प्रयत्नवाद
जड शरीरात राहून गत जन्मांचे सर्व संस्कार पुढील जन्मात वहन करणारा जीवात्माच पुनर्जन्म घेत असला पाहिजे, हे उघड आहे. जन्म जीवाचा आहे जडशरीराचा नाही, तद्वत्च उत्क्रांती जीवाचीच आहे, केवळ जडशरीराची नाही, या सत्याप्रत आपण येतो. प्रयत्न करून जीवाला उन्नत, उत्क्रांत दशा प्राप्त करता येते, हे महान तत्त्व वैदिक ऋषिमुनींनी स्पष्ट केले आहे. अवैदिक परंपरेत केवळ एकच मसीहा उद्धारकर्ता मानतात परंतु, व्यक्ती व तिची साधना हीच प्रमुख असते आणि सुयोग्य प्रयत्नानेच तिचा उद्धार होऊ शकतो, असे वैदिक परंपरा मानते. विचारवंतांना वैदिक तत्त्वे मान्य होण्यासारखीच आहेत. गीता स्पष्टच सांगते,
उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत्|
आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः॥5,अ.6॥
कोणी कोणाचा उद्धार करीत नाही, स्वतःलाच स्वतःचा उद्धार करावा लागतो. प्रत्येक जीव स्वतःच्या कर्माने स्वतःचा उद्धार करू शकतो किंवा अवनती करू शकतो. म्हणूनच आपणच आपले बंधू आहोत व आपणच आपले शत्रू आहोत. अवैदिक परंपरेत मात्र जीवाला एखाद्याचे पूर्ण गुलाम केले आहे. असल्या परंपरा अशास्त्रीय आहेत, अवास्तव आहेत, म्हणून असल्या परंपरेत जीवन घालविणाऱ्या जीवांचे कधीच कल्याण होणार नाही. गीता सांगते,
प्रयत्नाद्यतमानस्तु योगी संशुद्धकिल्बिषः|
अनेकजन्मसंसिद्धस्ततो याति परां गतिम्॥45,अ.6॥
प्रत्येक जन्मात उत्तमोत्तम संस्कार ग्रहण करून, जीवात्मा उच्च उत्क्रांत दशेला प्राप्त करू शकतो. प्रयत्नवादाचे असे अनन्यसाधारण महत्त्व आहे, दुसऱ्यावर सोपवून आपला उद्धार कधीच होणार नाही. अशा तऱ्हेने प्रत्येक जन्मात उत्तमोत्तम संस्कार ग्रहण करण्याचा अखंड प्रयत्न करीतच, योगी परमगतीला प्राप्त करू शकतो. मागील जन्मातील संस्कारात इहजन्मातील संस्कारांची भर टाकीत, अनेक जन्मानंतर योगी उच्च जन्म प्राप्त करून अंती परमगती प्राप्त करु शकतो, मुक्त होऊ शकतो. पण त्याकरिता प्रयत्न आवश्यक आहेत. इहजन्मी असा प्रयत्न वा उद्योग करावा की, जेणेकरून पुढील जन्मात यापेक्षा उत्तम जन्म मिळेल. आपले जीवन एकाच जन्मापुरते मर्यादित नसून, जीवनाची कक्षा अनेक जन्म ओलांडत असते. जन्मजन्मांतरीचा हिशोब वा संस्कार संग्रह म्हणजे जीवन होय. केवळ इहजन्मापुरतेच जीवन मानणे चूक आहे, जीवन विशाल आहे. उत्तम संस्कारांनी अधिक उत्तम गती प्राप्त करायची, असा जन्मजन्मांतरीचा हिशोब आहे. आपल्याला लवकर मुक्ती मिळावी, याबद्दल तीव्रता वा घाई असणे स्वाभाविक असले तरी उत्तम संस्कारग्रहण वा प्रयत्नवादात घाई नको. धीरोदात्त पुरुष उत्तम कर्मे करीत जातो, फळाची आशा धरीत नाही. येथेच त्याला मुक्ती आहे. खरा कर्मयोगी वा ज्ञानयोगी तोच असतो. जीवनाचे सार हेच आहे.
जीवात्मा जन्म कसा घेतो?
हवेत सर्वत्र प्राणवायू व नत्रवायू पसरला आहे. ज्वलनाकरिता प्राणवायूची आवश्यकता असते. हवेत अन्य वायूसुद्धा असतात, परंतु ज्वलनाकरिता केवळ प्राणवायूचाच उपयोग होत असतो. जळताना कर्ब प्राणवायूशी संलग्न होऊन कर्बाम्लवायूची देहधारणा होते. तद्वत् चुंबकत्वाच्या लहरी लोखंडात प्रवेश करून, तेथे आपल्याला अनुकूल अणुरचना करून घेतात, म्हणून त्या लोहपट्टीचे रुपांतर चुंबकांत होते. अन्य धातूमध्ये चुंबकत्व उत्पन्न होऊ शकत नाही. याचे कारण चुंबकीय लहरी अन्य धातूत तसला योग्य बदल करू शकत नाहीत. म्हणूनच चुंबक लोखंडालाच आकर्षित करतो, अन्य धातूंना आकर्षित करीत नाही. जीवांचे जन्म होण्याकरिता गर्भधारणा होणे आवश्यक आहे. गर्भधारणा होण्याकरिता समान जातीच्याच नरमादीची आवश्यकता असते. विभिन्न गटातील नरमाद्यांचे मैथुनच होत नाही; कारण विभिन्न योनीतील नरमाद्यांचे गुणसूत्र विभिन्न असून एकमेकांत मिसळत नाही. त्यामुळे प्रकृतीत विभिन्न योनीच्या नरमादीत आकर्षण नसते.
