मुंबई : (Chandrashekhar Bawankule) बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात मौजा सुलतानपूर येथे केंद्रीय योग आणि निसर्गोपचार संशोधन परिषद या संस्थेच्या स्थापनेसाठी २५ एकर शासकीय जमीन विनामूल्य देण्यास राज्य शासनाच्या महसूल विभागाने मान्यता दिली आहे. याबाबतचा निर्णय जारी करण्यात आला आहे.
सुलतानपूर येथील शासकीय गट क्रमांक ८८५ मधील एकूण जमिनीपैकी २५ एकर जागा या प्रकल्पासाठी देण्यात येणार आहे. या जागेवर १०० खाटांचे अत्याधुनिक रुग्णालय आणि योग व निसर्गोपचार संशोधन संस्थेची स्थापना करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. (Chandrashekhar Bawankule)
हेही वाचा : Ajit Pawar : "माझा या गोष्टीशी काही संबंध नाही...": उपमुख्यमंत्री अजित पवार
ही जमीन संस्थेला 'भोगवटादार वर्ग-२' म्हणून देण्यात आली आहे. या प्रकल्पाला केंद्र शासनाची रीतसर मान्यता मिळाल्यानंतरच बुलढाणा जिल्हाधिकारी संस्थेला जमिनीचा ताबा देतील. जमिनीचा ताबा मिळाल्यापासून तीन वर्षांच्या आत मंजूर रुग्णालयासाठी आणि संशोधन संस्थेसाठी तिचा वापर सुरू करणे बंधनकारक आहे.
या जमिनीचा वापर केवळ मंजूर प्रयोजनासाठीच (रुग्णालय व संशोधन संस्था) करावा लागेल. शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय ही जमीन विकता येणार नाही, देणगी देता येणार नाही, गहाण ठेवता येणार नाही किंवा भाडेतत्त्वावर देता येणार नाही,अशी अट ठेवण्यात आली आहे. (Chandrashekhar Bawankule)