प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्वतःसोबत समाजाच्या उत्थानासाठी कार्यरत पुण्याच्या मनोज भालेराव यांच्याविषयी...
पुण्याचे मनोज भालेराव हे आर्थिक सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. ‘प्रथमेश फायनान्शिअल सर्व्हिसेस’, ‘एमबी अॅडव्हायझरी’ या त्यांच्या दोन कंपन्या. या कंपन्यांद्वारे आर्थिक सल्लागार आणि आर्थिक सहकार्य मिळवून देण्याासठी ते काम करतात. त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार-प्रसारात ते अग्रेसर आहेत. वृद्धाश्रम आणि अनाथाश्रम या ठिकाणी ते सातत्याने भेट देतात. भेटवस्तू देणे, स्नेहभोजन करणे हे तर नित्याचे, पण त्यापलीकडे जाऊन वृद्धाश्रमातील त्या एकट्या पडलेल्या ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधणे, मुलाचे प्रेम-स्नेह देणे, तसेच अनाथाश्रमातील बालकांना किशोरवयीन मुलांना पित्याचे प्रेम देणे, आधार देणे, यासाठी मनोज व्यस्त जीवनातून वेळ काढतातच काढतात. समाजात विघातक शक्ती फूट पाडण्याचा प्रयत्न करत असतात. या पार्श्वभूमीवर मनोज समाजातली दरी कशी दूर करता येईल, यासंबंधात काम करतात. ‘एक गाव, एक स्मशान’ ही संकल्पना प्रत्येक गावात निर्माण व्हावी, यासाठीचे त्यांचे प्रयत्न महत्त्वाचे आहेत.
मनोज भालेराव यांच्या जीवनाचा मागोवा घेतला, तर कवी हरीवंश राय बच्चन यांची काव्यपंक्ती आठवते. ते एका कवितेत म्हणतात,
तू न थकेगा कभी!
तू न थमेगा कभी!
तू न मुड़ेगा कभी!
कर शपथ, कर शपथ, कर शपथ!
अग्निपथ! अग्निपथ! अग्निपथ...
या काव्यपंक्ती म्हणजे मनोज भालेराव यांच्या जीवनाचे प्रातिनिधिक उदाहरण म्हणता येईल.
पांडुरंग भालेराव आणि सुमनबाई हे कुटुंब मूळचे पुण्याच्या मुळशी तालुक्यातील मुठा गावचे. कामानिमित्त पुण्यात स्थायिक झाले. पांडुरंग हे एका कंपनीत कामाला, तर सुमनबाई या अंगणवाडी सेविका. दोघांना तीन अपत्ये. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हेच जीवनसूत्र असे कुटुंबाचे वातावरण. परिसरात बाबासाहेबांच्या विचारांचा जागर व्हावा, म्हणून पांडुरंग विविध उपक्रम राबवित. घरची आर्थिक परिस्थिती बेतास बेतच होती. मात्र, बाबासाहेबांच्या विचारप्रसारासाठी पांडुरंग यांनी घरचे दागिनेही विकलेले. कारण, बाबासाहेबांचे विचार हाच खरा दागिना, हे त्यांचे म्हणणे. या संस्कारांत वाढलेल्या मनोज यांना बाबासाहेबांच्या विचारांचे बाळकडू मिळाले नसेल, तर नवल!