आकाशस्थ मेघातील कणाकणात विद्युतसंचार भरलेला असतो. कणाकणातील विद्युतभार एकत्रित होऊन, तो महान भार पृथ्वीतलावर पडतो. परंतु, तो विद्युतभार पृथ्वीतलावर कुठेही पडू शकत नाही. ज्या पृथ्वीखंडावर मेघस्थित विद्युत्भाराच्या विरुद्ध विद्युतभार उत्पन्न होईल, त्याच ठिकाणी ती मेघस्थित वीज पडेल व त्या पृथ्वीतलखंडाशी एकरुप होईल. म्हणजे एका अर्थाने, त्या आकाशस्थ विद्युतचा अवतार वा जन्म, पृथ्वीतलावरील विशिष्ट स्थानी होतो. आकाशात काळे मेघ गडगडाट करीत एकावर एक लोळत येतात. ते इतके पृथ्वीतलाच्या निकट येतात की, घरादारावर लोंबल्यासारखे दिसतात. ‘लोंबती जलद घेऊनि नीरे’ परंतु, जेथे ते लोंबतात तेथे पाऊस पडेलच असे नाही. पाऊस पडण्याकरिता त्या पृथ्वीवरील हवेची आर्द्रता त्या ढगांमधील आर्द्रतेच्या निकट असायला हवी, ही शक्यता जंगलामुळे उत्पन्न होते. म्हणून जेथे अधिक वने असतात, तेथे अधिक पाऊस पडतो. पण मेघनिकट आर्द्रता असलेल्या प्रदेशात. असाच काहीसा प्रकार जीवदशा व जन्मविज्ञानाच्या बाबतीत आहे. पाऊस पडणे, विद्युत पडणे यात जसे निसर्ग नियम आहेत, तद्वत् जन्म रहस्याचे प्राकृतिक असे विज्ञान असल्यामुळे जन्माचे नियम जवळजवळ तसेच आहेत; पण थोडे दिव्य! मृत्यूनंतर अनेक जीवात्मे अवकाशात स्पंदन करीत राहतात. मृत्यूनंतर ते एकप्रकारच्या दिव्य अशा अवस्थेत असतात. तेथून कर्मगतीनुसार ते पृथ्वीस्थित मातृगर्भात आपण होऊन आकर्षिले जातात. पण कोणताही जीवात्मा कोणत्याही मातृगर्भात प्रवेश करू शकत नाही. मातृगर्भात तयार झालेल्या गर्भाला सर्वतोपरि योग्य असा तो अवकाशस्थ जीवात्मा असेल, तरच तो त्या गर्भात आपोआप आकर्षिला जाईल, अन्यथा नाही. आपण असेच जन्म घेत नसतो, तर आपला प्रकृतिच्या विशिष्ट नियमानुसारच जन्म होतो. गीता स्पष्टच सांगते,
ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः|
मनः षष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति॥7,अ.15॥
प्रकृतिं स्वामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः|
भूतग्राममिमं कृत्स्नमवशं प्रकृतेर्वशात्॥8,अ.9॥सुयोग्य प्रकृतीत म्हणजे मातृगर्भस्थ शरीरात सर्व भूत म्हणजे,‘जीवात्मे अवशं’ म्हणजे आपणहून आकर्षिले जातात. जन्माचा असा हा दिव्य खेळ सदोदित चालला आहे. दिव्य प्रकृतीच हे सारे करते. तेथे ईश्वराचा मुळीच संबंध नाही. अध्याय 9 मधील आठव्या लोकात गीता जरी, ‘मी प्रकृतिची निर्मिती करताना, जीवांना त्यांच्या कर्मभारानुसार प्रकृतीत म्हणजे देहात पुनः पुनः सृजन करतो’ असे म्हणत असली, तरी गीता अध्याय 3 मधील लोक 27 एवं 28 मध्ये स्पष्टच म्हणते,
प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः|
अहंकारविमूढात्मा कर्ताहमिति मन्यते॥27,अ.3॥वास्तविक सर्व कर्मे, सर्व प्रकारे प्रकृतीच्या गुणांमार्फत केली जातात. तरीही ज्याचे अंतःकरण अहंकारामुळे मोहित झाले आहे, असा अज्ञानी मनुष्य मी कर्ता आहे, असे मानतो.
(क्रमशः)
- योगिराज हरकरे
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)
9702937357