
मराठी रंगभूमी दिन विशेष
प्रेक्षकांमुळेच मराठी नाटकांचे भवितव्य उज्ज्वल
युवा नाट्य कलावंत अपर्णा चोथे यांचे मत
मराठी नाटकांना भवितव्य अतिशय उज्ज्वल असून रसिकांचा उदंड प्रतिसाद हा आनंददायी वारसा टिकवून ठेवण्यासाठी नेहमीच उपयुक्त ठरला असून नव्या कलाकारांनी अभ्यास करून या क्षेत्रात पाय रोवले पाहिजेत असे स्पष्ट मत मराठी रंगभूमी दिना निमित्त नवोदित अभिनेत्री अपर्णा चोथे यांनी व्यक्त केले.
मराठी रंगभूमी ला अवकळा आली आता नाटकांचा कोणी वाली नाही, प्रेक्षक पाठ फि रवितात तरूण कलाकार उत्सुक नाहीत वगैरे गोष्टी निव्वळ उथळ असल्याचे सांगतांना दै. मुंबई तरूण भारत सोबत केलेल्या खास चर्चेत अभिनेत्री अपर्णा चोथे यांनी एकूणच रंगभूमी वारसा आणि नव्या संचातील तंत्रज्ञानासह आलेल्या नाटकांवर आपले मत मांडले.
- मराठी रंगभूमी आणि नाटक या प्रवासाबद्दल काय वाटते?
अपर्णा चोथेः मराठी रंगभूमीला आणि नाटकाला अतिशय समृध्द आणि भारतीय संस्कृतीशी नाळ कायम असलेला वारसा आहे. अण्णासाहेब किर्लोस्करांपासून ते आजच्या नव्या दमाच्या अक्षता आचार्य किंवा प्राजक्त देशमुख पर्यंत जे-जे नाटककार आणि लेखकांनी रंगभूमीवर कलाकृती सादर केली त्याला मराठी सिकांनी उदंड असा प्रतिसाद दिल्याने हा प्रवास अतिशय आनंददायीच राहिला आणि राहणार असल्याचा विश्वास आहे.मी नवी कलाकार असल्याने कदाचित आधीच्या समर्थ नाट्यकलावंतांच्या अभिनयातून शिकवण घेऊनच या क्षेत्रात पाऊल ठेवले. विशेष म्हणजे माझ्या स्वतःच्या त्या तिघी... स्वातंत्र्यकुंडातील विरांगना या एकपात्री प्रयोगाला देखील जो प्रतिसाद मायबाप प्रेक्षकांनी दिलीा तो अभूतपूर्व असाच असल्याचे मला जाणवले. त्यामुळे मराठी रंगभूमीचा आणि नाटकांचा प्रवास भविष्यात देखील उज्ज्व असाच आहे असे मला वाटते.
-कोरोना काळानंतर ऑनलाईन नाटक आणि या बद्दल चिंता व्यक्त होत होती तो धोका वाटतो का?
-अपर्णा चोथेः अजिबात नाही. उलट आता प्रत्येक वयोगटातील प्रेक्षक हा नाट्यगृहाकडे वळतो आहे असे चित्र आहे अतिशय चांगली कथानक असलेली नाटके रंभूमीवर येताहेत आणि भविष्यात देखील ती येणार आहेत असे चित्र आहे. नव्या दमाचे कलाकार आणि लेखक तसेच नवं तंत्रज्ञान घेऊन हे लोक वेगवेगळे प्रयोग जे प्रेक्षकांच्या अभिरूचीला पसंत पडतील असेच करीत असल्याचे आपल्याला बघायला मिळते. लीना भागवत- मंगेश कदम यांचे आमने -सामने तसेच डॉ. राजन ताम्हणे यांचे डॉ. नरेश नाईक लिखित गोष्ट तिच्या घटस्फ ोटाची ऋषी मनोहर यांचे ठरलय फ ॉरएव्हर यात तर नव्या दमाचे कलाकार ऋता दुर्गुळे,कपिल रेडेकर आदी आहेत. शिवाय यात एलईडी स्क्रीनचा उपयोग आहे किंवा करूणाष्टके तसेच अद्वैत दादरकरचे शिकायला गेलो एक आदी नाटकांना रसिक डोक्यावर घेताहेत त्यामुळे १७० हून अधिक वर्षांपासून रंगभूमी समृध्द करणार्या या कलाकृतींना आता कोणताही धोका वाटत नाही. आम्ही सर्व कलाकार याचे वारकरी म्हणूनच सक्रीय आहोत.
