इतिहास आणि पुरातत्त्व संशोधन या क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या मधुरा सावंत यांची गोष्ट...
संस्कृतीचा जीवनप्रवाह ज्या विद्याशाखेतून आपल्यापर्यंत पोहोचतो, तो विषय म्हणजे इतिहास! आजच्या काळात ‘इतिहास’ या विषयाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. शालेय पाठ्यपुस्तकांपासून ते चालू घडामोडीपर्यंत ‘इतिहास’ हा विषय केंद्रस्थानी ठेवून अनेक चर्चा, वादविवाद आपल्या अवतीभोवती घडत असतात. पुस्तकांच्या पानांमधून बाहेर पडत, इतिहास आता वेगवेगळ्या समाजमाध्यमांमधून जास्तीत जास्त लोकाभिमुख होत चालला आहे. या काळामध्ये इतिहास संशोधकांचे, अभ्यासकांचे महत्त्वदेखील पूवपेक्षा अधिक वाढले आहे. इतिहास आकलनाच्या पातळीवर आता लोकसंस्कृतीचा इतिहास, खाद्यसंस्कृतीचा इतिहास, स्थानिक इतिहास अशा वेगवेगळ्या उपशाखांमधून इतिहासाकडे बघण्याची एक नवी दृष्टी तयार होताना दिसते. विद्येचं हे समृद्ध दालन आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आणखीनच समृद्ध करणारे अनेक युवक सध्या आपल्या अवतीभोवती कार्यरत आहेत. अशाच एक युवतीचे नाव म्हणजे मधुरा सावंत.
लहानपणापासूनच पुराणकथांचं, इतिहासाचं बाळकडू मधुरा यांना मिळत गेलं. त्यांचे आजोबा ‘हाफकिन इन्स्टिट्यूट’मध्ये कार्यरत होते. त्यांच्याकडून मधुरा यांना लहानपणापासूनच परळ आणि त्या परिसरातील इतिहासासंबंधी अनेक गोष्टी, किस्से ऐकायची सवय जडली. इतिहास शिकवताना, मुलांच्या मनातील नैसर्गिक कुतूहलाला हात घातला, तर काय चमत्कार घडतो, हे मधुरा यांच्या जडणघडणीतूनच दिसून येतं. मधुरा यांचे आईवडील लहानपणापासून त्यांना वेगवेगळ्या संग्रहालयांमध्ये आवर्जून घेऊन जायचे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयामध्ये त्यांची सिंधू संस्कृतीशी ओळख झाली. यावेळी त्यांच्या बालमनाला सातत्याने वेगवेगळे प्रश्न पडायचे. याच प्रश्नांचा शोध घेत, कालांतराने त्यांना त्यांच्या जीवनाची दिशा मिळाली. प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी त्यांनी वाचनालयामध्ये प्रवेश केला. तिथेच ‘पुरातत्त्वशास्त्र’ हा शब्द त्यांना सापडला. तेव्हाच त्यांना जाणवले की, इतिहासाच्या पलीकडे जाऊन भूतकाळाचा शोध घेणं, हीच त्यांची खरी आवड आहे. दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळाल्यावर मधुरा यांच्या घरच्यांना वाटलं की, त्यांनी वैद्यकीय शाखेत प्रवेश घ्यावा. अभ्यासात हुशार असल्यामुळे ही अपेक्षा रास्तच होती. मात्र, त्यांच्या मनाने इतिहासाचाच ध्यास घेतला. हाच विषय आपल्या जीवनाची दिशा ठरवेल, अशी त्यांना खात्री होती. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी कला शाखेची निवड केली आणि ‘इतिहास’ विषयात पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. याची पुढची पायरी म्हणून त्यांनी ‘पुरातत्त्वशास्त्र’ या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर अभिलेखागार आणि संग्रहालयशास्त्र, भारतीय शिलालेख लेखन, मोडी लिपीचा अभ्यासक्रम या साऱ्या विषयांमधील शिक्षण त्या सोबतच घेत होत्या. यामुळे अभ्यासाचा आणि संशोधनाचा दृष्टिकोन अधिक सखोल आणि व्यापक झाला.
