परतवारी

    05-Nov-2025
Total Views |
paratwari
 
२०१४ साली पहिल्यांदा आळंदी पंढरपूर वारी करण्याचा योग्य आला. तेव्हा कौस्तुभ काकांची भेट झाली. त्यांच्याकडून ‌‘परतवारी‌’विषयी ऐकलं होतं. त्यांच्या आठवणी ऐकून एकदातरी आपण ‌‘परतवारी‌’ करावी, असं वाटत होते. दरवष विचारच व्हायचा. यावष योग जुळून आला.अजूनही कित्येकांना अजूनही ‌‘परतवारी‌’ म्हणजे काय, हेच माहीत नाही. या लेखात जाणून घेऊया ‌‘परतवारी‌’विषयी...
 
आषाढ शुद्ध दशमीला सर्व पालख्या पंढरपुरात पोहोचतात. त्या पौर्णिमेपर्यंत पंढरपुरात असतात. गुरुपौर्णिमेला गोपाळपुरात काला होतो आणि सर्व पालख्या परतीच्या वाटेला लागतात. ‌‘परतवारी‌’ म्हणजे पंढरपूरहून सर्व पालख्या आपापल्या गावी पुन्हा चालत जातात. आम्ही पंढरपूर ते आळंदी असे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीसोबत ‌‘परतवारी‌’ केली. आळंदी ते पंढरपूर असे जाताना १७ दिवस लागतात. येताना मात्र दहा दिवस. प्रत्येक दिवशी अंतर मोठे असते. त्यामुळे थोडे कठीण वाटते. पण, माऊली सोबत असल्यावर कठीण काय? माऊली आहे तिकडे फक्त आनंदच! सर्व दिंड्यांच्या विणेकऱ्यांसाठी माऊलींसोबत थांबणे बंधनकारक असते; बाकी कुणाला हे बंधन नाही. त्यामुळे संख्या कमी असते. म्हणून सुविधासुद्धा फार नसतात किंवा सुविधा नाहीत म्हणून गद कमी असेही असेल. वारीत जाताना तुम्ही दिंडीत पैसे भरले की तुमची राहण्याची, जेवण्याची सोय दिंडीकडून केली जाते. ‌‘परतवारी‌’साठी अशी नोंदणी नाही आणि सोयही नाही. मोठी अंतरे, सुविधांचा अभाव यामुळेच बऱ्याचजणांना कठीण वाटते.
 
आम्ही चतुर्दशीला पंढरपुरात पोहोचलो. विठुरायाचं मुखदर्शन घेतलं. उद्या म्हणजे पौर्णिमेला कधी निघायचं वगैरे माहिती करून घेतली. पौर्णिमेच्या दिवशी सकाळी गोपाळपुरात गेलो. संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली दोन्ही पालख्या मागोमाग पोहोचल्या. गोपाळपुरात काल्याचे कीर्तन चालू होते. पालख्या गोपाळपूर कृष्ण मंदिरावरून विठ्ठल मंदिराकडे आल्या आणि पुन्हा आपापल्या मुक्कामी गेल्या. दुपारी जेवणानंतर दोन्ही पालख्या निघाल्या. आज मुक्काम वाखरी. सर्वांत छोटं अंतर. पण माऊलींना निरोप द्यायला बरीच मंडळी जमली होती. त्यामुळे वेग कमी होता. ठिकठिकाणी आरती होत होती. ‌‘ज्ञानोबा तुकाराम‌’च्या गजरात संथ वेगाने दोन्ही पालख्या पुढे जात होत्या.
 
साधारण ७ वाजता माऊलींची पालखी वाखरी मुक्कामी पोहोचली. उद्यापासून अंतरे मोठी. उद्या मुक्काम वेळापूर. उद्या पहाटे २.३० वाजता पालखी निघणार, अशी घोषणा झाली. सुरुवातीला थोडंसं दडपण आलं, आपण उठू ना? त्या रात्री झोपच नाही लागली. पण, चाल मात्र छान झाली. आम्हाला दिंड्यांचा वेगाने जमेल का, अशी शंका होती म्हणून २ वाजताच निघालो.
 
पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात चालताना छान वाटत होतं. सुरुवातीला रातकिड्यांची किरकिर मग पक्ष्यांची किलबिल कानांवर येत होती. काही वेळाने थांबत चालत होतो. जेवणानंतरचा प्रवास मात्र माऊलींसोबत केला. इथे प्रत्येक दिंडी वेगळी नव्हती. दिंड्यांसोबत चालताना एक गोष्ट लक्षात आली की ते काही पळत नाहीत. उलट भजन मालिका ऐकत अंतर कसे कापतोय काळातच नाही.
प्रत्येक दिवशी साधारण ३५-३८ किमी अंतर होतं. त्यामुळे पहाटे २.३०-३ वाजता निघायचं. जेवणाचा थांबा तीन-चार तासांचा आणि मुक्कामी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत पोहोचायचं असा दिनक्रम होता. सकाळी पहिला करणा वाजला की दक्ष आणि तिसरा करणा वाजला की आरती, मग ‌‘ज्ञानोबा-तुकाराम‌’ गजर करत पालखीत विराजमान होणार. मग आपोआप प्रत्येकजण नेहमीच्या क्रमाने चालू लागणार. दिंड्यांचे अभंग सुरू होणार. ‌’रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी, माझे चित्त तुझे पाया, मिठी पडली पंढरी राया‌’, ‌‘वाचन एक कमळापती, ज्ञानियांचा राजा गुरू महाराव‌’ असे भजनमालिकेतले अभंग आणि काही अभंग झाल्यावर किंवा विसाव्याच्या जवळ आल्यावर होणारे गजर वातावरण प्रसन्न करतात.
 
संध्याकाळच्या मुक्कामाच्या ठिकाणी जाण्याआधी हरिपाठ. मुक्कामावर पोहोचल्यावर ‌‘महाराज ज्ञानेश्वर माऊली‌’ हा गजर, तर मला अगदी ‌‘सोहं‌’ जपासारखाच वाटायचा. त्यानंतर आरती. मग जेवण करून आपला विसावा शोधा. पूव जेवणाचीसुद्धा सोय नसे, असे ऐकलं होतं. पण, कल्याणचे सखा भोईर व मंडळी गेली काही वर्षे सर्व वारकऱ्याना भोजनसेवा देत आहेत. मुक्कामावर पोहोचलो की आरती झाल्याबरोबर नैवेद्य दाखवून पंगत सुरू होईल, याची ते दक्षता घेतात. गैरसोय हीच सोय मानूनच वारकरी सदैव आनंदात असतो आणि याचा प्रत्यय ‌‘परतवारी‌’तसुद्धा येतो. आनंद नामात आहे, असे सर्व संतांनी सांगितले आहे. वारीत त्याचा प्रत्यय येतो. या ‌‘परतवारी‌’त सोहळे नाहीत त्यामुळेच याला ‌‘वैराग्यवारी‌’ म्हणतात का माहीत नाही; पण मलातरी हीसुद्धा ‌‘आनंदवारी‌’च वाटली.
 
- स्वाती खामकर
9819712010