गुरू म्हटले की तीन शिरे आणि सहा हात असलेले स्वरूप सहजतेने नजरेसमोर उभे राहते. आज कलियुगात गुरू दत्तात्रेयांची उपासना, मानवी आयुष्यासाठी आदर्शवतच मानली आहे. याच गुरू दत्तात्रेयांच्या 16 अवतारांपैकी एक असलेल्या तिसऱ्या दत्तात्रेय या अवताराची जयंती कार्तिक कृ. 2 अर्थात उद्या शुक्रवार, दि. 7 नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. यानिमित्ताने गुरू दत्तात्रयांचा महिमा आणि त्यांच्या अवतारांचा घेतलेला आढावा...
भारतीय अध्यात्म विश्वातील सर्वांत गूढ, गहन आणि तरीही तितकेच वात्सल्यपूर्ण स्वरूप म्हणजे दत्त. ‘अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त’ हा जयघोष ऐकताच, जात-पात, पंथ-संप्रदाय या सर्वांच्या पलीकडे गेलेल्या एका विश्वव्यापी तत्त्वाची जाणीव होते. दत्त हे केवळ एक दैवत नाहीत; ते एक तत्त्व आहे. ते परंपरेचे रक्षक आहेत, तेच बंडखोर अवधूत आहेत. ते सृष्टीचे पालक (विष्णू), निर्माते (ब्रह्मा) आणि संहारक (महेश) यांचे एकत्रित, मानवी कल्याणासाठी प्रकट झालेले रूप आहेत.
आजच्या काळात, जेव्हा जग वैचारिक गोंधळ आणि अस्तित्वाच्या प्रश्नांनी ग्रासले आहे, तेव्हा दत्त तत्त्वज्ञानाची पुन्हा एकदा उजळणी करणे हा केवळ धार्मिक नव्हे, तर एक सखोल वैचारिक आणि सामाजिक उपचार ठरू शकतो. विशेष म्हणजे या समाधानाचा उगमच मुळी एका अद्भुत घटनेत आहे. ‘दत्त तत्त्व’ समजून घ्यायचे, तर ते का आणि कसे प्रकट झाले? हे पाहणे अनिवार्यच. ही कथा केवळ एका अवताराच्या जन्माची नाही; ती आहे जगातील सर्वोच्च मानवी मूल्यांच्या पातिव्रत्य आणि मातृत्वाच्या शक्तीची.
ही कथा आहे, अत्रि ऋषी आणि त्यांच्या पत्नी सती अनसूया यांच्या अढळ निष्ठेची. अनसूयेचे पातिव्रत्य इतके प्रखर होते की, तिची कीत त्रिभुवनात पसरली. या सतित्वाची परीक्षा घेण्यासाठी साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश ऋषींच्या वेशात अत्रिंच्या आश्रमात आले. त्यांनी अट घातली की आम्हाला भोजन हवे, पण विवस्त्र अवस्थेत! एक सती स्त्री अशा धर्मसंकटात काय करेल? पण अनसूया ही केवळ सती नव्हती, ती ज्ञानी आणि मातृत्वाची साक्षात मूत होती. तिने अतिथींना विन्मुख पाठवले नाही. आपल्या पातिव्रत्याच्या पुण्याईवर तिने संकल्प सोडला आणि त्या तिन्ही देवांचे रूपांतर लहान बालकांमध्ये केले. जगाचे चालक-पालक-संहारक, आज एका आईच्या वात्सल्यापुढे बालक झाले होते. तिने त्यांना मायेने स्तनपान करवले, पाळण्यात झोपवले. जेव्हा त्रिदेव परत आले नाहीत, तेव्हा तिन्ही देव-पत्नी (सरस्वती, लक्ष्मी, पार्वती) चिंताग्रस्त होऊन अनसूयेकडे आल्या आणि त्यांनी आपल्या पतींना मूळ रूपात देण्याची याचना केली.
अनसूयेने बालकांना पुन्हा मूळ रूपात आणले. या घटनेने प्रसन्न होऊन आणि अनसूयेच्या पुत्रप्राप्तीच्या इच्छेचा मान राखून, तिन्ही देवांनी ‘आम्ही तिघेही तुझ्या उदरी पुत्ररूपाने जन्म घेऊ,’ असा वर दिला. हे तिघेही ज्या एका रूपात प्रकटले, तेच दत्त-आत्रेय (अत्रिंना दत्त म्हणजे दिलेले) रूप होय.
दत्तात्रेयांचे स्वरूप हेच एक परिपूर्ण तत्त्वज्ञान आहे. तीन मुखे हे केवळ ब्रह्मा-विष्णू-महेश यांचे प्रतीक नाहीत, तर ते सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांचे, सृष्टी-स्थिती-लय या त्रिकार्यांचे आणि भूत, वर्तमान, भविष्य या त्रिकाळाचे प्रतीक आहेत. सहा हात हे मानवी षड्रिपुंवर (काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर) विजय मिळवण्याचे प्रतीक आहेत. त्यांच्या मागे असलेली गाय ही पृथ्वी (कामधेनु) आहे, जी आपल्याला पोसते. चार श्वान (कुत्रे) हे चार वेदांचे प्रतीक आहेत. याचा अर्थ, जे ज्ञान (वेद) उच्चभ्रू वर्गापुरते मर्यादित होते, त्याला दत्तप्रभूंनी सर्वांसाठी खुले केले. ते प्राणिमात्रांवर प्रेम करणारे समतेचे प्रतीक आहेत. दत्त हे अवधूत आहेत. अवधूत म्हणजे जो सर्व बंधनांपासून, अगदी अहंकाराच्या बंधनापासूनही मुक्त आहे.