- मराठी प्रेक्षकांबद्दल काय वाटते?
- अपर्णा चोथेः मराठी प्रेक्षक अतिशय चोखंदळ आहे. तो नाटकप्रेमी आहे त्यामुळे त्याला नाटक बघालया येतांना नाटकं करायची नसतात तो आनंदाने येतो आणि आम्हा कलाकारांना आनंद देऊन आनंद घेऊनच जातो. हा माझा अनुभव आहे. चक्क मराठी नाटकांच्या प्रेमापायी हे लोक आपल्या वयाची, आजारपणाची आणि कोणत्याही व्याधीची पर्वा न करता व्हील-चेअरवर, हातात काठी घेऊन, कानाला यंत्र लाऊन नाटक बघायला येतांना मी बघितले आहे. एवढच नव्हे तर नाटक संपल्यानंतर ते आम्हा कलाकारांचे प्रत्यक्ष भेटून कौतुक केल्याशिवाय परत जात नाहीत त्यामुळे आमचा विश्वास आणखी दृढ होतो आणि या रसिकांमुळेच आम्हाला काम करण्याची प्रेरणा मिळते. त्यामुळे मराठी नाट्य रसिकांबद्दल कोणताही आक्षेप अथवा दुराग्रह असण्याचे कारणच नाही किंबहुूना १७० हून अधिक वर्षे म्हणूनच हे मराठी नाटक अगदी टवटवीत आहे काळ बदलला तसे ते कालानुरूप बदलत आहे आणि मराठी नाट्यप्रेमी त्याला स्वीकारीत आहेत.
- कालचे आणि आजचे नाटकं कसे बघता?
-अपर्णा चोथेः मराठी नाटके आज देखील टवटवीत आहेत कालची आणि आजची देखील. जुनी नाटके देखील आजच्या नव्या पिढीचा प्रेक्षक डोक्यावर घेत आहे. सखाराम बाईंडर पुन्हा रंगभूमीवर येत आहे. सूर्यांची पिल्ले असो की संगीत नाटके असो जे नव्या दमाचे कलाकार या समृध्द कलाकृतींचे पुनरूज्जीवन करताहेत आणि रसिक त्यांना भरभरून प्रतिसाद देताहेत ही स्वागतार्ह गोष्ट आहे. नाटकांचा आजकाल तर महापूर आला आहे. वेगवेगळ्या पध्दतीची, धाटणीची नाटके येताहेत ही आनंद आहे आणि सकारात्मक गोष्ट आहे, यामुळे नाटकाच्या निर्मितीसाठी परिश्रम घेणारा बॅकस्टेज आर्टिस्ट ते कलाकारांपर्यंत आनंदाचे वातावरण आहे ही बाब अतिशय महत्वाची वाटते. भारतीय संस्कृतीमुळे आणि वारस्यामुळे हे संपणे शक्य नाही. नवे आणि जुने लेखन यात काळाच्या ओघाने
फ रक करावाच लागतो मात्र मराठीबद्दल जो जाज्वल्य अभिमान आहे तो सर्वांनी बाळगावाच लागेल.
मालिकांकडे वळणारे नाट्यकलाकार देखील पुन्हा आता रंगभूमीकडे वळताहेत हे खूप आनंददायी आहे. विशेष म्हणजे नाटकातील सर्वच लोकांमध्ये समन्वय आहे. प्रेक्षकांच्या उत्साहमुळेच आम्ही उभे आहोत.
-प्रेक्षकांची अशी कोणती प्रतिक्रीया जी कायम आठवणीत राहिली?
