मुंबई : (Ajit Pawar) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे पुण्यातील कोरेगाव पार्कच्या जमीन व्यवहारातील गैरप्रकारामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. पार्थ पवार यांनी १८०४ कोटी बाजारभाव असलेली जमीन केवळ ३०० कोटींना विकत घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहे. या प्रकरणी माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी त्यांचा या गोष्टीशी काहीच संबंध नसल्याचे म्हटले आहे.
अजित पवार (Ajit Pawar) नेमकं काय म्हणाले ?
"सध्या वेगवेगळ्या माध्यमांवर जे काही दाखवल जात आहे, मला त्याबद्दलची पूर्ण माहिती नाही. माझा त्या गोष्टीशी डायरेक्ट 'अजित पवार' म्हणून काही संबंध नाही, मला गेली ३५ वर्ष महाराष्ट्रातली जनता ओळखते. या निमित्ताने मी आता संपूर्ण माहिती घ्यायचं ठरवलं आहे. कारण तीन- चार महिन्यांपूर्वी अशी काही तरी गोष्ट सुरू असल्याचं कानावर आल होत. त्यावेळी देखील मी सांगितलेलं कि, असं काहीही चुकीच केलेलं मला चालणार नाही. मात्र त्यानंतर परत काय झालं ते मला माहिती नाही."
"मी आजपर्यंत माझ्या नातेवाईकांच्या फायद्यासाठी काधीही, कोणत्याही अधिकाऱ्याला फोन केलेला नाही. मात्र आज मी सर्व सरकारी अधिकाऱ्यांना सांगेन कि, कोणीही माझं नाव घेऊन एखाद काम घेऊन आलं, जे नियमात बसणारं नसेल, तर त्याला माझा कोणत्याही प्रकारचा पाठिंबा नसेल. मी नेहमी कायद्याच्या चौकटीत राहून काम करणारा कार्यकर्ता आहे, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची जरूर चौकशी करावी. त्याबरोबरच मी देखील संपूर्ण माहिती घेऊन नेमकी वस्तुस्थिती काय आहे हे लवकरच सांगेन," असे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.