केवळ भारतातच नाही, तर जगभरात युरोपीय दृष्टिकोनातून ज्ञानप्रक्रियेचे सरसकट प्रमाणीकरण झालेले दिसते, हासुद्धा एकप्रकारे वसाहतवादी विचारांचा वारसाच म्हणावा लागेल. परंतु, या सांस्कृतिक सपाटीकरणाचा आपसुकच भारतीय संस्कृती आणि समाजजीवनाच्या आकलनावरही परिणाम होतो. त्यामुळे युरोपीय प्रमाणीकरणाच्या चश्म्यातून न पाहता, आपले सांस्कृतिक संचित संरक्षित करणे, ही काळाची गरज म्हणावी लागेल.
ख्रिस्ती धर्माच्या पार्श्वभूमीवर युरोपातील विज्ञान, मानव्य शास्त्रे आणि तत्त्वज्ञान यांच्या सैद्धांतिक विकसनाकडे पाहिल्यास काही समान तत्त्वे आढळतात, ज्यांनी काही विशिष्ट दृष्टीचे युरो-अमेरिकन मानस घडवलेले आहे. तर्कप्राधान्य आणि विश्वाचे जडवादी चिंतन यांचा परिणाम युरोपच्या आकलनावर कसा झाला आहे, हे आपण पाहिले. परंतु, कोणत्याही स्थिरपद झालेल्या चिंतनाचा प्रभाव हा केवळ समाजाच्या संचालनासाठी निर्माण झालेल्या व्यवस्थांपुरता सीमित न राहता, तो हळूहळू संपूर्ण समाजमानसांवर आपली पकड बसवतो. स्वाभाविकपणे संपूर्ण समाजाच्याच चिंतनाची ती दिशा बनून, त्या चौकटीबाहेरचा विचार परकीय वाटू लागतो आणि नंतर अशा वेगळ्या विचारांवर गंभीरपणे चिंतन होणेच बंद होते. पुनरुज्जीवन, प्रबोधन आणि त्यानंतरच्या तत्त्वज्ञानाच्या विकसनातून घडलेल्या युरोपीय मानसात चौकटीबाहेरच्या विचारांची स्वीकारार्हता कमी झालेलीच होती. परंतु, सांस्कृतिक वसाहतवादाचा परिणाम म्हणून युरोपचे वैचारिक मानस हे संपूर्ण जगावर लादले जात असल्याने त्याची व्याप्ती आता जागतिक आहे. त्यामुळे युरोपच्या वैचारिक मानसाची घडण कशा प्रकारची आहे, याचे आकलन आज आवश्यक आहे.
आज आपण पाहात असलेले विवक्षित पाश्चात्य मानस घडवण्यात त्यांच्या ज्ञानप्रक्रियेचा मोठा हातभार आहे. एखाद्या विषयवस्तूचे आकलन करून घेण्यास आवश्यक असे महत्त्वाचे पाश्चात्य तत्त्व म्हणजे ‘ज्ञाता-ज्ञेय भेद.’ या तत्त्वानुसार एखादी विषयवस्तू आणि तिचा अभ्यास करणारा अभ्यासक यांचा कोणताही परस्परसंबंध नसतो. अळीतून कोष आणि कोषातून फुलपाखरू तयार होण्याची प्रक्रिया आपण जितक्या निर्विकारपणे पाहू शकतो, त्याच अलिप्तपणे सामाजिक शास्त्रांचा अभ्यास करताना आपणही त्याच समाजाचे घटक आहोत, हा विचार पाश्चात्य ज्ञानपरंपरेत बसत नाही. विषयवस्तूपासून अलिप्ततेचे तत्त्व तर्कप्रामाण्यासाठी आवश्यक असते. कोणत्याही आत्मीयतेच्या अभावात कठीण प्रसंगांच्या वेळी घ्यायचे निर्णय संपूर्णपणे तर्काधिष्ठित स्वरूपात करता येतात. सर्वच निर्णय अशाप्रकारे तर्काच्या आधारे झाले, तर एक निश्चित सामाजिक सुव्यवस्था निर्माण होतेच. ‘ज्ञाता-ज्ञेय भेदा’चे हे तत्त्व पाश्चात्य वैज्ञानिकतेच्या व्याख्येतही दिसते. विज्ञानाचे नियम निरीक्षक-निरपेक्ष पद्धतीने प्रयोगांती सिद्ध झाले, तरच त्यांना वस्तुनिष्ठ निष्कर्ष मानले जाते. प्रयोगांची फलिते जर भिन्न व्यक्तींनी केलेल्या प्रयोगांमध्ये वेगळी दिसली, तर ती प्रयोगपद्धतीच चुकीची मानली जाते. निजव जडपदार्थांसाठी बनवली गेलेली तत्त्वे गणिती पद्धतीने मानव्यशास्त्रांमध्येही वापरण्याचा प्रयत्न पाश्चात्य समाजाने केलेला आहे. विभिन्न काळात, विभिन्न भूप्रदेशांत घडलेल्या घटना परस्परांहून वेगळ्या न मानता, त्यांच्यात अमूर्त समान तत्त्वे शोधत अशा तत्त्वांचे चिंतन निर्माण करण्याचा प्रयत्न या पद्धतीत होतो.