दत्त हा मूळ अवतार चिरंजीव आहेच, पण ‘दत्त पुराणा’नुसार याच गुरुतत्त्वाने वेळोवेळी भक्तांच्या कल्याणासाठी आणि विशिष्ट कार्यसिद्धीसाठी विविध रूपे धारण केली. ही 16 रूपे (षोडशावतार) म्हणजे त्या एकाच तत्त्वाची विविध प्रकाशकिरणे आहेत, ती पुढीलप्रमाणे. कधी ते योगीराज बनून कार्तवीर्य सहस्रार्जुनाला योगविद्या देतात, तर कधी स्वतःचे वडील अत्रि ऋषींना वरदान देण्यासाठी अत्रिवरद होतात. तेच मूळ दत्तात्रेय म्हणून निसर्गाला (24 गुरू) गुरू मानणारे, अवधूत बनतात. प्रजेला ताप देणारा कालाग्नी शांत करण्यासाठी ते कालाग्निशमन रूपात येतात, तर सच्च्या साधकांचे योगिजनवल्लभ (प्रिय) बनतात. हे विश्व म्हणजे ईश्वरी लीला आहे हे पटवण्यासाठी, ते लीलाविश्वंभर होतात. सिद्धीचे स्वामी सिद्धराज होऊनही, ते साधनेलाच महत्त्व देतात. अज्ञानाच्या अंधारात ज्ञानसागर बनून, तर दुष्काळात विश्वंभरावधूत (पालनकर्ता) होऊन ते तारतात. भक्तांना मायेतून सोडवण्यासाठी मायामुक्तावधूत, दुष्टांचा नाश करण्यासाठी मायावी अवधूत, सर्व परंपरांचे मूळ आदिगुरू, शिव आणि दत्त एकच आहेत हे पटवणारे शिवरूप, देवांचा अहंकार दूर करणारे देवदेवेश्वर, वैराग्याचे प्रतीक दिगंबर आणि अखेरीस, विष्णुदत्त नावाचा सामान्य भक्त बनून ते भक्तीचा आदर्श जगासमोर ठेवतात.
पुराणांमध्ये वर्णिलेल्या या 16 अवतारांचा अगाध महिमा आपण पाहिलाच. परंतु, कलियुगातील सामान्य भक्तांना थेट आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन मिळावे, यासाठी हे गुरुतत्त्व दत्त संप्रदाय म्हणून, एका विशिष्ट परंपरेत स्थिरावले. हा संप्रदाय पूर्णपणे गुरु-शिष्य परंपरेवर चालतो, ज्यात भगवान दत्तात्रेयांना आदिगुरू मानले जाते आणि मूतपेक्षा गुरुभक्तीला व त्यांच्या पादुकांना सर्वाधिक महत्त्व आहे.
या संप्रदायाचा मुख्य ग्रंथ ज्याला साक्षात गुरू मानले जाते, तो म्हणजे ‘श्री गुरुचरित्र.’ या ग्रंथात दत्ताचे पहिले दोन अवतार, श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्या सविस्तर कथा आणि शिकवण आहे. म्हणूनच, या ग्रंथाचे वाचन (पारायण) करणे, ही दत्त संप्रदायातील एक प्रमुख उपासना मानली जाते.
आजचे जग माहितीच्या महापुरामुळे निर्माण झालेल्या वैचारिक गोंधळात अडकले आहे. ‘मी हे का करतोय?’ हा अस्तित्वाचा प्रश्न आज, केवळ साधू-संन्यासी यांनाच नाही, तर तुमच्या-माझ्यासारख्या सामान्य माणसालाही सतावत आहे. अशा परिस्थितीत दत्त उपासना करताना केवळ एक धार्मिक विधी म्हणून न पाहता, दत्त तत्त्वज्ञानाकडे एक व्यावहारिक साधन (Practical Toolkit) म्हणून पाहण्याची गरज आहे. दत्ताचे अवधूत स्वरूप आपल्याला आजच्या ‘इन्फॉर्मेशन ओव्हरलोड’च्या जगात, अलिप्त (Detach) राहून योग्य निर्णय कसे घ्यावेत, हे शिकवते. तर, त्यांचे 24 गुरू हे तत्त्वज्ञान कोणत्याही परिस्थितीतून, अगदी अपयशातूनही, शिकण्याची ‘ॲडाप्टेबिलिटी’ देते.
त्यामुळे दत्त तत्त्वज्ञानाची ही उजळणी हा केवळ एक धार्मिक सोहळा नसून, आजच्या काळासाठी एक अत्यंत आवश्यक असा वैचारिक आणि सामाजिक उपाय (Solution) आहे, हेच खरे.
दिगंबरा दिगंबरा,
श्रीपाद वल्लभ दिगंबरा!
- आसावरी पाटणकर
(लेखिका संगीताचार्य असून, कला, शिक्षण, मानसिक आरोग्य आणि अध्यात्म या क्षेत्रांमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. सनातन धर्माच्या प्रसार-प्रचाराचे महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या ‘उद्गार’ संस्थेच्या संस्थापकही आहेत.)