अमेरिकेतील सत्तासंघर्षाच्या नवीन पर्वाची सुरुवात

05 Nov 2025 11:33:47
 America
 
गेल्या काही महिन्यांपासून न्यूयॉर्कच्या महापौरपदाच्या निवडणुका या जागतिक चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत आणि त्याचे कारण म्हणजे या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले ३४ वषय झोहरान ममदानी. डेमोक्रॅटिक पक्षाच्या ममदानी यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. त्यानिमित्ताने ट्रम्प विरुद्ध ममदानी अशी अमेरिकेतील सत्तासंघर्षाच्या नवीन पर्वाची सुरुवात होऊ शकते. त्याविषयी... (America)
 
अमेरिकेतली सर्वांत मोठे शहर असलेल्या न्यूयॉर्कच्या महापौरपदासाठी दि. ४ नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले. या निवडणुकीत ३४ वर्षांच्या झोहरान ममदानी यांचा विजय निश्चित मानला जात आहे. ममदानी हे सुप्रसिद्ध दिग्दर्शक निर्माती मीरा नायर आणि भारतात जन्म झालेल्या पण युगांडातून अमेरिकेमध्ये स्थायिक झालेल्या प्रा. महमूद ममदानी यांचे पुत्र असून, ते स्वतःला ‌‘समाजवादी डेमोक्रॅट‌’ म्हणवतात. डेमोक्रॅटिक पक्षामध्ये अनेक विचारप्रवाह असून, त्यातील आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या डाव्या विचारसरणीचा ममदानींवर प्रभाव आहे. सध्या ते न्यूयॉर्क राज्याच्या प्रतिनिधीगृहाचे सदस्य असून त्यांच्याकडे जेमतेम दोन वर्षांचा प्रशासकीय अनुभव आहे. न्यूयॉर्कच्या महापौरपदासाठी ममदानी नवखे मानले जात असले, तरी त्यांनी आपल्या अनोख्या प्रचारतंत्राने तसेच चाकोरीबाहेरच्या भूमिकेमुळे लोकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांच्या घोषणा भारतावर समाजवादाचा पगडा असलेल्या काळातील राजकीय पक्षांच्या घोषणांची आठवण करून देत असल्या, तरी त्यांचा लोकांवर मोठा प्रभाव आहे. ते महापौर झाल्यास निम्न-मध्यमवगयांसाठी असलेल्या घरांची भाडी पुढील चार वर्षांसाठी गोठवणार असून सर्वांना बसचा प्रवास निःशुल्क असेल. श्रीमंत व्यक्तींवर तसेच कंपन्यांवर अतिरिक्त कर लावण्यात येईल. गरिबांसाठी शहराच्या विविध भागांमध्ये स्वस्त दरातील सरकारी किराणा मालाची दुकानं सुरू करण्यात येतील. याशिवाय सहा महिन्यांपासून पाच वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी निःशुल्क पाळणाघरांची व्यवस्था करण्यात येईल. ममदानी राजकीय कार्यकर्ता असताना, त्यांनी न्यूयॉर्कच्या पोलीसदलाचे अधिकार काढून घेण्याची भूमिका घेतली होती. महागाई आणि ढासळत्या नागरी सुविधांमुळे अनेक मध्यम तसेच उच्च-मध्यमवगयांनी न्यूयॉर्क सोडण्यास पसंती दिली आहे.
 
न्यूयॉर्क एक शहर असले तरी अमेरिकेच्या राजकारणावरील त्याचा सर्वाधिक प्रभाव आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळपास सर्व आयुष्य न्यूयॉर्कमध्ये गेले असून हिलरी क्लिंटन यांनीही सिनेटमध्ये न्यूयॉर्क राज्याचे प्रतिनिधित्व केले होते. डेमोक्रॅटिक पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते न्यूयॉर्कमधील आहेत. न्यूयॉर्क महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था कॅनडापेक्षा मोठी, तर महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेच्या सुमारे चारपट मोठी आहे.
 
