जुन्नर व शिरूर परिसरातील बिबट्यांचे तातडीने स्थानांतरण; मानवी मृत्यूस कारक बिबट्या ठार

05 Nov 2025 11:46:45
leopard in pune
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - पुणे जिल्ह्यातील जुन्नर व शिरूर तालुक्यातील बिबट्यांच्या स्थानांतरणाला सुरुवात करण्यात येणार आहे (leopard in pune). तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात वाढलेली मनुष्यहानी लक्षात घेता वनमंत्री गणेश नाईक यांनी कठोर भूमिका घेतली आहे (leopard in pune). बिबट्यांना पकडण्यासाठी २०० पिंजरे बसविण्यात येणार असून आणखी एक हजार पिंजरे युद्धपातळीवर खरेदी करण्यात येणार आहे (leopard in pune). यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यासाठी ११.२५ कोटी रुपये मंजूर केले असून बिबट्याशी संबंधित घटनांना तोंड देण्यासाठी २० बचाव पथके, ५०० पिंजरे आणि आधुनिक उपकरणे खरेदी करण्यात येणार आहेत. (leopard in pune)
 
 
पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, राजगुरूनगर व शिरुर परिसरात बिबट्यांमुळे गेल्या काही दिवसात या चार जणांचा मृत्यू झाला आहे. मानवावरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दि. ४ नोव्हेंबर रोजी वनमंत्री नाईक यांनी मंत्रालयात बैठक घेऊन तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. यावेळी माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, प्रवक्ते वसंतराव जाधव, जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके, जनता दलाचे प्रदेश अध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांच्यासह विविध लोकप्रतिनीधी तसेच वनविभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल) एम. श्रीनिवास राव, मुख्य वनसंरक्षक जितेंद्र रामगावकर, पुण्याचे वनसंरक्षक आशिष ठाकरे आदी उपस्थित होते. पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व जिल्हा पोलीस प्रमुख संदीप सिंग गिल हे दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
 
 
नाईक म्हणाले की, "या परिसरात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात येईल. केंद्र शासनाच्या परवानगीने या परिसरातील बिबट्यांना पकडून त्यांचे स्थानांतरण वनतारा अशा ठिकाणी ज्या ठिकाणी सोय उपलब्ध आहे, तेथे करण्यात येईल. वनाशेजारील शेतीला व गोठ्यांना विद्युत तारांचे कुंपण लावणे, एआयच्या माध्यमातून बिबट्यांची हालचालीची माहिती नागरिकांना कळविणे, शेतीला दिवसा पूर्ण ताकदीने वीज पुरवठा करणे आदी उपाययोजना करण्यात येतील. तसेच या परिसरातील बिबट्यांना पकडण्यासाठी जिल्हा नियोजन निधीतून तातडीने २०० पिंजरे खरेदी करण्यात येतील. त्याशिवाय वन विभागाच्या निधीतून आणखी एक हजार पिंजऱ्यांच्या खरेदीसाठी १० कोटींचा निधी देण्यात येईल. या परिसरातील बिबट्यांची वाढती संख्या रोखण्यासाठी नसबंदीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावास लवकरात लवकर मान्यता मिळण्यासाठी सर्वपक्षीय नेते व वन अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ केंद्रीय वन मंत्री यांच्या भेटीसाठी घेऊन जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.


बिबट्या ठार 
दि. ३ नोव्हेंबर रोजी संतप्त नागरिकांनी पुणे नाशिक महामार्ग सुमारे १८ तास रोखून धरला होता. पिंपरखेड परिसरातील मानवी मृत्यूस कारक असणाऱ्या बिबट्यास जेरबंद किंवा ठार करण्यासाठी पुण्याचे वनसंरक्षक आशिष ठाकरे यांनी तातडीने प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव तथा मुख्य वन्यजीव रक्षक महाराष्ट्र राज्य नागपूर यांची परवानगी घेतली होती. सदर नरभक्षक बिबट्या जेरबंद किंवा ठार करण्यासाठी वन विभागाने रेस्क्यू संस्था पुणेचे डॉ. सात्विक पाठक पशु चिकीत्सक, जुबिन पोस्टवाला व डॉक्टर प्रसाद दाभोळकर या दोन शार्प शूटरसह वनविभागाची टीम घटनास्थळ परिसरात तैनात  होती. त्या बिबट्यास जेरबंद करण्याची कारवाई सुरू करण्यात आली. दिवसभरात परिसरात ठीकठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावून बिबट्याचे भ्रमण मार्गावरील ठशांचे निरीक्षण करण्यात आले. त्यानंतर रात्री तीन थर्मल ड्रोनच्या माध्यमातून घटनास्थळाच्या परिसरामध्ये त्या नरभक्षक बिबट्याचा शोध घेतला असता घटनास्थळापासून सुमारे ४०० ते ५०० मीटर अंतरावर सदर बिबट दिसून आला. टीमने त्यास बेशुद्ध करण्यासाठी डार्ट मारला. परंतु तो अपयशी ठरल्याने बिबट चवताळून प्रतिहल्ला करत असताना बंदूकधारी शार्प शूटर यांनी त्यावर रात्री १०.३० वाजताच्या सुमारास गोळी झाडल्याने सदर नर बिबट मृत झाला. त्याचे वय अंदाजे पाच ते सहा वर्ष असल्याचे दिसून आलेय त्यानंतर सदर नरभक्षक बिबट्याचे शव मौजे पिंपरखेड येथील ग्रामस्थांना दाखविण्यात आले. त्यानंतर सदर शव शवविच्छेदनाकरिता माणिकडोह बिबट निवारा केंद्र येथे हलविण्यात आले. 
Powered By Sangraha 9.0