"हा कसला वेडेपणा...", राहुल गांधींनी दाखवलेल्या फोटोतील ब्राझिलियन मॉडेलचा व्हिडिओ समोर; स्वतःच केला खुलासा

    06-Nov-2025   
Total Views |

Rahul Gandhi

मुंबई : (Rahul Gandhi Vote Theft Allegations) 
काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी हरियाणा विधानसभा निवडणुकीत ‘मत चोरी’ झाल्याचा नवा आरोप करत पत्रकार परिषदेत हरियाणातील मतदार यादीत ब्राझिलियन मॉडेल लारिसाचा (Brazilian model Larissa) फोटो दाखवला आणि २२ वेळा वापरल्याचा पुरावा सादर केला. यानंतर आता फोटोमध्ये असलेली महिला लारिसा हिने स्वतः प्रतिक्रिया दिली असून, तिला स्वतःलाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. तिच्या प्रतिक्रियेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

काय म्हणाली महिला?

राहुल गांधींनी केलेल्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर लारिसाने एक्सवर पोर्तुगीज भाषेत व्हिडिओ शेअर केला. हा फोटो तिच्या सुरुवातीच्या मॉडेलिंगच्या दिवसांतील एक जुना स्टॉक फोटो असल्याचे तिने स्पष्ट केले. “माझा भारताच्या राजकारणाशी काहीही संबंध नाही,” असे तिने व्हिडिओमध्ये सांगितले. पुढे तिने आश्चर्य व्यक्त करताना म्हटले, "हे खूप भयानक आहे! माझे जुने फोटो वापरत आहात का? मी तर फोटोत खूप तरुण दिसत आहे, मी १८-२० वर्षांची असेल तेव्हाचा तो फोटो असेल. पण हा माझा फोटो भारतात मतदानासाठी वापरण्यात येत आहे. मला भारतीय दाखवून लोकांना फसवण्यात येत आहे. हा कसला वेडेपणा आहे?"

ती पुढे म्हणाली, "एक पत्रकार माझ्या कामाच्या ठिकाणी मला फोन करुन माझी प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करत होता. त्याने माझ्या इंस्टाग्रामवरही मेसेज पाठवला. मी उत्तर दिले नाही. मात्र, माझ्या मित्राने मला भारतात व्हायरल होत असलेला दुसरा फोटो पाठवला. तुम्ही विश्वास ठेवणार नाही! मी कधीही भारतात आलेली नाही. मी एक ब्राझीलियन डिजिटल इन्फ्लुएंसर आणि हेअरड्रेसर आहे. मला भारतीय लोक खूप आवडतात,” असे ती म्हणाली. "माझा फोटो वापरला गेला, मी नाही! पण माझ्या पोस्ट पाहणाऱ्या, भारतीय माध्यमांना त्या भाषांतर करून देणाऱ्या आणि शेअर करणाऱ्या सर्व भारतीयांचे मी मनापासून आभार मानते. लोकप्रिय होण्यासाठी आपण काही भारतीय शब्द शिकणार आहोत”, असेही ती मजेत म्हणाली.
 
 

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\