Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरेंचा दौरा 'बेमोसमी' !

06 Nov 2025 14:50:29
Chandrashekhar Bawankule
 
मुंबई : (Chandrashekhar Bawankule) उद्धव ठाकरे यांचा सध्याचा मराठवाडा दौरा हा 'बेमोसमी' असून, केवळ निवडणुकीवर डोळा ठेवून केलेला शुद्ध राजकीय दौरा आहे. ते मुख्यमंत्री असताना कधी शेतकऱ्याच्या बांधावर गेले नाहीत, मंत्रालयाचा दरवाजा ज्यांनी पाहिला नाही, ते आता केवळ टीकेसाठी फिरत आहेत. त्यांची पत आधीच गेलेली आहे, ती आता परत मिळणार नाही, अशा घणाघाती टीका महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
 
मुंबई येथे पत्रकारांना त्यांनी सांगितले की, "उद्धव ठाकरे यांना पूरग्रस्तांच्या मदतीमधील फरक सुद्धा माहिती नाहीत. घराचे, जनावरांचे नुकसान झाल्यास काय मदत देतात, याचा त्यांना कोणताही अभ्यास नाही. केवळ प्रधानमंत्री मोदीजी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका करण्यासाठी हा दौरा सुरू आहे."
 
हेही वाचा :  Amit Gorkhe : आमदार अमित गोरखे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव; साहित्य जागर, जपले सामाजिक भान आणि मैत्रभाव!
 
• पाहणी पथकाचे अभिनंदनच !
 
केंद्रीय पथकाने सोलापुरात रात्री टॉर्च लावून नुकसानीची पाहणी केल्याच्या टीकेला उत्तर देताना बावनकुळे यांनी पथकाची पाठराखण केली. ते म्हणाले, "केंद्रीय पथक दिवसभर फिरत होते. वाटेत अंधार झाला आणि शेतकऱ्यांनीच 'हे बघून घ्या' असा आग्रह केला, तर पथकाने काम सोडून परत यायचं का ? उलट, रात्री-अपरात्री फिरून महाराष्ट्रातील ए टू झेड निरीक्षण केल्याबद्दल त्या पथकाचे अभिनंदन केले पाहिजे. एकीकडे पथक येत नाही म्हणून टीका करायची आणि पथक आल्यावर ते रात्री का फिरले म्हणून टीका करायची, हा अभ्यास नसलेल्या लोकांचा प्रकार आहे."
 
• सरकार 'मिशन मोड'वर 
 
सरकारने महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठे ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे गेले आहेत. काही शेतकरी 'केवायसी' मुळे राहिले असले, तरी सर्व रक्कम जिल्हाधिकाऱ्यांकडे पोहोचली आहे. एकही शेतकरी मदतीपासून सुटणार नाही, यासाठी मुख्यमंत्री रोज आढावा घेत आहेत. आमचे सरकार 'मिशन मोड'वर काम करत आहे. "आम्ही 'धन दांडग्यां'ऐवजी खऱ्या गरजवंत शेतकऱ्याला कर्जमाफी देणार आहोत. यासाठी 'केस-टू-केस' जिल्हावाईज डेटा मागवला असून, एकदा कर्जमाफी झाल्यावर शेतकरी पुन्हा कर्जात जाऊ नये, ही आमची भूमिका आहे," असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
हे वाचलात का ? :  Rahul Gandhi : "सैन्याला राजकारणात ओढू नका", राजनाथ सिंह यांचा राहुल गांधींना इशारा; नेमकं प्रकरण काय?
 
• राहुल यांची जुनी 'घिसी-पिटी कॅसेट'!
 
विरोधी पक्षाने गेल्या नऊ महिन्यांत विकासाचा एकही सकारात्मक मुद्दा मांडला नाही. राहुल गांधी फक्त आयोग, निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टावर बोलून संभ्रम निर्माण करत आहेत. ते तीच जुनी 'घिसी-पिटी कॅसेट' वाजवत आहेत. ते 'बेचैन' झाले आहेत. त्यांना कळून चुकले आहे की, २०४७ पर्यंत या देशात मोदीजींच्याच एनडीएची सत्ता राहणार आहे. त्यामुळेच ते 'व्होट चोरी'सारखे मुद्दे काढून संभ्रम पसरवत आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0