- अपर्णा चोथेः रसिकांच्या प्रशंसा आम्हा कलाकारांना खूप उर्जा देत असतात. उदाहरणच द्यायचे झाले तर हा माझा अनुभव सांगावा वाटतो. माझे एकपात्री नाटक प्रशंसनीय ठरले. ज्येष्ठ नाट्य समीक्षक रविंद्र पाथरे यांनी मला विचारले की, तू ोठे शिक्षण घेतले या क्षेत्रातले? मात्र मी जेव्हा या नाट्यक्षेत्रातून शिक्षण घेतले नसल्याचे सांगितल्यावर त्यांनी मला बाळा तू चौकटी पलिकडे जाऊन हे कार्य करीत आहेस ही खूप चांगली गोष्ट असल्याचे मला सांगितले ही माझ्यासाठी खूप मोठी काँम्पिमेंट होती. माझ्या त्या तिघी नाटकातील ज्या छोट्या छोट्या गोष्टी रंगभूमीवर होत्या त्याबद्दत त्यांनी मला प्रश्न विचारून माझ्या कार्याचे कौतूक केले.हे माझ्यासाठी अतिशय उर्जादायी असे आहे.
मराठी संगीत नाटकांचा वाऱसा समृध्द
ज्येष्ठ नाट्य अभिनेत्री मधुवंती दांडेकर यांची भावना
मराठी संगीत रंगभूमिचा,नाटकांचा वारसा अतिशय समृध्द असून आजच्या काळात तरूण कलाकार आणि नाट्यप्रेमी लोक ही नाटके पुनरूज्जिवीत करून रंगभूमीवर आणताहेत ही आश्वासक बाब असल्याच्या भावना ज्येष्ठ संगीत नाट्य अभिनेत्री मधुवंती दांडेकर यांनी व्यक्त केल्या.
नाट्य क्षेत्रातील दिग्गज आणि उत्तम साहित्यिकांमुळे रसिकांना ही नाट्य-अभिरूची अधिक हवीहवीशी वाटत गेली, अर्थात यात अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्यापासून आजतागायतच्या नव्या दमाच्या कलाकारांचे प्रयास कारणीभूत असल्याचे दै. मुंबई तरूण भारत शी बोलतांना मधुवंती दांडेकर यांनी सांगितले.
-संगीत नाटकाची वाटचाल आणि आजचा प्रवास या बद्दल काय सांगाल?
- मधुवंती दांडेकर : संगीत नाटकांची वाटचाल ही अतिशय समृध्द आणि प्रशस्त अशीच आहे.
यात मध्यंतरी मराठी चित्रपटांमुळे थोडी शिथिलता आली तरी ते कधीही रसहीन झाले नाही. नव्या पिढीने देखील ते स्वीकारले, त्यामुळेच आज संगीत नाटक हे रंगभूमीवर नव्या स्वरूपात देखील स्वीकारले जात आहे आणि नाट्य रसिकांची पावले नाट्यगृहांकडे वळत आहेत हे अधोरेखित करावेच लागेल. स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात संगीत नाटकाने अनेक स्थित्यंतरे अनुभवली आहेत, यात अनेक चढ-उतार देखील आलेत त्या काळात अतिशय दर्जेदार विषय मराठी चित्रपटांत आल्यामुळे तसेच संगीत नाटकांत कामे करणारे कलाकार कमी असल्यामुळे संगीत नाटक रंगभूमीवर येत नव्हते मात्र ज्यावेळी महिला कलाकारांचे देखील रंगभूमीवर पदार्पण झाले, त्यानंतर हा वारसा अधिक समृध्द होत गेला, हिराबाई बडोदेकर, कमल बडोदेकर आणि नंतर अनेक स्त्री कलावंतांनी हा वारसा समर्थपणे जपला यात आशा खाडिलकर,किर्ती शिलेदार,जयमाला शिलेदार, आदींनी संगीत नाटकांची धुरा सांभाळली आणि रसिकांनी ही नाटके डोक्यावर घेतलीत. बालगंधर्व असोत अथवा सवाई गंधर्व यांनी स्त्री वेशात भूमिका केल्यात मात्र त्या काळात स्त्रियांना घराबाहेर पडणे आणि नाटकात वगैरे काम या गोष्टी अतिशय दूर होत्या मात्र चित्रपटातून महिलांनी अभिनयाचे धाडस दाखविल्यावर संगीत नाटकात देखील स्त्रियांनी अभिनयासाठी पाऊल ठेवले आणि मग ही नाट्यपरंपरा अखंडित सुरू आहे.