इतिहासाच्या क्षेत्रात मुलुखगिरी करणाऱ्या व्यक्तीला वाचनाची आवड लागली नसेल, तरच नवल. वाचन आणि भटकंती हे दोन विषय मधुरा यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचे. वारसा सहलींचे त्यांना विशेष आकर्षण आहे. धोपट वाटेवर चालण्यापेक्षा ‘ऑफबिट’ स्थळांना भेट देणं त्या जास्त पसंत करतात.
इतिहास आणि पुरातत्त्वशास्त्र या विद्याशाखांची माहिती आज लोकांना होत असली, तरीदेखील तुलनेने अत्यंत कमी लोक या शाखेकडे वळतात. तुलनेने लहान असलेल्या या क्षेत्रात म्हणूनच स्पर्धा खूप तीव्र आहे, असं मधुरा यांना वाटतं. आपली, आपल्या कामाची ओळख निर्माण करण्याचे आव्हान त्यामुळे इतर कुठल्याही क्षेत्रांप्रमाणे इथे जास्त आहे. इतिहास आणि पुरातत्त्वशास्त्र या क्षेत्राविषयी सांगताना त्या म्हणतात की, “या क्षेत्रात केवळ ज्ञान पुरेसं नसतं, तर सातत्य, संयम आणि आत्मविश्वास या गोष्टीसुद्धा तितक्याच महत्वाच्या आहेत. अनेकदा स्वतःचं काम, आपली भूमिका पुन्हा पुन्हा सिद्ध करावी लागते आणि हाच प्रवास मला अधिक दृढ बनवतो,” असं त्या म्हणतात.
“भारत देश वेगवेगळ्या संस्कृतींच्या प्रवाहातून समृद्ध-संपन्न झालेला देश आहे. आपल्या परंपरांचे, संस्कृतीचं जतन-संवर्धन वारंवार आपण करत असतो. मात्र, या परंपरांकडे पाहताना त्यातला तार्किक विचार कमी होत चालला आहे,” असे मत मधुरा यांनी व्यक्त केले आहे. हा तार्किक विचार ज्यावेळेला जीवनाचा एक भाग होतो, त्याचवेळेला पुरातत्त्वशास्त्राचा विचार आपण आपसूकच आत्मसात करतो.
मधुरा सावंत यांच्या या ज्ञानसंचिताचा उपयोग त्यांनी अत्यंत वेगळ्या पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला. सध्या त्या ‘Mumbai Lores’ या उपक्रमांतर्गत शहरातील वारसास्थळांवर ‘हेरिटेज वॉक’चे आयोजन करतात. या ‘हेरिटेज वॉक’चे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शहराच्या वास्तू, संस्कृती आणि समाजजीवनामागचा इतिहास लोकांसमोर जिवंत स्वरूपात आणणं.‘हेरिटेज वॉक’ म्हणजे केवळ जुन्या इमारती किंवा स्मारकं दाखवणं नव्हे, तर त्या ठिकाणच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संदर्भांची सांगड घालणं. यातून लोकांना त्यांच्या आसपासच्या जगाशी लोकांचं वेगळं नातं निर्माण होतं. या प्रकल्पावर भाष्य करताना मधुरा सांगतात की, “आजच्या वेगवान समाजजीवनात अशा ‘हेरिटेज वॉक’चे महत्त्व आणखी वाढले आहे. कारण, या माध्यमातून लोक इतिहासाशी प्रत्यक्ष संवाद साधतात. हे अनुभवावर आधारित शिक्षण आहे. ‘हेरिटेज वॉक’ म्हणजे शहराचं आत्मपरीक्षण जिथे भूतकाळ आणि वर्तमान यांचा संवाद साधला जातो आणि त्या संवादातूनच ‘आपलं शहर’ पुन्हा नव्याने ओळखता येतं. असा हा आगळावेगळा प्रयोग करणाऱ्या मधुरा सावंत यांना पुढील प्रवासासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!