महापौरपदाच्या निवडणुकीसाठी तीन प्रमुख उमेदवार आहेत. न्यूयॉर्कचे सध्याचे महापौर एरिक ॲडम्स कृष्णवणय आहेत. २०२१ सालच्या निवडणुकांमध्ये त्यांना डेमोक्रॅटिक पक्षाने पाठिंबा दिला होता. यावष ते अपक्ष म्हणून पुन्हा उभे राहणार होते. पण, दि. २८ सप्टेंबर रोजी त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. डेमोक्रॅटिक पक्षामध्ये महापौरपदाच्या निवडणुकीच्या प्राथमिक फेरीत ममदानी यांच्यासमोर २०११ ते २०२१ या काळात न्यूयॉर्कचे गव्हर्नर म्हणून निवडून आलेल्या ॲण्ड्यू कुओमोसारख्या मोठ्या नेत्यांचे आव्हान होते. तेव्हा ममदानींना डेमोक्रॅटिक पक्षाच्या अवघ्या एक टक्का मतदारांचा पाठिंबा होता. पण, प्राथमिक फेरीत झोहरान ममदानी यांना तब्बल ४३.५ टक्के मतं मिळाली, तर कुओमो यांना अवघी ३६.४ टक्के मतं मिळाली. कोणालाही ५० टक्के मतं न मिळाल्याने दुसरी फेरी पार पडणार होती. पण, त्यापूवच ॲण्ड्यू कुओमो यांनी माघार घेतली आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. न्यूयॉर्क शहरात रिपब्लिकन पक्षाची फारशी ताकद नाही. कर्टिस सिल्वा हे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आहेत. मतदानपूर्व चाचण्यांमध्ये ममदानी यांना ४३ टक्के, कुओमो यांना २९ टक्के, तर सिल्वा यांना १९ टक्के मतदारांचा कौल होता. तरुण मतदारांमध्ये ममदानी यांना सुमारे ६४ टक्के पाठिंबा असून ५० वर्षांवरील मतदारांमध्ये कुओमो यांना जास्त पाठिंबा आहे.
 
सर्वांत धक्कादायक गोष्ट म्हणजे, ममदानींना यहुदी समाजातही बऱ्यापैकी पाठिंबा मिळत आहे. न्यूयॉर्कमध्ये यहुदी मतदारांची संख्या सुमारे १६ टक्के आहे. त्यातील सुमारे ४० टक्के लोक ममदानींना मतदान करतील, असा अंदाज आहे. विद्याथदशेत असल्यापासून ममदानींनी नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्ये केली आहेत. नेतान्याहूंना त्यांनी ‌‘युद्ध गुन्हेगार‌’ म्हटलं असून जर ते न्यूयॉर्कला आले, तर आपण त्यांना अटक करू, असेही म्हटले होते. ‌‘हमास‌’ आणि अन्य पॅलेस्टिनी संघटनांनी इस्रायलविरुद्ध उभारलेल्या दहशतवादी लढ्याला अरबी भाषेत ‌‘इंतिफादा‌’ असे म्हटले जाते. ममदानी या दहशतवादी ‌‘इंतिफादा‌’ची महात्मा गांधींचा सत्याग्रह तसेच दक्षिण आफ्रिकेतील नेल्सन मंडेलांच्या वर्णद्वेषविरोधी अहिंसात्मक लढ्याशी तुलना करून त्याला जागतिक स्तरावर न्यायला हवे, असे म्हणतात. त्यांची पत्नी रामा दुवाजी कला क्षेत्रात काम करत असून ती पॅलेस्टिनी चळवळीत सक्रिय आहे.
 
