ठाणे : महाराष्ट्र शासनामार्फत गठित ठाणे जिल्हा मॅन्युअल स्कॅव्हेंजर सर्वेक्षण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. या बैठकीस समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी ठाणे, सदस्य चरणसिंह टांक, जगदीश खैरालिया, सदस्य सचिव समाधान इंगळे तसेच जिल्ह्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद अधिकारी व विविध शासकीय-अर्धशासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान सदस्य चरणसिंह टांक यांनी भिवंडी-निजामपूर आणि उल्हासनगर महापालिका क्षेत्रात हाताने मैला साफ करण्याची प्रथा अद्याप सुरू असल्याचे निदर्शनास आणून देत अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच सफाई कर्मचारी वर्गाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य गृहनिर्माण योजना अंतर्गत मोफत घरे देण्याबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी वाल्मीकी समाजातील सदस्यांना जाती प्रमाणपत्र व जाती वैधता प्रमाणपत्र फ्लायिंग स्कॉडच्या पंचनाम्यावर आधारित प्रक्रियेद्वारे सुलभपणे उपलब्ध करून देण्यात यावे, अशी सूचना देण्यात आली. सफाई कर्मचारी वर्गातील पात्र विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी राज्य शासनामार्फत अनुदान देण्यात यावे, अशीही मागणी समितीकडून मांडण्यात आली. तसेच या समाजासाठी शासकीय जमिनीवर गृहनिर्माण आणि शाळांसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली.
सदस्य जगदीश खैरालिया यांनी मॅन्युअल स्कॅव्हेंजिंगमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत व नोकरीची संधी देण्याची मागणी केली.
बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी ठाणे यांनी सर्व सूचनांचा गांभीर्याने विचार करून धोरणात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. या बैठकीस सामाजिक कार्यकर्ते व समिती सदस्य नरेश भगवाणे, सीमा रिडलान, शीतल बनसौडे, आणि सामाजिक कार्यकर्ते श्री राहुल टांक, रविंद्र भेनवाल, अशोक परमार तसेच समितीच्या महिला सदस्य उपस्थित होत्या.