पाश्चात्य ज्ञानप्रक्रियेतील दुसरे महत्त्वाचे तत्त्व म्हणजे, ‘देकातय विकलन पद्धती’चे. या पद्धतीत एखाद्या घटनेवर प्रभाव टाकणाऱ्या जर अनेक प्रक्रिया असतील, तर त्यांच्यातील प्रत्येक प्रक्रियेच्या प्रभावाचे वेगळे मापन करणे शक्य असते आणि प्रत्येक वेगळ्या प्रभावक्षेत्रांची गोळाबेरीज म्हणजे एकूण घटना. याप्रकारच्या तत्त्वाच्या सत्यतेसाठी परिणामकारक घटकांच्याही संबंधशून्यतेची आवश्यकता या वैचारिक चौकटीत असते. म्हणजेच ज्ञेय विषयवस्तूचे केवळ ज्ञात्याशी भिन्नत्व पुरेसे नाही, तर विषयाच्या व्यापक चौकटीतील सर्व विषयवस्तूंचेही परस्परांशी भिन्नत्व आवश्यक आहे.
परंतु, विभिन्न परिस्थितींना एकाचवेळी लागू पडणारे असे प्रतिमान जर अमूर्त आणि संबंधशून्य अशा घटकांद्वारे करायचे असेल, तर अशा घटकांच्या योग्य मूल्यांविषयी काही प्रमाणीकरण आवश्यक असते. सुयोग्य अशा मर्यादेत ही मूल्ये असल्यास सुचारू चालणाऱ्या सामाजिक व्यवस्था निर्माण होतात आणि या अमूर्त घटकांची मूल्ये मर्यादेबाहेर गेल्यास ती समतोल बिघडल्याची नांदी समजली जाते. या प्रमाणीकरणाची उदाहरणे आपल्याला जागोजागी दिसतात. कुपोषण ही जगातील एक महत्त्वाची समस्या आहे, हे खरेच. पण, तिचे निराकरण करण्यासाठी जो पोषणमूल्य निर्देशांक मोजला जातो, त्याचे प्रमाणीकरण करणे कितपत योग्य आहे आणि तेही युरोपीय खाद्यसंस्कृती, राहणीमान व हवामान यांच्या आधारे मोजलेले? याचसारखे दुसरे उदाहरण म्हणजे प्रदूषण निर्देशांक आणि ऊर्जावापर निर्देशांक. अधिकचा ऊर्जावापर अधिक समृद्धतेचे प्रतीक आहे, असे मानणे जगात एक ऊर्जा असमतोल निर्माण करत आहे, तर त्याउलट प्रदूषण निर्देशांक ऊर्जानिर्मितीच्या विशिष्ट साधनांना त्याज्य ठरवत आहे. हे सर्व जागतिक निर्देशांक निश्चित करताना काही स्थानिक मुद्द्यांचा विचार करत, त्यांच्या योग्यायोग्य मूल्याविषयी काहीही महत्त्वाचे चिंतन निर्माण होत नाही. तिसरे एक उदाहरण जगभरात चर्चिले जाते, ते स्थूलता निर्देशांकाचे. स्थानिक आहारविहार, खाद्यसंस्कृती, पर्यावरणीय आवश्यकता याचा कोणताही विचार न होता, प्रमाणित निर्देशांकाच्या आधारे या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न होतो.
