मुंबई : (Maharashtra Local Body Elections) राज्य निवडणूक आयोगाची मंगळवार दि. ४ नोव्हेंबर रोजी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात मुंबईमध्ये पत्रकार परिषद पार पडली. यावेळी निवडणूक आयोगाने २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींचा निवडणुक कार्यक्रम जाहीर केला आहे. या दोन्ही संस्थांच्या निवडणूका येत्या २ डिसेंबरला होणार असून त्यानंतर लगेचच ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे.
त्याबरोबरच विरोधकांनी केलेल्या दुबार मतदानावरही निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलं आहे. अशा प्रकारचं संभाव्य दुबार मतदार रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने 'डबल स्टार'ची स्ट्रॅटेजी आखल्याचे सांगितले आहे. (Maharashtra Local Body Elections)
पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, मतदारयादीत ज्या- ज्या व्यक्तींची दोनदा नावे आहेत, ती नावे 'डबल स्टार'ने चिन्हांकित करण्यात आलेली आहेत. त्यानुसार 'डबल स्टार' असणाऱ्या मतदारास कोठेही दुसरीकडे मतदान करणार नसल्याची हमी द्यावी लागणार आहे. तसेच मतदानाच्या दोन दिवस आधी दुबार मतदारांची निश्चित संख्या स्पष्ट होईल अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. (Maharashtra Local Body Elections)
दरम्यान, ज्या मतदाराच्या नावापुढे 'डबल स्टार' म्हणजेच, मतदारांच्या यादीत दोनदा नाव असेल तो कोणत्या केंद्रावर मतदान करणार आहे याची माहिती त्या व्यक्तीला द्यावी लागणार आहे. त्यानुसार त्याने मतदान केल्यानंतर तशी माहिती दुसऱ्या केंद्रावर देण्यात येणार असल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.
Maharashtra Local Body Elections - असे असेल निवडणुकीचे वेळापत्रक...
अर्ज दाखल करण्यास सुरुवात - १० नोव्हेंबर
अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख - १७ नोव्हेंबर
अर्जाची छाननी - १८ नोव्हेंबर
अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख - २५ नोव्हेंबर
मतदान - २ डिसेंबर
मतमोजणी - ३ डिसेंबर
विभागनिहाय नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुका
कोकण - १७
नाशिक - ४९
पुणे - ६०
संभाजीनगर - ५२
अमरावती - ४५
नागपूर - ५५