मिया मुस्लिमांविरोधातील आसामी लढा...

    04-Nov-2025   
Total Views |
 
Miya Muslims
 
फार पूर्वीपासून असे म्हटले जाते की, भविष्यात एक दिवस असा येईल, जेव्हा बांगलादेशातून आसाममध्ये स्थायिक झालेल्या मिया मुस्लिमांपैकी एक व्यक्ती आसामची मुख्यमंत्री होईल. पण, हे विधान केवळ भयनिर्माण करणारे नसून, आसामचे वास्तव मांडणारे आहे. याच घुसखोरीविरोधात आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा नेटाने लढा देत आहेत. त्याविषयी...
 
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी "जे बांगलादेशी आसाममध्ये बेकायदेशीरपणे स्थायिक झाले आहेत आणि जे घुसखोर आहेत, त्यांच्याविरुद्धचा आपला लढा सुरूच राहील. आपण जोपर्यंत आसामचे मुख्यमंत्री आहोत, तोपर्यंत हा लढा सुरु राहील,” असा निर्धार नुकताच व्यक्त केला. ते मोरीगाव येथे पत्रकारांशी बोलत होते. ज्या बांगलादेशी मूळ मुस्लिमांनी येथे अतिक्रमण केले आहे, त्यांना तेथून हाकलून देण्याची आपली मोहीम सुरूच राहील. मिया मुस्लिमांच्या विरुद्धचा आपला लढा सुरूच राहील. त्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत कसलीही तडजोड केली जाणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितले.
"गायक झुबीन गर्ग याच्या दुर्दैवी मृत्यूनंतर विरोधी पक्षांकडून जे घाणेरडे राजकारण खेळले गेले, ते राजकारणही मिया मुस्लिमांची हकालपट्टी रोखू शकणार नाही. आम्ही झुबीन गर्ग यांना न्याय देऊ आणि त्याचवेळी जे बेकायदेशीर बांगलादेशी मूळ स्थायिक आणि घुसखोर यांच्याविरुद्धची मोहीमही एकाचवेळी सुरु राहील,” असे मुख्यमंत्री सरमा यांनी स्पष्ट केले.
 
आसामच्या विविध जिल्ह्यांत जंगलामध्ये आणि सरकारी जमिनीवर बेकायदेशीर वस्ती केलेल्या मिया मुस्लीम कुटुंबांना सरकारने जागा खाली करण्यासंबंधी नोटिसा बजाविल्या आहेत. गेल्या ३० ऑटोबर रोजी जिल्हा प्रशासनाने अनेक वर्षे शासकीय जमिनीवर राहत असलेल्या २९ कुटुंबांना तेथून हलविले. मिया मुस्लिमांच्या विरुद्धचा हा संघर्ष पुढील ३० वर्षे सुरु ठेवण्याची आवश्यकता आहे, तरच आसामी जनता राज्यात सुरक्षितपणे राहू शकेल, असे मुख्यमंत्री सरमा यांनी म्हटले आहे. पुढील जनगणना ज्यावेळी होईल, त्यावेळी आसाममध्ये मिया मुस्लीम हा सर्वांत मोठा समाज असेल, असा सावधगिरीचा इशारा मुख्यमंत्री सरमा यांनी आसामी जनतेला दिला. आसाममधील एकूण लोकसंख्येच्या ३८ टक्के इतकी लोकसंख्या मिया मुस्लिमांची झालेली असेल. मागील जनगणनेची आकडेवारी आणि त्यांच्या लोकसंख्या वाढीचा वेग यावरून कोणीही हा निष्कर्ष काढू शकेल, असे मुख्यमंत्र्यांनी निदर्शनास आणून दिले.
 
आसाममधील हे वास्तव आहे. हे लक्षात घेऊन मिया मुस्लिमांच्यापासून आसामी जनतेचे संरक्षण करणे हे आपले उद्दिष्ट आहे, असे सांगून मुख्यमंत्री सरमा म्हणाले की, "गेल्या पाच वर्षांपासून आपण जसे कार्य करीत आहोत, तसे कार्य गेल्या ३० वर्षांपासून केले गेले असते, तर ही समस्या उद्भवलीच नसती. पण, आता गेल्या पाच वर्षांपासून ही लढाई सुरु झाली आहे आणि त्यतून आवश्यक तो परिणाम साधला जाईपर्यंत ती सुरु ठेवणे आवश्यक आहे. मिया मुस्लिमांच्या विरुद्ध जो दबाव ठेवला जात आहे, तो कायम ठेवला पाहिजे. हा दबाव कायम ठेवल्यास परिस्थिती आपल्या नियंत्रणात राहील, अन्यथा नियंत्रणाबाहेर जाईल,” याकडेही आसामच्या मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले आहे. आसाममधील बांगलादेशी घुसखोरांची समस्या किती भयंकर आहे, त्याची कल्पना यावरून यावी. पण, मुख्यमंत्री सरमा यांनी या भीषण समस्येविरुद्ध जोरदार कारवाई सुरु केली असल्याने, ही समस्या नियंत्रणात राहील अशी अपेक्षा आहे.
 
