हैदराबाद : (Telangana Road Accident) तेलंगणात अतिशय भीषण रस्ते अपघात झाला आहे. सोमवार दि. ३ नोव्हेंबर रोजी सकाळी रंगारेड्डी जिल्ह्यातील चेवेल्ला मंडलमधील मिर्झागुडा गावाजवळ एका खडी भरलेल्या टिपर लॉरीने टीजीएसआरटीसीने भाड्याने घेतलेल्या बसला जोरदार धडक (Telangana Road Accident) दिली आहे. या अपघातात १४ महिला आणि १० महिन्यांच्या बाळासह १९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २५ जण जखमी झाले आहेत.
हैदराबाद-विजापूर महामार्गावर सकाळी ६.१५ च्या सुमारास ही घटना (Telangana Road Accident) घडली. पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, पाटणचेरूमधील लकदारम येथून मानेगुडा येथे खडी वाहून नेणारा टिपर दुसऱ्या वाहनांना ओव्हरटेक करत अतिशय वेगाने जात होता. खड्डा टाळण्यासाठी, चालक अचानक वळला आणि रस्त्याच्या चुकीच्या बाजूला गेला. त्याचवेळी ७२ प्रवाशांना घेऊन येणाऱ्या बसला धडकला.
दरम्यान माध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ७२ प्रवाशांना घेऊन येणाऱ्या बसची प्रवासी क्षमता ही केवळ ३५ची होती. ही धडक अतिशय भीषण होती, ज्यात महाराष्ट्रातील २४ वर्षीय 'आकाश कामले' आणि तंदूर-हैदराबाद मार्गावर पाच वर्षांपासून बस चालवणारा आरटीसी चालक 'दस्तगिरी बाबा' या दोन्ही वाहन चालकांचा जागीच मृत्यू झाला असून, बसचा पुढचा भाग ओळखता न येण्याइतपत चिरडला गेला आहे. (Telangana Road Accident)
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला शोक...
पंतप्रधान नरेंद्र मोदी एक्सवर पोस्ट करत म्हणाले, "या कठीण काळात माझ्या भावना बाधित लोकांसोबत आहेत. त्याचबरोबर जखमींना लवकर बरं वाटावं यासाठी प्रार्थना करतो", त्याबरोबरच पंतप्रधानांनी मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रूपये, तर जखमींना ५०,००० रूपयांची मदत जाहीर केली आहे.