दिशादर्शक विजय

    04-Nov-2025
Total Views |
 
India Win First-Ever ICC Women
 
दीप्ती शर्माच्या गोलंदाजीवर दक्षिण आफ्रिकेची फलंदाज डी. लर्कचा झेल भारतीय कर्णधार हरमनप्रीतच्या हातात विसावला आणि भारतीय चाहत्यांनी एकच जल्लोष केला. भारतीय संघाने २०२५च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत अप्रतिम कामगिरी करत मिळवलेले हे विजेतेपद आपल्या महिला क्रिकेटला एक नवी संजीवनी देणारे ठरेल, यात काहीही शंका नाही. १९८३च्या विजयानंतर आपल्याकडचे क्रिकेट बदलले, तसेच महिला क्रिकेटदेखील आता वेगळे आणि मोठे वळण घेईल, अशी आशा आहे. हा विजय भारतीय महिला क्रिकेटला एक नवी दिशा देईल, हे नक्की!
 
महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने दर्जेदार खेळी करत, सर्वच क्रिकेट रसिकांची मने जिंकली. आज हरमन, स्मृती, दीप्ती, जेमिमा, शफाली, रिचा ही नावे घरोघरी पूजली जाणार आहेत. कारण, हा विजय केवळ एका संघाचा नसून, करोडो भारतीयांचा आहे. हरमन आणि तिच्या संघाचे कितीही कौतुक केले, तरी ते अपुरेच असेल.
 
या स्पर्धेची सुरुवात होण्याच्या आधी आपली कर्णधार हरमनप्रीतने सांगितलेच होते की, ‘भारतीय संघासाठी ही स्पर्धा महत्त्वाची असेल आणि आम्ही या विजेतेपदाचे मुख्य दावेदार असू.’ पण, महिला क्रिकेटमध्ये जिथे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारखे संघ असतात, तिथे इतर संघांना फारसा वाव नसतो. या दोन्ही संघांनी महिला क्रिकेटचा दर्जा वेगळ्या स्तरावर नेला आहे. या दोन्ही संघांनी विश्वचषक स्पर्धा अनेकदा जिंकली. पण, महत्त्वाची गोष्ट अशी की, हे दोन्ही संघ उपांत्य फेरीमध्ये पराभूत झाल्यामुळे, यावर्षी महिला विश्वचषक स्पर्धेला नवीन विजेता मिळणार, ही गोष्ट स्पष्ट झाली.
 
स्पर्धेची प्राथमिक फेरी उत्तम झाली. ऑस्ट्रेलियन संघाने साखळी गटातले आपले सर्व सामने जिंकून महिला क्रिकेटमधील आपले वर्चस्व अजूनच अधोरेखित केले. इंग्लिश संघदेखील चांगला खेळत होता. हे दोन्ही संघ उपांत्य फेरीत प्रवेश करणार, हे निश्चित होते. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी ही स्पर्धा म्हणजे ‘रोलर कोस्टर राईड’ होती. इंग्लंड विरुद्ध पहिल्याच सामन्यात ते केवळ ६९ धावांमध्ये बाद झाले. पण, त्यांनी इतर सर्व संघांना हरवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धदेखील ते कमी धावसंख्येत बाद झाले, पण भारत आणि न्यूझीलंडसारख्या संघांना सहज हरवत त्यांनीदेखील उपांत्य फेरीत प्रवेश केला. आता प्रतीक्षा होती, ते उपांत्य फेरीत खेळणार्‍या चौथ्या संघाची.
 
भारतीय संघासाठीदेखील काही वेगळी परिस्थिती नव्हती. आपल्या संघाने इतर आशियाई संघांना पराभूत करीत सुरुवात तर चांगली केली, पण इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मात्र हार पत्करली. हे दोन्ही पराभव जिव्हारी लावणारे होते. इंग्लंड विरुद्ध चार धावांनी, तर आफ्रिकेविरुद्ध अगदी अटीतटीच्या लढतीत आपण पराभूत झालो. ऑस्ट्रेलियाविरुद्धदेखील मोठी धावसंख्या उभारल्यानंतर भारतीय संघ पराभूत झाला. यानंतर भारतीय संघावर टीकादेखील झाली. यानंतर उपांत्य फेरीत प्रवेशासाठी आपल्याला न्यूझीलंड संघाला पराभूत करणे आवश्यक होते. नवी मुंबईत झालेल्या सामन्यात आपण न्यूझीलंडलादेखील छोबीपछाड दिला आणि उपांत्य फेरीचे तिकीट निश्चित केले. उपांत्य फेरीत आपला सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणे कायमच आव्हानात्मक असते आणि इथे तर विश्वचषकाचा उपांत्य सामना होता. ही लढाई चुरशीची होणार, यात शंका नव्हती!
 
नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील मैदानावर त्यादिवशी ‘न भूतो न भविष्यति’ असा सामना झाला. ऑस्ट्रेलियन संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांमध्ये ३३८ धावांचा डोंगर रचला. फिबी लिचफील्ड, एलिस पेरी आणि अ‍ॅशली गार्डनर यांच्या तुफानी फटकेबाजीपुढे भारतीय संघ बॅकफूटवर गेला होता. त्यातच फलंदाजी करताना आपण आपल्या सलामीवीर शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना यांच्या विकेट्स लवकर गमावल्या. पण, त्यानंतर त्या मैदानावर वादळ आलं. मुंबईच्याच जेमिमा रॉड्रीग्झने संपूर्ण खेळाचा ताबा आपल्या हाती घेत दर्जेदार खेळाचे प्रदर्शन घडवले. कप्तान हरमनप्रीतनेदेखील तिला चांगली साथ दिली. जेमिमाची ती खेळी म्हणजे तिच्या भावनांचा उद्रेक होता. तिने आणि हरमनने हळूहळू धावा गोळा करत भारतीय संघाला विजयाच्या जवळ नेले. हरमन बाद झाल्यानंतरदेखील जेमिमा गडबडली नाही. उलट तिने अधिक जबाबदारीने खेळ करत, इतर खेळाडूंना हाताशी धरत विजय मिळवला. या सामन्यात तिने केलेले शतक हे भारतीय क्रिकेटमधील एक मैलाचा दगड ठरावे. तिच्या या खेळीने भारतीय संघाला तिसर्‍यांदा क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जागा मिळवून दिली.
 
अंतिम सामनादेखील चांगलाच रंगला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला फलंदाजीसाठी पाचारण केले. आपल्या सलामीच्या फलंदाजांनी संयमी खेळ करत धावा जमवायला सुरुवात केली. स्मृती तिच्या नेहमीच्याच पद्धतीने खेळत होती. या सामन्यात ही सलामीची सूत्रे शफालीने आपल्या हाती घेतली होती. तिने काही चांगले फटके मारले. आपल्या सर्वच प्रमुख फलंदाजांनी धावसंख्येचा भर टाकण्याचे काम केले. स्मृती, हरमन, जेमिमा या सर्वच खेळाडू आपापले योगदान देत होत्या. पण, डावाच्या शेवटी दीप्ती शर्मा आणि रिचा घोष यांनी मनसोक्त फटकेबाजी करत आपल्याला ३००च्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले.अर्थात, दक्षिण आफ्रिकेच्या बॅटिंगचा विचार करता, कदाचित ही धावसंख्यासुद्धा अपुरी पडली असती. त्यांची कप्तान लॉरा वोल्व्हार्ट चांगल्या फॉर्ममध्ये होती. उपांत्य सामन्यात तिने इंग्लंडविरुद्ध मोठे शतक केले होते. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी फलंदाज, लॉराच्या फलंदाजीवर दक्षिण आफ्रिकेचा संघ विसंबून होता. तिने सुरुवात पण चांगली केली होती. भारतीय गोलंदाजीची लय बिघडण्याचे काम तिने चांगले केले. पण, एका पाठोपाठ एक आफ्रिकेचे खेळाडू बाद होत गेले. भारतीय गोलंदाजांनी, खासकरून शफाली वर्मा आणि दीप्ती शर्मा यांनी चांगली गोलंदाजी केली. दोघींनीही वेळोवेळी बळी घेतले. वोल्व्हार्टने मात्र उत्तम खेळ करत शतक पूर्ण केले. तिच्या फलंदाजीमध्ये नजाकत होती. ती बाद झाल्यानंतर मात्र आफ्रिकन फलंदाजांनी शरणागती पत्करली आणि भारताचा विजय सुकर झाला. भारतीय संघाने ५२ धावांनी विजय मिळवत विश्वचषकावर आपले नाव कोरले.
 
या स्पर्धेत आपल्या सर्वच खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. अनुभवी हरमन, स्मृती, दीप्ती, रेणुका, जेमिमा यांचा प्रभाव तर दिसलाच, पण नवीन दमाच्या श्री चरणी, क्रांती, शफाली, प्रतिका, रिचा यांनीदेखील अप्रतिम खेळ केला. प्रतिकाला दुखापत झाल्यानंतर तिच्या जागी आलेल्या शफालीने अंतिम सामन्यात आपली चमक दाखवली. स्मृतीबरोबर सलामीला येताना तिने फटकेबाजी करत आफ्रिकेच्या संघावर वर्चस्व गाजवले, तर नंतर गोलंदाजी करताना दोन बळीदेखील घेतले. तिला अंतिम सामन्याची सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात आले. या स्पर्धेत स्मृती भारताकडून सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली, तर दीप्तीने स्पर्धेतील सर्वांत जास्त बळी घेण्याचा आणि ‘प्लेयर ऑफ द टूर्नामेंट’ हा किताब पटकावला. जेमिमाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेली खेळी तर संग्रहालयात जपून ठेवावी अशीच होती. तिच्यासाठी ही स्पर्धा म्हणजे तिच्या भावनांचा उद्रेक होता. सामन्यांत अपेक्षित कामगिरी न होणे, अंतिम ११ मधून बाहेर गेल्यानंतरचा त्रास, परत संघात आल्यानंतर आपली कामगिरी उंचावण्याची गरज आणि उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना केलेले दमदार शतक या सगळ्याचा परिपाक म्हणजे जेमिमा रॉड्रीग्झ होती. तिने अगदी लहान वयात खेळातील प्रगल्भता दर्शवली असे म्हटले, तर वावगे ठरणार नाही. कप्तान हरमनप्रीतनेदेखील वेळोवेळी आपला दर्जा दाखवून दिला. तिच्या कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यावरील हा विजय म्हणजे एकप्रकारे तिच्या खेळाचा गौरवच आहे.
 
