बंगालचे ‌‘कल्याण‌’

05 Nov 2025 11:43:17
West Bengal

 
पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि विरोधी पक्षाच्या भूमिकेत असलेल्या भाजपमधील वाद नवीन नाहीच. तृणमूलच्या या ‌‘जंगलराज‌’मध्ये आतापर्यंत शेकडो भाजप कार्यकर्त्यांना जीवही गमावावा लागला आहे. यापूवही भाजपच्या खासदारांवर, नेत्यांवर, त्यांच्या वाहनांवरही हल्ले करण्याचे बरेचदा प्रयत्न झाले. यावरून बंगालमधील कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती किती ढासळली आहे, याची कल्पना यावी. पण, आता तृणमूल काँग्रेसचे खासदारच गुंडगिरीची आणि थेट गुद्द्याची भाषा बोलू लागले आहेत. त्यामुळे जिथे खासदाराच्या तोंडी ही अशी विखारी भाषा असेल, तिथे या पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांची उक्ती आणि कृती यांच्याबद्दल काय बोलावे... (West Bengal)

तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी प. बंगालमधील भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांना थेट धमकी दिली. “दानुकीमध्ये सीआयएसफ सुरक्षेशिवाय तुम्ही येऊनच दाखवा. इथून तुम्ही परत जाऊ शकणार नाही,” या शब्दांत कल्याण बॅनर्जी अधिकारींना धमकावले. आता बंगाली मतदारांनी लोकसभेत निवडून दिलेले हे खासदार महाशयच अशा प्रकारे अन्य पक्षाच्या नेत्यांना थेट धमकावणार असतील, तर यांच्यापासूनच आधी सुरक्षा घ्यावी लागेल, अशी स्थिती. तेव्हा, असे एखाद्या नेत्याला जाहीर धमकावण्यापर्यंत मजल जाते तरी कशी? तर साहजिकच ममतादीदींचा वरदहस्त असल्याशिवाय हे शक्य नाही. दीदींचा पाठिंबा आणि राज्यातील तृणमूलचे कार्यकर्ते म्हणून काम करणाऱ्या पोलिसांच्याच जीवावरच कल्याण बनज यांची एवढी हिंमत झाली.
 

एकूणच बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती इतकी ढासळली आहे की, या राज्यात आता विरोधी पक्षांचे लोकप्रतिनिधीही सुरक्षित नाहीत. बंगालमध्ये महिला, गरीब, शेतकरी असे सगळ्यांचेच जीव टांगणीला लागलेले. कधी कोणता तृणमूलचा कार्यकर्ता संपत्तीचा, अब्रूचा किंवा थेट नरडीचाच घोट घेईल, याची शाश्वती नाही. दीदींना ज्यांच्या जीवावर ही सत्ता वारंवार उपभोगता येते, त्या बांगलादेशी घुसखोरांनी युक्त असलेल्या मतदारयादीवरच निवडणूक आयोगाने ‌‘एसआयआर‌’च्या माध्यमातून मोर्चा वळवला आहे. त्यामुळे दीदी आणि त्यांच्या चेलेचपाट्यांच्या पायाखालची वाळूच सरकली आहे. कल्याण बॅनर्जी दिलेली धमकी हे त्याचेच द्योतक!
 

‘ते‌’ बंगाली असले तरी...
 

देशभरातील १२राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदारयादी पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रिया राबविली जाणार असून, प. बंगालमध्ये कालपासून या प्रक्रियेची सुरुवात झाली. याअंतर्गत घरोघरी जाऊन मतदारांची फेरतपासणी करणे, त्यांची रीतसर नोंद ठेवणे ही क्लिष्ट प्रक्रिया राबवून मतदारयादी पुढील महिन्यात अंतिम करून प्रसिद्ध केली जाईल. त्यामुळे पुढील वष पार पडणाऱ्या विधानसभा निवडणुकांपूव प. बंगालची मतदारयादी स्वच्छ होऊन, त्यामधून बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्यांची नावेही हद्दपार होतील, अशी आशा. पण तसे झाले, तर आगामी विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसू शकतो, म्हणूनच ममता बॅनजनी या प्रक्रियेला प्रारंभीपासून विरोध दर्शविला आहे. त्यासाठी त्यांनी बंगालमध्ये मोर्चा काढून शक्तिप्रदर्शनाचाही घाट घातला. पण, एवढ्यावर थांबतील त्या दीदी कसल्या! त्यांनी ही प्रक्रिया राबविणाऱ्या ‌‘बूथ लेव्हल ऑफिसर‌’ अर्थात ‌‘बीएलओं‌’नाही लक्ष्य करून, त्यांना या प्रक्रियेपासून परावृत्त करण्यासाठी दवाबतंत्राचा अवलंब केला.
 

तृणमूल काँग्रेस पक्षाचा कूचबिहार भागाचा अध्यक्ष गिरींद्रनाथ बर्मन आणि बासंती विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्यामलाल मंडल यांनी त्यांच्या समर्थकांना “बीएलओ दिसले की त्यांना थेट झाडावर उलटे टांगा” असे आदेश दिल्याचे वृत्त ‌‘टेलिग्राफ‌’ने दिले होते. यावरून मतदारयादी पुनरीक्षणाची प्रक्रियाच पार पडू नये, त्यात विलंब व्हावा, खंड पडावा, याच उद्देशाने बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे नेते, गुंड कार्यकर्ते सक्रिय झालेले दिसतात.
 

त्यातच काही ‌‘बीएलओं‌’नीही जीवाच्या भीतीपोटी या प्रक्रियेतच सहभागी न होण्याचा निर्णय घेतला, तर काहींनी यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने आयोजित केलेल्या प्रशिक्षणालाच दांडी मारली. त्यानंतर आयोगानेही या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या ‌‘बीएलओं‌’वर कारवाईचा इशारा दिला. त्यामुळे मतदारयादी पुनरीक्षणाची प्रक्रिया प. बंगालमध्ये विनाविघ्न पार पडते का, ते पाहावे लागेल. कारण, अशा 80 हजारांहून अधिक ‌‘बीएलओं‌’चा शेवटी जीवही तितकाच महत्त्वाचा. त्यामुळे हे ‌‘बीएलओ‌’ बाहेरचे नसले आणि बंगालीच असले, तरी त्यांच्याच राज्यात त्यांच्याच जीवाची शाश्वती नाही, असा हा आजचा ‌‘बुडता बंगाल!‌’

Powered By Sangraha 9.0