असो. मुलाने वकील व्हावे, असे सुमनबाईंना वाटे. मनोजवर त्यांचा भारी जीव. तर पांडुरंगाचे एकच म्हणणे असे, काहीही हो, पण बाबासाहेबांना विसरू नकोस. पुढे दहावीनंतर वकिलीचे शिक्षण घेण्यासाठी त्यांनी कलाशाखेत प्रवेश घेतला. पण, आयुष्यात वेगळेच घडणार होते. मनोज बारावी इयत्तेत असतानाच वडिलांना अचानक पॅरालिसीसचा अटॅक आला. घरचा कर्ता पुरुष अंथरुणाला खिळला आणि घराचे वासे फिरले. तसे मोठा भाऊही छोटे-मोठे काम करायचा, पण बाबांच्या उपचाराचा खर्च आणि घरदार सांभाळणे यांची भयंकर ओढाताण होऊ लागली. त्यामुळे मनोज यांनी शिक्षण सोडले आणि ते मार्केट यार्डमध्ये भाजी पुरवठादार म्हणून काम करू लागले. पहाटे ३ वाजता उठून ते मार्केटमध्ये जात, भाजी विकत घेत आणि परिसरातील हॉटेलला त्या देत असत. दुपारी १२ वाजेपर्यंत हे काम चाले. संध्याकाळी पुन्हा हॉटेल्सला भेट देत दुसर्या दिवशी कोणत्या भाज्या हव्या, याची ऑर्डर घेत. सलग पाच वर्षे हे काम सुरू होते. याच काळात बाबांचे निधन झाले आणि काही महिन्यांतच कळले की आईला कर्करोगाने गाठले.
थकल्यावर, निराश झाल्यावर आई म्हणजे मनोज यांची आधार होती. आजाराचे निदान झाल्यानंतर मनोज आईसोबत सावलीसारखे राहिले, तिला एकटेपणा, वेदना जाणवू नये, याची काळजी घेतली. या काळात आईने मनोजकडून वचन घेतले की "कसलंच व्यसन करू नकोस. खूप शिक.” आईसारखे हेच म्हणायची. २०-२१ वर्षांच्या मनोज यांनी आईला वचन दिले. पण, काही काळातच कर्करोगाने आईचे निधन झाले. दुर्दैव असे की, पुढे सहा महिन्यांतच त्यांच्या एकुलत्या एक बहिणीचेही अल्पआजाराने निधन झाले. १९९९ ते २००१ या काळात आईबाबा आणि बहिणीचा मृत्यू. एकावर एक धक्के त्यांना बसले. काय करावे? आत्महत्या? की व्यसनाधीन व्हावे? मात्र, आईला त्यांनी वचन दिले होते की, कधीच व्यसन करणार नाही. त्यामुळे निराशेतून बाहेर येण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’, ‘मृत्युंजय’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र’ ही पुस्तकं वाचून त्यांच्या निराश मनात पुन्हा जगण्याचे विचार सुरू झाले.
त्यांनी आर्थिक सल्लागार म्हणून कार्यरत असणार्या एका खासगी कंपनीत नोकरी सुरू केली. काम करता करताच त्यांनी ‘अर्थशास्त्र’ या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. दरम्यान, प्रणाली यांच्याशी त्यांचा विवाह झाला. आयुष्यात थोडी स्थिरता आली. याच काळात त्यांनी आर्थिक सल्लागार क्षेत्रातल्या बारकाव्यांचा अभ्यास केला. आर्थिक सल्लागार म्हणून व्यवसाय करावा, असे ठरवत त्यांनी ‘प्रथमेश फायनान्शियल सर्व्हिसेस’ ही कंपनी सुरू केली. घरासाठी कर्जसुविधा पुरवण्यापासून पुढे साखर कारखान्यांना कर्ज उपलब्ध करण्यापर्यंत त्यांनी झेप घेतली. हे सगळे करत असताना त्यांनी सामाजिक बांधिलकी सोडली नाही. त्यांचे वर्गमित्र निलेश गद्रे यांच्याशी सामाजिक परिस्थितीवर त्यांचा संवाद होई. त्यातूनच ते सक्रिय समाजकारणात कार्य करू लागले. मनोज म्हणतात, "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे खरे राष्ट्रनिष्ठ, समाजनिष्ठ विचार समाजात पोहोचवण्यासाठी आयुष्यभर काम करणार आहे.” ‘कर शपथ, कर शपथ अग्निपथ...’ म्हणत प्रतिकूल परिस्थितीला टक्कर देत स्वतःसोबत समाजाचा विकास साधू पाहणारे मनोज भालेराव हे समाजासाठी म्हणूनच दीपस्तंभ आहेत.