कल्याणसिंह यांचे नाव नव्या जिल्ह्यास देणार
 
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि ज्यांना ‘हिंदूहृदयसम्राट’ म्हणून ओळखले जाते, त्या दिवंगत कल्याणसिंह यांचे नाव उत्तर प्रदेशात नव्याने निर्माण केल्या जात असलेल्या जिल्ह्यास दिले जाणार आहे. उत्तर प्रदेशातील अत्यंत प्रभावशाली नेत्यांमध्ये कल्याणसिंह यांची गणना केली जाते. उत्तर प्रदेश सरकार अलिगढ आणि बुलंदशहर यातील भूप्रदेशातून ७६वा जिल्हा निर्माण करणार आहे. लवकरच निर्माण होणार्‍या या जिल्ह्यास माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह यांचे नाव दिले जाणार आहे. या नव्या जिल्हा निर्मितीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून मंत्रिमंडळाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. एक प्रशासकीय निर्णय आणि भावनिक आदरांजली म्हणून याकडे पाहिले जात आहे. ‘कल्याणसिंह नगर जिल्हा’ असे नाव या जिल्ह्यास दिले जाणार आहे. कल्याणसिंह यांचे राजकीय प्रभावक्षेत्र राहिलेल्या अलिगढ जिल्ह्यातील अत्रौली आणि गंगिरी या तालुयांचा आणि बुलंदशहरमधील दिबाई तालुयाचा या नव्या जिल्ह्यात समावेश केला जाणार आहे. अत्रौली हे कल्याणसिंह यांचे जन्मस्थान आहे. उत्तर प्रदेशचा राजकीय चेहरामोहरा ज्या नेत्याने बदलला, त्या नेत्यास ही अत्यंत योग्य आदरांजली ठरेल, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. कल्याणसिंह यांनी आपले संपूर्ण जीवन समाजसेवा, सांस्कृतिक अभिमान आणि सुशासन यासाठी व्यतित केले, कल्याणसिंह यांचे योगदान भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील, असेही योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. उत्तर प्रदेश सरकारकडून ‘कल्याणसिंह नगर’ नावाचा जो नाव जिल्हा निर्माण केला जाणार आहे, तो म्हणजे ज्या नेत्याने संपूर्ण देशात आदराचे स्थान प्राप्त केले आहे, त्या नेत्याचे जिवंत स्मारक म्हणून या जिल्ह्याकडे पाहिले जाणार आहे.
 
आयुषमान भारत : जगातील सर्वांत मोठी आरोग्यसेवा
 
सात वर्षांपूर्वी ‘प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ सुरु करण्यात आली. या सात वर्षांच्या काळात आरोग्यसेवेच्या क्षेत्रात या योजनेमुळे खूप मोठा बदल झाल्याचे दिसून आले. याअंतर्गत जी ‘आयुषमान भारत’ योजना सुरु करण्यात आली आहे, ती जगभरातील सर्वांत मोठी अशी आरोग्य विमा योजना ठरली आहे. या योजनेखाली आतापर्यंत ४२ कोटी आयुषमान कार्डे देण्यात आली आहेत. तसेच या योजनेखाली १२ कोटी कुटुंबांना आरोग्यसेवेचा लाभ मिळत आहे. या योजनेमुळे देशातील कोट्यवधी जनतेला दर्जेदार आणि परवडणारी आरोग्यसेवा मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २३ सप्टेंबर २०१८ या दिवशी ‘आयुषमान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजने’चा शुभारंभ करण्यात आला. या योजनेखाली प्रत्येक कुटुंबास दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्यसेवा दिली जात आहे. शासकीय आणि खासगी इस्पितळामधून ही आरोग्यसेवा घेता येणार आहे. कोणत्याही कुटुंबावर वैद्यकीय सेवा खर्चाचा भार पडता कामा नये, असा विचार पुढे ठेऊन ही योजना सुरु करण्यात आली. या योजनेची ऑटोबर २०२५ पर्यंतची आकडेवारी पाहिल्यास ४२ कोटी आयुषमान कार्डे देण्यात आली आहेत. या कार्डामुळे देशातील गरीब जनतेला १७ हजार ६८५ शासकीय आणि १५ हजार ३८० खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
 
२०२४-२५ च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार, या योजनेमुळे लाभधारकांचा आरोग्यसेवेवरील १.५२ लाख कोटी रुपये खर्च वाचला आहे. तसेच या योजनेखाली ८६ लाख ज्येष्ठ नागरिकांचा समावेश करण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकांना उतारवयात मोफत आरोग्यसेवा मिळणार असल्याने आरोग्यसेवेसाठी एवढे पैसे कोठून आणायचेस, याची चिंता या नागरिकांना वाटणार नाही. या योजनेखाली आर्थिकदृष्ट्या मागास अशा १२ कोटींहून अधिक कुटुंबांना आरोग्यसेवा लाभ मिळणार आहे. सार्वजनिक निधीचा वापर करून आरोग्यसेवा उपलब्ध करून देणारी ही जगातील सर्वांत मोठी अशी आरोग्य विमा योजना आहे. हृदयशस्त्रक्रिया, कर्करोग यांसारख्या आजारांवर या विमा योजनेखाली उपचार केले जात आहेत. ‘आयुषमान भारत’ कार्यक्रम हा केंद्र सरकार आणि राज्य सरकारे यांच्या सहकार्याने राबविला जात आहे. या योजनेसाठी २०२५-२६च्या केंद्रीय अर्थसंकल्पात ९ हजार ४०६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती, तर २०२२ -२३ आणि २०२४-२५ या काळात राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेश यांनी एकत्रितपणे पाच हजार कोटी रुपये गुंतविले होते. भारतातील सर्वसामान्य जनतेला विनाखर्च उत्तम आरोग्यसेवा देण्यामध्ये ही योजना चांगली आणि अभिमानास्पद कामगिरी करीत आहे.

दत्ता पंचवाघ

एम. ए. (अर्थशास्त्र), पत्रकारिता क्षेत्रात ३३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. ‘हिंदुस्थान समाचार’ या वृत्तसंस्थेपासून पत्रकारितेस प्रारंभ. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पर्यटन आदी विषयांवर विपुल लेखन. आकाशवाणी मुंबई केंद्रासाठी लेखन.