मुंबई : (Pandharpur) पंढरपूर येथील श्री क्षेत्र विठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथे पांडुरंगाच्या (Pandharpura) नवीन सागवानी लाकडी रथनिर्मितीचे काम पूर्ण होऊन बुधवारी दि. ५ नोव्हेंबर रोजी या रथाचे पंढरपूरासाठी प्रस्थान झाले. यंदा कोकणातील कारागिरांनी हे कार्य पार पाडले आहे.
रथाच्या बांधकामात जय-विजय, हनुमान आणि गरुड यांच्या आकर्षक कोरीवकामाचा समावेश आहे. पर्यावरणपूरकता लक्षात घेऊन पूर्ण रथ लाकडाच्या साहाय्याने तयार करण्यात आला असून कोणतेही धातूचे खिळे वापरलेले नाहीत. रथातील सर्व जोडकाम लाकडी खिळ्यांनीच करण्यात आले असून हे खिळे देखील कारागिरांनी स्वतः बनवले आहेत. रथाचे नक्षीकाम हे पूर्णतः हाताने घडवले गेले असून कोणत्याही यांत्रिक साधनांचा वापर केलेला नाही.
हेही वाचा : हाताने मैला साफ करणाऱ्या प्रथेला पूर्णविराम देण्यासाठी ठाण्यात जिल्हास्तरीय समितीची बैठक
केळबाई इंडस्ट्री (कुडाळ) चे सिद्धेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ आणि नेरूर येथील कुशल कारागीर विलास मेस्त्री, श्यामसुंदर मेस्त्री आणि त्यांच्या सहका-यांनी दोन वर्षांच्या अथक परिश्रमानंतर हे काम पूर्ण केले आहे. रथ निर्मितीकारांच्या मते, सागवानी लाकडामुळे हा रथ पुढील किमान शंभर वर्षे टिकणार. आपल्या भावना व्यक्त करताना सिद्धेश नाईक म्हणाले, “पंढरपूर (Pandharpura) देवस्थानाच्या या पवित्र कार्यात सहभागी होण्याचा मान आम्हा कोकणवासीयांना लाभला, हे आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. पांडुरंगाच्या कृपेनेच हे कार्य साकार झाले.”
हे वाचलात का ? : Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर म्हणाले, "तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर..."
स्थानिक प्रशासन आणि भक्तजनांच्या उपस्थितीत आज या रथाचे उद्घाटन भक्तीभावाच्या वातावरणात आणि जळगावकर महाराज,परभणीचे शिंदे मामा आणि मंदिर समिती सदस्य रमेश गोडसे यांच्या उपस्थितीत पार पडले. आगामी आषाढी वारीत हा नवीन रथ सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.