प्रमाणीकरणाचा सर्वांत मोठा दुष्परिणाम म्हणजे स्थानिक घटकांना कोणतेही स्थान न देणे. उंची आणि वजन या दोन घटकांच्या आधारे बनवल्या जाणाऱ्या स्थूलता निर्देशांकाकडे पाहिल्यास त्यात विशिष्ट भूप्रदेशातील लोकांच्या शरीराची ठेवण, त्यातील स्नायूंचे आणि अस्थींचे प्रमाण, त्या प्रदेशात पिकणारे आणि सहज मिळणारे अन्नपदार्थ या सर्वांचा अजिबात विचार नसतो. केवळ वजन आणि उंचीच्या विशिष्ट गुणोत्तराच्या आधारे एखादी व्यक्ती सुडौल आहे की स्थूल की अतिस्थूल, याचा निर्णय घेऊन त्याआधारे औषधे आणि कृत्रिम पोषणद्रव्यांचा मारा केला जातो. प्रमाणीकरणाचे तत्त्व तर्कप्राधान्याच्या मूलभूत तत्त्वाशी मेळ खाणारे आहेच. कोणत्याही प्रश्नाचे प्रमाणीकरण झाल्यावर त्यावरचे उत्तर शोधण्यास मानवी मेंदूच्या सर्जनशील भागाचे काही काम उरत नाही. दिलेल्या कार्यप्रणालीचे टप्पे पाळत गेल्यास इच्छित स्थळी नक्की पोहोचता येते.
प्रमाणीकरणाचा मोठा धोका समाजाच्या सांस्कृतिक वारशाला असतो. सांस्कृतिक संचितातून प्राप्त झालेल्या अनेक चालीरिती तर्काच्या कसोटीवर बसत नाहीत; म्हणून प्रथम टवाळीच्या धनी होतात आणि हळूहळू सामाजिक स्मृतीतून निघून जातात. अशा सर्व सांस्कृतिक परिघातील कृती हळूहळू बंद झाल्यास त्या संस्कृतीच्या अस्तित्वालाच एक धोका निर्माण होतो. परंतु, तर्कप्रधान चौकटीत असे समाजाचे आणि त्याच्या संस्कृतीचे असे नष्ट होणे योग्यच मानले जाते. परंतु, प्रत्येक विषयवस्तू एका ठराविक प्रमाणात बसवण्याचा अट्टाहास म्हणजे, त्या विषयाचे जे विशिष्ट कंगोरे आहेत, त्यांना तासून नष्ट करणे. या प्रकारच्या चिंतनातून सैद्धांतिक मांडणीला प्रत्यक्ष अनुभवाहून अधिक महत्त्व प्राप्त होऊन सिद्धांतांना अनुसरून नाही; म्हणून अनुभवांना नाकारण्यापर्यंत प्रवास घडतो. त्यातून विशेष ध्यानात घेण्याची बाब म्हणजे प्रमाणीकरणासाठी मूळ प्रमाण हे नेहमी युरोपीय संचितात शोधले गेल्याने त्या प्रमाणांनाच एक सांस्कृतिक रंग चढतो. याचे अनुभव आपण इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र यांच्या आकलनात पाहिले आहेत. जगभराच्या राजसत्तांचे आकलन युरोपीय सामंतशाहीच्या प्रमाणात करून त्यांच्यातील साम्यस्थळांच्या आधारे त्यांचे आकलन करण्याचा युरोपीय प्रयत्न त्यांच्यातील भेदांचे तात्त्विक महत्त्व समजून घेत नाही.
