मनसेचे पानिपत अटळ

04 Nov 2025 12:50:57
 
MNS
 
महाविकास आघाडीच्या वळचणीला जात काल-परवा मुंबईमध्ये पार पडलेल्या ‘सत्याच्या मोर्चा’मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी उभे आयुष्य ज्यांना विरोध केला, त्या महाविकास आघाडीतील नेत्यांच्या मांडीला-मांडी लावून बसल्याचे अवघ्या महाराष्ट्राने पाहिले. राजकीय सोय म्हणून राज ठाकरे यांचे वागणे सोयीचे असले, तरी वैचारिकदृष्ट्या त्यांचा झालेला बुद्धिभेद राज यांना मानणार्‍या वर्गाला निश्चितच पटला नसेल. पण, राजकारणाच्या नावाखाली सतत भूमिका बदलणार्‍या राज यांना कोण सांगेल की, हे वागणं बरं नाही. जेव्हा पक्ष म्हणून पहिल्याच निवडणुकीला सामोरे गेलेले राज यांनी ‘एकदा नाशिकची सत्ता देऊन तर बघा, विकास नाही झाला तर पुन्हा तुमच्या दारात मत मागायला येणार नाही,’ अशी भावनिक साद नाशिककरांना घातली होती.
 
आपल्या प्रत्येक सभेत मंत्री छगन भुजबळ यांची नक्कल करण्याची एकही संधी राज यांनी सोडली नाही. राज यांनी केलेली नक्कल आणि विकासाच्या दाखवलेल्या स्वप्नाला भूलत नाशिककरांनी त्यांना भरभरुन मतदान करत मनसेचे ‘इंजिन’ महापालिकेच्या फलाटावर उभे केले. पण, पाच वर्षांत विकास न झाल्याने पुढच्या प्रत्येक निवडणुकीत त्यांना मतदारांनी नाकारले. त्यामुळेच आपले राजकीय अस्तित्व धोक्यात आलेल्या मनसेच्या कारभार्‍यांनी पडत्या फळाची आज्ञा मानत संपण्याच्या मार्गावर असलेले आपले चुलत बंधू उद्धव ठाकरे यांना टाळी देत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले. मात्र, नाशकात कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांची वानवा असलेला पक्ष निवडणुकीला कसा सामोरा जाणार आणि विजय मिळवणार, याचे कोडे राजकीय विश्लेषकांना पडले आहे.
 
नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीचे गणित पाहता, काँग्रेस आणि शरद पवार गट हे दोन्ही पक्ष प्रभावहीन आहेत, तर गळती थांबली नसल्याने उबाठा गटही पुरता घायाळ झाला आहे. याउलट भारतीय जनता पक्षाने बूथ स्तरापासून सूक्ष्म नियोजन करत आपले संघटन इतके मजबूत केले आहे की, पुढच्या दोन निवडणुका तरी कोणाही ते भेदू शकतील याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह महाविकास आघाडीचे नाशिकमध्ये पानिपत होणार, हे अटळ!
 
 
चाचपडणारा उबाठा गट
 
 
 
नाशिकमध्ये मनसेची वाट जशी बिकट आहे, अगदी तशीच उबाठा गटाची अवस्था. एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये आपले अस्तित्व टिकविण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागत आहे. आपापल्या भागात पक्षाची ओळख निर्माण करणारे अनेक बिनीचे शिलेदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य करत शिवसेनेत दाखल झाले. परिणामी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाताना कोणता चेहरा द्यावा, जेणेकरुन मतदारांचा विश्वास बसेल, या विवंचनेत उद्धव ठाकरे निश्चितच असतील.
 
गत विधानसभा निवडणुकीला हट्टाने ठाकरे यांनी तीन मतदारसंघ पदरात पाडून घेतले. पण, तिन्ही ठिकाणी पक्षाची हाराकिरी झाली. त्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी पाहिजे ती रसद पुरवणारे सुधाकर बडगुजर यांची ठाकरे यांनी हकालपट्टी करत स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला. हे कमी की काय, म्हणून तत्कालीन महानगरप्रमुख विलास शिंदे यांनाही बाहेरचा रस्ता दाखवला. त्यांनी आपली ताकद दाखवत अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्यासोबत नेत चांगला पक्ष रिकामा केला. या घटनेला आठ दिवस होत नाही, तोच उपनेते सुनील बागूल आणि नवनियुक्त महानगरप्रमुख मामा राजवाडे यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यामुळे नाशिकमध्ये उबाठा गट पुरता नामोहरम झाल्याचे सध्यातरी दिसते. त्यात सतत नाशिममध्ये येऊन संघटनेत डोकावणारे विश्वप्रवक्ते संजय राऊत प्रकृती अस्वास्थ्यामुळे काहीसे दुरावले आहेत.
 
त्यात मागील महापालिका निवडणुकीत निवडून आलेले जवळजवळ सर्वच नगरसेवक आपले राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत. त्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची गळती थांबविण्यासाठी उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांना एकदाही नाशिकला येण्याची तसदी घेण्याची गरज वाटली नाही. यांच्यासोबतच युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई कार्यकर्त्यांचा फोनही उचलत नसल्याने निवडणूक कोणाच्या जोरावर लढवायची, या विवंचनेतून पक्ष सोडून गेले आणि आता दुसर्‍या पक्षातून निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत. या सगळ्या एकत्रित कारणांमुळे नाशिकमध्ये उबाठा गटाचे भविष्य सध्यातरी अंधकारमय दिसते. सध्यातरी ठाकरेंना नाशिकचे मैदान अवघडच!


विराम गांगुर्डे
Powered By Sangraha 9.0