-संगीत रंगभूमीच्या योगदानाविषयी आणखी काय सांगू शकाल?
-मधुवंती दांडेकरः संगीत नाटकाला आता साधारणतः दीडशे वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळापासून रसिकांची अभिरूची जपणार्या या कलाकृतीने रसिकांना आनंद दिला आहे. स्वातंत्र्यलढ्यात त्या काळी आपल्या महाराष्ट्रात टिळक, आगरकर, सावरकर, आदी लोक सक्रीय असतांना आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी समाजातील सर्वच लोकांची एकजूट अत्यंत महत्वाची ठरली संगीत नाटकातून समाज प्रबोधनाचे विषय मांडत असतांना केवळ मनोरंजन हा हेतू न ठेवता अनेक प्रतिभावंत मंडळींनी सक्रीय पुढाकार घेत कार्य केले आहे. सावरकर असोत की,शिरवाडकर गो. ब. देवल असोत की, वसंत कानेटकर, राम गणेश गडकरी असोत की, आचार्य अत्रे यांनी खुप मोठे कार्य आपापल्या क्षेत्रात कार्य केले आहे स्वातंत्र्यासाठी लढणार्या लोकांचे स्वातंत्र्यपूर्व काळात संगीत रंगभूमीचे योगदान हा कार्यक्रम आपण दूरदर्शनवर केला.दिव्य स्वातंत्र्य रवी... हे त्या कार्यक्रमाचे नाव. मराठी नाट्यसंगीताला एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी जसे गायक म्हणून दीनानाथ मंगेशकर,बाल गंधर्व, छोटा गंधर्व आणि इतर प्रतिभावंतांनी कार्य केले तसेच वि. दा. सावरकरांनी देखील राष्ट्रप्रेम आणि देशभक्तीचे विषय समाजासमोर अतिशय प्रखरतेने पुढे आणले हे विसरता कामा नये. ही सगळी माहिती आजच्या पिढीला देखील असायला हवी असे वाटते.
-संगीत नाटकांसाठी आणखी काय प्रयत्न व्हायला हवेत?
-मधुवंती दांडेकरः संगीत नाटकांचा वारसा पुढे नेण्यासाठी आज नवे लोक ही संगीत नाटके पुनरूज्जीवित करून रंगभूमिवर आणीत असली तरी अनेक नव्या कलाकारांचा ओघ हा प्रायोगिक अथवा व्यावसायिक नाटकांकडेच अधिक असतो असे निदर्शनास येते. त्यामुळे खरेतर मराठी भाषेला सौंदर्य प्राप्त करून देण्यात या संगीत नाटकांचा मोठा वाटा असल्याने संस्कृत सह मराठी भाषा जतन करण्याच्या हेतूने ही नाटके सातत्याने रसिकांसमोर आणणे गरजेचे आहे. या संगीत नाटकातील भाषाशैली अतिशय समृध्द अशीच आहे. त्यातून समाज प्रबोधनाचे विषय तर मांडलेच आहेत मात्र रसिकांची अभिरूची जपण्याचे देखील कार्य केले आहेत. या साहित्यिकांनी केलेले हे कार्य पुढे नेण्याची जबाबदारी खरेतर आता तरूणाईने आपल्या खांद्यावर घ्यायला हवी आणि नव्या संकल्पना तंत्रज्ञानासह ही संगीत नाटके नव्या विषयांसह देखील रंगभूमीवर आणल्या गेली पाहिजेत.