरून चालत निघाले होते. मात्र ट्रेन सुरु झाल्याने हे प्रवासी सँडहर्स्ट स्थानकादरम्यान पोहोचले असता मागून आलेल्या अंबरनाथ जलद लोकलने रुळावरून चालणाऱ्या चार प्रवाशांना उडवले. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर, तीन जखमींवर जे जे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार सायंकाळी ५.५० पासून लोकल सोडण्यात आलेल्या नव्हत्या. मात्र, सायंकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी लोकल सुरु करण्यात आल्या.
आंदोलन नेमकं कशासाठी होते?
मुंब्रा इथे झालेल्या अपघातात लोहमार्ग पोलिसांनी २ अभियंत्यांवर गुन्हे दाखल केले, त्याच्या विरोधात रेल्वे कर्मचारी संघटना आंदोलन करत आहेत. यामध्ये नॅशनल रेल्वे मजूर युनियनकडून गुरुवार,दि.६ रोजी संध्याकाळी मोर्चा काढण्यात आला, त्यानंतर लोकल देखील सोडण्यात आल्या नाहीत, मोटरमन देखील यात सहभागी झाले होते. मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल सीएसएमटी स्थानकात उभ्या होत्या. वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाचे रेल्वे युनियन सोबत बोलणे सुरू झाले. लोकल सोडण्यात याव्यात यासाठीही बोलणी सुरू झाली. अखेर सायंकाळी ६ वाजता लोकल सुरु झाल्या. मध्य रेल्वे डीआरएम, डीएम सरांसोबत बोलून हे आंदोलन थांबवण्यात आल्याची माहिती, मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी दिली. तसेच, मस्जीद रेल्वे आणि सँडहर्स्ट रोड स्थानकादरम्यान रुळावरून चालणाऱ्या तीन प्रवाशांना मागून येणाऱ्या लोकलने धडक दिली, अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी माध्यमांना दिली. या तिघांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.