अशा प्रकारे युरोपीय संदर्भांच्या आधारे संपूर्ण ज्ञानप्रक्रियेचेच जे प्रमाणीकरण झाले आहे, त्याचा परिणाम विविध विषयांच्या संस्कृतीसापेक्ष आकलनापुरता मर्यादित न राहता, प्रत्यक्ष संस्कृती आणि समाजाचे जीवनमान यांच्या प्रमाणीकृत आकलनापर्यंत सर्वव्यापी होत आहे. या स्थितीत आपल्या रोजच्या जीवनातील सांस्कृतिक संदर्भ पुसत जाऊन एका प्रमाण सांस्कृतिक वर्तनाच्या सपाटीकरणाकडे समाजाची वाटचाल होताना आपल्याला दिसते. हे सपाटीकरण एखाद्या भाषेच्या सर्व बोली, स्थानिक लहेजे, बोलण्याच्या लकबी हे सर्व नष्ट होऊन केवळ पुस्तकी प्रमाणभाषा उरण्यासारखे आहे. या सपाटीकरणाची अंतिम परिणीती आपल्या समाजाचे सामाजिक गंतव्याविषयीचे जे चिंतन आहे, ते हरवून जाऊन सर्वच जागतिक समाज एका युरोपीय सामाजिक गंतव्याकडे वाटचाल करण्यात होईल.
भारतीय चिंतनात मर्यादेपलीकडील प्रमाणीकरणाचा विचार त्याज्य आहे. धर्म म्हणजे नेमके काय, याची चर्चा करताना ‘तर्कोऽप्रतिष्ठः श्रुतयोर्विभिन्ना नैको मुनिर्यस्य मतं प्रमाणम्| धर्मस्य तत्त्वं निहितं गुहायाम्|’ असा इशारा आपल्याला ‘महाभारत’ देऊन ठेवते. तर्कबुद्धीच्या अतिवापराविषयीही आपल्या चिंतनात सूचित केले जाते. याचा अर्थ प्रमाणीकरण अजिबात नको, असे नाही. कोणत्याही विषयाच्या आकलनासाठी काही अंतर सुनिश्चित प्रमाणांच्या आधारे आणि तर्कबुद्धीच्या योगे जावेच लागते. परंतु, ज्ञानप्रक्रियेच्या या मार्गाला काही मर्यादा असल्याचे भारतीय चिंतन मानते. सांस्कृतिक संचितातून आलेले शहाणपण, प्रत्यक्ष अनुभूती आणि परिसंस्थेशी अनुरूपता अशा घटकांचा विचार करत प्रसंगी निर्णय घ्यावेत, असे आपण मानतो. मानवी जीवनातील प्रत्येक निर्णय तर्काच्या कसोटीवर एकसारखाच योग्य असला पाहिजे, असा दुराग्रह आपला नसतो. आणि त्यामुळेच भारतीय भूप्रदेशात निर्माण झालेल्या अनेकानेक सामाजिक व्यवस्था जरी एकाच तत्त्वातून निर्माण झाल्या, तरी त्यांचे बाह्यस्वरूप कधीच एकसारखे नसते.
वाढते जागतिकीकरण आणि माध्यमविस्फोट यांमुळे सर्व जग एकमेकांच्या कधी नव्हे इतके जवळ आले आहे. विविध समाजांच्या सांस्कृतिक देवाणघेवाणीचेही प्रमाण पूवच्या तुलनेत बरेच वाढले आहे. परंतु, या सर्व मंथनाची जी प्रमाण चौकट आज जगभरात वापरली जाते, ती युरोपीय आहे. जगातील अनेक समाजाच्या सांस्कृतिक संचितांचे वहन या चौकटीतून शक्य नाही. स्थानिक संदर्भांना सोडून देऊन युरोपीय प्रमाणांच्या आधारे होणारे जागतिकीकरण जागतिक समाजाला एका संदर्भविहीनतेच्या अवस्थेकडे घेऊन जात आहे. या प्रवाहात वाहात जायचे की आपले सांस्कृतिक संचित घट्ट धरून ठेवून आपला वेगळा मार्ग चोखाळायचा आणि आपल्या सामाजिक गंतव्याच्याच दिशेने वाटचाल सुरू ठेवायची, याचा निर्णय आज आपल्याला एक समाज म्हणून घेणे आवश्यक बनले आहे.
- डॉ. हर्षल भडकमकर
(लेखकाने मुंबईतील ‘टीआयएफआर’ येथून खगोलशास्त्रात ‘पीएच.डी.’ प्राप्त केली आहे. सध्या एका खासगी वित्तसंस्थेत नोकरी करत असून ‘प्रज्ञा प्रवाह’ या संस्थेचे कोकण प्रांत कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत आहेत.)
9769923973