या सर्वांमध्ये एका व्यक्तीचे आभार मानणेदेखील तेवढेच महत्त्वाचे. अमोल मुजुमदार हा आपल्या क्रिकेटमधील ध्रुवतारा आहे. दुर्दैवाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा टिळा भाळी न लागलेल्या अमोलने दोन- अडीच वर्षांपूर्वी या संघाचा प्रशिक्षक म्हणून धुरा हाती घेतली आणि संघाचे रुपडेच बदलून टाकले. क्रिकेटच्या या स्तरावर प्रशिक्षक म्हणून काम करताना तुम्हाला फलंदाजी आणि गोलंदाजी कशी करावी, हे शिकवायचे नसते, तर एक खेळाडू आणि संघ म्हणून तुम्ही अजून किती प्रगल्भ व्हाल, याकडे लक्ष द्यायचे असते. अमोलने नेमके हेच केले. गोलंदाजी प्रशिक्षक आविष्कार साळवी आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक मुनीश बाली यांना हाती धरून त्याने या संघात विजिगीषु वृत्ती निर्माण केली, कोणत्याही परिस्थिती हार न विचार मनावर ठसवला आणि त्याचेच परिणाम या स्पर्धेत दिसून आले. तो संघासाठी काय होता, संघात त्याचे योगदान काय होते, हे सामना संपल्यानंतर खेळाडूंच्या वर्तनातून दिसले. त्याच्या हाती विश्वचषकाची ट्रॉफी देताना प्रत्येक खेळाडूने जणू त्याला धन्यवाद दिले. खेळाडूंकडून मिळणारा हा आदर कमवावा लागतो आणि अमोल त्यासाठी नक्कीच पात्र होता.
 
हा विश्वचषक खर्‍या अर्थाने भारतीय महिला क्रिकेटला पुढे घेऊन जाणारा असेल. भारतीय महिला क्रिकेटला जवळजवळ ५० वर्षांचा इतिहास आहे. हा विजय म्हणजे, आपल्या संघाने गेल्या ५० वर्षांमधील सर्व महिला क्रिकेटपटूंना दिलेली मानवंदना होती. गेल्या पाच दशकांमध्ये डायना एडलजी, शुभांगी कुलकर्णी, शांता रंगास्वामी, संध्या अगरवाल, अंजु जैन, पूर्णिमा राव, अंजुम चोप्रा, नीतू डेव्हिड, मिताली राज, झुलन गोस्वामी आणि इतर अनेक खेळाडूंनी भारतीय क्रिकेटची सेवा केली आहे. अनेक खेळाडूंनी या खेळाला आपले सर्वस्व दिले आहे. हा विजय म्हणजे त्यांनी लावलेल्या आणि जोपासलेल्या, वाढवलेल्या झाडाला आलेले फळ आहे. आज ते फळ आजचा संघ चाखत असला, तरी त्यांनी या जुन्या खेळाडूंचीदेखील दखल घेतली. मैदानावर उपस्थित असलेल्या बहुतेक सर्वच जुन्या खेळाडूंना भेटून, त्यांच्याशी हितगुज करत हरमन आणि संघाने त्यांच्याप्रति असलेल्या आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांचे हे वर्तन खूप काही सांगून जाणारे ठरले.
 
१९८३ मध्ये कपिल देवच्या संघाने विश्वचषक विजय मिळवल्यानंतर आपल्या देशातील क्रिकेटचे रुपडेच बदलून गेले. आता या विजयानंतर महिला क्रिकेट बदलेल, अशी आशा करूया. या क्रिकेटवेड्या देशात अजूनही महिला क्रिकेटला पाहिजे, तसा आधार नाही. गेल्या काही वर्षांमध्ये हे चित्र बदलते आहे, पण महिला क्रिकेटच्या प्रगतीसाठी अजूनही मोठा वाव आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, या विजयानंतर आपल्याला अनेक नवनवीन महिला खेळाडू मिळाव्यात. आजही मुलांना क्रिकेट किंवा इतर कोणताही खेळ खेळण्यासाठी जितके प्रोत्साहन घरातून मिळते, तितके मुलींना मिळत नाही. या विजयानंतर भारतीय समाजामधील या विचारसरणीत फरक पडावा. गेल्या काही वर्षांमध्ये ‘बीसीसीआय’ने अनेक पावले उचलत महिला क्रिकेटला मुख्य प्रवाहात आणले आहे. येणार्‍या काळात भारतीय महिला क्रिकेट अजूनच वेगळ्या स्तरावर जाईल, अशीच आशा करूया. एकूणच हा भारतीय क्रिकेटमधील दिशादर्शक विजय म्हणावा लागेल.



कौस्तुभ चाटे