या पाठिंब्याचे कारण म्हणजे, न्यूयॉर्कमध्ये घरं, शिक्षण, आरोग्य आणि अन्नधान्याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. सामान्य न्यूयॉर्कवासीयांना वर्षभरासाठी घरभाड्यापोटी किमान ३० हजार डॉलर्स, तर लहान मुलांना सांभाळायला २६ हजार डॉलर्स खर्च करावे लागतात. यात तुम्ही वीज, पाणी, किराणा सामान आणि अन्य खर्च धरले, तर किमान एक लाख डॉलर्सची आवश्यकता आहे. ज्या कुटुंबांमध्ये केवळ एक सदस्य नोकरी करतो, तिथे घर खर्च चालवणे अवघड झाले आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या सामान्य मतदारांमध्ये आपला पक्ष काही धनाढ्य उदारमतवादी लोकांच्या हातात गेला असून, त्यांना आपल्या समस्यांशी काहीही देणेघेणे नाही, अशी भावना निर्माण झाली आहे. म्हणूनच कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या झोहरान ममदानींच्या पाठी ते उभे राहात आहेत. पण, त्यांना कल्पना नाही की, ममदानी जी आश्वासने देत आहेत, ती कधीही पूर्ण होणार नाहीत. कनिष्ठ मध्यमवगयांसाठी असलेल्या घरांची भाडी गोठवली, तर उर्वरित घरं आणखी महाग होतील. स्वस्त दरात धान्य पुरवणारी सरकारी दुकानं भ्रष्टाचाराला आमंत्रण देतात. न्यूयॉर्कलाही संघटित गुन्हेगारीचा त्रास अनेक वर्षे सहन करावा लागला होता. पोलीस दलाला अर्थपुरवठा न केल्यास शहरातील गुन्हेगारी वाढेल. आज अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये न्यूयॉर्कपेक्षा चांगल्या सुविधा तुलनेने कमी कर भरून उपलब्ध आहेत. मुंबईप्रमाणेच न्यूयॉर्कमध्ये जमिनीचा तुटवडा असल्यामुळे अनेक लोकांनी शेजारच्या न्यूजस, फिलाडेल्फिया आणि कनेक्टिकट इ. ठिकाणी मोठी घरं विकत घेतली आहेत.
 
ममदानींचा विजय झाला, तर डेमोक्रॅटिक पक्षातील समाजवादी विचारांच्या गटाची ताकद वाढणार आहे. दुसरीकडे ममदानींचा विजय डोनाल्ड ट्रम्पच्या पथ्यावर पडणार आहे. ट्रम्पना स्वतःच्या राजकारणासाठी एखादा मोठा शत्रू असणे आवश्यक आहे. ममदानी हे साम्यवादी तसेच इस्लामिक मूलतत्त्ववादी असल्याची भीती निर्माण करून त्यांना नामोहरम करण्यासाठी ट्रम्प अनेक प्रकारचे प्रयत्न करतील. त्यात न्यूयॉर्कला केंद्र सरकारकडून मिळणारी आर्थिक मदत रोखून धरणे, तसेच न्यूयॉर्कमध्ये घुसलेल्या बेकायदेशीर स्थलांतरितांना पकडण्यासाठी केंद्रीय पोलीस दल तैनात करणे अशा अनेक गोष्टी केल्या जातील. त्यामुळे आणखी श्रीमंत लोक न्यूयॉर्कमधून बाहेर पडू लागतील. ममदानींचा मर्यादित प्रशासकीय अनुभव पाहता, त्यांना न्यूयॉर्क शहराची जबाबदारी पेलवण्याची शक्यता कमी असली, तरी ते आर्थिक शिस्तीचा विचार न करता लोकानुनयी धोरण राबवून दीर्घकाळासाठी न्यूयॉर्कचे नुकसान करतील. या निवडणुकीमुळे डेमोक्रॅटिक पक्षांतर्गत, तसेच अमेरिकेच्या राजकारणातील संघर्षाचे एक नवीन पर्व सुरू होत आहे.
 
- अनय जोगळेकर
Powered By Sangraha 9.0